राजकीय इस्लामविरोधात कुर्झ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2020
Total Views |
agralekh_1  H x


सभ्यता आणि रानटीपणातला हा संघर्ष असल्याचे कुर्झ यांचे मत अजिबात चुकीचे नाही. कट्टरपंथी इस्लामींनी ठिकठिकाणी केलेल्या हल्ल्यांतूनही त्याची खात्री पटते. कारण, मध्ययुगीन काळातील जंगली कल्पनांसाठी आधुनिक काळातील निष्पाप जनतेला मारुन टाकण्याचाच प्रकार धर्मांध जिहादी सातत्याने करत आलेत.
 
फ्रान्समध्ये सॅम्युअल पॅटी या शिक्षकाची मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखवल्याने मुंडके छाटून हत्या करण्यात आली. तद्नंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामी कट्टरपंथाविरोधात जोरदार आघाडी उघडली. इस्लामला जगावरील संकट घोषित करतानाच पाश्चिमात्त्य मूल्यांसाठी कट्टरतावाद धोकादायक असल्याचे ते म्हणाले. फ्रान्समध्ये धर्मांध जिहादचा नमुना दाखवल्यानंतर कट्टरतावाद्यांनी ऑस्ट्रियामध्येही हिंसाचार घडवून आणला. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये सहा ठिकाणी इस्लामी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला व त्यात चार जणांचा बळी गेला आणि १३ जण जखमी झाले. मात्र, ऑस्ट्रियाचे चॅन्सलर सबॅस्टियन कुर्झ यांनी धर्मांध जिहादचे संकट ओळखले व त्यांनीही फ्रान्सच्या पावलावर पाऊल टाकले.
 
 
फ्रान्सच्या अध्यक्षांनी कट्टरतेविरोधात उघडलेल्या मोहिमेला त्यांनी एकाप्रकारे पाठिंबा दिला व धर्मांध जिहादविरोधात भूमिका घेतली. आता तर युरोपातील दोन प्रमुख देशांचे दोन्ही नेते इस्लामी मूलतत्त्ववादाला लोकशाही, एकता, सामाजिक सामंजस्यासमोरील सर्वात मोठा धोका मानत असून त्यानुसार कृती करताना दिसतात. तसेच इस्लामी लागेबांध्यांतून येणार्‍या परकीय धन-संपत्ती-देणग्यांवर दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली असून शिक्षण प्रणालीतील इस्लामी प्रभावाबद्दलही त्यांनी काळजी व्यक्त केली आहे. आगामी काळात तर ऑस्ट्रिया फ्रान्सच्या बरोबरीने कट्टर इस्लामविरोधी अजेंडा राबवू शकतो व यामुळे अन्य युरोपीय देशांनाही योग्य तो संदेश मिळेल, तसेच त्यांनाही आपल्याला कोणाच्या बाजूने उभे राहायचे, हे ठरवावे लागेल.
 
 
व्हिएन्नातील जिहादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रियन सरकारने कट्टरतावादाविरोधात धडक कारवाई करत राजकीय कारणासाठी वापरल्या जाणार्‍या मशिदींवर बंदी घातली. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार सबॅस्टियन कुर्झ यांनी राजकीय उद्देशांसाठी इस्लामी कट्टरपंथियांकडून वापरल्या जाणार्‍या देशातील सर्वच सामाजिक व शैक्षणिक संस्थांची ओळख पटवून त्यांच्या नोंदणीचे निर्देश दिले. कुर्झ यांच्या मंत्रिमंडळाने दहशतवादी गुन्ह्यांतील दोषींना आजन्म जन्मठेपेच्या शिक्षा प्रस्तावाचेही समर्थन केले आहे. सोबतच दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यातील गुन्हेगाराची सुटका झाली, तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स किंवा निगराणीचाही निर्णय घेतला. धार्मिकरीत्या प्रेरित कट्टरपंथाला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्याचेही ऑस्ट्रियन सरकारने निश्चित केले आहे. एकूणच सबॅस्टियन कुर्झ धर्मांध जिहाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेऊनच थांबलेले नाहीत, तर सत्तेचा योग्य वापर करत कायद्याच्या माध्यमातून त्याला आळा घालण्यासाठीही कामाला लागल्याचे दिसते. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कुर्झ यांनी केलेल्या ट्विटमधूनही त्याचा दाखला मिळतो. ते म्हणाले की, “आम्ही राजकीय इस्लामला गुन्हा घोषित करत आहोत. कारण, ते स्वतः दहशतवादी नसले तरी दहशतवाद्यांसाठी ‘ब्रीडींग ग्राऊंड’चे/दहशतवादी जन्माला घालण्याचे काम ते करतात.”
 
 
ऑस्ट्रियन सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धक्का पोहोचविणार्‍या सर्व मशिदी बंद करण्याचे आदेशही दिले. व्हिएन्नातील जिहादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रियन पोलिसांनी इस्लामी कट्टरपंथाशी निगडित ६० पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी केली व ३० संशयितांच्या चौकशीचे आदेशदेखील दिले. हल्ल्यानंतर सबॅस्टियन कुर्झ यांनी आपले मत व्यक्त केले होते. “ख्रिश्चन किंवा इस्लाम अथवा ऑस्ट्रियाई व निर्वासितांमधील हा संघर्ष नाही, तर शांततेवर विश्वास ठेवणार्‍या व युद्धाची संधी शोधणार्‍यांतला हा संघर्ष आहे. सभ्यता आणि रानटीपणातला हा संघर्ष आहे,” असे ते म्हणाले होते. कुर्झ यांचे मत अजिबात चुकीचे नाही, हे कट्टरपंथी इस्लामींनी ठिकठिकाणी केलेल्या हल्ल्यांतून कोणालाही पटू शकते. कारण, मध्ययुगीन काळातील जंगली कल्पनांसाठी आधुनिक काळातील निष्पाप, निरागस जनतेला वेठीस धरण्याचा-मारुन टाकण्याचाच प्रकार धर्मांध जिहादी सातत्याने करत आलेत. आता मात्र, इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या असंस्कृत कल्पनांच्या विनाशासाठी जग एकटवत असल्याचे दिसते.
 
 
युरोपातील फ्रान्स असो वा ऑस्ट्रिया किंवा इतर कोणी वर्षानुवर्षांपासून मानवी मूल्ये, मानवी अधिकाराची महिमा वर्णत आले. पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद वगैरे कल्पना या देशांनी सदोदित बाळगल्या, पण त्या कितीही उदात्त असल्या तरी त्या सभ्य-सुसंस्कृत समाजापर्यंतच मर्यादित असतात. अर्थात, याचे भान तिथल्या राज्यकर्त्यांनी बराच काळपर्यंत राखले नाही व इस्लामी दहशतवाद असो की कट्टरपंथी इस्लाम, निर्वासित-घुसखोर असोत, त्यांच्यासाठीही त्यांनी वरील कल्पना वापरण्याचा उद्योग केला. पण, त्यामुळे उलटेच झाले व जिहादी धर्मांधांनी युरोपातील ही मूल्ये ‘आम्ही सांगू तोच इस्लाम, मान्य नसेल तर मरा’, या एकमेव ध्येयापोटी पायदळी तुडवायला सुरुवात केली.
 
 
फ्रान्समधील शिक्षकाच्या हत्येनंतर मानवी मूल्ये आणि अधिकारांची युरोपातली झिंग उतरु लागली व आता ऑस्ट्रियाही त्याच दिशेने मार्गक्रमण करु लागला. ते मानवी संस्कृतीच्या जिवंततेसाठी आवश्यकच म्हटले पाहिजे. कारण, एका वृत्तानुसार ऑस्ट्रियात इस्लामी कट्टरपंथाचा प्रसार वेगाने होत असून, ‘इस्लामिक स्टेट’मध्ये सामील होणार्‍यांची युरोपातील सर्वाधिक संख्या ऑस्ट्रियातील तरुणांची आहे. केवळ स्थलांतरितच नव्हे, तर बाल्कन देश आणि चेचन्यातूनही ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी येत आहेत. दरम्यान, सबॅस्टियन कुर्झ यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याही आधी इस्लामी कट्टरपंथाविरोधात लक्ष वेधले होते.
 
 
गेल्यावर्षी त्यांनी फ्रीडम पार्टीच्या सहकार्याने कट्टर इस्लामींवर कारवाई केली होती, तर यंदाच्या जुलैत गृहमंत्र्यांनी राजकीय इस्लामच्या कामावर नजर ठेवण्यासाठी एक नवे कार्यालय उघडले. इतकेच नव्हे तर २०१५ साली १९१२ सालच्या कायद्यात महत्त्वाची दुरुस्तीही केली होती. ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या प्रतिकांवर बंदी, कट्टरपंथी मशिदींवर बंदी, इमामांची बरखास्तीची कामे कुर्झ यांनी केली होती. आता त्यांची ही कट्टर राजकीय इस्लामविरोधातील मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसते व यावेळी फ्रान्ससारखा शक्तिशाली देशही कट्टर इस्लामविरोधात उभा ठाकलेला आहे.



@@AUTHORINFO_V1@@