नीला मॅडम...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2020   
Total Views |
NILA MAM_1  H x
 
 
 
 
 
वय वर्षे ७५ असलेल्या नीला मॅडम म्हणजे उत्साह, आशा आणि नीरक्षीरविवेकवृत्तीच्या धनी. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि वाढदिवसानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा!
 
 
 
“पत्रकारिता हे व्रत आहे. सवंग प्रसिद्धी, दुसर्‍याला जे चांगले वाटेत तेच लिहिणे हे खर्‍या पत्रकाराचे उद्योग नाहीत. त्यामुळे आपल्याला जे दिसते ते सत्य आहे की नाही, याची पारख करून समाजासमोर मांडणे हे आपले काम! बाकीचे मीठ-मसाला लावायला बसलेलेच असतात.” हे ज्येष्ठ पत्रकार, लेखक नीला उपाध्ये यांचे वाक्य मला सदासर्वकाळ स्मरणात असते. काही वर्षांपूर्वी मी दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये ‘वस्त्यांचे वास्तव’ हे सदर लिहीत होते.
 
 
तेव्हा वस्त्यांमध्ये येणारे सगळेच बरेवाईट अनुभव लिहावे की लिहू नये, असे मला वाटत होते. पण, मॅडमनी मला विचारले होते की, “काय गं म्हशे, तू वस्त्यांमध्ये जातेस, मेले बरं लिहितेस.” त्यावेळी मी म्हणाले होते, “हो, पण अनुभव खूप दु:खद आहेत. लोक असंही जगणं जगतात, ते दु:ख लिहून वाचकांना दु:खच होत असेल.” त्यावर मॅडमनी तब्बल ३५  मिनिटे जराही खंड न पडता, मला पटवून दिले की, “आपण पत्रकार आहोत. जे दिसते ते लिहिलेच पाहिजे, त्यात बनावटपणा असता नये.
 
 
असो ! ‘काय गं म्हशे’, ‘टोणगे’ वगैरे उपनामांनी आस्मादिकास संबोधणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे नीला मॅडम. त्यांना नेहमीच घाईत आणि तरीही उत्साहातच मी पाहिले आहे. एक दिवस मला त्यांचा फोन आला, पण कामानिमित्त उचलू शकले नाही. पूर्ण दिवस तसाच व्यस्त गेला. मॅडमनी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या कार्यालयातही फोन केला, तेव्हा त्यांना कळले की, मी संध्याकाळी ७ नंतर येणार आहे. मी कार्यालयात ७ वाजता आले आणि कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नीला मॅडम दत्ता म्हणून उभ्या! नेहमीप्रमाणे स्वागत केले, “काय गं म्हशे, फोनबिन उचलायची रीत आहे की नाही? तुझ्याकडे अर्जंट काम होते.”
 
 
मलाही उत्सुकता लागली की, असे काय काम असेल की मॅडम चेंबूरहून इतक्या ट्राफिकमधून वडाळ्याच्या आमच्या कार्यालयात आल्या. त्यामुळे कार्यालयात गेल्यागेल्या मी विचारले, “बसा सांगा काय काम आहे.” त्यावर माझ्या हातात एक चिठ्ठी दिली आणि नेहमीप्रमाणे उत्साहात म्हणाल्या, “तू ‘माणसं’ सदर लिहितेस ना? हा बघ, या कागदावर एका माणसाचा फोन नंबर आहे.”
 
 
हे कोण आहेत, विचारल्यावर नीला मॅडम म्हणाल्या, “अगं, गेले वीस वर्षे या माणसाला मी दररोज बस किंवा ट्रेनमध्ये किंवा रस्त्यावरही पेनं विकताना बघायचे. हा अंध माणूस आहे गं. पण २० वर्षे पेन विकाणार्‍या या माणसाने त्याच्या मुलांना डॉक्टर बनवले. आता त्याने पेन बनवण्याचे मशीन विकत घेतले आणि स्वत:च पेन बनवतो, स्वत:च विकतो. योगिता, तू अशा माणसावर लिहिले पाहिजेस.” मी विचारले, यांचे नाव-पत्ता. त्या म्हणाल्या, “मला नाही माहिती गं. फक्त जाता-येता कुठेतरी पेन विकताना दिसतो. मी नेहमी त्याच्याकडून पेन विकत घेते. मला पण त्याच्याबद्दल कालच कळले, म्हणून वाटले की, तुला त्याच्याबद्दल सांगावे. कष्टातून यश मिळवणार्‍या सामान्य माणसासाठी आपण लिहिले पाहिजे.”
 
 
मी अगदी अवाक होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिले. मी लिहीत असलेल्या सदरात जीवंतपणा यावा म्हणून त्यांची ही धडपड. बरं तो पेन विकणारा माणूस काही त्यांच्या ओळखीचाही नव्हता. पण, समाजातल्या तळागाळातल्या माणसांना प्राधान्य मिळावं, ही त्यांची तळमळ!
 
असो, नीला मॅडम यांचे पती म्हणजे वसंत उपाध्ये काका वारले. त्यानंतर मी त्यांच्या घरी गेले होते. नीला मॅडम ढिगभर पुस्तकांचा पसारा घेऊन बसल्या होत्या. खरंतर मी त्यांचे सांत्वन करायला गेले होते. पण, एक अक्षरही बोलू न देता त्या बोलू लागल्या, “हे बघ, मला एशियाटिक सोसासयटीची फेलोशिप मिळाली. त्यासाठी मी आगरी समाजाच्या इतिहासावर लिहीत आहे. हे एकदाचे काम पूर्ण होऊ दे. म्हातारी झाले मेले तर काम अर्धवट राहील गं. जसे काका मला सोडून गेले.” नीला मॅडमचे अश्रू पुस्तकावर टपटप ओघळू लागले.
 
 
रडता रडता म्हणू लागल्या, “त्यांनी मला हिंमत, साथ सगळंच दिलं. ते नाहीत, मन लागत नाही. या पुस्तकात मन रमवते. कामात जीव लावते.” असे म्हणत त्या दुसर्‍या रूममध्ये गेल्या. परत आल्या तर हातात गिफ्ट बॉक्स. ते देत म्हणाल्या, “म्हशे, काल तुझा वाढदिवस होता ना. मला मेलीला जमलं नाही विश करायला. तुला कधीच गिफ्ट घेऊन ठेवलं होतं. बघ, आयुष्य असंच असतं गं ऊन-पावसाचं. येणारा दिवस साजरा केला पाहिजे.
 
 
म्हशे, कामाला लाग, कळलं” आणि मग पुन्हा त्या मला पत्रकारितेतली आव्हानं, पत्रकारितेतल्या संधी याबाबत सांगू लागल्या. नीला मॅडम यांच्या विद्वतेसोबतचे संवेदनशील जगणे आणि असणे मी अनुभवले आहे. खर्‍याची चाड बाळगून त्यासाठी प्रचंड संघर्ष करणार्‍या नीला मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...! त्यांना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो, हीच आजच्या दिवाळीच्या शुभ दिनी ईश्वरचरणी प्रार्थना...

@@AUTHORINFO_V1@@