वैदिक संस्कृतीची प्राचीनता : लोकमान्य टिळकांचे संदर्भ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2020
Total Views |

vividh_1  H x W


मागच्या लेखांमध्ये वैदिक साहित्यातली आणि महाभारतासारख्या आर्ष महाकाव्यातली सरस्वती नदीची वर्णने आपण पाहिली. तिचे प्राचीन काळातले अस्तित्व आणि महत्त्व लक्षात घेता तिच्या खोऱ्यात बहरलेल्या नगरांना ‘सरस्वती नागरीकरण’ हेच नाव सर्वाधिक समर्पक ठरते. भूशास्त्र आणि भूजलशास्त्र यांचा अभ्यास करताना सरस्वतीचे प्राचीन अस्तित्वच नव्हे, तर तिचा काळ सुद्धा लक्षात येतो. तो थोडाथोडका नाही, तर निदान इ.स. पूर्व २४,००० इतका तरी नक्की मागे जातो, हे ही आपण मागच्या लेखात पाहिले. त्याच्या द्वारे पुन्हा एकदा आर्यांच्या स्थलांतराचा सिद्धांत कसा लंगडा पडतो, याचा आढावा आपण घेतला. आजच्या लेखापासून आपण ‘खगोलशास्त्र’ (Astronomy) ही ज्ञानशाखा या बाबतीत काय सांगते, याचा एक धावता आढावा घेऊया.


वैदिक साहित्यातले खगोलीय उल्लेख


वैदिक साहित्यात वेदांच्या सर्व संहिता, ब्राह्मण ग्रंथ, इत्यादि वाङ्मयाचा जसा समावेश होतो, तसे त्यात सहा वेदांगांचे ग्रंथ सुद्धा अंतर्भूत होतात. त्यातलेच एक म्हणजे ‘वेदांग ज्योतिष’. आजच्या आधुनिक युगात आपण ज्याला ‘खगोलशास्त्र’ म्हणतो, त्यालाच या प्राचीन काळात ‘ज्योतिष’ म्हणत असत. आकाशातल्या विविध गोष्टींच्या स्थितीवरून भविष्यात घडणाऱ्या घटनांचे आडाखे बांधण्याची विद्या म्हणजे ‘फलज्योतिष’ ही या प्राचीन ज्योतिषशास्त्राहून पूर्णपणे वेगळी आहे. या प्राचीन ज्योतिष शास्त्रात विविध नक्षत्रे, ग्रह, त्यांच्या गती, कालमापनाची क्लिष्ट आकडेमोड, वगैरे गणितीय आणि खगोलीय ज्ञानाचा समावेश होतो. अत्यंत प्राचीन काळापासून अगदी प्राथमिक अवस्थेत असलेल्या मानवाला आकाशातल्या सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, ग्रहणे, वगैरे गोष्टींचे गूढ वाटत आलेले आहे. ते उकलण्याचे कुतूहल सुद्धा सतत जागे राहिल्याने प्राचीन मानवाने या गोष्टींची सतत निरीक्षणे घेत त्यातून काही ना काही तथ्ये समजून घेतलेली आहेत. ती समजलेली तथ्ये अशा ग्रंथांमधून नोंदवून ठेवल्याने तो काळ नेमका कोणता होता, यावर आजच्या आधुनिक विज्ञानाच्या आधारे प्रकाश टाकता येऊ शकतो. चंद्राचा आकार आणि उगवण्याची – मावळण्याची वेळ या गोष्टी तर दररोज बदलणाऱ्या असल्यामुळे सहजपणे लक्षात येतातच. पण विविध तारे, त्यांच्या समूहातून बनणारे विविध आकार, त्यांच्या जागा आणि क्रम – अशा गोष्टी रोजच्या रोज तर नाहीच, पण वर्षानुवर्षे सुद्धा बदलत नाहीत. हे सुद्धा आपल्या प्राचीन पूर्वजांच्या लक्षात आलेले होते. चंद्राच्या सोबत उगवणारे नक्षत्र कोणते, सूर्याच्या सोबत उगवणारे नक्षत्र कोणते, त्यावरून चंद्राची आणि सूर्याची ‘जागा’ कशी बदलत जाते, बदलणारे दिनमान, ऋतू, इत्यादि बारकावे आणि त्यांच्यामधले परस्पर संबंध, यांचे ज्ञान अशा नोंदींमधूनच विकसित होत गेले. ‘दिवस’ ‘महिना’, ‘दक्षिणायन’, ‘उत्तरायण’, ‘वर्ष’ या संकल्पना सुद्धा अशाच विकसित होत गेल्या. यथावकाश आपल्या पूर्वजांना ‘अयनबिंदू’ (Solstice) आणि ‘संपातबिंदू’ (Equinox) यांचेही ज्ञान झाले. सूर्याची उगवण्याची जागा जेव्हा सर्वाधिक दक्षिणेला किंवा सर्वाधिक उत्तरेला असते, ते दिवस म्हणजे ‘अयनबिंदू’. यातला एक ‘दक्षिणायन बिंदू’ (December Solstice) तर दुसरा ‘उत्तरायण बिंदू’ (June Solstice) असतो. या दिवशी रात्र किंवा दिवस हे सर्वाधिक लांबीचे असतात. या दोन बिंदूंच्या बरोबर मधले बिंदू म्हणजे ‘संपातबिंदू’. यातला एक ‘वसंत संपात’ (March Equinox) तर दुसरा ‘शरद संपात’ (September Equinox) असतो. या दिवशी दिवस व रात्र हे समान लांबीचे असतात. वसंत संपाताच्या दिवशी नवे वर्ष सुरू झाले असे मानतात. आज आपण नक्षत्रांची नावे घेताना आश्विनीपासून सुरुवात करून रेवतीपर्यंत येऊन थांबतो. अर्थात जेव्हा आश्विनी नक्षत्रात वसंत संपात होऊ लागला, तेव्हाची कालगणना आज आपण वापरत आहोत. पण कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेत (४.४.१०) मात्र हीच गणना कृत्तिकेपासून सुरू होऊन भरणी नक्षत्राला संपते. अर्थात तैत्तिरीय संहितेचा जो काळ होता, तेव्हा कृत्तिका नक्षत्रात वसंत संपात होऊन वर्षाची सुरुवात होत असे. हा वर्षाच्या सुरुवातीचा दिवस असा का बदलतो?



पृथ्वीची ‘परांचन’ गती


पृथ्वी आपल्या आसाभोवती एखाद्या भोवऱ्याप्रमाणे फिरत असते, हे आपल्याला माहित आहे. पण भोवरा स्वत:भोवती फिरताना त्याचा अक्ष स्थिर राहत नाही, तो डळमळत असतो. तसेच पृथ्वीचा अक्ष सुद्धा एका दिशेत स्थिर राहत नाही. त्याची दिशा सतत बदलत राहते. या अक्षाची सुद्धा आकाशात एक फेरी होते. त्याची ही फेरी सुमारे २५,७७२ वर्षांनी पूर्ण होते. यामुळे ऋतू बदलतात, संक्रांती सुद्धा बदलतात. वैशाख-ज्येष्ठ महिन्यात सध्या कडकडीत उन्हाळा असतो. पण या फेरीच्या निम्म्या काळाने, म्हणजेच सुमारे १२,९०० वर्षांनी याच वैशाख-ज्येष्ठ महिन्यात थंडी असेल! थोडक्यात, सुमारे ७१-७२ वर्षांनी पृथ्वीचा अक्ष एक अंशाने मागे पडतो – किंवा ऋतू व संक्रांती पुढे सरकतात. या गतीला ‘परांचन’ गती (Precession) असे म्हणतात.


लोकमान्य टिळकांचे कार्य


स्व. लोकमान्य टिळक भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना एका विशिष्ट श्लोकापाशी थबकले. गीतेच्या दहाव्या अध्यायातील एकेका श्लोकात “विविध गटातल्या गोष्टींमध्ये सर्वात श्रेष्ठ किंवा पहिली गोष्ट मी आहे”, असे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. त्यामध्ये “मासानां मार्गशीर्षोऽहम्” (भ. गीता १०.३५) या श्लोकात “महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे”, असे सांगताना बहुधा त्या काळी मार्गशीर्ष महिना वर्षातला पहिला महिना गणला जात असावा, असा निष्कर्ष टिळकांनी काढला. म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याने वसंत ऋतूत वर्षाची सुरुवात मानण्याची पद्धत महाभारत काळाच्या आधीच पडलेली असावी. सध्या जर चैत्र महिना वर्षाचा पहिला महिना आहे आणि वसंत संपात चैत्रात होतो, तर मार्गशीर्ष महिन्यात वसंत संपात होणारा काळ कोणता असेल? या विचाराने आकडेमोड करताना अतिशय आश्चर्यकारक तथ्ये त्यांच्या लक्षात आली. सध्या वसंत संपताची तारीख २० मार्च अशी निश्चित असते. यंदाची मार्गशीर्ष प्रतिपदा १५ डिसेंबर २०२० रोजी आहे. यातला फरक सुमारे ९६ दिवस आहे. तो लक्षात घेता महाभारत युद्धाचा काळ ९६ X ७२ इतकी वर्षे, म्हणजे सुमारे ७००० वर्षे मागे – अर्थात इ.स. पूर्व ५००० इतका मागे जातो! एका नक्षत्रात वसंत संपात सुमारे ९६० वर्षे राहतो. त्यामुळे महाभारताचा काळ इ.स. पूर्व ५९६० ते इ.स. पूर्व ५००० दरम्यानचा असा टिळकांच्या गणितानुसार ठरतो. हे पाहता वेदकाल तर त्याच्याही आधी काही सहस्रकांपासून सुरू होतो, हे ओघानेच आले. त्यानंतर मग त्यांनी एकूणच वैदिक साहित्यातले असे अनेक खगोलीय संदर्भ शोधून काढले आणि त्यावरून त्यांचीही कालनिश्चिती केली. या काळातल्या एका विशिष्ट टप्प्याला त्यांनी “मृगशीर्षारंभ काल” असे नाव दिले. त्यातही पहिला टप्पा “मृगशीर्षारंभ अदिती काल” हा सांगितला. यात वसंत संपात पुनर्वसू मध्ये होता. हा अदिती काल साधारणपणे इ.स. पूर्व ६००० ते इ.स. पूर्व ४००० दरम्यान संपणारा असा, तर पुढचा मृगशीर्षारंभ काल साधारणपणे इ.स. पूर्व ४००० ते इ.स. पूर्व २५०० असा टिळकांनी सांगितला. यात वसंत संपात आर्द्रा नक्षत्रात होता. वर उल्लेख केलेला तैत्तिरीय संहितेचा काळ इ.स. पूर्व सुमारे २५०० ते इ.स. पूर्व सुमारे १४०० या दरम्यानचा “कृत्तिकारंभ काल” या नावाने त्यांनी दाखवला. सध्या आपण कालगणनेत वापरतो तो आश्विनी नक्षत्रात वसंत संपात होणारा काळ खरे तर इ.स. पूर्व १४०० ते इ.स. पूर्व ५०० या दरम्यानचा आहे, हे त्यांनी दाखवून दिले. हा सगळा अभ्यास त्यांनी त्यांच्या “The Orion” या दीर्घ निबंधात मांडला आहे. सध्या वसंत संपात पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात होतो. तेव्हा फाल्गुन महिना चालू असतो. त्यामुळे हा महिन्यांचा आणि नक्षत्रांचा क्रम बदलण्याची गरज आहे, हे या निमित्ताने आपण लक्षात घेतले पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात “भारतीय सौर” कालमापन पद्धतीत हा गोंधळ दूर केला गेला आहे. तीच पद्धत आपण जास्तीत जास्त वापरात आणण्याची गरज आहे.



तात्पर्य – वैदिक काळ, महाभारत काळ हा अशा पद्धतीने जितका मागे जातो, ते पाहता इ.स. पूर्व १८००-१५००च्या दरम्यान मध्य आशियन ‘आर्यांनी’ भारतात स्थलांतर केले, आणि त्याच्या नंतर पुढे कधीतरी वेद वगैरे साहित्याची निर्मिती केली, हा युरोपीय विद्वानांचा सिद्धांत कशाच्या आधारे खरा मानायचा? आर्यांच्या आक्रमणाच्या किंवा स्थलांतराच्या सिद्धांताला कसलाच आधार नाही, हे असे वेगवेगळ्या मार्गांनी वारंवार सिद्ध होत आहे.



- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ‘भारतविद्या’ अथवा ‘प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@