एक दिवाळी सैनिकांसोबत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2020
Total Views |

indian army_1  


‘अल्टिमेट हायकर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्स’ संस्थेतर्फे दरवर्षी भारतीय सीमेवर तैनात सैनिकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन दिवाळी साजरी करण्यात येते. यंदा कोरोना संकटामुळे संस्थेच्या परंपरेत खंड पडतो की काय, अशी चिंता होती मात्र, ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली व संस्थेच्या सदस्यांनी साडेपाच हजार किमीचा दुचाकी प्रवास करून भारत-चीन सीमेवरील ‘माना’ या ठिकाणी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली.


मुंबई :
‘अल्टिमेट हायकर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्स’ या संस्थेतर्फे यंदाही दिवाळी भारताच्या शेवटच्या गावी, भारत-चीन सीमेवर माना बॉर्डर येथे सैनिकांसोबत साजरी करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून संस्था ऐन दिवाळीत आपल्या सेनेच्या अतिदुर्गम भागातील चेक पोस्टवर जाऊन भारतीय जावनांसोबत साजरी करत असते. जवानांना शुभेच्छापत्रे, फराळ, भेटवस्तू देऊन छोटासा कार्यक्रम सीमेवर पार पाडला जातो. गतवर्षी दिवाळीच्या दिवशी ‘अल्टिमेट हायकर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्स’ संस्थेच्या सदस्यांनी अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवरील सैन्य अधिकारी आणि जवानांना शुभेच्छापत्रे आणि फराळ देऊन साजरी केली. त्याच दिवशी तवांग येथील दहा हजार फूट उंचीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर दीपोत्सव करून सदस्यांने महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले होते.

त्याआधीच्या वर्षी भारत-चीन सीमेवरील ‘गुरुडोगमर’ या जगातील सर्वात उंच सरोवराच्या पोस्टवरील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली गेली होती. या अभिमानास्पद परंपरेला यावर्षी कोरोनामुळे खंड पडतोय की काय, या चिंतेत संस्था सदस्य असतानाच, अचानक ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाल्याच्या बातम्या आल्या आणि संस्थेचे संस्थापक योगेश आलेकरी यांनी निवडक सदस्यांना घेऊन सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला.योगेश आलेकरी, विशांत वचकल, अमोल लिमन, सुनील जाधव, योगेश खुटवड, शीतल चिंधे, अशी ‘अल्टिमेट हायकर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्स’चे निवडक आणि बेधडक सदस्य मुंबई-उत्तराखंड-मुंबई अशा तब्बल पाच हजार ५०० किमीच्या दुचाकी प्रवासासाठी सज्ज झाले.

भरतीताई धोंडे यांनी, यावेळी शुभेच्छापत्रे न देता काही भावनिक हस्तलिखित टपालपत्रे लिहून संस्थेच्या वाशीच्या ऑफिसमध्ये आणून दिली, तर भूषण भागवत यांच्या मुलीने स्वहस्ते बनविलेली शुभेच्छापत्रे पुणे ऑफिसला जमा केली. तर अजिंक्य हाडके यांनी मिठाईचे बॉक्स सदरील मोहिमेस पाठवून दिले. ‘कोविड’ परिस्थितीवर मात करत, नोव्हेंबरच्या कडाक्याच्या थंडीत हिमालयातील पर्वताच्या कुशीत वसलेल्या या भागात दुचाकीवर प्रवास म्हणजे एक साहसी प्रकारच..!! पण, या प्रवसातली थ्रिल अनुभवत सह्याद्रीचे मावळे हिमालयातील आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने मजल दरमजल करत पुढे सरकत होते. अतिशय काळजीपूर्वक आणि उत्तरेतील राज्यांच्या नियमावलीचे पालन करत टीम, मुंबई येथून दुचाकी प्रवास करत उत्तराखंड येथे पोहोचली. केदारनाथ, बद्रिनाथ, तुंगनाथ या भव्य कैलास रूपांचे दर्शन घेऊन पांडवांच्या चारणस्पर्शाने पावन झालेल्या माना या भारताच्या सर्वात शेवटच्या गावी पोहोचल्यानंतर ठरल्याप्रमाणे सीमेवर तैनात सैनिकांसोबत दिवाळी फराळ व हस्तलिखित पत्रे देऊन ‘कोविड’ परिस्थितीमुळे कमीत कमी संपर्क आणि गर्दी टाळून छोटेखानी कार्यक्रमाच्या स्वरूपाने उपक्रम पार पडला.


जवानांच्यावतीने त. घ. राणा यांनी शुभेच्छापत्रे स्वीकारली. त्यांनी येथील नैसर्गिक आव्हानात्मक परिस्थितीमधील आपले चित्तथरारक अनुभव सांगितले. बर्फवृष्टी झाल्यावर सीमेवर सैनिकांना रसदपुरवठा, दररोजचे रुटीन सांभाळणे, रस्ते खुले करणे, प्रचंड थंडीत हाती शस्त्र घेऊन आठ-आठ तास उभे राहणे हे त्यांचे अनुभव अंगावर काटा आणणारेच होते. ते आज तिथे या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन उभे आहेत म्हणून आपण घरात सुखाने दिवाळी साजरी करतो, यासाठीच आपण या जवानांचे काहीतरी देणे लागतो, म्हणूनच आपल्या संस्थेचे सदस्य स्वतःच्या घरात सर्वसुख दिवाळी सुरू असलेली टाकून या खडतर मार्गावर, कडाक्याच्या थंडीत वाट वाकडी करून येत असतात आणि इथे आल्यावर या फौजीबंधूंना भेटल्यावर केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे नक्कीच वाटते.

या ठिकाणी ‘अल्टिमेट हायकर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्स’ संस्थेचे संस्थापक योगेश आलेकरी, विशांत वचकल, अमोल लिमन, सुनील जाधव, योगेश खुटवड, शीतल चिंधे हे उपस्थित होते. दिवाळीला सर्व जवानांना सुट्टी भेटतेच असे नाही, म्हणून शक्य तेवढे, फूल ना फुलांची पाकळी म्हणून संस्थेचे सदस्य दरवर्षी आपली दिवाळी घरी साजरी न करता कुठेतरी सीमेवर साजरी करतात. “या उपक्रमात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावी,” असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


योगेश आलेकरी
९७०२५२५४३५
(योगेश आलेकरी अल्टीमेट हायकर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्स, मुंबई, संस्थेचे संस्थापक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@