ट्रम्प हरले, मोदी जिंकले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2020
Total Views |

narendra modi donald trum


भारतात झालेली बिहार विधानसभा निवडणूक आणि सोबत देशभरात विविध राज्यांत झालेल्या विधानसभांच्या ५९ जागांसाठीची पोटनिवडणूक महत्त्वाची आहे. भारतातील ही निवडणूक म्हणजे एक प्रकारे कोरोनाच्या महासंकटावर मात करण्यासाठी सरकारने केलेल्या कामाविषयीचा जनमत संग्रह होता आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकले आहेत.



अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पराभूत झाले व त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन विजयी झाले. याचे खापर ट्रम्प यांनी कोरोनाच्या संकटावर फोडले आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले की, “कोरोनावरील लस यशस्वी झाल्याची घोषणा ‘फायझर’ कंपनीने काही दिवस रोखून ठेवली आणि त्यामुळे त्यांना विजयी होता आले नाही.” कोणत्याही राष्ट्रप्रमुखासाठी कोरोनाची महासाथ हे फार मोठे संकट आहे व त्यातून आपली लोकप्रियता टिकवून ठेवणे अवघड आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनाही या महासाथीचा राजकीय फटका बसला. अमेरिकेमध्ये जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत आणि सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले आणि कोरोनाला रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ आणि अन्य निर्बंध लागू केल्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आली. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले आणि उत्पन्नात मोठी घट झाली. संपूर्ण समाजात नाराजी निर्माण झाली. अशा स्थितीत निवडणूक जिंकणे कठीणच. म्हणून ट्रम्प यांची ही तक्रार गांभीर्याने घ्यायला हवी की, ‘फायझर’ कंपनीने मतदानापूर्वी लसीची घोषणा केली असती, तर ट्रम्प म्हणतात तसा त्यांचा विजय झाला असता.
वरील संदर्भात भारतात झालेली बिहार विधानसभा निवडणूक आणि सोबत देशभरात विविध राज्यांत झालेल्या विधानसभांच्या ५९ जागांसाठीची पोटनिवडणूक महत्त्वाची आहे. भारतातील ही निवडणूक म्हणजे एक प्रकारे कोरोनाच्या महासंकटावर मात करण्यासाठी सरकारने केलेल्या कामाविषयीचा जनमत संग्रह होता आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकले आहेत. मोदी यांच्या करिष्म्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहार विधानसभा निवडणूक पूर्ण बहुमत मिळवून जिंकली आणि पोटनिवडणूक झालेल्या देशभरातील विधानसभेच्या ५९ जागांपैकी ४१ जागा भाजपने जिंकल्या. विशेष म्हणजे, भाजपने जिंकलेल्या ४१ जागांपैकी ३१ काँग्रेसकडून हिसकावून घेतल्या आहेत. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने केलेल्या कामावर लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. या ऐतिहासिक महासाथीमुळे जगभर विविध राष्ट्रप्रमुखांना राजकीय फटका बसत असताना भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बळ वाढले, ही बाब विलक्षण आहे.

भारतातील गरिबी, लोकसंख्येची घनता व आरोग्य सुविधांचा मागासलेपणा ध्यानात घेता, कोरोनाच्या महासाथीचा देशाला जबरदस्त फटका बसेल, असे अनेकांना वाटत होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटाचा अंदाज घेऊन खूप लवकर ‘लॉकडाऊन’ लागू करण्यासोबत वैद्यकीय सुविधा झपाट्याने विकसित करण्याचे काम केल्यामुळे भारतात कोरोनाची साथ तुलनेने नियंत्रणात राहिली. ‘वर्ल्ड ओमीटर’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत गुरुवारी एक कोटी सात लाख रुग्ण असताना, भारतात ही संख्या ८६ लाख ८४ हजार होती. अमेरिकेत गुरुवारपर्यंत कोरोनामुळे दोन लाख ४७ हजार मृत्यू झाले असताना, भारतात ही संख्या एक लाख २८ हजार होती. अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटी आहे, तर भारताची १३८ कोटी आहे. हे ध्यानात घेतले तर भारतात कोरोनाची साथ किती प्रभावीपणे नियंत्रणात ठेवली हे स्पष्ट होते. दर दहा लाख लोकसंख्येमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अमेरिकेत ३२ हजार २८३, तर भारतात सहा हजार २७० आहे. मृत्यूच्या बाबतीत हे प्रमाण अमेरिकेत ७४६ तर भारतात ९३ इतके आहे. कोरोनाच्या बाबतीत ‘लॉकडाऊन’ हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. मोदींनी वाईटपणा येण्याचा धोका पत्करून स्वतः ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. पण, वाईटपणा येण्याच्या ऐवजी त्यांच्यावरील भरवशामुळे देशातील जनतेने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर मोदीजींनी देशव्यापी ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यापूर्वीच राज्यातील सरकारने ‘लॉकडाऊन’ जाहीर केला होता. पण, त्यावेळी कोणी त्याची फारशी गंभीर दखल घेतली नव्हती, याचीही नोंद घ्यायला हवी.

कोरोनाच्या महासाथीला रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ जाहीर करणे आणि मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा उभारण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य लोकांच्या अडचणी ध्यानात घेऊन अन्य उपाय केले. देशभर कोट्यवधी लोकांना मोफत धान्य देणे, काही महिने गरिबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, शेतकरी, दिव्यांग, गरीब महिला यांच्या खात्यात थेट पैसे जमा करणे, नोकरदारांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीतून पैसे काढण्याची परवानगी देणे, कर्जाचे हप्ते थांबविण्याची परवानगी आणि रस्त्यावरील विक्रेत्यापासून विविध व्यावसायिकांना पुन्हा व्यवसाय उभारण्यासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करणे, असे अनेक उपाय मोदी सरकारने केले. याचा परिणाम म्हणून कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक व सामाजिक संकटाची झळ कमी झाली. ‘लॉकडाऊन’मुळे विविध ठिकाणी अडकलेले श्रमिक आपापल्या गावी जाऊ लागले, त्यावेळी त्यांच्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध करण्यापासून त्यांना आपल्या मूळ राज्यात परतल्यावर मदत करण्यापर्यंत विविध कामांसाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला. या सर्व काळात मोदी सरकारच्या जोडीने भारतीय जनता पक्षाने देशभर अत्यंत प्रभावी सेवाकार्य करून जनसामान्यांना दिलासा दिला. त्याची पोचपावती म्हणून जनतेने या निवडणुकीत बिहार विधानसभेत पूर्ण बहुमत आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगण, मणिपूर इत्यादी राज्यात पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी करून मोदीजींना पसंती दिली. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन निवडणुकीच्या निमित्ताने व्हावे आणि त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पराभूत होताना भारतात मोदीजी विजयी व्हावेत, ही विलक्षण बाब आहे.


देशातील राजकारणाचा विविध निवडणूक सर्वेक्षणाद्वारे अभ्यास करणार्‍या नवी दिल्ली येथील ‘लोकनीती-सीएसडीएस’ या संस्थेचा अहवाल या संदर्भात पाहण्यासारखा आहे. ही संस्था भाजपला पाठिंबा देणारी नाही आणि त्यांचा अहवाल प्रसिद्ध करणार्‍या ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राची भूमिकाही मोदी समर्थनाची नाही. त्यांच्या सर्वेक्षणात असे आढळले की, बिहारमध्ये कुटुंबात स्थलांतरित कामगार असलेल्या घरांपैकी ३५ टक्के कुटुंबांनी भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला, तर ४० टक्के कुटुंबांनी राष्ट्रीय जनता दलाच्या महागठबंधनला पाठिंबा दिला. संस्थेच्या अभ्यासानुसार, बिहारमध्ये ४२ टक्के कुटुंबातील व्यक्ती हे स्थलांतरित कामगार म्हणून काम करतात. ‘लॉकडाऊन’मुळे स्थलांतरित कामगारांचे फार हाल झाले व त्यांच्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केल्याने भाजपला त्याचा फटका बसेल, असे मानणार्‍यांना हे उत्तर आहे की, अशा कुटुंबात सरसकट भाजपविरोधी लाट निर्माण झाली नाही. कुटुंबात स्थलांतरित कामगार नाही, अशा कुटुंबांचे प्रमाण 58 टक्के असून त्यापैकी 39 टक्क्यांनी एनडीएला, तर ३६ टक्के कुटुंबांनी महागठबंधनला मतदान केले. स्थलांतरित कामगारांचा प्रश्न कसा हाताळला या प्रश्नाच्या उत्तरात मोदीजींच्या सरकारबद्दल ५७ टक्के लोकांनी खूप चांगला किंवा चांगला, असे म्हटले. पण, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारच्या बाबतीत हेच प्रमाण ४५ टक्के होते. मोदी सरकारने कोरोनाच्या महासाथीचा मुकाबला कसा केला, असे विचारता ५९ टक्के लोकांनी पूर्ण समाधानी किंवा अंशतः समाधानी असल्याचे सांगितले. पण, नितीशकुमार सरकारबद्दल हे प्रमाण ४८ टक्के होते. ‘लोकनीती-सीएसडीएस’च्या सर्वेक्षणात मोदी सरकारच्या एकंदर कामगिरीबद्दल पूर्ण समाधानी किंवा अंशतः समाधानी असलेल्यांचे प्रमाण 64 टक्के इतके जास्त आढळले होते. प्रमुख समस्या कोणत्या? असे विचारता, विकास आणि रोजगार याला 56 टक्के मते मिळाली, तर महागाईला ११टक्के प्रतिसादकर्त्यांनी महत्त्व दिले.

कोरोनाच्या महासंकटाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धैर्याने आणि ठामपणे सामना केल्यामुळे त्यांच्याबद्दलचा लोकांचा भरवसा वाढला. याच काळात मोदी सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान सुरू करतानाच, शेतकर्‍यांना स्वातंत्र्य देणारे कायदे करणे, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणे, कामगार कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणे आणि देशाच्या आर्थिक विकासाला दीर्घकालीन चालना देणारे विविध उपाय केल्यामुळे भविष्यातील भरारीची पायाभरणी झाली. देशावर गंभीर संकट आल्यानंतर निराश होऊन घरात बसण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत आक्रमकपणे उपाययोजना केली. प्रसंगी वाईटपणा येण्याचा व आपली लोकप्रियता घसरण्याचा धोका पत्करला. कोरोनाचे महासंकट जागतिक आहे, त्याचे परिणाम भारतालाही भोगावे लागणारच होते. पण, मोदीजींनी ज्या ठामपणे परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांच्याबद्दलचा जनतेचा विश्वास वाढला. संकट आहे, आर्थिक पेच आहे, रोजगाराची समस्या आहे, विकासाची गरज आहे. पण, या समस्यांवर मात मोदीजीच करू शकतात, अशी भावना झाली आणि कोरोनावरील या जनमत संग्रहात जनतेने भाजपला आशीर्वाद दिला.आपल्या कर्तृत्वाने आणि विश्वासार्हतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मनात स्थान मिळविले असल्याने बिहार विधानसभा आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या पोटनिवडणुकांचा निकाल असा लागला आहे. नाहीतर बिहारमध्ये भाजपखेरीज अन्य सर्व प्रमुख पक्षांच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घटल्या, याचा दुसरा अर्थ काय लावणार? लोकांना विकास हवा आहे, त्यांना त्यांचे प्रश्न सोडवून हवे आहेत आणि ते काम मोदीजींसारखा खंबीर आणि अनुभवी नेताच करू शकतो. तेजस्वी यादवसारखा नवखा तरुण हे काम करू शकत नाही, हे बिहारच्या जनतेने मतदानाद्वारे दाखवून दिले आहे. बाकी कोणी कोणाची मते कापली आणि कोण पराभूत झाला, कोण ‘मॅन ऑफ द मॅच’ झाला, अशी चर्चा ज्यांना करायची त्यांना खुशाल करू द्या!


-डॉ. दिनेश थिटे
@@AUTHORINFO_V1@@