ममतांची ‘फॅसिस्ट’ प्रयोगशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2020
Total Views |

agralekh_1  H x


ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपला व जनतेला दडपण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी इतिहासाची पुनरावृत्ती होणारच! ३५ वर्षांची डाव्यांची सत्ता बंगाली जनतेने हटवली, तीच जनता ममतांच्याही फॅसिस्टवादाला हरवणारच! तेव्हा ममतांनी भाजपचे आंदोलन दाबण्याचे प्रयत्न करू नये.


पश्चिम बंगालमधील भाजप नेते मनीष शुक्ला यांच्या हत्येने राज्यातील ममता बॅनर्जी सरकारची गुंडगिरी पुन्हा उघड झाली. मात्र, एरवी भाजपचे नाव घेऊन हुकूमशाहीचा आरोप करणारे तथाकथित बुद्धिजीवी, पत्रकार, संपादक ममतांच्या हिंसाचाराचीच पाठराखण करतील, ते भाजप नेता वा कार्यकर्त्याच्या हत्येवर कधीही तोंड उघडणार नाहीत. त्याला कारण ते भाजपवर कितीही ‘फॅसिस्टवादी’ म्हणून आरोप करत असले तरी खरे ‘फॅसिस्टवादी’ ते स्वत:च आहेत आणि आता ममतांच्या राज्यात पश्चिम बंगाल देशातील नवी ‘फॅसिस्ट प्रयोगशाळा’ म्हणून उदयाला आली व आपल्याच फॅसिस्टवादी आचार-विचारबंधूंविरोधात एल्गार कसा करावा, ही या तथाकथित बुद्धिजीवी, पत्रकार, संपादक मंडळींसमोरची मोठी समस्या आहे. उल्लेखनीय म्हणजे, मनीष शुक्ला या भाजप नेत्याची हत्या ही काही पहिलीच घटना नाही, तत्पूर्वी बंगालमध्ये डाव्यांची राजवट होती, तेव्हाही कित्येक संघ स्वयंसेवक व भाजप नेत्यांचा बळी त्या सरकारने किंवा डाव्या कार्यकर्त्यांनी घेतलाच होता. आता फक्त गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्ताबदल झाल्याने ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी आल्या. पण, राजकीय विरोधकांचा जीव घेऊन त्यांना संपविण्याची प्रथा मात्र बंद पडली नाही. उलट ममतांच्या काळात ती अधिक आक्रमकपणे अमलात आणली गेली व भाजप कार्यकर्ते-नेत्यांच्या हत्या तिथली सामान्य गोष्ट झाली व बुद्धिजीवी, पत्राकार, संपादकांचे मौन हीदेखील सामान्य बाब झाली.


गेल्या कित्येक वर्षांपासून ममतांच्या-तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली सैतानी मनोवृत्ती दाखवून अनेकानेक भाजप कार्यकर्त्यांचा खून केला, तर गुरुवारी भाजपने केवळ ममतांच्या व तृणमूलच्या गुंडगिरीचा निषेधमात्र करण्यासाठी निदर्शनांचे आयोजन केले, त्यानेही ममता व त्यांचा पक्ष संतापला. कायदा-व्यवस्थेचे राजरोस धिंडवडे उडालेल्या राज्यात ममतांच्या पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांच्या निषेध प्रदर्शनाचाही हक्क नाकारला. भाजपच्या सातसूत्री कार्यक्रमाला स्वीकारण्याची गोष्ट तर दूरच, ममता सरकारने त्यांचा लोकशाहीप्रदत्त अधिकारही हिसकावून घेतला व भाजप कार्यकर्त्यांच्या निषेध प्रदर्शनावर पोलिसांकरवी अमानुष लाठीमार केला. परंतु, फॅसिस्टवादाविरोधात लढण्याची भाजप कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ की, त्या लाठीमारापुढेही ते डगमगले नाही, तेव्हा पोलिसांनी पाण्याचा मारा केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलन दडपण्यासाठी सरसावलेल्या पोलिसांना मात्र भाजप कार्यकर्त्यांना रोखता आले नाही, ते पाहून तृणमूल काँग्रेसचे गुंडही विरोधासाठी रस्त्यावर उतरले. आपल्या राजकीय विरोधकांना कसेही करून चिरडून टाकलेच पाहिजे, अशी भूमिका घेऊन वागणार्‍या ममतांच्या कार्यकर्त्यांना सत्तेची धुंदी आणि मस्ती इतकी चढलेली की, त्यापैकी काहींनी भाजपच्या आंदोलकांवर गावठी बॉम्ब फेकण्याचाही उद्योग केला. भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करणे, आंदोलन दाबून टाकणे हाच त्यांचा उद्देश होता. पण, भारतमातेच्या सेवेसाठी तत्पर व बंगभूमीला ममतांसारख्या हुकूमशहांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना त्यांना रोखता आले नाही; अर्थात ही फक्त सुरुवात आहे. लोकसभा निवडणुकीतून ममतांच्या हुकूमशाहीला बंगाली जनतेने तर आधीच धुडकावून लावलेले आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची हुकूमशाही पूर्णपणे मोडीतही निघेलच!



बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांसाठी पायघड्या अंथरणार्‍या ममतांना बंगाली जनतेने गेल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात चांगलेच ओळखले; नव्हे अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती आणि मुस्लीम लांगुलचालनाचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला. मात्र, यातूनच दुर्गापूजेपासून रामनवमीपर्यंत हिंदूंच्या प्रत्येक सण-उत्सव साजरा करण्यावर जाचक अटी-बंधने लादणार्‍या ममतांना आता सत्तेबाहेर फेकावेच लागेल, याची खूणगाठ बंगाली जनतेने मनाशी बांधली. लोकसभा निवडणुकीत भाजपचे १८ खासदार निवडून आले व याचा अर्थ विधानसभेच्या २००च्या आसपास मतदारसंघांत भाजपने आघाडी घेतल्याचे, विजय नोंदविल्याचे वा तृणमूलला तुल्यबळ लढत दिल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, आधीच आक्रस्ताळ्या असलेल्या ममतांना भाजपची घोडदौड खुपणे साहजिकच होते. नंतर त्यांनीच ‘अपॉईंट’ केलेल्या व निवडणुकीच्या राजकारणातला ‘आधुनिक चाणक्य’ म्हणून ओळख मिळविलेल्या प्रशांत किशोर यांनीही एका अध्ययनातून तृणमूल काँग्रेसची आगामी विधानसभा निवडणुकीत डाळ शिजणार नाही, असा अहवाल दिला. येत्या वर्षात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून तृणमूल काँग्रेसची पाचपन्नास जागा जिंकण्याचीही स्थिती नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. त्यातून सत्तासिंहासन डळमळीत होण्याच्या धास्तीने ममता बॅनर्जी व त्यांचा पक्ष अधिकच खवळला, बेभान झाला.


कोरोनाकाळात आकडेवारीच्या लपवाछपवीचे आरोप झालेल्या व कोरोनाला हरवण्यासाठी परिश्रम न घेतलेल्या ममतांनी भाजपच्या सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर मात्र कारवाई केली. पण, ममता बॅनर्जींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुमच्यासारख्या सत्ताधीशांचे हुकूमशाही गाजवण्याचे दिवस आता गेलेत. आता बंगाली जनतेलाही तुमची असलियत चांगल्याप्रकारे समजली आहे. तुम्हाला निवडणुकीच्या राजकारणात लोकशाही पद्धतीने मतदानाच्या माध्यमातून आसमान दाखविण्यासाठी बंगाली जनमताचे हात शिवशिवताहेत. कधी एकदा निवडणूक येते आणि ममतांची, तृणमूलची राजवट आपल्या हातांनी मतदान करून उलथवून टाकतो, असे त्या जनतेला वाटत आहे. लोकसभा निवडणुकीतील निकाल व भाजपच्या आंदोलनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद-पाठिंबा त्याचीच साक्ष देतो; अर्थात याची जाणीव ममता बॅनर्जींनाही आहेच व म्हणूनच, त्या भाजपविरोधात फॅसिस्टवादी धोरण अवलंबताना दिसतात. पण, आता त्यांच्याकडेही करण्यासारखे फार काही विशेष नाही. ज्याप्रमाणे डाव्यांची एकाधिकारशाही नेस्तनाबूत करण्याचे काम ममतांच्या नेतृत्वात बंगाली जनतेने केले, तशीच अवस्था ममतांचीही होणार यात तिळमात्र शंका नाही. ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपला व जनतेला दडपण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी इतिहासाची पुनरावृत्ती होणारच! ३५ वर्षांची डाव्यांची सत्ता बंगाली जनतेने हटवली, तीच जनता ममतांच्याही फॅसिस्टवादाला हरवणारच! तेव्हा ममतांनी भाजपचे आंदोलन दाबण्याचे प्रयत्न करू नये. कारण, ते जितके दडपण्याचा त्या प्रयत्न करतील, तितकीच उसळी मारून भाजप कार्यकर्ते व जनता ममतांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@