तेजाचा सण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2020
Total Views |

दिवाळी _1  H x


ज्योत आणि बुद्धी, प्रकाश आणि ज्ञान एकच! या दिवाळीला दिवा लावून अग्निदेवाला हीच प्रार्थना- सर्वांना सद्बुद्धी मिळू दे! सर्वांना हिवाळ्यातील अग्नी व सूर्यपूजेचे मर्म कळू दे! दिवाळीच्या सणाचे महत्त्व पटू दे! ‘छठपूजे’चे तत्त्व कळू दे!


दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव! प्रकाशाचा सण! हिवाळ्यात दिवस लहान होत जात असताना केलेली उजेडाची प्रार्थना. हिवाळ्यातील रात्री मोठ्या होत जात असताना लावलेला आशेचा दिवा. रात्र मोठी होवो, नाहीतर गडद काळोख पसरो, बाहेरच्या संकटाची कसली तमा? आम्ही निराश न होता आशेचा दिवा लावून, अंधार दूर करू, असेच जणू काही दिवाळी सुचवते. रात्र काय किंवा हिवाळा काय, तो संपणार आहे. म्हणून दिव्यांची आरास करून हा काळ दिवाळी आनंदाने आणि उत्साहाने भरते! थंडीचा आणि थंडीबरोबर येणार्‍या अंधाराचा काळ मानवासाठी कठीण असतो. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या कथेत दिलेली धोक्याची सूचनासुद्धा- ’Winter is coming' अशीच आहे. हिवाळ्याचा काळ कंठणे सोपे नसल्याने, कित्येक प्राणी सरळ दोन-चार महिन्यांसाठी झोपून जातात. झाडेसुद्धा आपापली पाने गाळून थंडीचा सामना करायला तयार होतात. हिवाळ्यात नेमाने येणार्‍या नैराश्याला हटविण्यासाठी थंड देशांमध्ये 'Light Therapy'चा वापर केला जातो. हिवाळ्याच्या दिवसात घरात लख्ख प्रकाश देणारे दिवे लावून ’Winter Blues' घालवायचा प्रयत्न केला जातो. दिवाळीत आपण अगदी हेच करतो! दिवे लावून मनाची निराशा घालवतो. खरे पाहायचे तर, दिवाळीची तयारी, खरेदी, स्वच्छता आदी गोष्टींमुळे आपल्या मनाला थंडीची मरगळ अशी येतच नाही! म्हणून दिवाळी हा उत्साहाचा सण आहे. मनाची शक्ती वाढविणारा सण आहे. दिवाळीमध्ये स्निग्ध पदार्थ खाऊन, त्वचेला तेल लावून शरीराचे थंडीपासून रक्षण करतो. म्हणून दिवाळी हा थंडीमध्ये तनाची शक्ती वाढविणारा उत्सव आहे.




संस्कृतमध्ये ‘दिव’ म्हणजे चमकणे, प्रकाशणे. त्यापासून ‘दिवा’, ‘दिवस’, ‘दिवाकर’, ‘देव’, ‘दिव्य’ हे शब्द झालेले दिसतात. इथे ‘दिवाकर’ हे प्रकाश निर्माण करणार्‍या सूर्याचे नाव आहे आणि ‘देव’ हे प्रकाश देणारी किंवा ऊर्जेचा स्रोत असलेली शक्ती आहे. ‘Divine’ या इंग्लिश शब्दाचे मूळसुद्धा ‘देव’ या शब्दात आहे. संस्कृतमध्ये ‘दीप’ म्हणजे प्रज्वलित करणे. त्यापासून ‘दीप’, ‘दीपावली’ हे शब्द झालेले दिसतात. इथे ‘दीपावली’चा अर्थ होतो दीपांची ओळ. (आवली = ओळ, रांग). शब्दांच्या अर्थाने पाहू जाता, दिवाळी किंवा दीपावली ही दिव्यांची आरास आहे. लुकलुकत्या पणत्यांच्या उजेडाचा सण आहे.
भारतीय विचारानुसार प्रकाश म्हणजे निव्वळ उजेड नाही, तर प्रकाशाचा एक अर्थ ज्ञान असासुद्धा आहे. प्रकाशाच्या योगाने सर्व वस्तू दिसायला लागतात. तसे बुद्धीच्या योगाने आपल्याला वस्तूंचे ज्ञान प्राप्त होते. जसे सूर्याच्या प्रकाशाने वस्तू दिसतात, तसे बुद्धीच्या प्रकाशाने वस्तू जाणता येतात. याकरिता ऋग्वेदातील ऋषी बुद्धी मागतात ती प्रकाश देणार्‍या सूर्याकडे. गायत्री मंत्रात ऋषी म्हणतात -
‘तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्॥
(ऋग्वेद ३.६२.१०)
वर्णन करण्यास योग्य असलेल्या सूर्यादेवा, मी, तुझे ध्यान करतो, तुझे स्तवन करतो! तू माझ्या बुद्धीला प्रज्वलित कर! तू जसा तेजाने तळपतोस, तसे माझ्या बुद्धीला तेज चढू दे! माझ्या बुद्धीला चालना मिळू दे!
सूर्याची पूजा प्राचीन काळापासून चालत आली आहे. दिवाळीच्या दरम्यान येणारी सूर्य पूजा म्हणजे ‘छठपूजा.’ उत्तर भारतात एकदा दिवाळीनंतर आणि एकदा चैत्रातील पाडव्याच्या नंतर ‘छठपूजा’ केली जाते. हे व्रत कदाचित हिवाळ्याच्या सुरुवातीला आणि हिवाळा संपल्यावर केले जात असावे. चार दिवस चालणार्‍या या व्रतात सूर्यदेव व त्याच्या पत्नी, षष्ठी (छठ), उषा आणि प्रत्युषा यांची पूजा केली जाते. पहाटे आणि संध्येला नदीत उभे राहून सूर्याला अर्घ्य देणे, एक दिवस उपवास करणे, असे या उपासनेचे स्वरूप असते. दिवसा प्रकाश देणार्‍या सूर्याला आणि रात्रीच्या वेळी प्रकाश देणार्‍या अग्नीला मानवाने एकच देव मानले. अग्निहोत्रात सूर्योदयाची आहुती सूर्याला, तर सूर्यास्ताची आहुती अग्नीला दिली जाते, ती या कारणाने. आपल्या जीवनातील लग्नासारखे महत्त्वाचे संस्कार अग्नीच्या साक्षीने केले जातात. आयुष्याचा शेवट झाल्यावर देह अग्नीला अर्पण करून अंतिम आहुती दिली जाते. अशा प्रकारे हिंदू संस्कृतीने अग्नीला फार महत्त्वाचे स्थान दिले आहे. ऋग्वेदानेसुद्धा अग्नीची स्तुती गायली आहे. ऋग्वेदाच्या पहिल्याच सूक्तात मधुच्छंदा वैश्वामित्र ऋषी म्हणतो-
अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवऋत्विजम्।
होतारं रत्नधातरम्॥ ऋग्वेद १.१.१॥



देवांचा ऋत्विज असलेल्या अग्नीची आम्ही नित्य स्तुती करतो. यज्ञात सर्वात पुढे असलेला अग्नी आम्हाला रत्नांनी विभूषित करो! अग्नी मनुष्याला वर्धमान करतो, धन आणि यश देतो, संरक्षण करतो आणि आम्ही दिलेली आहुती देवतांना पोहोचवतो! त्या अग्नीस माझा नमस्कार असो! आम्हा गृहस्थ लोकांना अग्नी प्राप्त होवो! जसे पुत्राला सहज पिता प्राप्त होतो, तसा तू आम्हास बाधारहित होऊन प्राप्त हो! पूर्वीच्या ऋषींनी तुझे गुणगान केले होते आणि आता आधुनिक काळातही आम्ही तुझे गुणगान करत आहोत. हे अग्नी! तू आमच्या निकट येऊन राहा! आमच्यामध्ये वास कर! अग्नीमध्ये दिलेली आहुती तो देवांकडे नेतो, असे मानले जाते. अशीच मान्यता ग्रीक लोकांमध्येही होती. ग्रीक लोक देवाला द्यावयाचा बळी अग्नीमध्ये अर्पण करत असत. ग्रीक व रोमन लोकांनी अग्नीची कैक मंदिरे बांधली होती. इटलीमधील रोम शहरात ’Temple of Vesta' व ’Temple of Vulcan' ही दोन अग्नीची प्रसिद्ध व भव्य मंदिरे होती. व्हेस्टाच्या मंदिरात सदैव चेतवलेला अग्नी असे. तो अग्नी नित्य जागृत ठेवण्याची जबाबदारी नेमून दिलेल्या कुमारिकांवर असे. या अग्नी मंदिरांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. ग्रीक भाषेत अग्नी, सूर्य, चंद्र, पृथ्वी, आकाश आदी देवतांना उद्देशून अनेक प्रार्थना लिहिल्या गेल्या. या प्रार्थना काल्पनिक ग्रीक नायक ओरफियसने लिहिल्या, असे मानले जाते. त्यापैकी अग्नीच्या प्रार्थनेचा हा स्वैर अनुवाद -
हे अग्नी!
अमर्याद अबाधित रूपात -
आकाशाचा सम्राट तू,
सूर्य-चंद्राचे तेज तू,
तार्‍यांचा लखलखाट तू!
हे अग्नी!
सौम्य शांत रूपात -
जीवातील धगधग तू,
सर्वोत्तम महाभूत तू,
प्रकाशदायी शक्ती तू!
हे अग्नी!
माझी प्रार्थना ऐक!
तुझी केशरी ज्योत
शुद्ध, निष्पाप व प्रसन्नपणे
आम्हा सोबत निरंतर राहो!
प्रकाश देणार्‍या अग्नीची पूजा सर्वच प्राचीन संस्कृतींनी केली. अग्निपूजक पारशी आजही ‘अग्यारी’ या अग्नी मंदिरात अग्नीची उपासना करतात. इजिप्तमधील प्राचीन लोकांत सूर्य व अग्नीच्या देवता होत्या. युरोपातील सेल्टिक, स्लाव्हिक लोकांत पण अग्नीची पूजा केली जात असे. अमेरिकेतील अ‍ॅझटेक, माया आदी लोकांत अग्निपूजा केली जात असे. चीन, कोरिया, जपान, मंगोलिया या ठिकाणीही अग्नीची पूजा केली जात असे. अब्राहमिक धर्मांमध्ये मात्र अग्नीशी मैत्री केलेली दिसत नाही. पण, अग्नीची भीती मात्र दिसते. ख्रिश्चन व इस्लाम धर्मात Hell व जहन्नममधील भीषण आगींचे वर्णन आले आहे. या धर्मांनुसार पापी मृताला अनंतकाल तेथील आगीत लोटले जाते.



‘सेपियनस्’ या पुस्तकात श्री हरारी यांनी म्हटले आहे की, आदिमानव जेव्हा अग्नीचा उपयोग करायला लागला, तेव्हा त्याच्या प्रगतीला सुरुवात झाली. शिजविलेले/ भाजलेले अन्न मनुष्य खाऊ लागल्याने त्याची मोठ्या दातांची गरज कमी झाली. कालांतराने त्याचा जबडा लहान होत गेला व कवटी मोठी होऊन मेंदूसाठी अधिक जागा उपलब्ध झाली. पचनासाठी कमी ऊर्जा खर्च करावी लागली, ती ऊर्जा मेंदूसाठी उपलब्ध झाली. यामुळे मेंदूचे आकारमान वाढू लागले. सहजच मानवाच्या विकासाला गती मिळाली. अग्नी निर्माण करता येणे, त्याचा उपयोग अन्न शिजविण्यासाठी करता येणे व अग्नीवर नियंत्रण ठेवता येणे, हा मानवाच्या विकासातील सर्वात पहिला टप्पा. कदाचित, म्हणूनच सर्व प्राचीन संस्कृतींनी अग्नीची पूजा केली असावी. अग्नीचे अगदी बालरूप म्हणजे दिव्याची ज्योत. ज्ञानोबांच्या भाषेत - दीपकळिका! एखादा लहानसा दिवा काळोख्या खोलीत लावला तरी खोलीभर त्याचा उजेड पसरतो. शिवाय, खिडकीतून बाहेर सांडतो. मग, रात्रीच्या वेळी दुरूनसुद्धा एखाद्या वाटसरूला ते घर दिसणार! ज्ञानोबा म्हणतात, “दिव्याची ज्योत अगदी छोटी असली तरी तिचे तेज अंधार नष्ट करते. त्याप्रमाणे सद्बुद्धीला लहान म्हणो नये. जसे लहानशा दिव्यात अंधार नष्ट करायची शक्ती असते, तसे अज्ञानाचा नाश करायची शक्ती सद्बुद्धीमध्ये असते.”
जैसी दीपकळिका धाकुटी।
परी बहु तेजातें प्रगटी।
तरी सद्बुद्धि हे थेकुटी।
म्हणों नये॥ (ज्ञानेश्वरी २.२३८)
ज्योत आणि बुद्धी, प्रकाश आणि ज्ञान एकच! या दिवाळीला दिवा लावून अग्निदेवाला हीच प्रार्थना- सर्वांना सद्बुद्धी मिळू दे! सर्वांना हिवाळ्यातील अग्नी व सूर्यपूजेचे मर्म कळू दे! दिवाळीच्या सणाचे महत्त्व पटू दे! ‘छठपूजे’चे तत्त्व कळू दे! तेजाच्या उत्सवाला अज्ञानापायी विरोध न होवो! आनंदाच्या सणाला क्षुद्रबुद्धीचे विरजण न लागो! घरोघरी लावलेल्या दिव्यांच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार दूर दूर पळून जावो!


- दीपाली पाटवदकर
@@AUTHORINFO_V1@@