झारखंडमधील ‘फुंगसूक वांगडू’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2020
Total Views |

indrajitsingh_1 &nbs


कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर नवनवे यशस्वी संशोधन करणार्‍या झारखंडमधील ‘फुंगसूक वांगडू’च्या (इंद्रजीत सिंग) आयुष्याविषयी...


जगातला सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणार्‍या ‘नोबेल’ पुरस्कारांची घोषण नुकतीच करण्यात आली. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आदी विविध विषयांमध्ये यशस्वीरीत्या संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दरवर्षी काही निवडक व्यक्तींचीच या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड होते. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी निवड होणारे हे बहुतांश शास्त्रज्ञच असतात. सर्वसाधारणपणे या व्यक्ती पद्धतशीरपणे प्रयोग करून त्याची निरीक्षणे नोंदवून एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचतात आणि एक नवे यशस्वी संशोधन जगापुढे सादर करतात. जगभरातील कोट्यवधी नागरिकांना त्याचा लाभ होतो. शास्त्रज्ञांच्या याच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जागतिक ‘नोबेल समिती’ दरवर्षी जगातला सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या ‘नोबेल’ पुरस्कारांसाठी काही शास्त्रज्ञांची निवड करते. जगात आजच्या घडीला अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत.


मात्र, प्रत्येक शास्त्रज्ञाला हा पुरस्कार मिळतोच असे नाही. या पुरस्कारासाठी आपली निवड झाली नाही तरी जनहितार्थ या शास्त्रज्ञांचे विविध संशोधन सुरूच असते. त्यांच्या नवसंशोधनाद्वारे निर्माण करण्यात आलेल्या उपकरणांचा अनेकांना आपल्या जीवनात फायदा होतच असतो. केवळ उच्चशिक्षित व्यक्तीच संशोधन करतात असे नाही, तर संशोधनाची आवड असणारे असे अनेक व्यक्ती या जगात असून त्यांनी केलेल्या उपकरणांचा लाभ अनेक जण घेत आहेत. भारतातही अनेक तरुणांमध्ये विविध क्षेत्रात संशोधन करण्याची इच्छा असल्याचे अलीकडे पाहायला मिळते. या तरुणांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक विषयांत यशस्वी संशोधन करून विविध जगप्रसिद्ध उपकरणे तयार केली आहेत. उदाहरण घ्यायचेच झाले तर झारखंडमधील इंद्रजीत सिंग या १८ वर्षीय विद्यार्थ्याचे घेता येईल. केवळ पदवीधर असणार्‍या या विद्यार्थ्याने विविध आविष्कार साकारत सर्वांसमोर आपली छाप पाडण्यात यश मिळविले आहे. ‘सोलर सायकल’, ‘इलेक्ट्रिकल सायकल’, ‘सॅनिटाईझ ड्रोन’ अशी विविध उपकरणे त्याने स्वसंशोधनातून अवघ्या वयाच्या 18व्या वर्षीच निर्माण केली असून शेकडो नागरिक त्याचा लाभ आपल्या जीवनात घेत आहेत. त्याचे हे कर्तृत्व वाखाण्याजोगे असून इंद्रजीतवर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.



इंद्रजीत सिंग हा झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातील एक तरुण संशोधक. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या इंद्रजीतला लहानपणापासूनच मशिन्सची खूप आवड. आपल्या आवडीच्या क्षेत्रात म्हणजे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची त्याची आधीपासून इच्छा होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्याला हे शक्य झाले नाही. इंद्रजीतचे वडील हे बसचालक. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने इंद्रजीत आणि त्याच्या भावंडांना सरकारी शाळांतच शिक्षण घेता आले. पुढील शिक्षणासाठी घरातून आर्थिक पाठबळ न मिळाल्यामुळे त्याला अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेता आला नाही. मात्र, यातून खचून न जाता इंद्रजीतने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपली संशोधनाची आवड सोडली नाही. एका शाळेतील विज्ञान उपक्रमांमध्ये सहभाग घेत त्याने आपली ही आवड सुरूच ठेवली. येथे काम करताना त्याला काही पैसेही मिळू लागले. या मिळालेल्या पैशांतून त्याने आपल्या घराजवळच एक छोटेखानी वर्कशॉप तयार केले. या वर्कशॉपमध्ये इंद्रजीत विविध मशिन्स निर्माण करण्यासाठी संशोधन करू लागला. झारखंडमधील पर्वतीय भागांत मुलांना शाळेत जाण्यासाठी मैलोन्मैल पायी चालत जावे लागते. या पायी चालण्याच्या कंटाळ्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यास टाळाटाळ करतात. विद्यार्थ्यांची हीच समस्या लक्षात घेत विद्यार्थ्यांसाठी ‘सोलर सायकल’ तयार करण्याचा निर्णय त्याने घेतला. एकदा इंद्रजीतला सोलर सायकल मिळाली होती. या सायकलचे तंत्र समजून घेऊन त्याने सायकल तयार करायला सुरुवात केली.

ही सायकल दोन पद्धतीने चालू शकते. सोलर पॅनेलच्या साहाय्याने ही सायकल ३० किमी चालते, तर इलेक्ट्रिक चार्जिंगने ६० कमी चालते. आपला अभ्यास आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने इंद्रजीतने डिलिव्हरी बॉयचे पार्ट टाईम काम करायला सुरुवात केली. या कामासाठी त्याने स्वतः तयार केलेल्या सोलर सायकलचा वापर करायला सुरुवात केली. एकदा त्याने आपला सायकल बनवण्याचा व्हिडिओ युट्यूबवर टाकला आणि ऑर्डर्स मिळायला सुरुवात झाली. या सायकलची विक्री १४ हजार रुपयांना होत आहे. या सायकलमध्ये २४ व्हॉल्टची बॅटरी असून आतापर्यंत ८०० ऑर्डर्स इंद्रजीतला मिळाल्या आहेत. याशिवाय अजून एका संशोधनावर काम सुरू आहे. अलीकडे आपल्या मित्रांच्या सहकार्याने इंद्रजीतने ‘मल्टी पर्पज ड्रोन’ तयार केला आहे. कोरोनाकाळाचे महत्त्व समजून घेत कोणतीही जागा सॅनिटाईझ करण्यासाठी तसेच औषधे डिलिव्हर करण्यासाठी हा ड्रोन फायदेशीर ठरतो. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना त्याने केलेल्या या संशोधनाची ख्याती वार्‍यासारखी सर्वत्र झपाट्याने पसरत असून इंद्रजीतच्या कौतुकाचे गोडवे गायले जात आहेत.


- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@