यथा राजा, तथा प्रजा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2020   
Total Views |
Kirit_1  H x W:
 
 
 
किरीट सोमय्या यांनी ठाकरे आणि वायकर परिवाराचे अन्वय नाईक कुटुंबीयांशी आर्थिक हितसंबंध उघडे पाडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांच्यावर शिवसेनेचे ‘मातोश्रीवंत’ एकाएकी तुटून पडले. का, तर सोमय्यांनी शिवसेनेच्या नेते किंवा मंत्र्यांवर नाही, तर थेट ‘मातोश्री’लाच थेट लक्ष्य केले. एवढेच नाही तर आपण विचारलेल्या पाच प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे, असे आव्हानही सोमय्यांनी दिले. पण, सोमय्यांनी केलेले आरोप खोडून काढून, ‘मातोश्री’ला खूश करण्याऐवजी शिवसेनेच्या नेते, मंत्र्यांनी सोमय्या यांच्यावर गलिच्छ शब्दांत चिखलफेक केली. त्यामुळे हाच प्रश्न उपस्थित होतो की, जर खरंच ठाकरेंचा या प्रकरणाशी संबंध नसेल, तर शिवसेनेच्या ‘नेते’ म्हणवणार्‍या मंडळींना इतकी खालची भाषा वापरुन बरळण्याची गरजच का पडली? पण, शिवसेनेच्या तोंडची ही मवाली आणि गुंडगिरीची भाषा महाराष्ट्राला नवीन नाहीच. उगाच त्याला ‘शिवराळ’ भाषा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानच या लोकांनी गेली कित्येक वर्षे केला आणि त्याबद्दलचा नसता अभिमानही बाळगला. या नादात दुर्दैवाने या मंडळींच्या हे लक्षात आले नाही की, आपण पातळी सोडून केवळ राजकीय हेवेदाव्यांपोटी कुणाबद्दल काहीही बरळतोय. त्यात आता आपल्या हाती सत्ता असल्यामुळे हा उन्माद गेल्या काही काळात अधिकच वाढला. मग ते कंगनाच्या बंगल्यावर घाईघाईत बुलडोझर फिरवणे असो वा अर्णव गोस्वामीची दिवाळी तुरुंगातच जावी, ही कुकामना करुन त्यांना सर्वस्वी अडकविण्याचा केलेला आततायी प्रयत्न असो, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा सत्तेचा माज पदोपदी महाराष्ट्र अनुभवतोय. त्यात किरीट सोमय्यांसारख्या नेत्यांवर महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी पातळी सोडून बोलण्यापेक्षा आधी आपल्याच वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत माहिती घ्यायला हवी होती. महापौरांबद्दल अधिक बोलणे न लगे. त्यामुळे ‘सामना’तील उखाडण्याची लेखी भाषा असो वा अथवा ही तोंडी घाण, जनता सगळं डोळे उघडं ठेवून बघतेय. त्यामुळे आता असेच वाटते की, जी भाषा पक्षप्रमुखांनी दसरा मेळाव्यात वापरली, त्याचेच अनुकरण त्यांची आंधळी प्रजा करताना दिसते.
 

युवराजांसाठी बोचरे ‘बराकबोल’

 
 
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना पुन्हा एकदा आरसा दाखविण्यात आला. पण, यंदा कुणा भारतीय नेत्याने, मंत्र्याने हे शुभकाम केलेले नाही, तर थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीच राहुल गांधींविषयी आपले मतप्रदर्शन केले आहे. ’ए प्रॉमिस्ड लॅण्ड’ या पुस्तकामध्ये बराम ओबामा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही रितसर उल्लेख केला आहे. ओबामा म्हणतात, “काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे चिंतातुर आणि योग्यतेचा अभाव असलेले नेते आहेत. त्यांना जणू आपल्या कोणा शिक्षकाला प्रभावित करायचे आहे, असे वर्तन दिसते. मात्र, त्यांच्याकडे कुठल्याही विषयावर प्रभुत्व मिळवण्याची क्षमता आणि कोणताही विषय समजून घेण्याच्या उत्कटतेचा अभाव असल्याने ते सातत्याने अपयशी ठरत आहेत.” आता ओबामांनीच असे म्हटल्यावर युवराज तोंडावर आपटले नसते तरच नवल! ओबामा पुढे म्हणतात, “राहुल गांधी हे त्या विद्यार्थ्याप्रमाणे आहेत, ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला असून आता त्यांना आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. मात्र, त्या विषयात प्रभुत्व मिळवण्याची योग्यताच मुळी त्यांच्यात नाही आणि त्यांची तशी इच्छाही दिसून येत नाही.” आता बरं झालं हे ओबामाचं म्हणाले ते. भाजपच्या किंवा अन्य नेत्याने अशीच कटू टीका केली असती, तर त्याला साहजिकच ‘राजकीय टिप्पणी’ म्हणून काँग्रेसजनांनी याच नेत्यांवर आगपाखड केली असती. पण, माजी राष्ट्राध्यक्ष असलेल्या ओबामांचा सत्तेपासून कोसो दूर असलेल्या गांधी घराण्याशी काय संबंध? ओबामा तर गांधी घराण्याचे भाजपप्रमाणे कडवे विरोधकही नाहीत. मग ओबामांसारख्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाने राहुल गांधींविषयी असे विधान करणे, यातच सर्व काही आले. आता काँग्रेस पक्ष ओबामांच्या नावानेही बोटं मोेडणार का? की ओबामाही मोदींची भाषा बोलतात, अशी फुटकळ टीका करुन आपले अधिक हसे करुन घेणार? तेव्हा, ओबामांच्या या टिप्पणीचा तरी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने सकारात्मक विचार करावा आणि आपली जागतिक प्रतिमा इतकी का खालावली, याचे चिंतन करावे.


@@AUTHORINFO_V1@@