संभल जाओ नितीशबाबू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2020   
Total Views |
NITISH KUMAR_1  
 
 

‘बिहारची नाडी ओळखणारा नेता’ अशी ओळख असलेले नितीश कुमार या निवडणुकीत मात्र अगदी सुरूवातीपासूनच अस्वस्थ होते. त्यांची मुख्यमंत्रिपदाची पुढची पाच वर्षेही आता याच अस्वस्थतेत जातील. मात्र, त्यांच्यापुढे आता जदयुला नवे नेतृत्व देण्याचे आव्हान आहे. तसे न केल्यास पुढील पाच वर्षांनी नितीश कुमारांचा पक्ष अगदीच किरकोळ होऊन जाईल.
 
 
 
पंजाबमधल्या लुधियानामध्ये २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सर्व मुख्यमंत्री एकत्रित येऊन शक्तीप्रदर्शन करणार होते. मात्र, त्या सभेत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार फारसे उत्सुक नव्हते. त्याचे कारण म्हणजे सभेच्या मंचावर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार होते. आता सेक्युलर असलेले नितीश कुमार अशाप्रकारे जाहीर सभेमध्ये मोदींसोबत यायला तयार नव्हते, अखेर लालकृष्ण अडवाणींच्या इच्छेपुढे नितीश कुमारांचे काही चालले नाही आणि अखेर ते उपस्थित राहिले.
 
 
मात्र, तेथेही नरेंद्र मोदींसोबत कोणत्याही प्रकारचा संवाद साधणे ते टाळत होते आणि मोदींपासून अंतर राखूनच होते, त्यांच्या चेहर्‍यावरची चलबिचलही अगदी स्पष्ट दिसत होती. मात्र, मंचावर सर्व नेते उपस्थित झाल्यावर दुसर्‍या कोपर्‍यात उभे असलेले नरेंद्र मोदी नितीश कुमारांकडे चालत आले आणि नितीश कुमारांचा हात धरून समोरच्या जनसागराकडे पाहून उंचावला आणि त्याचवेळी समोरून कॅमेर्‍यांचा लखलखाट झाला. त्यावेळी नितीश कुमारांचा चेहरा जबर धक्का बसल्यासारखा झाला होता आणि काही कळायच्या आतच मोदी पुन्हा आपल्या जागी गेले होते. सभा संपल्यावर नितीश कुमारांचा राग अखेर बाहेर आला आणि आपल्या सहकारी नेत्याकडे पाहून ते म्हणाले - “याच्यासाठीच मला येथे आणले का? हे असे घडणार याची तुम्हाला कल्पना होती. मात्र, तरीदेखील तुम्ही मला यायला भाग पाडलं. हे जे काही घडलं आहे ती अगदी सुनियोजित आहे. आता उद्या प्रत्येक वर्तमानपत्रात हा फोटो पहिल्या पानावर छापला जाईल. अशाप्रकारचे राजकारण मला अजिबात पसंत नाही....”
 
 
अर्थात, एकेकाळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत अंतर राखणार्‍या नितीश कुमारांचे मुख्यमंत्रिपद आज त्याच मोदींमुळे शाबुत राहिले आहे. विशेष म्हणजे, बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ सभा घेतल्या. त्या प्रत्येक सभेत नितीश कुमार उपस्थित होते आणि प्रत्येक सभेत ‘नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील, तेच एनडीएचे नेते आहेत’ हे मोदींनी अगदी ठामपणे सांगितले. बिहार विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली आहे. कारण, कोरोना संसर्गाच्या काळात निवडणूक घेणे हे सर्वांत मोठ आव्हान होते. त्यातही बिहारसारख्या राज्यात ते आव्हान अधिकच असल्याचे सांगितले जात होते. मात्र, निवडणूक आयोगाने अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली. दुसरे आव्हान राजकीय पक्षांपुढे होते, ते म्हणजे प्रचार करण्याचे. कारण, निवडणुकीचा प्रचार म्हटला की लाखोंच्या सभा, रोड शो, घरोघरी जाणे हे आलेच. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, निवडणूक आयोगाने त्यासाठी अनेक बंधने घातली होती. त्यामुळे राजकीय पक्षांना ऑनलाईन प्रचारावर भर द्यावा लागला. कोरोनामुळे मतदानाचा टप्पा घसरण्याचे बोलले जात असतानाही समाधानकारक झालेले मतदान हे दिलासादायक ठरले आहे.
 
 
‘बिहारची नाडी ओळखणारा नेता’ अशी ओळख असलेले नितीश कुमार या निवडणुकीत मात्र अगदी सुरूवातीपासूनच अस्वस्थ होते. चिराग यांच्या कथित बंडामुळे त्यांची प्रचंड चिडचिड झाली होती, त्यामुळेच एनडीएच्या जागवाटपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत येण्यास त्यांनी सुरुवातीला नकार दिला होता. कारण, चिराग यांना भाजपची फूस असल्याचा त्यांचा ठाम समज झाला होता. मात्र, भाजपने त्यानंतर त्यांची समजूत काढली. पुढे मोंदींसह सर्वांनी नितीश यांचेच नेतृत्व कायम राहील, असेही सांगतिले.
मात्र, तरीदेखील ‘जैसे थे’ स्थितीत आलेल्या जदयुला यावेळी नितीश कुमारांचा करिश्मा वाचवू शकला नाही. विशेष म्हणजे, ही माझी शेवटची निवडणूक असल्याची भावनिक सादही त्यांनी घातली, तरीदेखील अवघ्या ४३ जागांवर जनतेने त्यांची बोळवण केली. त्यामुळे पुढील पाच वर्षे सरकार चालविताना नितीश यांच्यावर जनतेच्या या नाराजीचे मोठे आव्हान असणार आहे. त्यातच आता भाजप मोठा भाऊ झाल्याने राज्य सरकारमध्ये भाजपचे वर्चस्व राहणार, हे उघड आहे.
 
 
मात्र, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जदयुमध्ये नवे नेतृत्व तयार करावे लागणार आहे. अर्थात, त्यासाठी आता फारच उशीर झाला आहे. मात्र, तसे न केल्यास पुढील निवडणुकीत जदयुला ४३ जागाही राखता येणार नाहीत. बिहारमध्ये भाजपला अगदी मागच्या चार दिवसांपर्यंत दुय्यम भूमिका स्वीकारावी लागत होती. मात्र, आज भाजप बिहारमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, असे त्यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील, यावरही भाजप ठाम आहे. त्यामुळे अतिशय विचारी राजकारणी असलेल्या नितीश कुमारांना हे असे का झाले, याचा विचार करूनच पुढची पाच वर्षे राज्य कारभार करावा लागणार आहे. कारण, अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील पाच वर्षांनी बिहारमध्ये ‘भाजप विरुद्ध राष्ट्रीय जनता दल’ असा सामना होईल आणि तब्बल २० वर्षे सत्तेत असणार्‍या नितीश कुमारांचा पक्ष अगदीच किरकोळ होऊन जाईल.
 
 
नितीश कुमारांना आव्हान देण्यात आणि आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यात तेजस्वी यादव यांना यश आले आहे. त्यांना या निवडणुकीत मोठी मेहनत घेतली, हे नाकारून चालणार नाही. महत्त्वाचे म्हणजे लालूप्रसाद यादव यांच्या छायेतून बाहेर पडून त्यांनी यश मिळविले आहे. मात्र, हे यश कायम राखण्यासाठी त्यांच्यासाठीदेखील पुढची पाच वर्षे महत्त्वाची ठरतील. त्यांना आपल्या पारंपरिक मुस्लीम-यादव मतपेढीसह अन्य मतदारांचाही विश्वास संपादन करण्यात यश मिळविले तर ते अतिशय महत्त्वाचे ठरेल. बाकी काँग्रेसने तर दरवेळीप्रमाणे लढवायची म्हणून निवडणूक लढविली, उलट त्यांच्यामुळेच तेजस्वी यांचे नुकसानच झाले आहे.
 
 
भाजपने मात्र आपली रणनीती अतिशय शांतपणे आखली होती. बिहारमध्ये गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असल्याने ‘अ‍ॅन्टिइन्कम्बन्सी’ असणार, हे साहजिकच होते. मात्र, त्याचा फटका जसा नितीश कुमारांना बसला, तसा आपल्याला बसू नये यासाठी केंद्र सरकारच्या योजना राज्यात यशस्वीपणे राबविण्यास कधीपासूनच प्रारंभ केला होता. उदाहरण द्यायचे झाल्यास बिहारमध्ये गेल्या दीड वर्षांत १.०७ कोटी घरांमध्ये नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी जलजीवन मिशन अंतर्गत पोहोचविण्यास यश आले आहे.
 
 
लोकाभिमुख आणि प्रत्यक्षात ग्राऊंडवर करायचे काम यापेक्षा वेगळे असते का, हा प्रश्न विरोधकांनीच स्वत:ला विचारण्याची गरज आहे. भाजपला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला तो महिला वर्गाकडून. देशातील नारीशक्ती म्हणजेच भाजपचे ‘सायलेंट व्होटर’ आहेत, असा खुलासाही पंतप्रधानांनी त्यानंतर केला आहे. महिलांसाठी जन-धन खाती, स्वयंसहायत गटांना आर्थिक मदत, उज्ज्वला योजना, इंद्रधनुष योजना या आणि अशा अनेक योजनांचे हे यश आहे. भाजपने अतिशय नियोजनबद्धपणे प्रचार करून नितीश कुमारांविषयीची नाराजी आपल्याला महागात पडू नये, याची व्यवस्थित काळजी घेतली.
 
 
निवडणुकीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर मतदारांचा अद्यापही कायम असलेला विश्वास. कोरोना संकटाची हाताळणी व्यवस्थित केली नाही, टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेसह नागरिकांचे नुकसान झाले, स्थलांतरित कामगारांना मोठा फटका बसला, असे अनेक आरोप मोदी सरकारवर झाले होते. त्यामुळे बिहारमध्ये त्याचा फटका बसेल, या आशेने विरोधी पक्ष अगदी देव पाण्यात बुडवून बसले होते. मात्र, मतदारांनी विरोधकांचे हे आरोप सपशेल नाकारले आणि मोदी विरोधाची हवाच काढून घेतली. पंतप्रधानांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादाचे रूपांतर मतांमध्येही झाले, हे विशेष. त्यामुळेच एकेकाळी नितीश कुमारांच्या जदयुच्या छायेखाली राहणारा पक्ष आज नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवित आहे, हे विशेष.


@@AUTHORINFO_V1@@