तिमिरातुनी तेजाकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2020
Total Views |

light_1  H x W:


मा गतानामा दीधीथा ते नयन्ति परावतम्।
आ रोह तमसो ज्योतिरेह्या ते हस्तौ रभामहे॥ (अथर्ववेद- ८/१/८)


हे मानवा! तू (गतानाम्) मागे घडलेल्या, गेल्या गोष्टींची (मा आ दीधीथा:) चिंता करू नकोस! कारण, (ये) या ज्या काही भूतकालीन गोष्टी आहेत, त्या सर्व तुला (परावतम्) दूर, मागे (नयन्ति) घेऊन जातात. यासाठी तू (तमस:) अंधाराला सोडून (ज्योति:) प्रकाशावर आरुढ हो! (एहि) ये, तू पुढे ये! (ते) तुझ्या (हस्तौ) दोन्ही हातांना (आरभामहे) आम्ही गतिमान बनवितो.


विवेचन


भारतीय संस्कृतीने विश्वमानवाला असंख्य मूल्यमौक्तिके बहाल केली आहेत. याच मूल्यांमुळे जगाच्या कानाकोपर्‍यातील प्रत्येक माणसाला जगण्याचे नवे बळ मिळतेय. मनामनांत विचारांची दडलेली मलीनता नाहीशी होऊन तो उत्साहाने जगण्यास प्रवृत्त होतो. सदरील मंत्रात सर्वात महत्त्वाचा व प्रेरक असा संदेश देत ऋषी म्हणतात - आ रोह तमसो ज्योति:। हे मानवा! अंधाराला दूर सारत, तू प्रकाशकिरणांवर आरुढ हो. काळोखाला सोडून उजेडाची कास धर! कारण, अंधार हेच दुःख व शांततेचे मूळ कारण आहे. याचे दुष्परिणाम फारच घातक ठरतात. अंध:कारातील जगणे फारच क्लेशदायक आहे. पण, हा अंधार केवळ रात्रीमुळे निर्माण झालेलाच असतो, असे नव्हे तर तो मानवाच्या अनिष्ट वृत्तींचाही असू शकतो. जन्मोजन्मीच्या वाईट संस्कारांमुळे साठलेल्या अनिष्ट कर्मांचाही असू शकतो. त्याचबरोबर नानाविध दुर्गुण व दुरितांचाही असू शकतो, म्हणूनच अशा या अंधाराचा त्याग करून सत्य ज्ञानरूप प्रकाशाचा स्वीकार करणे, अत्यावश्यक आहे! यासाठी शतपथ ब्राह्मण व उपनिषद ग्रंथात म्हटले आहे- तमसो मा ज्योतिर्गमय। आमची वाटचाल नेहमीच प्रकाशाच्या मार्गाने असावी. आमच्या अंतर्मनात दडलेला सर्व प्रकारचा काळोख नाहीसा होऊन आमची मने व इंद्रिये पवित्र शुद्ध व ज्योतिर्मय व्हावीत. अंधार व प्रकाश हे दोन्ही घटक परस्परविरोधी आहेत. अंधारात भीतीचे साम्राज्य, तर प्रकाशात आनंदाचे चांदणे असते. वाईट कामे अंधारात होतात, तर प्रकाशात मात्र पवित्र व शुद्ध कामे! दुष्टांना व दुर्जनांना अंधार आवडतो. कारण, त्यामुळे त्यांना अनिष्ट कामे सहज करता येतात. चोरी करता येते किंवा दुसर्‍यांना फसवता किंवा लुबाडता येते. प्रकाश हा मात्र अगदी सर्वांनाच प्रिय असतो. प्रकाशाच्या झगमगत्या किरणांमध्ये सगळ्यांना अगदी मनमुरादपणे बागडावे वाटते. स्वच्छंदपणे इकडे तिकडे फिरावेसे वाटते. पण, अंधारात मात्र ही मुक्तता नसते. तिथे तर भीतीचे सावट असते, त्यामुळे काहीच करता येत नाही.

त्या अनुषंगाने वैदिक संस्कृतीच्या उत्सवपरंपरा या जीवनाला प्रेरणा देणार्‍या आहेत. दीपावली हे पर्व ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्यास प्रवृत्त करणारा म्हणजेच ‘आरोह तमसो ज्योति:’ या वेदवचनाचा जणूकाही नवा आविष्कारच होय. या दीपोत्सवात घराघरांवर झळाळणारी दिव्यांची आरास ही आम्हास प्रकाशमय जीवन जगण्याचे बळ देते. या सणानिमित्ताने आसमंत प्रकाशाने उजळतो. बाह्य जग तेजोमय बनते. पण, अंतर्मनात दडलेल्या अंधाराचे काय? बहिरंगाबरोबरच अंतरंगही उजळावयास हवे! आम्हा सर्वांच्या मनात उद्भवणार्‍या काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या-द्वेष, अहंकार या षड्रिपूंचा भयावह अंधार हा आज आमचे जगणे असह्य करतोय. त्रिविध दुःखांनी आमचे जीवन त्रस्त व अशांत होत चालले आहे. या अंधाराला संपवायचे असेल, तर आत्मचैतन्याचा प्रकाश हवा! विवेकज्ञानाचा उजेड हवा! जेव्हा विवेकज्ञानाचे दिवे प्रज्वलित होतील, तेव्हा मानवी मनात घर करून बसलेला अंधार नाहीसा होईल. त्याचबरोबर जगामध्ये नित्यदिनी अविद्या, अज्ञान, अन्याय, अभाव यांपासून उद्भवत असलेले जागतिक स्तरावरील असंख्य प्रश्न अगदी चुटकीसरशी नाहीसे होतील.
अंधारवाटा अनेक आहेत. पण, त्यांवर प्रकाशाचा एक छोटासा किरणदेखील मात करू शकतो. त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या अज्ञानरूपी दुःखांना विवेकज्ञानाचा लघु अंशदेखील संपवू शकतो. याच संदर्भात संत ज्ञानेश्वरही म्हणतात, ‘जैसी दीपकलिका धाकुटी, परि ती बहु तेेजाते प्रकट। तैसी बुद्धी ही थेकुुुटी। म्हणो नये॥’ मंत्र्यांच्या प्रारंभी मानवाला त्रस्त करणार्‍या काही भूतकालीन दुर्गुण व दोषांच्या तिमिरांना नाहीसे करण्याकरिता प्रेरणा दिली आहे. माणूस हा अल्पज्ञ प्राणी असल्यामुळे जाणतेपणी किंवा अजाणतेपणी त्याच्या हातून काही चुका होऊ शकतात. म्हणूनच मंत्र म्हणतो, ‘गतानाम् मा आ दीधीथा:!’ मागे झालेल्या उणिवांबद्दल तू शोक करू नकोस. झाल्या गेल्या गोष्टी विसरून तू पुन्हा कामाला लाग. त्याचबरोबर ज्या जवळच्या व्यक्ती या जगातून निघून गेल्या आहेत, त्यांबद्दल शोक करू नकोस. भूतकाळाला दोष देत निराश व हताश होऊ नकोस. कारण, हा भूतकालीन अंधार तुला प्रगती साधू देणार नाही. महाभारतातील भीष्मपर्वांतर्गत श्रीमद्भगवद्गीतेतही योगेश्वर कृष्ण म्हणतात, ‘गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता:।’ भूतकालीन घडलेल्या घटनांविषयी, मृत्युमुखी पडलेल्या आपल्याच नातेवाईक किंवा इतर आप्तांविषयी अथवा निकटच्या स्नेही लोकांविषयी विद्वान लोक कधीही चिंता करीत नसतात.
झाले गेले विसरून जाऊन पुन्हा कामाला लागतात. माणसानेही असेच केले पाहिजे. पण, आजकाल माणूस मोठ्या प्रमाणात दु:खी होतोय. त्याचे कारण म्हणजे, त्याच्या हातून घडलेल्या काही चुका, दुष्कर्म किंवा इतरांकडून त्याच्यावर झालेले अन्याय! त्याचबरोबर नाना प्रकारच्या व्यर्थच्या चिंतांमुळे किंवा ओढविलेल्या संकटांमुळेसुद्धा तो निराश व हताश होतो आहे. इतकेच काय तर मागील भूतकाळाचा अंधार आठवत तो जगण्याची आशाही सोडून बसतोय. परिणामी, आत्महत्येसारख्या मार्गाकडे वळून जीवन संपविताना दृष्टीस पडतो. वेदांनी या अशा भूतकालीन अंधाराला नाहीसे करण्यासाठी वेदोक्तीच्या माध्यमाने नवे चैतन्याचे बळ दिले आहे. यासाठीच शेवटी प्रत्यक्ष भगवंत म्हणतात, “हे माणसा! तू पुढे ये, मी तुझ्या दोन्ही हातांना गतिमान बनवितो. तुला प्रदान केलेले हे दोन्ही कर म्हणजे पुरुषार्थासाठी मिळालेले वरदान आहेत. याचा उपयोग करून तू आपल्या जीवनातील अंतर्बाह्य अंधार नाहीसा करणे आणि प्रकाशाच्या जगणे जग!” याप्रसंगी कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रार्थनेतील खालील ओळी फारच उपयुक्त ठरतात.‘दे मुक्तता, भयहीनता अभिमान दे, दे लीनता, दे अंतरा शुभदायिनी मलयानिलासम भावना, तिमिरातुनी तेजाकडे ने दीप देवा जीवना!!’
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@