आणखी एक राहुल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2020   
Total Views |

rahul tripathi _1 &n


पुणे शहरामध्ये लहानाचा मोठा झालेला आणि क्रिकेटशी एकरूप झालेल्या तरुण राहुल त्रिपाठीची प्रेरणादायी गोष्ट...


भारतीय क्रिकेटमध्ये ‘राहुल’ या नावाचा तसा जुना इतिहास आहे. तसेच, सध्या चालू असलेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या तेराव्या हंगामातदेखील याच नावाची चलती आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे शिष्य क्रिकेटचे मैदान गाजवत आहेत. सचिन, सेहवाग, गांगुली, कुंबळे यांच्यासोबत राहुल हेदेखील भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मोठे नाव म्हणूनच घेतले जाते, तर आज दुसरीकडे के. एल. राहुल आणि राहुल तेवतीयासारखे खेळाडू स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहेत. के. एल. राहुल हा पंजाबच्या संघाचे यशस्वी नेतृत्त्व करत आहे, तर, राहुल तेवतीयाने स्वतःच्या कामगिरीने विदेशी कर्णधार स्टिव्ह स्मिथचा विश्वास जिंकत संघातील आपले स्थान पक्के केले आहे. यामध्ये आणखी एका राहुलचे नाव उदयास आले. तो म्हणजे अभिनेता शाहरुख खानच्या ‘कोलकाता नाईट रायडर्स’ संघाचा राहुल त्रिपाठी. कोलकाता संघाने पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याला संधी दिली नाही. मात्र, ‘दिल्ली कॅपिटल’विरुद्ध संघाने त्याला आठव्या स्थानावर फलंदाजीची संधी दिली. या संधीचे सोने करत त्याने १६ चेंडूंमध्ये ३६ धावांची तडाखेबाज फलंदाजी केली. त्याची ही खेळी बघून चेन्नईविरुद्ध सामन्यात कोलकाता संघ व्यवस्थापनाने त्याला सलामीला उतरवले आणि पुन्हा एकदा ‘आयपीएल’ने २०१७चा ‘राहुल त्रिपाठी’ पाहिला. त्याने ५१ चेंडूंमध्ये ८१ धावांचा खेळत करत संघाला विजय मिळवून दिला आणि सर्वांनी त्याच्या या खेळीचे कौतुकही केले. लहानपणापासून क्रिकेटमध्ये जिद्द आणि मेहनतीनेच त्याने हे स्थान मिळवले. जाणून घेऊया त्याच्या जीवनप्रवासाबद्दल...


राहुल अजय त्रिपाठी याचा जन्म २ मार्च, १९९१ रोजी झाला. झारखंडमधील रांची येथे जन्मलेल्या राहुलला वडिलांपासून क्रिकेटचा वारसा मिळाला. तसेच, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या शहरामध्ये जन्मलेल्या राहुललाही लहानपणापासूनच क्रिकेटचे वेध लागले. त्याचे वडील हे भारतीय लष्करात होते. विशेष म्हणजे, लष्करात येण्यापूर्वी त्यांनीही काहीकाळ क्रिकेटसाठी दिला होता. ते विद्यापीठ स्पर्धा, तसेच उत्तर प्रदेश क्रिकेट संघाकडून खेळले होते. पण, कुटुंबासाठी त्यांनी क्रिकेटची वाट सोडली आणि भारतीय लष्करात दाखल झाले. असे असले तरीही आपले स्वप्न आपला मुलगा राहुल पूर्ण करेल, असा त्यांना विश्वास होता आणि त्याने तो सिद्धही केला. राहुल हा लहानपणापासून अभ्यासात हुशार. गणित हा त्याचा आवडीचा विषय. त्याने शालेय अभ्यासक्रमात कधीच ९८ पेक्षा कमी गुण मिळवले नाहीत. त्यामुळे त्याची बुद्धिमत्ताही अफाट होतीच. पुढे त्याच्या वडिलांची बदली ही पुण्यात झाली आणि इथून खरी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. वडिलांनी त्याची क्रिकेटमधली आवड हेरली होती. म्हणून त्यांनी राहुलला पुण्यातील सगळ्यात जुन्या आणि सुप्रसिद्ध डेक्कन जिमखाना अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला. यानंतर त्याने अकादमीत चांगली फलंदाजी केली, तसेच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये तडाखेबाज फलंदाजी करत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. १९व्या वर्षी २०१०मध्ये महाराष्ट्र संघाकडून ‘ए लिस्ट’ क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर पुढे २०१२ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यामध्ये त्याची फटकेबाजी पाहून देशांतर्गत ‘टी-२०’ क्रिकेट खेळण्याची संधीही मिळाली. दरम्यान, एका स्थानिक स्पर्धेमध्ये एकाच षटकात सहा षट्कार मारण्याची कामगिरी केली आहे आणि तीही दोनदा. त्यामुळे त्याची तुलना भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि तडाखेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्याशी होऊ लागली होती. पुढे ‘आयपीएल’ २०१७मध्ये दहा लाखांच्या बेस प्राईजमध्ये ‘रायझिंग पुणे सुपरजायंट्स’ संघाने सहभागी करून घेतले.


पुणे संघात समावेश आणि अजिंक्य रहाणेसोबत सलामीची फलंदाजी यामुळे त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. म्हणून संघामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टिव्ह स्मिथ, महेंद्र सिंह धोनी, अजिंक्य रहाणे आणि बेन स्टोक्ससारखे तगडे फलंदाज असतानाही राहुलने सर्वाधिक धावा केल्या. १४ सामन्यांमध्ये त्याने ३९१ धावा केल्या. त्याच्या योगदानामुळे पुणे संघदेखील स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर २०१८ मध्ये ‘राजस्थान रॉयल्स’ने ३ .४० कोटींची बोली लावत राहुलला आपल्या संघामध्ये समावेश करून घेतले. मात्र, नावाला साजेशी कामगिरी त्याला करता आली नाही. सध्या चालू असलेल्या ‘आयपीएल २०२०’ मध्ये कोलकाता संघाने ६०लाखांची बोली लावत आपल्या संघात समावेश करून घेतला. त्याच्या दोन सामन्यांतील खेळीने भारतीय संघाची दावेदारी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्याच्या खेळातील समंजसपणा आणि गरज पडेल तशी फटकेबाजी, यामुळे येत्या काळात राहुलचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. त्यामुळे भविष्यात तो भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...

@@AUTHORINFO_V1@@