सावधान ! नोव्हेंबरनंतर कोरोनाची दुसरी लाट?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2020
Total Views |
corona Virus_1  
 
 


मुंबई : गणेशोत्सवाप्रमाणे दिवाळी हा सण सुद्धा सदिच्छा देण्याच्या निमित्ताने एकमेकांना भेटण्याचा, गर्दीचा आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून शासनाच्या आरोग्य विभागाने पूर्वतयारी करण्याचे आदेश महानगरपालिका आणि नगरपालिकांना दिले आहेत. मात्र याबाबत निश्चित काही सांगण्यात येत नसल्याने नागरिक मात्र संभ्रमात आहेत.
 
 
कोरोनाच्या सावटाखाली असलेली यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत. कारण कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराची संभाव्य दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने पूर्वतयारी देखील करुन ठेवण्याचे आदेश राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांना दिले आहेत.
 
 
 
कोरोनाची भीती झुगारून दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीकरता बाहेर पडत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. त्यातच परदेशातही कोरोनाची दुसरी लाट म्हणता येईल अशा संख्येने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गर्दीमुळे राज्यातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याबाबत उघड बोलण्यास कोणीही तयार नाही. सर्व गर्भित इशारा देत आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने महापालिका आणि नगरपालिकांना पूर्वतयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
गणेशोत्सवानंतर सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात होती. अनेक रुग्णांना बेड्स मिळवण्याकरता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मागील चार-पाच आठवड्यात रुग्णसंख्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली. रुग्ण बरे होण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवीन रुग्ण सापडण्याच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. मृतांची संख्याही कमी कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातली कोरोनसंदर्भातील भीती कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत.
 
 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "कोरोनाची दुसरी लाट येऊ नये ही अपेक्षा आहे. मात्र अनुमान व्यक्त करणे मुश्किल आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर उतरत आहेत. त्याचप्रमाणे बाजारपेठांमध्ये गर्दी खूप होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षिततेचे जे काही नियम आखून दिले आहेत त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. परदेशात ज्या पद्धतीने कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने एका महिन्यात वाढला आहे. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा राज्यात संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन तयारी ठेण्यात आली आहे."


@@AUTHORINFO_V1@@