नेमके किती जीव जाणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2020   
Total Views |
leopard _1  H x


दिवाळीच्या पहिल्या दिवशी सातार्‍यात रस्ते अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन दिवसांनी मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर गाडीच्या धडकेत एका गरोदर मादी बिबट्याचा जीव गेला. त्यानिमित्ताने मुंबईकरांना या अजगरासारख्या पसरत जाणार्‍या अजस्त्र शहरात एक ‘जंगल’ नावाची परिसंस्था असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. त्याला कारण पुनश्च एका बिबट्याचा मृत्यू ठरले. एवढेच काय, ते दु:ख मात्र, देशभरात दरदिवशी रस्ते किंवा रेल्वे अपघातात एका वन्यजीवाचा तरी मृत्यू होतोच. मुंबईतही रस्ते अपघातात बिबट्याचा मृत्यू होण्याचे ही पहिलीच घटना नाही. १९९४ ते २०१२ दरम्यान मुंबईत रस्ते अपघातात ४० बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. ’वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार, २०१९ साली देशात ७३ बिबट्यांचा रस्ते अपघातात आणि १० बिबट्यांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला होता. म्हणूनच हरितक्षेत्रामधून जाणार्‍या रस्ते किंवा रेल्वे मार्गिका प्रकल्पांमध्ये वन्यजीवांच्या दृष्टीने उपाययोजना राबविणे ही काळाजी गरज बनली आहे. शिवाय सद्यस्थितीत असणार्‍या रस्ते किंवा रेल्वे मार्गिकांवरही शीघ्र उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी हे प्रकल्प उभारणार्‍या प्राधिकरणांनी पुढाकार घेतला पाहिजे. दरवर्षी रेल्वे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणार्‍या शेकडो हत्तींचा विचार करुन रेल्वे विभागाने भन्नाट कल्पना राबवून ती अंमलात आणली. उत्तराखंडमधील ऋषिकेश आणि आसाममधील गुवाहाटी येथे हत्तींचे कळप हे रेल्वे मार्गिका ओलांडून जातात. त्यामुळे दरवर्षी याठिकाणी काही हत्तींचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी रेल्वे विभागाने या रेल्वेमार्गांवर ध्वनिक्षेपक लावले आहेत. या मार्गिकांवरुन रेल्वे गाडी जाण्यापूर्वी ध्वनिक्षेपकांमधून मधमाशांच्या आवाज प्रक्षेपित करण्यात येतो. हत्ती हे निसर्ग: मधमाशांच्या आवाजांना घाबरत असल्याने रेल्वेमार्गिका ओलांडत नाही. अशा प्रकारे छोट्या-छोट्या उपाययोजना राबवून वन्यजीवांचे जीव वाचवता येऊ शकतात. शिवाय वनक्षेत्रांमधून किंवा त्याच्या आसपासच्या क्षेत्रामधून जाणार्‍या रस्ते प्रकल्पांमध्येही वन्यजीवांना जाण्यासाठी ओव्हरपास आणि अंडरपास बांधून त्यांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करता येऊ शकतो.

वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी...

वन्यजीवांच्या दृष्टीने विकास प्रकल्पांमध्ये वन्यजीवांसंदर्भातील उपाययोजना राबविण्याच्या कामाला महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. कान्हा-पेंच व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदून जाणार्‍या महामार्ग-७ वर ओव्हरपास बांधण्यात आला आहे. भारतात अशा प्रकारे वन्यजीवांचा भ्रमणमार्ग लक्षात घेऊन तयार केलेला हा पहिलाच ओव्हरपास आहे. त्यामध्ये नक्कीच काही उणिवा आहेत. या उणिवा लक्षात घेऊन मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणार्‍या ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’वरही वन्यजीवांसाठीच्या उपाययोजना अंमलात आणण्याचे काम सुरू आहे. तज्ज्ञ समितीच्या सूचनांनुसार महामार्ग उभारणार्‍या ‘एमएसआरडीसी’ प्राधिकरणाचे अधिकारी मार्गिकेच्या रचनांमध्ये सुधारणा किंवा ओव्हरपास-अंडरपासचे नियोजन करत आहेत. अशाच प्रकारचे काम तुंगारेश्वर अभयारण्य आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानादरम्यानही करण्यात येणार आहे. या दोन्ही संरक्षित वनक्षेत्राच्या मधल्या भागातून तीन विकास प्रकल्प जात आहेत. त्यामुळे बिबट्यासह इतर वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी या प्रकल्पांवरुन वन्यजीवांसाठीचा ओव्हरपास बांधण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यान बांधण्यात येणार्‍या नव्या रस्त्यावरही वन्यजीवांसाठी उपाययोजना राबविण्याची मागणी वन विभागाने केली आहे. वन्यजीवांप्रमाणेच सागरी परिसंस्थेतील काही जीवांनाही ’वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत संरक्षण मिळाले आहे. मुंबई महानगरपालिकेकडून मरिन डाईव्ह ते वांद्रे दरम्यान ‘कोस्टल रोड’ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भरावामुळे हाजीअली आणि वरळी येथील प्रवाळांच्या वसाहती बाधित होणार होत्या. सुरुवातीस महापालिकेच्या अधिकार्‍यांनी बाधित होणार्‍या प्रवाळांकडे दुर्लक्ष केले. मात्र, वन विभाग आणि लोकदबावानंतर त्यांनी प्रवाळांच्या स्थानांतरणाचे काम हाती घेतले. गेल्याच आठवड्यात वन विभागाची कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर पालिकेच्या अधिकार्‍यांनी शास्त्रज्ञांच्या मदतीने १८ पेक्षा अधिक प्रवाळ वसाहतींचे इतर किनार्‍यांवर स्थानांतरण केले. वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासक्षेत्रामध्ये विकास प्रकल्प राबवताना वन्यजीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने काही उपाययोजना राबविणे आवश्यक असतात. मानवी कारणांमुळे वन्यजीवांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन लोकदबाव निर्माण होण्यापूर्वीच सरकारी यंत्रणांनी जबाबदारीच्या नात्याने पर्यावरणपूरक विकास प्रकल्प राबिवण्यामध्ये आपला कल वाढविणे गरजेचे आहे.
@@AUTHORINFO_V1@@