मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने 'मेरी सहेली' अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ व घेता आयआरसीटीसी स्टॉल्सवरच खाद्यपदार्थ खरेदी करावे, असे सल्ले या अभियानाच्या माध्यमातून महिला प्रवाशांना दिले जाणार आहेत. महिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेने सातत्याने प्रयत्न करून “मेरी सहेली” हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. "मेरी सहेली" ही महिला प्रवाशांची सतत सोबती , मित्र म्हणून काम करणार असून महिला प्रवाशांची सुरक्षा फक्त स्थानकात नव्हे तर गाडीत, इच्छितस्थळी उतरण्यापर्यत सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी महिला अधिकारी आणि कर्मचार्यांची एक विशेष टीम तयार केली आहे. ही टीम महिला प्रवाशांसह सर्व प्रवासी डब्ब्यांना भेट देत ट्रेनमध्ये प्रवास करणार्या महिला प्रवाशांची ओळख पटवून घेणार आहे. महिला प्रवाशांशी संवाद साधताना हे पथक आरपीएफ सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक १८२, जीआरपी हेल्पलाईन क्रमांक १५१२ आणि इतर सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी अद्ययावत करणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
नाव, पीएनआर / तिकिट क्रमांक, कोच आणि बर्थ क्रमांक इत्यादी प्रवाशांचा तपशील देखील “मेरी सहेली” टीम नोंदवणार आहे. महिला प्रवाशांचा तपशील ट्रेन पकडल्या स्थानकापासून उतरणाऱ्या स्थानकापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना पाठवला जाणार आहे. तसेच या अभियानांतर्गत महिला प्रवाशांच्या आरोग्याबाबत विचारणा करत महिला प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य ते पाऊल उचलणार आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफने २४ विशेष गाड्यांमध्ये “मेरी सहेली” कार्यक्रम सुरू केला असून यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यात मुंबई-नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस, गोदान एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई विशेष , मुंबई-हावडा एक्सप्रेस, पुणे-पाटणा विशेष अशा इतर गाड्यांचा समावेश आहे.