देहडी दीप प्रकाश तद्न्वय...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2020
Total Views |
Diwali _1  H x
 
दिवा, दीपक, पणती यातला भावार्थ म्हणजे अमावस्येला म्हणजेच जीवनात कितीही काळोख अर्थात खडतर परिस्थिती असेल, तरीही प्रकाशपुंज म्हणजेच सकारात्मकता असावी असे सूचित होते. जीव, माया आणि ब्रह्मतत्त्वाचे पूजन म्हणजे दिवाळी.
 
 
दीपावली अर्थात प्रकाश उत्सव! उत्तर गोलार्धात प्रत्येक वर्षी शरद ऋतूत साजरा केला जाणारा हा हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव. आध्यात्मिक दृष्टीने अंधःकारावर प्रकाशाचा विजय म्हणजे दीपोत्सव. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अर्थात ‘तिमिरातुनी तेजाकडे’ ही उपनिषदांची आज्ञा आहे. शीख, बौद्ध आणि जैन पंथातदेखील दीपावलीचे विशेष महत्त्व आहे. १४ वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा निःपात करुन मर्यादापुरुषोत्तम श्रीराम जेव्हा अयोध्येस परत आले, तेव्हा अयोध्यावासीयांनी आपल्या प्राणप्रिय राजाचे दीप उजळून स्वागत केले.
 
 
कार्तिक अमावस्येला संपूर्ण अयोध्या प्रकाशाने उजळून निघाली, तेव्हापासून हिंदू जनमानसात दिवाळी साजरी केली जाते. दीपावली दिव्यांचा उत्सव आहे. भारतीयांचा विश्वास आहे की, सत्याचा नेहमी विजय होतो. ‘असतो माऽ सद्गमय, तमसो मा ज्योतिऽर्गमय’ ही वेदोक्ती सार्थ ठरविणारा सण म्हणजे दीपावली. दीपावली शब्दाची संस्कृत उत्पत्ति म्हणजे ‘दीप’ आणि ‘आवली.’ या उत्सवात घराच्या दारावर, घरावर, मंदिरावर दिव्यांची ओळ (आवली) प्रज्वलित केली जाते.
 
 
सहस्त्रदिपे दिप खुलला, सुंदर प्रकाश हा जयजयकारे गर्जो दर्शन, आनंद लुटता हा दिवा, दीपक, पणती यातला भावार्थ म्हणजे अमावस्येला म्हणजेच जीवनात कितीही काळोख अर्थात खडतर परिस्थिती असेल, तरीही प्रकाशपुंज म्हणजेच सकारात्मकता असावी असे सूचित होते. जीव, माया आणि ब्रह्मतत्त्वाचे पूजन म्हणजे दिवाळी. दीपोत्सव म्हणजे श्रीहरी विष्णूंचे गृहस्थीरूप आहे. श्रीगणेश म्हणजे विद्या आणि श्रीलक्ष्मी म्हणजे धनधान्य यांचे एकत्रित पूजन दिवाळी सणात करतात. दिवाळीच्या आठ दिवसांपूर्वी सागर मंथनातून लक्ष्मीचे प्रागप्ट्य झाले तो आठवीचा दिवस म्हणजे दीपावलीची चाहुल असते. दीपावली महोत्सवाचा पर्वकाळ धनत्रयोदशी अथवा धनतेरसपासून प्रारंभ होतो.
 
 
दिवाळीच्या पहिल्या तीन दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे. अकाल मृत्युभय टाळण्यासाठी धनत्रदयोदशीच्या सायंकाळी यमराजासाठी दक्षिणाभिमुख दीपदान करावे, असे सांगितले आहे. प्रकाशाची उपासना सूर्य, अग्नी आणि दिव्यांच्या रूपात नेहमीच होत आहे. जीवसृष्टीचा जन्म होण्यासाठी सूर्याचे प्रागट्य नारायणाच्या दक्षिण नेत्रातून झाले आहे. नारायणाच्या नेत्रातून निघालेले हे तेज सूर्याकडून यज्ञकुंडातील अग्नीत आणि त्यातून दिव्यांच्या रूपात जनमानसाला प्रदान करण्यात येते. दीप-दीप्तौनामक धातू अर्थात चकाकणारे, ज्योतिर्मय, प्रकाशमान असे आहे. जीवनात कितीही विघ्नसंकटे मग ती आधिदैहिक, आधिभौतिक, आधिदैविक असोत, ती दूर करण्यासाठीच पृथ्वी, जल, अग्नी,वायू, आकाश ही पंचतत्त्वे अवतीर्ण होऊन दीपरूपाने ही दिव्यता प्रकाशमय स्वरूपात आली. ही पाच तत्त्वेच सृष्टीच्या उपादानाचे कारण आहेत. समस्त जगताला प्रकाशाची, तेजाची व ज्ञानाची जाणीव करून देणारा सण दिवाळी म्हणूनच माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
 
सूर्ये अधिष्ठीली प्राची।
जगा जाणीव दे प्रकाशाची॥
तैसी श्रोतया ज्ञानाची ।
दिवाळी करी॥
 
 
तेजपुंज दीप म्हणजेच श्रीगणेश. गणेश शब्दात ‘ग’ म्हणजे ज्ञान आणि ‘ण’ म्हणजेच निर्वाण. ज्ञानाकडून मोक्षाकडे असेदेखील यातून सुचवायचे आहे. पद्मपुराण आणि स्कंदपुराणात दीपावलीचा उल्लेख दिसतो. स्कंदपुराणात दिव्याला सूर्याचा प्रतिनिधी मानले गेले आहे.
 
घृतवर्ती समायुक्तं महोतेजो महोज्वलम्।
दीपं दास्यामि देवेशि सुप्रीतो भव सर्वदा॥
 
काही प्रांतात दिवाळीच्या काळात उपनिषदातील यम आणि नचिकेताची कथा हीदेखील संदर्भ म्हणून मानतात. सातव्या शताब्दीतील संस्कृत नाट्य ‘नागनंद’ यामध्ये राजा हर्ष याने दिवाळीला ‘दीपप्रतिपादुत्सव:’ असे म्हटले आहे. राजशेखराने काव्यमीमांसेत ‘दीपमालिका’ असे वर्णन केले आहे. आठवीच्या दिवशी प्रकट झालेली श्रीलक्ष्मी दीपावलीच्या रात्री श्रीविष्णूसोबत सहधर्मचारिणी म्हणून भक्तांच्या विघ्नबांधांना दूर करते. बुद्धिदेवता गणेश, संगीत, साहित्य, वागविलासिनी सरस्वती आणि धन प्रबंधक कुबेराची श्रीलक्ष्मीसह पूजन हे दिवाळीचे खास वैशिष्ट्य होय. पूर्व भारतात ओडिशा आणि बंगालमध्ये दिवाळीत कालीपूजा करतात. मथुरा आणि उत्तर मध्य क्षेत्रात दीपावलीला गोवर्धन पूजा म्हणजेच श्रीकृष्णपूजन करण्यात येते. दिवाळीच्या पर्वावर ‘अन्नकुट’ हा उत्तर भारतात साजरा केला जाणारा महत्त्वाचा विधी आहे. कृष्णभक्तीधारेतील लोक दीपोत्सवाला भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी राजा नरकासुराचा वध केल्याच्या पार्श्वभूमीवर साजरा करतात.
 
श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे - पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांनाही त्रास देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच, सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.
 
कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरकचतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला. अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस जिभेला लावतात.
 
दीपावलीत जैन मतावलंबी लोक चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा मोक्षप्राप्ती दिवस आणि निर्वाण दिवस म्हणून स्मरण करतात. शिखांच्या इतिहासात प्रकाशपर्व दीपावलीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इसवी १५७७ मध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अमृतसर सुवर्णमंदिराचा शिलान्यास संपन्न झाला होता. इसवी सन १६१९ मध्ये सहावे गुरू हरगोविंसिंहजी महाराज यांची कारावासातून मुक्तता झाली, म्हणून शीख समाजात हा दीपावली सण ‘मुक्ती दिवस’ म्हणून उत्साहाने साजरा करतात.
 
 
केवळ जीवनातील ज्योतीने प्रकाश देणारेच नव्हे, तर आपल्या जीवन दीपाला मालवून हजारो लाखोंच्या जीवनात आनंदाचा प्रकाश देणार्‍या असंख्य नररत्नांची खाण आपल्या संस्कृतीत आहे. दीपावलीचा सण साजरा करत असताना, या कोविड योद्ध्यांच्या बलिदानाचे स्मरण करून आपणही आपल्या जीवनात देव, देश, धर्मासाठी आपापल्या क्षेत्रात शुभकार्याचा दीप लावूया. समस्त वाचकांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. समर्थ सद्गुरू दयाळनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे उंबरठ्यावर लावलेला दिवा जसा आत आणि बाहेर प्रकाश देतो, तसे आपलेही जीवन अंतरबाह्य उजळून निघावे, ही या दीपोत्सवप्रसंगी मंगलकामना...
 

दैशिकराय परात्पर गुरुतर
आनंद अनुभव दे
देहडी दीप प्रकाश तद्न्वय
बहरिधी दासा दे
-डॉ. भालचंद्र हरदास
@@AUTHORINFO_V1@@