...तर २०२१ हे २०२० पेक्षाही भीषण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2020   
Total Views |
WFP_1  H x W: 0
 
यंदाचे वर्ष आता जवळपास संपल्यात जमा समजावे. चालू नोव्हेंबर आणि पुढचा डिसेंबर. खरंतर दरवर्षी वर्षाअखेर हा विचार प्रत्येकाच्या मनाला एकदा तरी स्पर्शून जातो की, ‘अरेच्चा, हे वर्षं संपलेसुद्धा. कधी आले, कधी गेले, कळलेच नाही ना!’ २०२० बाबतही जवळपास सर्वांचीच अशी भावना असेल, तर नवल ते काय...
 
 
 
जानेवारी, फेब्रुवारीनंतर मार्चपासून पुढे ‘लॉकडाऊन’ हां हां म्हणता म्हणता वाढतच गेला. मग सर्व ठप्प करणार्‍या ‘लॉकडाऊन’नंतर आता सगळं काही खुले करण्यासाठीची ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु आहे. असे हे २०२० वर्ष अनेक बर्‍या-वाईट अनुभवांसह कायमच प्रत्येकाच्या स्मरणात राहील, याबद्दल शंका नाहीच. पण, बहुतांशी नकारात्मकता आणि वाईट बातम्यांनी व्यापलेले हे वर्ष सरुन आता नवीन वर्षाचे, नवीन उमेदीने स्वागत करायला अवघे जग सज्ज असतानाच, संयुक्त राष्ट्र संघाच्या नोबेल विजेत्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने (डब्ल्यूएफपी) मात्र २०२१ हे वर्षं २०२० पेक्षाही भयंकर ठरणार असल्याचे भाकीत वर्तविल्याने काही देशांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
 
अजूनही कोविड महामारीचा विळखा जागतिक पातळीवर कमी झालेला नाही. काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा ‘लॉकडाऊन’ची वेळही उद्भवली. लसीवर संशोधन सुरुच आहे. अर्थव्यवस्था हळूहळू सावरण्याच्या मार्गावर आहेत. रोजगार, व्यवसायही पूर्ववत होण्यासाठी सरकारेही प्रयत्नशील आहेत. अशात ‘डब्ल्यूएफपी’चे प्रमुख असलेल्या डेव्हिड बेसले यांनी मात्र २०२१ मध्ये २०२० पेक्षाही भूकबळीच्या भयंकर संकटाला मानवजातीला सामोरे जावे लागू शकते, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
 
बेसले यांचा रोख संपूर्ण जगाकडे नसला, तरी यामध्ये २० देशांचा त्यांनी समावेश केला आहे, जिथे उपासमारीने उद्भवणार्‍या भूकबळींची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसते. यापैकी काही प्रमुख देश म्हणजे अफगाणिस्तान, कॅमरुन, काँगो, इथिओपिया, हैती, लेबॅनॉन, मोझांबिक, नायजर, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनुझुएला, झिम्बाव्बे इत्यादी. बेसले यांच्या मते, अन्न-धान्याच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे या देशांमधील भूकबळींची संख्या लाखोंनी वाढण्याची भीती आहे. दुष्काळासारख्या संकटाने अन्न-धान्याचे उत्पादन घटल्यास ही भूकबळींची संख्या जवळपास २७० दशलक्ष इतकी प्रचंड असू शकते, असे बेसले यांनी त्यांच्या एका व्हर्च्युअल मुलाखतीत स्पष्ट केले. बेसले यांनी सादर केलेल्या एका आकडेवारीनुसार, जगाच्या पाठीवर एप्रिल २०२० मध्येच १३५ दशलक्ष लोकं भूकबळीच्या सावटाखाली होते, कोविडमुळे या वर्षाच्या अखेरीसपर्यंत हीच संख्या आणखीन १३० दशलक्षने वाढून जवळपास २७० दशलक्षाच्या घरात जाऊ शकते, अशी भीती बेसले यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केली.
 
बेसले आणि ‘डब्ल्यूएफपी’चा उद्देश या मुलाखतीच्या माध्यमातून संबंधित देशांना आणि जगामध्ये घबराट पसरवण्याचा कदापि नसून, याविषयी जागतिक पातळीवर मतैक्य घडवून, ही परिस्थिती पूर्णपणे टाळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा आहे. बेसले यांच्या मते, या कामासाठी ‘डब्ल्यूएफपी’ला गरज आहे ती एकूण १५ अब्ज डॉलर्स इतक्या निधीची. यापैकी पाच अब्ज डॉलर्सचा निधी फक्त दुष्काळी परिस्थिती उद्भवणार नाही, याच्या प्रयत्नांसाठी, तर १० अब्ज डॉलर्सचा निधी हा लोकांना पौष्टिक अन्नाचा पुरवठा करण्यासाठी. खासकरुन कुपोषित मुले, ज्यांना बहुतांशी माध्याह्न भोजनातून पौष्टिक अन्नाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे हे भूकबळीचे महासंकट टाळण्यासाठी बेसले आणि ‘डब्ल्यूएफपी’ जागतिक पातळीवर अधिकाधिक निधी यासाठी कसा जमा होईल, यासाठी प्रयत्नशील आहे.
 
 
याच संदर्भात बेसले आपला अनुभव सांगताना म्हणतात, “ ‘डब्ल्यूएफपी’ला नोबेल पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी आमचा हा गंभीर विषय जागतिक नेतृत्वापुढे मांडण्यासाठी आम्हाला फक्त १५ मिनिटांचा वेळ विविध व्यासपीठांवर दिला जाई. पण, नोबेलपश्चात आता हाच कालावधी ४५ मिनिटांवर पोहोचला आहे. त्यामुळे आम्हाला या संकटाची भीषणता, तीव्रता लोकांपर्यंत मांडता येते.” बेसले यांना विविध देशांकडून तसेच कोविड महामारीच्या संकटातही ज्यांनी अब्जावधींची कमाई केली, त्यांच्याकडून या कामी मदतीची मोठी अपेक्षा आहे. तेव्हा, बेसले आणि ‘डब्ल्यूएफपी’ला आर्थिक सहयोगही लाभो आणि २०२० सारखी वाईट स्थिती २०२१ मध्ये कुठल्याही कारणास्तव पुन्हा न उद्भवो, हीच ईश्वचरणी प्रार्थना...





@@AUTHORINFO_V1@@