१५ मिनिटांसमोर १० वर्षे क्षुल्लक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2020
Total Views |

rahul gandhi_1  


२००४ ते २०१४ पर्यंत दहा वर्षे मनमोहन सिंग पंतप्रधान असले, तरी ‘१०, जनपथ’वरून काँग्रेसी ‘सुपर प्राईम मिनिस्टर’च देशाचा कारभार चालवत होत्या. पण, या दहा वर्षांत राहुल गांधींनी कधी अक्साई चीनमधून चीनला बाहेर फेकून देण्याची हिंमत दाखवली नाही. दहा वर्षांच्या काँग्रेसी सत्ताकाळात चीनला धोबीपछाड देणारी राहुल गांधींची १५ मिनिटे कधी उगवलीच नाहीत.


विदूषकी बडबड करण्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान लोकसभा खासदार राहुल गांधींशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. मात्र, सदानकदा शेंडा बुडखा नसलेल्या, वडाची साल पिंपळाला लावणार्‍या, ‘आपलं ठेवावं झाकून, दुसर्‍याचं पाहावं वाकून’ पद्धतीच्या विधानांमुळे तर राहुल गांधी आज राष्ट्रीय विनोद होऊन बसलेले आहेत; अर्थात, देशातील १३० कोटी जनताही श्रमपरिहारार्थ राहुल गांधींचा स्टॅण्डअ‍ॅप कॉमेडी शो एन्जॉय करतच असते. आताही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कथित चिनी अतिक्रमणावरून अशी काही बढाई मारली की, शत्रूला चितपट करणारा हाच तो वीर असे एखाद्याला वाटेल. पण, ते किंवा त्यांचा काँग्रेस पक्षही तसा अजिबात नाही. “पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर (भित्रे) असून त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. एक हजार २०० चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली आणि तरीही मोदी स्वतःला देशभक्त म्हणवून घेतात. चीनमध्ये आपल्या देशात पाय ठेवण्याचीही हिंमत नव्हती. पण, या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली. जगात भारत हा एकमेव देश आहे, ज्यात चिनी सैन्याने पाऊल ठेवले आणि आपली एक हजार २०० चौरस किलोमीटर जमीन हडप केली. जर आमचे सरकार असते, तर १५ मिनिटांत चिनी सैन्याला बाहेर फेकून दिले असते. चीनला १०० किमी मागे ढकलले असते,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. मात्र, राहुल गांधींनी उच्चारलेला एक एक शब्द तपासून पाहिला असता, ते स्वतःहूनच जवाहरलाल नेहरूंपासून मनमोहन सिंगांपर्यंतच्या काँग्रेसी पंतप्रधानांचीच लाजिरवाणी करणी जाहीरपणे कथन करत, त्यांना ‘कायर’ ठरवत असल्याचे स्पष्ट होते.




कारण, ‘हिंदी चिनी-भाई भाई’च्या घोषणा देत भाबड्या आशावादात देशकारभार करणार्‍या जवाहरलाल नेहरूंना चीन आपल्या उत्तर सीमेवर आक्रमण करण्यासाठी सज्ज असल्याचाही कधी पत्ता लागला नाही. तसेच चीनने हल्ला केला, तेव्हा भारतीय सैनिकांना जुन्या-पुराण्या आणि अपुर्‍या हत्यारांनिशी, अपुर्‍या साहित्यानिशी लढाईत उतरावे लागले. तरीही भारतीय सैन्यातील जिगरबाज सैनिकांनी चीनला थोपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, राजकीय नेभळटपणापायी देशाला अक्साई चीनसह ४३ हजार वर्ग किलोमीटरचा भूभाग गमवावा लागला. तेव्हा नेहरूंनी जिथे गवताचे पातेही उगवत नाही, ती जमीन चीनने बळकावली, तर त्यात काय काळजी करण्यासारखे, असे विधान केले होते. राहुल गांधींच्या मते अशी विधाने करणारे नेहरू हिंमतबाज असतील, ‘कायर’ नसतील! त्यानंतरही काँग्रेसी पंतप्रधानांच्या काळात चीनने भारतीय भूमीचा लचका तोडण्याचे काम सुरूच ठेवले व तत्कालीन सत्ताधार्‍यांनी त्याला विरोध करण्याचे धाडस दाखवले नाही.



आज राहुल गांधी १५ मिनिटांत चीनला बाहेर फेकून देण्याची भाषा करतात. पण, त्यांच्याआधीच्या काँग्रेसी पंतप्रधानांचे सोडा, २००४ ते २०१४पर्यंत चांगली दहा वर्षे राहुल आणि सोनिया गांधी या मायलेकांकडेच सत्तेची सूत्रे होती. मनमोहन सिंग पंतप्रधान असले तरी ‘१०, जनपथ’वरून काँग्रेसी ‘सुपर प्राईम मिनिस्टर’च देशाचा कारभार चालवत होत्या. पण, या दहा वर्षांत राहुल गांधींनी कधी अक्साई चीनमधून चीनला बाहेर फेकून देण्याची हिंमत दाखवली नाही. दहा वर्षांच्या काँग्रेसी सत्ताकाळात चीनला धोबीपछाड देणारी राहुल गांधींची 15 मिनिटे कधी उगवलीच नाहीत किंवा राहुल गांधींच्या मते १५ मिनिटांसमोर दहा वर्षांचा काळ क्षुल्लक असावा, त्यामुळे त्यांना चीनविरोधी कारवाईला वेळच मिळाला नाही. दरम्यान, २००८-टिया पांगनाक व चाबजी व्हॅली, २००९-डुम चेला, २०१२-डेमचोक आणि २०१३साली राखी नुला या भारतीय प्रदेशांवर काँग्रेसच्या सत्ताकाळात व राहुल गांधी पक्षाचे नेते असतानाच चीनने कब्जा केला. त्यांची ही कामगिरी पाहता राहुल गांधींनी शत्रूला पाणी पाजण्याच्या पोकळ गमजा मारू नये. तिथे मोदींसारखा कणखर आणि खमका माणूसच हवा असतो, जो स्वतःहून कोणाची खोड काढत नाही आणि कोणी वळवळ केलीच, तर त्याला तोंड वर करायलाही जागा सोडत नाही. गलवानची झटापट त्याचे ताजे उदाहरण आहे.


दरम्यान, चीनला बाहेर फेकून देण्याचे नव्हे, तर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाशी गुप्त करार करण्याचे पाऊल मात्र राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी आपल्या सत्ताकाळात उचलले होते. आजपर्यंत दोन देशांचे राष्ट्रप्रमुख, दोन कंपन्या वगैरेंत सामंजस्य, सहकार्य करार झाल्याचे सर्वांनी पाहिले होते. पण, राहुल-सोनियांनी हुकूमशाहीवादी चिनी कम्युनिस्ट पक्षाबरोबर लोकशाहीवादी देशातील काँग्रेस पक्षाचा अभूतपूर्व करार करून दाखवला होता. मात्र, कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसमध्ये झालेल्या करारात नेमके काय दडलेले आहे, हे राहुल गांधी वा सोनिया गांधींनी देशवासीयांना कधीच सांगितले नाही. त्यानंतर २०१७ साली डोकलाम वादावेळी राहुल गांधींनी रात्रीच्या अंधारात लपून छपून चिनी राजदूताची, तर २०१८ साली कैलास-मानससरोवर यात्रेला जाण्याच्या नावाखाली चिनी मंत्र्यांची भेट घेतली होती. पण, त्यांनी ही भेट नेमका कोणता पराक्रम गाजविण्यासाठी घेतली, याचा पुरेसा, पटण्याजोगा खुलासा कधीही केला नाही. तेच राहुल गांधी आज चीनने एक हजार २०० चौरस किलोमीटर भूभाग बळकावल्याचा दावा करतात, यातून त्यांना भारताचे पंतप्रधानच नव्हे, तर सैन्यालाही पराभूत, पराजित ठरवायचे आहे. कारण, मागील सहा महिन्यांत भारतीय सैन्याने जीवाची बाजी लावून चिन्यांना आसमान दाखवले, अतिशय कठीण हवामानातही कित्येक टेकड्या काबीज केल्या. त्यामुळे चीन गांगरला आणि शाब्दिक बुडबुड्यांपलीकडे त्याची मजल गेली नाही. पण, राहुल गांधींनी आपल्या भाषणात कधीही भारतीय सैन्याच्या हिमतीला, कामगिरीला दाद दिली नाही, म्हणजेच त्यांना भारतविरोधी व चीनप्रेमी विधाने करून देशाचे मनोबल खच्ची करायचे आहे, हेच दिसून येते. कारण, भारतीय सीमेत प्रवेश केल्याने चिनी सेना राहुल गांधींच्या शब्दांत विजयी ठरते व भारतीय सेना पराजयी! यातूनच राहुल गांधी नेमके भारताचे की चीनचे, याचीही उकल होते.
@@AUTHORINFO_V1@@