संगीतातील उष:काल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2020   
Total Views |
Usha Utthup_1  


आपल्या निराळ्या आवाजाने हिंदी चित्रपटसृष्टीत खर्‍या अर्थाने आपला ठसा उमटविणार्‍या उषा उत्थुप यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने...
 
 
भारतातल्या चित्रपटसृष्टीतील एक ठसठशीत, भारदस्त आणि उत्साहाने सळसळता आवाज म्हणजे उषा उत्थुप. प्रत्येक भारतीयाला डोलायला लावणारा हा आवाज आता वयाच्या पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला आहे. त्यांच्या कपाळावरील ठसठशीत कुंकवाप्रमाणेच लोकांच्या मनात त्यांचे व्यक्तिमत्त्व ठसले आहे. सतत हसतमुख चेहरा, डोक्यात गजरा आणि कांजीवरम साडी हे त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या आवाजाप्रमाणेच लोकांच्या मनात घर करुन आहे. एक नाईट क्लब गायिकेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज भारतातील लोकप्रिय गायिकेपर्यंतचा आहे. भारतासोबतच अनेक परदेशी भाषिक गाणी गाणार्‍या या आवाजाला संगीत क्षेत्रात ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत.
 
उषाजींचा जन्म दि. ७ नोव्हेंबर १९४७ रोजी मुंबईत झाला. त्यांचे कुटुंब हे तामिळ ‘सामी’ होते. वडील वैद्यनाथ सामी हे मुंबई गुन्हे शाखेत मोठे अधिकारी होते. उषाजींना दोन भाऊ आणि तीन बहिणी. सर्वसामान्य मध्यमवर्गीय परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. त्यांच्या शेजारी ‘पठाण’ हा मुस्लीम परिवार वास्तव्यास होता. त्यांचे ‘सामी’ परिवाराशी घरोब्याचे संबंध होते. त्या परिवारातील जमिला हिच्याशी उषाजींची छान मैत्री झाली. जमिलाने त्यांना हिंदी गाण्यांची ओळख करुन दिली. शिवाय घरात आईवडिलांना गाण्याची हौस होती. त्यामुळे सातत्याने रेडिओ सुरू असायचा. हाच ‘रेडिओ सिलोन’ त्यांचा पहिला गुरु ठरला. उषाजींचे शालेय शिक्षण सेंट अ‍ॅग्नेस हायस्कूल, भायखळा येथे झाले. तिथे त्या इंग्रजी, हिंदी, मराठी आणि फ्रेंच भाषा शिकल्या. घरात तामिळ बोलली जायची. म्हणून त्या गंमतीने म्हणतात की, “मी तामिळ, वाढले मुंबईत, शाळा ख्रिश्चन, शेजारी मुस्लीम, मल्याळी माणसाशी लग्न आणि आता वास्तव्य कोलकात्याला, म्हणून खर्‍या अर्थाने मी ‘भारतवासी’ आहे.”
 
 
उषाजींच्या मोठ्या बहिणी उमा, इंदिरा या ‘सामी सिस्टर्स’ म्हणून १९५०च्या दशकात प्रसिद्ध होत्या. मुंबई आणि अन्य शहरांत विविध क्लब आणि जिमखान्यातून त्यांचे कार्यक्रम व्हायचे. उषाजींनी गाण्याचे पारंपरिक शिक्षण कधी घेतले नाही. ‘रेडिओ सिलोन’ गाणी ऐकून विविध प्रकारच्या संगीतप्रकारांशी त्यांची ओळख झाली. खास करुन इंग्रजी गाण्यांशी त्यांची मैत्री झाली. वयाच्या नवव्या वर्षी बहिणींच्या ओळखीमधून त्यांनी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गाणे गायले. ते गाणे ऐकून त्याकाळचे रेडिओवरील प्रसिद्ध उद्धघोषक अमीन सायानी यांनी उषाजींना रेडिओवर गाण्याची संधी दिली. उषाजींनी ‘मॉकिंगबर्ड हिल’ नावाचे इंग्रजी गाणे गायले आणि त्यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. १९६९ साली चेन्नईमधील माऊंट रोडवरील ‘नाईट जेम्स’ नावाच्या एका नाईट कल्बमध्ये उषाजींनी गाण्यास सुरुवात केली.
 
 
कांजीवरम साडीत एक बाई भारदस्त पुरुषी आवाजात गात असल्याचे पाहून प्रेक्षक थक्क झाले. त्यांच्या सादरीकरणाला मिळालेला प्रतिसाद पाहून नाईट कल्बच्या मालकानेही त्यांना आठवडाभर गाण्याकरिता थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचा नाईट कल्बमध्ये गाण्याचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास त्यांना दिल्लीला घेऊन आला. याठिकाणी ओबेरॉय हॉटेल्समध्ये त्या गाऊ लागल्या. एके दिवशी हॉटेलमध्ये ‘नवकेतन’ चित्रपटातील काही कलाकार गाणी ऐकण्यासाठी आले होते. त्यावेळी देव आनंद यांना उषाजींचे गाणे आवडले आणि त्यांना चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. आयव्हरी-मर्चंटच्या ‘बॉम्बे टॉकीज’ कंपनीमधून त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात झाली. प्रथम त्यांनी शंकर-जयकिशन आणि त्यानंतर ‘हरे राम हरे कृष्णा’ या चित्रपटामध्ये इंग्रजी गाणे गायले.
 
उषाजींनी १९७० ते ८०च्या दशकात संगीतकार आर. डी. बर्मन आणि बप्पी लहिरी यांच्यासाठी अनेक प्रसिद्ध गाणी गायली. भारतीय महोत्सवाचा भाग म्हणून त्यांनी नैरोबीला भेट दिली होती. या भेटीदरम्यान झालेली सादरीकरणे इतकी लोकप्रिय ठरली की, त्यांना राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. स्वाहिली भाषेत गायलेल्या राष्ट्रवादी गाण्यामुळे त्या खूप लोकप्रिय झाल्या. तत्कालीन अध्यक्ष जोमो केनियाट्टा यांनी त्यांना केनियाचे मानद नागरिक बनवले. त्यावेळी स्थानिक बॅण्ड ‘फेल्लीनी फाईव्ह’सह सोबत त्यांनी ‘लाईव्ह इन नैरोबी’ अल्बम तयार केला. त्यानंतर भारतातील अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणे गायले.
 
 
‘डार्लिंग’ या चित्रपटासाठी त्यांना २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट गायिकेचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ लाभला. हा पुरस्कार घेताना त्यांना गहिवरुन आले. कारण, ४२ वर्षांच्या गायन कारकिर्दीत त्यांना पहिल्यांदाच ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला होता. त्यांच्या गानसेवेबद्दल कृतज्ञता म्हणून त्यावेळी प्रेक्षागृहातील उपस्थित सर्वांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. उषाजींच्या वेगळ्या, भारदस्त आणि पुरुषी आवाजामुळे त्यांना चित्रपटगीते गुणवत्तेच्या मानाने तशी कमीच मिळाली. अर्थात, त्यांना त्यांच्या आवाजाच्या मर्यादा माहीत होत्या. त्यामुळे मर्यादित गुणवत्तेवर त्यांनी लोकप्रियतेची जी मजल मारली, ती कौतुक करणारी आहे. त्यांनी १७ ते १८ भारतीय भाषांमध्ये, तर जगातील आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. जगात सगळीकडे त्यांचे गाण्यांचे कार्यक्रम होतात. २०११ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारही लाभला होता. गाण्याव्यतिरिक्त शिवणकाम, वाचन, चित्रकला, इस्त्री करणे हे त्यांचे आवडते छंद. त्यांची मुलगी आणि आता नातही गाण्याकडे वळली आहे. या तिघांचा मिळून ‘थ्रीजी’ नावाचा एक कार्यक्रमही आहे. ७४व्या वर्षीही त्यांचा उत्साह अगदी कायम आहे, हे विशेष.





@@AUTHORINFO_V1@@