पथदर्शी भारतीय संस्कृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2020   
Total Views |

Boris_1  H x W:

 
रामनामाचा जप करत, वानरसेनेने सेतू बांधला. ‘जय श्रीराम’ म्हणत हनुमंताने लंकादहन करून रावणाच्या अहंकाराचा बिमोड केला. त्याच घटनेचे स्मरण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी करून आपल्या देशवासीयांना महामारीला हरवण्यासाठी भावनिक साद घातली.
 
 
 
दिवाळीचा सण, हिंदू धर्मीयांसाठी चैतन्य, ऊर्जा आणि वर्षभरासाठी उत्साह, आनंद देणारा. पण, कोरोना महामारीच्या संकटात आपले सण साजरे करण्याची परंपरा आणि प्रथा यांच्यावर काहीसे निर्बंध येऊन पडले. हिंदू धर्मीयांनी आपल्या संस्कृतीनुसार ते स्वीकारलेही. जगभर मृत्यूचे थैमान घालणार्‍या कोरोनारुपी राक्षसाची तुलना बोरिस जॉन्सन यांनी रावणाशी केली, ही बाब महत्त्वाची ठरतेच. वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देणारी आपली भारतीय संस्कृती ही जगाला पथदर्शी ठरते, याचेही एक उदाहरण आहे.
 
 
 
ब्रिटनच्या पंतप्रधानांचा संवाद हा फारच गाजला. यात ते म्हणतात, “ब्रिटनमधील सर्व हिंदू धर्मीयांना दीपावलीच्या शुभेच्छा. आपण हा सण व्हर्च्युअलरीत्या साजरा करीत आहोत. या तुमच्या त्यागाबद्दल सर्वप्रथम अभिनंदन करतो. महामारीचा विळखा वाढत असताना आपल्या सणांवर निर्बंध आणून ते साजरे करणे खरेच खूप कठीण असते. मात्र, या अंधःकारावर प्रकाशाचा विजय नक्की होईल. आपल्यासमोर पुढील आव्हाने प्रचंड आहेत. वाईटावर चांगल्याचा विजय ज्याप्रमाणे होतो, त्याचप्रमाणे आपण हे युद्ध जिंकू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या काळात ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन पोहोचली आहे.
 
 
 
‘लॉकडाऊन’ आणि इतर निर्बंध काटेकोरपणे पाळले जात आहेत. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहेत. जॉन्सन यांच्यासाठी हा खडतर काळ मानला जात आहे. ब्रेग्झिट, कोरोना महामारीसारखी आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. अशातच त्यांच्या राजीनाम्याच्याही बातम्या आहेत. इतक्या खडतर काळात देशवासीयांना धीर देण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांची करून दिलेली आठवण प्रतीकात्मक ठरते. भारतीय संस्कृती परंपरा जगासाठी पथदर्शी ठरू शकते का, असा प्रश्न विचारणार्‍या प्रत्येकाला हे उत्तर आहे.
 
 
 
ही म्हणण्याची गोष्ट नाही, जॉन्सन यांनी आपल्या पुढील वक्तव्यात त्याचाच दाखला दिला. ब्रिटनमध्ये असलेले हिंदू, शीख आणि जैन बांधव कोरोना महामारीच्या काळात खांद्याला खांदा लावून मदतकार्यात उतरले आहेत. तेथील नागरिकांनी भुकेलेल्यांसाठी अन्नदान केले. ही सेवा करत असताना कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही, याचे धन्यवादही जॉनसन यांनी दिले. “प्रभू श्रीराम आणि माता सीतेने रावणावर विजय प्राप्त करून संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली होती, त्याप्रमाणे आपण कोरोनावरही विजय मिळवू,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. तिथल्या नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून केलेल्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
 
 
 
‘आय ग्लोबल दीपावली महोत्सव २०२०’ या कार्यक्रमात करण्यात आलेल्या जॉन्सन यांच्या संबोधनाची देशभरात चर्चा झाली. त्यावर डावे-उजवे काय म्हणाले या वादाबद्दल खोलात न जाता, भारतीयांनी आपल्या सणांचे महत्त्व जाणून घेतले, तर अधिक किफायतशीर ठरेल. दिवाळी सण ऊर्जा देणारा, उत्साह देणारा ठरतो. सणांबाबतीत वैविध्यपूर्ण असा देश म्हणूनच आपली संस्कृती ओळखली जाते. हिंदू धर्मीयांचा हाच आदर्श काही विदेशातील मंडळींनी घेतल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले. जुलिया रॉबर्ट्स, सिल्वेस्टर स्टेलॉन आदी चेहर्‍यांनीही हिंदू धर्माबद्दलची आस्था वेळोवेळी बोलून दाखवली आहे.
आशिया खंडातील काही ज्या देशांमध्ये जिथे हिंदूंवरती अत्याचारांच्या घटना उघडकीस येतात, त्यांच्या पतनाचे कारणही तेच आहे.




बळजबरीचे धर्मांतरण, हल्ले, मंदिरांचा विध्वंस या घटना हृदय पिळवटून टाकणार्‍या असतात. त्या गोष्टींचा निषेध करावा तितका थोडाच आहे. हिंदू आणि शिखांचे धर्मांतरण रोखण्यास असमर्थ ठरलेल्या इमरान खान सरकारने कर्तारपूर गुरुद्वारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. कर्तारपूर गुरुद्वारा हा उभय देशांतील संबंधांसाठी महत्त्वाचा मानला जात होता.
कोरोनामुळे या वर्षीही तो जास्त दिवस खुला राहू शकला नाही. याचे व्यवस्थापन हे पाकच्या शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून काढून घेऊन बिगर शीख समितीकडे सोपवले. मात्र, याच धर्माबद्दल ब्रिटनसारख्या देशाच्या पंतप्रधानांनी केलेला उल्लेख म्हणजे संस्कृतीची समाजाची जाण असण्याचे एक प्रतीक आहे. विशेष म्हणजे, जॉन्सन यांनी हिंदू वगळता शीख, जैन आणि अन्य धर्मीयांचे आभार मानले आणि जगासमोर असलेल्या या संकटात भारतीय संस्कृती ही ऊर्जेचा स्रोत ठरली.



@@AUTHORINFO_V1@@