सशस्त्र क्रांतीचे जनक-आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2020
Total Views |

lahuji_1  H x W



आपल्या वडिलांचा मृत्यू आणि तोसुद्धा स्वराज्य रक्षणासाठी. मग काय, हा देश पुन्हा स्वतंत्र करण्यासाठी लहुजी यांनी शपथ घेतली. ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी.’ लहुजींना युद्धशास्त्राचे जे ज्ञान अवगत होते, त्याने तरुणांना बलशाली व युद्धकलेत तरबेज करण्याचे महान कार्य लहुजींनी करत आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याचे ठरविले व शेवटपर्यंत ते व्रत त्यांनी निष्ठेने पाळले.



गुरुवर्य क्रांतिकारकाचे नाव लहुजी राघू साळवे, म्हणजेच लहुजी वस्ताद. त्यांचा जन्म किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी पेठ या गावी दि. १४ नोव्हेंबर, १७९४ साली झाला. त्यांच्या आजोबांचे नाव लहुजी होते. लहुजी बाबा हे शिवाजी महाराजांचे भक्त होते. त्यांनी शिवकालीन काळात शिवाजी महाराजांसाठी त्या भागातील ५०० तरुणांना एकत्र करून पुरंदर किल्ल्यावर लष्करी प्रशिक्षण केंद्राद्वारे ते तरुणांना दांडपट्टा चालविणे, तलवारी, भालाफेक इत्यादीमध्ये ते तरबेज बनवित असत. संभाजी राजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला होता. शिवाजी महाराज पेठ या गावी मोजक्या सैन्यासह मेण्यातून निघाले असताना, लहुजी बाबांनी वार्‍याच्या वेगाने जोरात येऊन मेण्याचे कापड बाजूला सारून शिवाजी महाराजांवर पुष्पवृष्टी केली होती व पुरंदर किल्ल्यावर निघून गेले. तसेच पुरंदर किल्ल्यावर शिवाजी महाराज व लहुजी बाबांची भेट होते. शिवाजी महाराज लहुजींचे शौर्य पाहून त्यांना ‘राऊत’ ही पदवी व तलवार भेट देतात. पुरंदर पायथ्याची २० एकर जमीन देऊन त्यांच्या आईला पाच एकर जमीन, चोळी बांगडी म्हणून देतात. लहुजी बाबांच्या नंतर पुरंदर किल्ल्याची जबाबदारी लहुजींचा मुलगा राघोबा साळवे यांच्याकडे आली.

राघोबा पुरंदरच्या जंगलात फिरत असताना एक वाघ, त्यांच्यासमोर आला. राघोबाने तो वाघ टिपरूच्या साहाय्याने टिपला व त्यास बांधून पेठ या गावात त्यांच्या दारात बांधून ठेवला. हा.. हा... म्हणता ही बातमी पेशव्यांना कळली. पेशव्यांसाठी तो वाघ हुजुरपागेतील शिकारखान्यात, पुरंदर किल्ल्यावरून डोक्यावर राघोबांनी पुण्यात आणला. राघोबांना शिकारखान्याचे प्रमुख करण्यात आले. राघोबा शरीराने मजबूत आणि शस्त्रविद्येत संपूर्ण तरबेज असल्याने स्वराज्याचा भोक्ता असल्यामुळे अंगाच्या गुणवत्तेमुळे पेशव्यांकडे नोकरीला राहिले. पेशव्यांचा भव्य शिकारखाना त्यावेळी हुजुरपागेत होता. त्या ठिकाणी शिकारखान्याचा प्रमुख म्हणून राघोबा साळवे नोकरीला लागले. लहुजीसुद्धा आपल्या वडिलांसोबत या ठिकाणी जायचे व त्यांच्याकडूनच त्यांनी शस्त्रविद्येचे शिक्षणही घेतले. किशोर वयापासून लहुजी युद्धशास्त्रात निपुण झाले होते. घोड्यावर स्वार होणे, दांडपट्टा, तलवार, भालाफेक इत्यादी सर्व कला लहुजींनी आत्मसात केल्या होत्या. याच काळात स्वराज्यावर इंग्रज व मुघलांच्या स्वार्‍या होत होत्या. पुणे तर सर्वांचे महत्त्वाचे लक्ष्य होते. कारण, महाराष्ट्र हाच एक असा इलाका होता की, ज्याने शेवटपर्यंत हिंदुस्थानच्या शत्रूशी झुंज दिली व त्याचे केंद्र होते पुणे. हिंदवी स्वराज्याचा श्री गणेश ज्या पुण्यात झाला आणि ज्या कसबा गणपतीच्या प्रथम पूजनाने जिजाऊ साहेबांनी बाल शिवरायांकडून येथील मातीत सोन्याचा नांगर फिरवला, ते पुणे उद्ध्वस्त करून ताब्यात घेणे हाच इंग्रजांचा अखेरचा प्रयत्न होता. म्हणून १८१७ साली इंग्रजांनी पुण्याजवळील खडकी या लष्करी तळावरून पुण्यावर अखेरचा व जबरदस्त हल्ला चढविला. घनघोर युद्ध झाले. मराठी सेना भगव्या झेंड्याच्या सन्मानासाठी प्राणपणाने लढत होती. राघोबा साळवे हेसुद्धा स्वातंत्र्योत्सव रणात झुंजत होते. शेवटी मराठी सेनेचा पराभव झाला.राघोबा धारातीर्थी पडले. आजही पुणे-मुंबई मार्गावर ग. दि. माडगुळकर यांच्या घराजवळील बजाज कंपनीसमोरील पुलाच्या बाजूला जे ‘मांगीरबाबा’ या नावाने ओळखले जाणारे छोटेसे मंदिर आहे. तीच या राघोबा राऊत यांची समाधी आहे.

यावेळी लहुजींचे वय होते २३ वर्षे. आपल्या वडिलांचा मृत्यू आणि तोसुद्धा स्वराज्य रक्षणासाठी. मग काय, हा देश पुन्हा स्वतंत्र करण्यासाठी लहुजी यांनी शपथ घेतली. ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी.’ लहुजींना युद्धशास्त्राचे जे ज्ञान अवगत होते, त्याने तरुणांना बलशाली व युद्धकलेत तरबेज करण्याचे महान कार्य लहुजींनी करत आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याचे ठरविले व शेवटपर्यंत ते व्रत त्यांनी निष्ठेने पाळले. पुण्यातील पर्वती व गुलटेकडी परिसरातील एकांत ठिकाणी तरुणांना युद्धशिक्षण देण्याचे काम त्यांनी सुरू केले. देशासाठी अज्ञातवासात राहून गुप्त संघटना तयार करून तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून अखंडपणे अविरत निःस्वार्थ बुद्धीने महान कार्य लहुजींनी केले. त्यांच्या कार्याला तोड नाही. युद्धकलेत निपुण व ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे, असे व्यक्तिमत्त्व सध्यातरी लहुजी वस्तादांशिवाय दुसरे नाही, असे लोकमान्य टिळकांनाही त्यावेळी वाटत होते.
यावरून लहुजी वस्ताद म्हणजे त्या काळातील सर्व घटकांना आदरणीय वाटणारा नेता होता. लहुजी वस्ताद यांचं सर्व आयुष्यच देशकार्यार्थ समर्पित होतं. ते स्वतः अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते. नित्य नियमाने ते प्रातःकाळी पूजाअर्चा करत. त्यांच्या कपाळाला गंध, टिळा, भस्माचे पट्टे असत, डोक्याला भले मोठे पागोटे. अंगात बंडी, खांद्यावर कांबळी आणि आखूड धोतर, अशा अत्यंत साध्या; परंतु रुबाबदार राहणीचा हा पुरुष पाहिल्याबरोबर त्यांच्याबद्दल पाहणार्‍यांच्या मनात नितांत आदर निर्माण होत असे. भक्कम कमावलेली शरीरयष्टी, भारदस्त मिशा, तेजस्वी डोळ्याचे लहुजी पुण्याला बाहेरच्या वस्तीतच, म्हणजे आपण ज्याला गंजपेठ म्हणतो, त्या ठिकाणी राहत असत.



लहुजी वस्तादांकडे जी मंडळी शिक्षण घेण्यासाठी येत, त्यातील काही निवडक मंडळींचीच माहिती उपलब्ध होते. त्यात सदाशिवराव परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, गोवंडे आदी प्रमुख घेत, तर पुढे स्वतः महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांनीसुद्धा लहुजींकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले. स्वतः ज्योतिबा फुले तर लहुजी ज्या ठिकाणी वास्तव्याला होते, त्या परिसरात रहिवासी होते. ते नियमितपणे एकमेकांना भेटत होते. महात्मा फुले यांनी गोरगरिबांनी, अज्ञानी बांधवांनी शिक्षण घेतले पाहिजे म्हणून जो प्रचार केला, त्या कार्यातही लहुजी वस्ताद, महात्मा फुले यांच्यासमवेत वस्तीवस्तींत फिरून लोकांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करीत होते व मुक्ता साळवे हीस महात्मा फुले यांच्या शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवित होते. लहुजी वस्ताद शस्त्रविद्येचे गुरूच ठरतात. ज्योतिबा फुले व लोकमान्य टिळक, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हेसुद्धा युद्धशास्त्र शिक्षणार्थ लहुजींकडे येत असत. त्यावेळी फडके हे सदाशिवपेठेतील नृसिंह मंदिरातील एका खोलीत राहत असत. याच मंदिरात लहुजी वस्ताद अनेक वेळा येऊन गेलेले आहेत. पुढे इंग्रजी सत्तेला आव्हान देण्यासाठी फेब्रुवारी १८५९मध्ये शिवरात्री मुहूर्तावर मांग, महार, रामोशी, काही पांढरपेशे अशांच्या सामर्थ्यावर वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्यास्तव सशस्त्र उठाव केला व एकामागून एक हल्ल्यांमुळे इंग्रज शासनही चक्रावून गेले. ते शेवटी ब्रिटिशांच्या हाती सापडले. २०जुलै, १८७९च्या मध्यरात्री देवरनावडगा येथे डॅनियलने त्यांना घेरले आणि हाता-पायात बेड्या घालून पुण्यात आणले. पुण्याच्या संगम पुलाजवळील सत्र न्यायालयात ब्रिटिश सरकार विरुद्ध सशस्त्र बंड करण्याच्या आरोपावरून हिंदुस्थानातील पहिला राजद्रोहचा खटला चालवला. या खटल्याच्या अंतिम सुनावणीच्या वेळी लहुजी वस्ताद आपल्या प्रिय शिष्याला म्हणजेच वासुदेव बळवंत फडके यांना कोणती शिक्षा होते, हे ऐकण्यासाठी त्या न्यायालयात उपस्थित होते. तो दिवस होता ७ नोव्हेंबर, १८७९. म्हणजे यावेळी लहुजींचे वय वर्षे ८५ पर्यंत पोहोचले होते. वासुदेवांना यावेळी काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा होऊन त्यांना एडनच्या तुरुंगात मरेपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे निकालपत्र ऐकून लहुजी किती अस्वस्थ व दुःखी झाले असतील याची कल्पनाच केलेली बरी. फडके यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर लहुजी संगम पुलाच्या परिसरात वावरत असत. शेवटी १७ फेब्रुवारी, १८८१साली त्यांनी आपली जीवनगाथा संपविली. अशा महान क्रांतिकारकास कोटी-कोटी वंदन!


- डॉ. भरत वैरागे
(लेखक पुणे महानगरपालिकेत नगरसेवक असून भाजप अनुसूचित जाती मोर्चा- महाराष्ट्रचे उपाध्यक्ष आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@