पोटनिवडणुकांतही भाजपचीच बाजी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2020
Total Views |
NMO_1  H x W: 0

गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणमधील पोटनिवडणुकांतही भाजपचे ‘कमळ’च उमलले आणि उत्तर-दक्षिण ते पूर्व-पश्चिम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेसमोर विरोधक खुजे असल्याचे जगजाहीर झाले.
 
बिहार विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच देशभरातील ११ राज्यांतल्या ५९ जागांसाठीही पोटनिवडणुका झाल्या. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभेसह अन्य विधानसभांच्या पोटनिवडणुकाही लढवल्या आणि घवघवीत यश मिळवले. परिणामी, नरेंद्र मोदींच्या नावावर २०१४, २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच आजही जनतेचा प्रचंड विश्वास असल्याचे स्पष्ट झाले. तसेच मोदी जिथे उभे ठाकतील, तिथे भाजप जिंकणार, जिंकते, हेदेखील यावेळच्या निवडणूक निकालावरुन पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
 
बिहारमध्ये १५ वर्षांच्या नितीश कुमार सरकारविरोधी भावनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभांनी रोखले आणि त्याचे रुपांतर रालोआच्या विजयात केले. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, मणिपूरसह विविध राज्यांच्या पोटनिवडणुकांतही मोदींनी आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकांच्या निकालावरुन तर नरेंद्र मोदी सर्वहारापासून सर्वसमाजात अफाट लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले. गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणमधील पोटनिवडणुकांतही भाजपचे ‘कमळ’च उमलले आणि उत्तर-दक्षिण ते पूर्व-पश्चिम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेसमोर विरोधक खुजे असल्याचे जगजाहीर झाले.
 
तसेच बिहार विधानसभा किंवा अन्य ठिकाणच्या पोटनिवडणुकीच्या निकालांनी मोदींवर तर्‍हेतर्‍हेचे आरोप करणार्‍यांना जनतेने धुडकावून लावल्याचेही दिसून आले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी असोत की, मोदींवर हिटलर, फॅसिस्ट, हुकूमशहा वगैरे आरोप करणारे तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, बुद्धिजीवी, संपादक-पत्रकार, या कोणाकडेही लक्ष द्यायला जनतेला वेळ नसल्याचेच यातून समोर आले. अर्थात, भाजपची विजयी घोडदौड आता तर सुरु आहेच, पण यापुढे ती अधिक अफाट होईल, याचे संकेतही पोटनिवडणुकांच्या निकालातून मिळाले.
 
भाजपने ११ राज्यांतल्या ५९ मतदारसंघातल्या पोटनिवडणुकांपैकी सुमारे ४० जागा जिंकत जनतेची पहिली पसंत आपणच असल्याचे दाखवून दिले. विरोधकांसाठी हा नक्कीच आश्चर्याचा धक्का किंवा डोके गांगरुन टाकणारा निकाल असेल, कारण त्यांनी भाजपच्या इतक्या मोठ्या नव्हे, तर साध्या विजयाचीही अपेक्षा केली नव्हती. त्यांना आपल्या बनवाबनवीच्या खेळावर विश्वास वाटत होता नि जनताही त्याला भुलेल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. बिहार विधानसभेच्या निवडणुकीनंतर देशभरातील राजकीय पक्ष, अभ्यासक, विश्लेषकांचे सर्वाधिक लक्ष मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांवर लागले होते.
 
कारण, कमलनाथ यांच्या जनविरोधी सरकारशी विद्रोह करुन काँग्रेसमधल्या ज्योतिरादित्य सिंधिया गटाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे इथे २८ जागा रिक्त झाल्या व या ठिकाणी पोटनिवडणुकांची वेळ आली. तत्पूर्वी कमलनाथ यांचे सरकार जाऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले व त्यांना स्पष्ट बहुमतासाठी २८ पैकी ९ जागांवर विजय मिळवणे अत्यावश्यक होते. पण, इथे भाजपने तब्बल १९ जागा जिंकल्या आणि शिवराज सरकार अधिकच भक्कम झाले. या विजयात शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदेंबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सिंहाचा वाटा असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
 
कारण, काँग्रेसने शिवराज सिंह चौहान यांच्यावर निरनिराळे आरोप केले होते, त्यात सत्ता हडपल्याचा दावा फारच जोरदारपणे करण्यात येत होता, तर ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावरही इतिहासकाळातील कथित अप्रामाणिकतेचे दाखले देण्यापासून विविध आरोप झाले, पण जनतेने त्यांना स्वीकारुन, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास कायम ठेवून काँग्रेससह सर्वच विरोधकांचे आरोप फेटाळून लावले व भाजपला मध्य प्रदेशचा गड बहुमताने राखता आला. पण, छत्तीसगढ, झारखंड व हरियाणात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. इथल्या चारपैकी एकही जागा भाजपला जिंकता आली नाही, ते का झाले, याचा विचार व कृती स्थानिक नेतृत्वासह केंद्रीय नेतृत्वानेही करायली हवी. कारण, यातल्या हरियाणात भाजप सत्तेत आहे, तर छत्तीसगढ व झारखंडमध्ये गेल्यावेळी भाजपचीच सत्ता होती.
 
दरम्यान, भाजपने उत्तर प्रदेशातल्या सातपैकी सहा जागा जिंकत राज्यात आपलीच चलती असल्याचे सिद्ध केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केल्या जाणार्‍या खोट्यानाट्या आरोपांना केराची टोपली दाखवत मतदाराने विजयाचा भगवाच फडकावला. तसेच उत्तर प्रदेशातील भाजपविजयाने समाजवादी पक्ष किंवा काँग्रेसला राज्यात भवितव्य नसल्याचे दाखवून दिले. इथेही योगी आदित्यनाथ यांच्या बरोबरीने नरेंद्र मोदींचाच करिश्मा चालला, पण भाजपला सर्वाधिक फायदा झाला तो पूर्वोत्तर आणि दक्षिण भारतात.



पूर्वोत्तरातील भाजपचा विजय पाहता तो कोणाला फार मोठा वाटणार नाही, पण भाजपने तिथे विरोधकांचा जसा सामना केला, त्यावरुन हा विजय जनाशीर्वादाशिवाय शक्य नसल्याचे दिसते. मणिपूर कित्येक वर्षांपासून काँग्रेसशासित व काँग्रेसला पाठिंबा देणारे राज्य म्हणून ओळखले जाते. पण भाजपने इथल्या पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांत विजय मिळवला. परिणामी, मणिपूरमध्ये भाजप २५ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, हे कौतुकास्पद.
 
आता भाजपला इथे एकट्याच्या बहुमतासाठी सहाच जागांची आवश्यकता आहे, तर दक्षिण भारतातील तेलंगण राज्यातला भाजपचा विजय सर्वाधिक अनोखा म्हटला पाहिजे. शेजारच्या कर्नाटकात भाजपची सत्ता आहे व इथल्या दोन्ही जागा भाजपनेच जिंकल्या, पण तेलंगणमधील एकमेव जागाही भाजपने आपल्याकडे खेचून आणली. भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकांत तेलंगणमध्ये चार जागा जिंकल्या व विरोधी पक्ष म्हणून समोर आला, तर आताची एक विधानसभेची जागा जिंकत तेलंगण राष्ट्र समितीला जोरदार झटका दिला, तसेच राज्यात भाजपची वेगाने व विजयी वाढ होत असल्याचे दाखवून दिले. मणिपूर ते तेलंगण इथेही मोदीनामानेच भाजपला विजयी केले, हे महत्त्वाचे. स्थानिक मुद्द्यांसह कोरोना काळातील पंतप्रधान मोदींचे काम, चीनविरोधी आक्रमकता या सगळ्याचाच यावर प्रभाव पडला व मोदींच्या मजबूत शासकाच्या प्रतिमेवर जनतेने मतदान केले, हे यावरुन म्हणता येईल.
@@AUTHORINFO_V1@@