रसिक कर्मयोगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2020
Total Views |

daji_1  H x W:


कुणाला त्यांच्यासारख्या ज्येष्ठापुढे आता बोलावं तरी काय हेच सुचेना, इतके ऐकणारे मनातून हलले होते! प्रशंसा करायची तरी कशी, शब्द सुचेनात आणि आमचे शब्द केवळ हवेचे बुडबुडे ठरावेत, अशी दाजींची कृती मोठी होती. मी तर धन्य धन्य झाले! इतका निर्लोभीपणा, असा श्रेष्ठ विचार, लगेच व्यवस्थित योजना आखण्यातली तत्परता म्हणजे कृती करण्याची सिद्धता... असा निष्ठावंत आणि नि:स्वार्थी कर्मयोगी साक्षात आपण पाहतोय, या काळात! हा अनुभवच रोमांचित करणारा होता.



२०१० हे वर्ष. दादर-मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यवाहपदाची धुरा माझ्यावर सोपविली गेली तोवर कधी कुठल्या सार्वजनिक संस्थेचं काम न केलेली मी, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनुभवी सहकारी व्यक्तींच्या सहयोगामुळे हळूहळू रुळून गेले. स्मारकाच्या वास्तूच्या चौथ्या मजल्यावरची सभागृहासाठी ठेवलेली जागा काही वर्षे धूळखात पडून राहिली होती. कबुतरांचं साम्राज्य झालं होतं ते! पाहता पाहता तिथे काम सुरू झालं आणि एक उत्कृष्ट सभागृह आकाराला आलं. ध्वनिप्रक्षेपणाची योजना तर इतकी उत्तम श्रेणीची की, गायक-वादक-नाटकवाले जाणकार तर त्या सभागृहाच्या प्रेमातच पडले. उद्घाटनाचा थरार तर काही वेगळाच! म्हणजे सभागृहाच्या भिंतीवर दोन बाजूंना लावण्याची दोन भली मोठी शिल्पं सभेची वेळ होत आली तरी लावून झाली नव्हती. माझ्या हृदयाची धडधड काही कमी होत नव्हती, कार्याध्यक्ष रणजित सावरकर हे मात्र सभेपूर्वी ही शिल्पं लागणारच, अशा निर्धारानं देखरेख करीत उभे! आत्मविश्वास दांडगा! खरंच झालंही अगदी तसचं, उद्घाटन उत्तमरीत्या पार पडलं.यानंतर कोषाध्यक्षा मंजिरी मराठेंशी बोलत असताना त्या म्हणाल्या की, “सभागृहाच्या बांधकामात स्मारकाची गंगाजळी जवळजवळ संपुष्टात आली आहे अन् काही मोठे प्रकल्प तर बाकी आहेत करायचे. विशेषत: क्रांतिकारकांचं स्मृतिसंग्रहालय.”

झालं! माझी नेहमीप्रमाणे झोप उडाली. काय करावं याच विचारानं पछाडलं. सभागृह उत्कृष्टच; पण लोकांना माहिती तरी व्हायला हवं, तर कार्यक्रम होतील. तो प्रयत्न चालू झालाच, दुसरा प्रयत्न निधी उभा करण्याचा. कुणाशी बोलावं याबद्दल असा विचार करता करता एकदम दाजीशास्त्रीचं नाव डोळ्यांसमोर चमकलं (पं. दाजी पणशीकर). लगेच त्यांना दूरभाष लावला, बोलले. ते म्हणाले, “जरा विचार करतो. मग बोलतो तुमच्याशी.”‘नाट्यसंपदे’सारख्या नामवंत नाटक मंडळींचा कारभार समर्थपणे सांभाळणार्‍या व्यक्तीला या विषयाचाही काही अनुभव असणार हा माझा अंदाज. यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांचा दूरभाष आलाच. मात्र, ते जे काही बोलले ते अपेक्षेपलीकडचं... हे माझ्या दैनंदिनीतलं पानच देते खाली...


११ फेब्रुवारी २०११


आपल्याला देणग्या हव्यात हे मी दाजी शास्त्रींजवळ बोलले. त्यांची तीन व्याख्यानं आपल्याकडे (स्मारकावर) करावीत, असं अध्यक्ष डॉ. सुधाकर देशपांडेंबरोबर ठरलं होतंच. आता हे बोलल्यानंतर त्यांनी सुचवलं आहे की, त्यांची स्वत:ची महाभारतावर सात दिवसांची व्याख्यानमाला तिकीट लावून शिवाजी मंदिरात करावी (९०, ७०, ५०जशी नाटकासाठी असतात तशी लावून). त्याचं उत्पन्न ते स्मारकाला देतील. आपल्याला खर्च थिएटरच्या भाड्यापलीकडे काही नाही.इतक्या मनापासून आत्मीयतेनं आणि निरपेक्षतेनं त्यांनी ही योजना सुचविली आहे की, त्या भावनेचा आपल्याला आदरच केला पाहिजे. तेव्हा पहिलं म्हणजे त्यांच्याशी बोलणं, दुसरं हे मार्चमध्ये करता येईल का ते पाहणं. शिवाजी मंदिरच्या लोकांशी संपर्क वगैरे. पण, प्रथम त्यांच्याशी बोलून त्यांना धन्यवाद देणं. त्या दिवशी सावरकर स्मारकावर गेल्यावर मी रणजित सावरकरांना दाजीशास्त्रींची ही कल्पना सांगितली. त्यांनी लगेच दाजींना फोन लावून “स्मारकावर भेटून बोलू. आपण या,” अशी विनंती केली. भेटीत दाजीशास्त्री म्हणाले, “मला यांनी परिस्थितीची कल्पना दिल्यावर या विषयात आपण काय करू शकतो, असा विचार मी केला. तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही मी, जिथे-जिथे व्याख्यानमालांसाठी जातो, तिथलं जे मानधन मला मिळेल ते केवळ माझा प्रवासखर्च काढून घेऊन बाकी सगळी राशी स्मारकाला देईन...” ऐकणारे सारे अवाक!त्या भेटीत आम्ही पाहिलं की, दाजीशास्त्रींची योजना सारी व्यवस्थितपणे कागदावर उमटलेली होती.निमंत्रणावरून ते जिथे जाणार होते, तिथे व्याख्यान ठरविणार्‍या मंडळींशी ते बोलणार होतेच, त्याशिवाय ते पुढे म्हणाले, “मी, स्वत: काही जिल्ह्यांच्या ठिकाणी जाऊन, तिथल्या प्रमुख नागरिकांशी हे बोलेन. माझी योजना मांडेन आणि पाच, सात, दहा दिवसांच्या व्याख्यानमाला ठरवेन. त्याचा केवळ प्रवासखर्च मला स्मारकाने द्यावा. माझं मानधन मी स्मारकाला देणार.” कुणाला त्यांच्यासारख्या ज्येष्ठापुढे आता बोलावं तरी काय हेच सुचेना, इतके ऐकणारे मनातून हलले होते! प्रशंसा करायची तरी कशी, शब्द सुचेनात आणि आमचे शब्द केवळ हवेचे बुडबुडे ठरावेत, अशी त्यांची कृती मोठी होती. मी तर धन्य धन्य झाले! इतका निर्लोभीपणा, असा श्रेष्ठ विचार, लगेच व्यवस्थित योजना आखण्यातली तत्परता म्हणजे कृती करण्याची सिद्धता... असा निष्ठावंत आणि नि:स्वार्थी कर्मयोगी साक्षात आपण पाहतोय, या काळात! हा अनुभवच रोमांचित करणारा होता.

यानंतर मी पाहिलं की, शिवाजी मंदिरात की यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या त्यांच्या दोन-तीन दिवसांच्या व्याख्यानांचं मानधन त्यांनी ताबडतोब स्मारकाला देणगी म्हणून दिलं अन् ज्या दोन जिल्ह्यांच्या ठिकाणी ते जाऊन आले होते, त्याचा केवळ प्रवासव्यय अगदी रुपये-आणे-पैसे असा त्यांनी स्मारकाला तिकिटासह सादर केला नि तेवढाच घेतला! ‘राऊंड फिगर’ नाही, दुसरा कसला खर्च नाही, अशी सचोटी! ‘जसा संग तसा रंग’ म्हणतात ना- दाजीशास्त्रींची ही कल्पना पार्ल्याचे विश्वास महाशब्दे यांना कळताच ते म्हणाले, “प्रचारपत्रकं मी छापून आणतो” अन् आम्ही मजकूर लिहून देताच छापलेल्या हस्तपत्रकांचा गठ्ठा त्यांनी लगेच थेट स्मारकावरच आणून दिला; अर्थात वृत्तीमध्ये मुळात काही सात्त्विकपणा असल्याशिवाय असं कुणी वागत नसतं, हे उघड आहे. त्यांनी त्याचा एक पैसाही घेतला नाही.दाजींची ती कल्पना होती उत्तमच! परंतु, नेमक्या पुढे लगेचच निवडणुका आल्या. मग काय? स्थानिक राजकारणात शहरं, गाव नि माणसं बुडून गेली. नंतर आणखी काही झालं. म्हणता म्हणता शेवटी ही कल्पना काही अमलात येऊन शकली नाही. पण, त्यांचा तो विचार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभाच जणू आमच्यासमोर उलगडून ठेवता झाला. उजळलेल्या गाभार्‍यासारख्या आहे तो.१९८८ मध्ये माझ्या थोरल्या लेकाचं, नरेंद्रचं लग्न झालं आणि माझी मोठी सून म्हणून तरंगिणी घरात आली, तेव्हापासूनची दाजी शास्त्रींची ओळख. तरंगिणी त्यांची पुतणी. नटश्रेष्ठ प्रभाकरपंतांची धाकटी कन्या. ती त्यांना ‘दाजीकाका’ म्हणते, म्हणून आम्हीही ‘दाजीकाका’ म्हणू लागलो.

‘नाट्यसंपदे’चा कारभार शिवाजी मंदिरातल्या कार्यालयातून चाले. त्यामुळे ते रोजच दादरला येत, तरी आमच्या घरी येणं क्वचित होई. त्यांच्या त्या कधीतरी येण्यातून त्यांच्या स्वभावाचे पैलू कळू लागले.त्यांची भाषणं थोडीच ऐकली मी; परंतु ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ म्हणजे दहा हजार वक्त्यांतसुद्धा उठून दिसेल असा वक्ता, असा अर्थ त्या दोन शब्दांचा लावावा लागेल! सरस्वतीची पूर्ण कृपा आहे त्यांच्यावरती. ‘रामायण’, ‘महाभारत’ हे त्यांचे विशेष अभ्यास विषय. त्याबद्दल बोलताना एका भाषणात त्यांनी सांगितलेला एक फरक पक्का लक्षात राहिला. महाभारत ही ‘हवं हवं’ची गोष्ट आहे, तर रामायण ही ‘नको-नको’ची. राम आणि भरत दोघेही राज्याधिकार-राजपद सहज नाकारणारे. लक्ष्मण रामानुगामी! ही त्यांची विशेष विश्लेषक दृष्टी थेट मुळाशी पोहोचणारी. ‘कर्ण खरा कोण होता’ मधलं त्यांचं विवेचन आणि सत्यकथन अनेक गैरसमज दूर करणारं, तर ‘महाभारत-एक सुडाचा प्रवास’ हे वेगळ्याच प्रकारे कथासूत्र उलगडणारं. लेखकाकडे त्याचं स्वतःचं म्हणून काही सांगण्यासारखं असावं लागतं; जे केवळ त्यालाच दिसलं आहे असं. तेव्हा ते खर्‍या अर्थानं स्वतंत्र लेखन होतं. तसं हे त्यांचं ग्रंथलेखन आहे. वेगवगळी स्तोत्रं (संस्कृत), वा अन्य तशाच विषयांबद्दल एका दैनिकात काही वर्षांपूर्वी आलेल्या त्यांच्या लेखमाला खूप गाजल्या. त्यातही शेवटची लेखमाला तर केवळ अप्रतिम आहे.

‘मराठी भाषेचं लेणं’ म्हटलं पाहिजे त्याला. वास्तविक, त्या लेखांचं ताबडतोब पुस्तकच व्हायला हवं होतं. मराठी भाषा किती प्रभावी, सुंदर रीतीनं लिहिली जाऊ शकते, त्याचं उत्तम उदाहरण आहे ते अन् त्यातून साधणारं वाचकाचं उद्बोधन फारच महत्त्वाचं. लेखकातलं तेज, त्याची तपस्या आणि त्याची मानवजातीच्या कल्याणाची उत्कट मनोकामना यांनी ते लेख नुसते लखलखताहेत. एखाद्या चांगल्या प्रकाशकाला त्यांचा संग्रह काढण्याची सुबुद्धी सुचावी, ही इच्छा कायम माझ्या मनात राहिली आहे. दाजीशास्त्रींच्या स्वच्छता आणि टापटीपपणा या गुणांविषयी सांगितलं पाहिजे. त्यांच्या व्यक्तिगत राहणीपुरतंच ते मर्यादित नाही. अव्यवस्थितपणा अजिबात आवडत नाही. एकदा ते माझ्या घरी आले असताना, बैठकीतल्या टेबलच्या कप्प्यात वृत्तपत्रं विस्कटलेली दिसली. माझी शाळेत जाणारी पुतणी पुष्पा त्यावेळी तिथे बसलेली होती. तिच्याकडे पाहून ते म्हणाले, “हा गठ्ठा विस्कटलेला का? नीट लावून ठेव तो.” तिनं आज्ञाधारकपणे तो नीट रचून ठेवला. पुढच्या वेळी ‘दाजीकाका येताहेत’ हे शब्द ऐकताच ती आधी बैठकीकडे धावली. तिनं वृत्तपत्रं नीट ठेवली. असा त्यांच्या बोलण्यातला एक धाक! रिक्षावाला वा टॅक्सीवाला रस्त्यावर थुंकला की, त्यांना संतापच येतो. ते त्याला सुनवतात, “पुन्हा थुंकलात, तर मी ताबडतोब उतरून दुसरी रिक्षा/टॅक्सी घेईन;” अर्थात समजावूनही देतात, का थुंकू नये ते. निर्ढावलेला नसेल तर तो माणूसही ऐकतोच. काहींनी सोडलंही असेल तंबाखू खाणं!

त्यांची प्रयोगशीलता विलक्षण आहे. सतत सुधारणा करत राहण्याची ओढ. कुठेही काही उपयुक्त वाचलं की, ते स्वतः आधी करून पाहायचं, मग ते दुसर्‍यांना अतिशय उत्साहानं सांगायचं. दोन गॅ्रम सोन्याचं वळं पाण्यात टाकून ते अमुक वेळ उकळून पाणी प्यायचं, हे वाचल्यावर आधी स्वतः तो प्रयोग केला; अर्थात याचं श्रेय सौ. मंगलाकाकूंना द्यायला हवं. कारण, ते करून देणार्‍या त्या! माणसाच्या नावात अनुस्वार असावा. तो सही करताना वा सगळीकडे देताना ‘०’ असा पोकळ द्यावा, ‘.’असे बारीक टिंब नव्हे. सही अशी असावी, तशी नव्हे. सही (स्वाक्षरी)खाली रेघ देण्याची सवय असेल, तर तिचं उजवीकडचं टोक उंचावर न्यावं. जांभळं वस्त्र नेसावं. खोलीत ईशान्य दिशेला पाणी ठेवावं. एक ना दोन, अशा असंख्य गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळतात. एकीकडे कडकडीत वैराग्य, तर दुसरीकडे रसिकता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळं परिमाण देणारं वैशिष्ट्य. जी वस्तू वापरायची ती उत्तम दर्जाचीच असावी, हा आग्रह असतो. इतरही काही आग्रह असतात. तरंगिणीच्या विद्यार्थिनींना हे माहिती झालं की, मुलींच्या कपाळावर कुंकू हे हवंच, असं दाजीकाकांचं सांगणं असतं. मग दाजीकाकांची भेट व्हायची असली की प्रत्येकीच्या कपाळावर टिकली असणारचं. त्यांच्या लग्नावेळचा एक किस्सा ऐकला. लग्न लागताना नवरी नऊवारी साडीत असली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. तिकडून निरोप आला, ‘नवरा मुलगाही धोतरात असला पाहिजे, कळवा त्यांना.’ निरोप पोहोचला नि तो मान्यही झाला. हा एक खमकेपणाही त्यांना आवडला असावा!



कुणाच्याही चांगल्या गुणाचं कौतुक केलं तर ते मुुक्तकंठ असतं. प्रोत्साहन देणं, मदत करणं हे अगदी तत्काळ असतं. त्यांचं आणखी एक स्वभाववैशिष्ट्य म्हणजे परखडपणा; अर्थात त्यामागे असते मनापासूनची सदिच्छा! एक आदर्शवाद. परिपूर्णतेचा आग्रह. वृत्तीचा निर्मळपणा आणि संबंधितांची नाराजी पत्कारण्याची हिंमतसुद्धा! अक्कलकोटच्या एका भाषणावेळी त्यांनी श्रोत्यांना विचारलं, “अक्कलकोट स्वामींनंतर या गावात एक तरी थोर पुरुष झाला का? ...का नाही?” देवालाही जाब विचारणारे आहेत ते, माणसांची काय कथा? आदरणीय विक्रमराव सावरकरांच्या षष्ट्यब्दिपूर्ती सत्कार समारोहावेळी दाजीशास्त्री सूत्रसंचालन करणार होते. कुठल्या उंचीवर नेला असता कार्यक्रम त्यांनी! परंतु, ते स्वतः आजारी झाल्यामुळे सूत्रसंचालनासाठी येऊ शकले नाहीत. पण, मी कित्येक प्रसंगी अनुभवलं आहे की, ते रंगमंचावर उपस्थित असले की कार्यक्रमाला एक वेगळाच डौल येतो. मग कार्यक्रम ‘आदर्श शिक्षिके’चा पुरस्कार मिळालेल्या तरंगिणीच्या मावशीच्या कौतुकाचा पारिवारिक कार्यक्रम असो, नाहीतर कुणाच्या पुस्तक प्रकाशनाचा, ते बोलतील ते तितक्याच उत्साहानं, समरसून आणि मनःपूर्वकतेनं. गेल्याच वर्षात मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘मनस्वी’चं प्रकाशन त्यांच्या शुभहस्ते झालं. कार्यक्रम मिश्र होता. उत्तरार्धात महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावर पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या सुप्रसिद्ध वक्त्याचं भाषणं होतं. त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ नव्हता. पण, त्या पूर्वार्धात झालेल्या प्रकाशनाच्या वेळच्या अगदी लहानशा भाषणातही त्यांना अशी काही रसवत्ता आणली की, श्रोत्यांच्या स्मरणकोषात ती पक्की अंकित व्हावी.



खरं तर आम्ही सगळे अगदी आयत्या वेळी पोहोचलो होतो स्मारकावर, आपल्या आपल्या ठिकाणाहून. पुष्पेंद्रजींशी त्यांची ओळखसुद्धा करून देता आली नसेल किंवा नाममात्र झाली असेल क्षणभराची! सूत्रसंचालन करणार्‍या कुणाल रेगेंना मी ओळखत नव्हते, ते मला ओळखत नव्हते. ते उशिरा पोहोचले. त्यांना दाजींची पुरेशी माहिती-परिचय करून देण्यासाठी, माहिती आहे की नाही, या चिंतेनं मी हैराण! ते आल्याबरोबर मी त्यांना काळजीनं विचारलं, “अहो, तुम्ही दाजी पणशीकरांना ओळखता का?” यावर कुणाल म्हणाले, “दाजींना नाही, तर कुणाला ओळखायचं हो?” वा! माझा जीव अगदी सोन्याच्या भांड्यात पडला. सांगायचं मुख्य असं की, त्या कमी वेळात उरकाव्या लागलेल्या कार्यक्रमातही प्रारंभी सर्वांचा उल्लेख करताना ते पुष्पेंद्रजींकडे वळून स्मित करून म्हणाले. “यांचं नावचं कुलश्रेष्ठ! म्हणजे कार्यही नक्कीच श्रेष्ठ असणार ना!” तेव्हा ती सद्भावना क्षणार्धात पुष्पेंद्रजींसह सर्वांपर्यंत पोहोचली. हे त्यांच्या स्वभावातलं निर्मळपण, मोकळेपण, स्वागतशीलता आणि रसाळपण त्यांच्या लोकप्रियतेचं गमक आहे.अशाच एका प्रसंगी स्मारकावर दाजीचं भाषण झालं. आम्ही काही बोलत बसलो असताना आमचे कार्यकारिणी सदस्य, स्थापत्य तज्ज्ञ (आर्किटेक्ट) मुकुंद गोडबोले तिथे आले. दाजींना म्हणाले, “एक विनंती आहे. तुमच्याबरोबर फोटो काढायचाय एक.” आम्ही बाजूला झालो. दाजीशास्त्री बसले होते, त्या खुर्चीशेजारी मुकुंदराव उभे होते. त्यांनी खूण करून फोटो काढणार्‍याला थांबविलं नि हळूच एका गुडघ्यावर खाली बसले अन् मग खूण केली “हं!” दाजीकाका हसले. म्हणाले, “अरे वा!” त्यांना तो नम्रतेचा भाव कौतुकास्पद वाटला. विक्रम सावरकरांचा आणि त्यांचा जुना परिचय. आत्मीयता आणि प्रेमादराचं नातं होतं त्यांचं...



दि. २३फेब्रुवारी २०१४ला विक्रमरावांनी देह ठेवला. ते अखेरच्या दिवसांत महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या परिसरात रणजितच्या निवासस्थानी होते. ९ मार्च या दिवशी स्वामिनी वहिनींनी उदकशांतीचा विधी ठेवून जवळच्या मंडळींना बोलावलं होतं. भोजनापूर्वी आवारात एक अनौपचारिक सभा झाली. सर्वांनी विक्रमरावांच्या आठवणी सांगितल्या. पण, दाजीशास्त्रींच्या बोलण्यामुळे सभेला वजन आलं. स्फूर्तीचा रंग आला. समयोचित आणि खरी अशी नाट्यमयता आली. सार्थता लाभली. एक भारदस्तपणा अणि उंची आली. त्यांच्या बोलण्यातून सर्वांनाच एक समाधान मिळालं. जाता जाता एक गंमत सांगते. दाजीकाकांना येताना पाहिलं उदकशांतीची पूजा करण्यासाठी आलेल्या गुरुजींनी. ते स्वामिनी वहिनींना म्हणाले, “अरे बापरे! दाजी आलेत का? म्हणजे मला अगदी न चुकता सारा विधी व्यवस्थित केला पाहिजे.” कारण, दाजींना या विषयातलंही बरंच काही येतं नि कळतं. ते तरुणपणी भारी तापट होते, असं ऐकलंय, घरातलीही मुलंमाणसं त्यांना वचकून असत म्हणे. पण, अशी माणसं कित्येकदा पुढे जातील तशी पक्व फळासारखी मधुर बनत जातात. तसं त्यांचं झालं असावं.

दाजीशास्त्री खरे भक्त आहेत. देवाशी जवळीक साधलीय त्यांनी. डोंबिवलीचे केसकर पती-पत्नी त्यांच्या प्रवासी मंडळाच्या एक सहलीत कुरुक्षेत्राला दाजीकाका आणि सौ. मंगलाकाकू यांना घेऊन निघाले. इतर स्त्रीपुरुष मिळून २०-२२मंडळी असावीत. मीही त्यात होते. प्रतिदिनी संध्याकाळी दाजीशास्त्रींची महाभारतावर व्याख्यानं होत. एके दिवशी बोलताना त्यांनी त्या पहाटे त्यांना पडलेलं सुंदर स्वप्न श्रोत्यांना सांगितलं. श्रीकृष्णाच्या साक्षात्काराचं स्वप्न होतं ते. त्याचं लावण्य, त्याचं गोड जिंकून घेणारं स्मित, त्याच्या तेजाचा लखलखाट त्यानं जवळ घेऊन कुरवाळून कसं विचारलं की, ‘आता गेला का राग?’ हे सगळं त्यांनी समरसून सांगितलं. श्रोत्यांना त्या पवित्र आनंदात सामील करून घेतलं.सगळे आस्तिक असतील असं थोडंच आहे? कोणी नास्तिकही असतील त्या श्रोतृवर्गात. पण, असा विचार त्यांना थांबवू शकला नाही. तो आनंद त्यांना एकट्यापुरता ठेवायचा नव्हता. लुटायचा होता. वाटायचा होता. विलक्षण वाटलं ते मला! तिथे अहंभाव नव्हता, बालसदृश सरलता, निर्मलता होती. अलीकडे त्यांचा प्रवास कमी झाला आहे. परंतु, बोलण्यातला उत्साह अभंग आहे. विचारमंथन अखंड आहे. बुद्धीचं तेज आणि वाणीचं ओज कायम आहे; अर्थात सौ. मंगलाकाकूंनी दिलेली सुंदर साथ आणि सहयोग यांनाही त्याचं श्रेय जातं. सौ. नंदिनी, सौ. मोहना आणि विक्रमादित्य या मुलांनी आपापल्या क्षेत्रात नाव मिळवून त्यांना पूर्ण समाधान दिलं आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदाचा आहे. आनंदाचाच होणार आहे.



- अनुराधा खोत
@@AUTHORINFO_V1@@