अयोध्येतील दीपोत्सवाचा लखलखाट !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2020
Total Views |

dipostav_1  H x



मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामजन्मभूमीस्थळी सुमारे ५००वर्षांनी दीपावलीच्या काळात साडेपाच लाख दिव्यांचा लखलखाट करुन दाखवला. शरयू तटावर लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती उजळल्या, अयोध्यानगरी सुवर्णतेजाने झळाळली आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’नेदेखील या विक्रमी दीपोत्सवाची नोंद केली.



तब्बल ५००वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ५ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी भव्य मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. शेकडो वर्षांपासून हिंदू धर्मीयांनी आपल्या आराध्य दैवताच्या मूळस्थानी पुनःप्रतिष्ठापनेसाठी अविरत दिलेल्या लढ्याला मूर्त स्वरुप मिळाले. प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीस्थळी मंदिर निर्मितीला सुरुवात झाल्याने येणारा हिंदू धर्मीयांचा प्रत्येक सण-उत्सव विशेष झाला आणि त्याची प्रचिती यंदाच्या नवरात्र-विजयादशमीला आली, तशीच ती सणांचा राजा दीपावलीतही आली. दसर्‍याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकाराने अयोध्येत रामलीलेचे आयोजन केले गेले व त्याचे थेट प्रसारण दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कोट्यवधी रामभक्तांनी पाहिले. दिवाळी तर हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव, श्रीराम असुरराज रावणावर विजय प्राप्त करुन अयोध्येत आल्याने आपण दीपावली साजरी करतो. हजारो-लाखो वर्षांपूर्वी अयोध्येत जो झगमगाट झाला असेल, तो नक्कीच अवर्णनीय आणि अलौकिक असेल. मात्र, त्याचाच पुनःप्रत्यय समस्त हिंदूंनी, भारतीयांनी आणि पृथ्वीवासीयांनी आताच्या दिवाळीतही घेतला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामजन्मभूमीस्थळी सुमारे ५००वर्षांनी दीपावलीच्या काळात साडेपाच लाख दिव्यांचा लखलखाट करुन दाखवला. शरयू तटावर लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती उजळल्या, अयोध्यानगरी सुवर्णतेजाने झळाळली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेदेखील या विक्रमी दीपोत्सवाची नोंद केली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्काळ जे व्हायला हवे होते, ते ७०वर्षांनंतर झाले, इथल्या मातीतला वारसा-संस्कृती असूनही तुष्टीकरणापायी दूर लोटलेल्या परंपरेला सत्ताधार्‍यांनी आपले मानले. दशकानुदशकांपासून हिंदूंना जे जे हवे होते, ते ते होत असताना पाहायला मिळाले.


मात्र, हिंदूंना प्रिय असलेल्या या घटना एकाएकी घडलेल्या नाहीत तर त्यामागे शेकडो वर्षांची साधना, तपस्या आहे. २०१४सालच्या लोकसभा निवडणुकीत त्या साधना आणि तपस्येला फळ आले आणि सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात हिंदुत्व-भारतीयत्व-राष्ट्रीयत्व दिसू लागले. हिंदू, भारतीय, राष्ट्रीय म्हणून जे जे काही होते, त्याचे अलंकार झाले आणि फक्त देशभरातच नव्हे तर जगभरात त्यांना डोक्यावर घेतले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या योगशास्त्राला आंतरराष्ट्रीय पटलावर स्थान मिळवून दिले. संयुक्त राष्ट्रांपुढे मांडलेला योग दिनाचा प्रस्ताव सर्वसंमतीने पारित झाला नि दरवर्षी ठिकठिकाणी योगाच्या प्रचार-प्रसारार्थ कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले. योगाबरोबरच आयुर्वेदाचाही राष्ट्रीय पातळीवरुन जगभरात प्रचार केला जाऊ लागला. देशात येणार्‍या विविध जागतिक नेतृत्वाला भारताच्या समृद्ध वारशाची, संस्कृतीची नव्याने ओळख होऊ लागली, पवित्र धार्मिक स्थळे, मंदिरांच्या शहरांत राष्ट्रप्रमुखांच्या भेटी-गाठी झाल्या. भारत म्हणजे नेमके काय, भारतीय संस्कृती म्हणजे नेमके काय, हे सांगणारी श्रीमद्भगवद्गीता अभ्यागतांना भेट म्हणून दिली जाऊ लागली. न्यायालयाच्या माध्यमातून श्रीरामजन्मभूमीस्थळाचा सत्य आणि तथ्यावर आधारित निकाल लागला, श्रीराम मंदिराची पायाभरणी झाली. कोरोना काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागतिक स्तरावरील आभासी परिषदांतही पार्श्वभूमी म्हणून भारताच्या अस्मिता आणि प्रतिकांना स्थान मिळाले. २०१४नंतर देशात काय बदल झाला, हे सांगणार्‍या या घटना आणि त्यातलेच सर्वांत अलीकडचे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीनिमित्त अयोध्येत श्रीरामजन्मभूमीस्थळी आयोजित केलेला विलक्षण आणि विहंगम दीपोत्सव. नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ यांनी जनतेने आपल्याला ज्यासाठी मतदान केले, त्याचा प्रत्येक वेळी मान राखल्याचे यातून दिसते.



दरम्यान, मोदींच्या आधी जवळपास प्रत्येक सरकारने आपल्या पुरोगामित्व आणि सेक्युलरित्वासाठी हिंदुत्वाला विकृत करुन दाखवले. काँग्रेसने तर हिंंदूंना दहशतवादी ठरवले, तसेच श्रीरामाचे अस्तित्वही नाकारले. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, तेव्हाही देशातील पुरोगामी-सेक्युलर टोळके विव्हळतच होते. पण गेली कित्येक वर्षे हिंदुत्वाला, भारतीयत्वाला, राष्ट्रीयत्वाला दडपण्याचे, धुडकावण्याचे काम केलेल्यांची अवस्था आज काय आहे? देशाच्या राजकीय पटलावर ते एकतर नामशेष झालेत किंवा त्यांच्याच वैचारिक भाईबंदांच्या माध्यमांपर्यंत त्यांचे अस्तित्व उरलेय. योगी आदित्यनाथ यांनी राज्यात सत्ता मिळवल्यानंतर सर्व धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला, वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षानंतर एखाद्या सरकारने अशाप्रकारे हिंदू स्थळांची दखल घेतली आणि त्याआधी काय सुरु होते? तर आपण किती धर्मनिरपेक्ष आहोत, हे दाखवण्यासाठी रमजानच्या इफ्तार पार्ट्या नि शिरखुर्मा ओरपण्याचा कार्यक्रम! आता मात्र, गेल्या सहा वर्षांपासून देशात हिंदुत्वाचा शंखनाद झाला नि पुरोगामी-सेक्युलरिझमचे दाखले देणारेही नवहिंदुत्ववादी किंवा सौम्य हिंदुत्ववादी होऊन मंदिरांचे उंबरठे झिजवू लागले. त्यांना जानवे दाखवून आपल्या हिंदुत्वाचे प्रमाण द्यावेसे वाटू लागले. पण इथल्या जनतेने त्या सर्वांचेच खायचे नि दाखवायचे दात पाहिलेले आहेत, त्यामुळेच तर लागोपाठच्या निवडणुकांतही याचे प्रतिबिंब उमटताना दिसते. अर्थात, याला मर्यादा नाही, हिंदूविरोधकांना आणखी रसातळाला जायचे आहे नि हिंदुत्वनिष्ठांना आणखी शिखरावर जायचे आहे. विद्यमान केंद्र सरकारही आपल्या छोट्या-मोठ्या कृतीतून आपल्यासाठी भारतीयत्वाची संकल्पना किती महत्त्वाची आहे, हे दाखवून देत आहे. तसेच देशातील जनतेनेही आपल्या धार्मिक, सांस्कृतिक मुळाशी जोडले पाहिजे, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे या सरकारला वाटते. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी आयोजित केलेला साडेपाच लाखांपेक्षा अधिक दिव्यांचा दीपोत्सव त्याचाच दाखला होता व असे कार्यक्रम उत्तरोत्तर आणखी वाढत जातील.
@@AUTHORINFO_V1@@