'जागे व्हा ! नाहीतर मनसे स्टाईल कारवाई करू'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2020
Total Views |

raj thackeray uddhav thac



मुंबई :
महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय करणे आणि त्याचा विस्तार करणे नित्याची बाब आहे, कधीही या महिलांनी कर्जाचा हफ्ता चुकवण्यात दिरंगाई केली नाही, परंतु लॉकडाऊनमुळे या ग्रामीण भागातील महिलांचे व्यवसाय जवळपास ठप्प झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे. यातच मायक्रो फायनान्स कंपनीकडून महाराष्ट्रात दंडेलशाही सुरु केली आहे. या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.


या पत्रात राज ठाकरेंनी म्हटलंय की, कोणत्या परिस्थितीचा विचार न करता मायक्रो फायनान्स कंपन्या कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे, चारचौघात अपमान करणे असले प्रकार सर्रास करत आहेत. या विषयाच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीवर सरकारने अंकुश ठेवायला हवा, कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार ह्या कंपन्यांना कोणी दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.




हा विषय गंभीर आहे आणि हे जर असचं सुरु राहिलं तर लक्षात ठेवा ह्यांचे मानसिक आणि सामाजिक परिणाम गंभीर असतील, म्हणून सरकारने आता जागे व्हावे आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत ह्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा आणि हे जर सरकार म्हणून तुमच्याकडून होणार नसेल तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मायक्रो फायनान्स कंपन्या आणि ठाकरे सरकारला दिला आहे.
पूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थाच गेले ६ महिने ठप्प आहे आणि अजूनही अर्थव्यवस्थेला उभारी येण्याची कोणतीही चिन्हं नाहीत त्यांमुळे ह्या माता-भगिनी कर्जाचे हप्ते भरु शकतील ह्याची शक्यता नाही, त्यामुळे ह्या महिलांच कर्ज माफ करण्यासाठीही सरकारने पाऊलं उचलायला हवीत. ह्यातील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बचत गटाच्या महिलांकडून विमा उतरवतो हे सांगून त्या विम्याच्या हप्ता गोळा केला आहे पण आज जेंव्हा व्यवसाय ठप्प आहे आणि कर्जाचे हप्ते देणं हा महिलांना शक्य नाही अशा वेळेस जेंव्हा ह्या महिला विम्याच्या पॉलिसीची मागणी करत आहेत तेंव्हा मायक्रो पायनान्स कंपन्या विम्याचे कागदपत्रं देत नाहीयेत. ह्यात ह्या माता-भगिनींनी जरी विम्याची रक्कम अदा केली असली तरी विमाच उतरवला गेला नाहीये अशी शंका येत आहे. त्यामुळे ह्या महिलांना विम्याचे कागदपत्रं तर मिळायलाच हवेत पण त्यांना त्यांच्या विमा कवचाचा लाभ देखील मिळायलाच हवा! अशी मागणी राज ठाकरे यांनी पात्रातून केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@