जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताची॥

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2020
Total Views |

arpnamastu_1  H


संत सेना महाराजांच्या वरील अभंगाप्रमाणे पंढरीच्या वाटेवर सुख शोधणारे ,आपल्या भक्तिरसाने संपूर्ण महाराष्ट्राला चिंब भिजवणारे हभप रामदास महाराज यांचे दुर्दैवाने २५ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा हा लेख...


रामदास महाराजांचे पूर्ण नाव रामदास कोंडाजी जाधव होते. त्यांचा जन्म मनमाडला झाला. संतश्रेष्ठ कैकाडी महाराज हे रामदास बाबांचे काका. कैकाडी बाबांचा सहवास रामदास बाबांना लाभला. लहानपणापासूनच त्यांच्यावर अध्यात्माचे आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. रामदासबाबांचे वडील कोंडाजीबाबा यांचे वास्तव्य मनमाडला होते. कोंडाजी काकांनी मनमाड ते पंढरपूर अशी दंडवत घालून वारी केली, त्यावेळी लहानगे रामदासबाबा त्यांच्यासोबत पायी चालत होते. वडिलांच्या अध्यात्माचा फार मोठा परिणाम रामदासबाबांवर झाला आणि तेदेखील अध्यात्माकडे हळूहळू आकृष्ट व्हायला लागले. रामदास महाराज यांचे शिक्षण येथील ‘इंडियन हायस्कूल’मध्ये झाले. रामदास महाराज शालेय जीवनात उत्तम अभिनय करायचे, नाटकात भाग घ्यायचे, उत्तम कबड्डी खेळायचे, शाळेच्या कबड्डीच्या संघाचे ते कर्णधार होते. वक्तृत्व, वाद-विवाद, स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त सार्वजनिक वाचनालयातर्फे घेतल्या जाणार्‍या वक्तृत्व स्पर्धेत रामदास बाबांनी लोकमान्य टिळकांवर केलेल्या वक्तृत्वाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.


१९६२ला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर रामदास बाबा पंढरपुरात वास्तव्यास आले. रामदासबाबा, संतश्रेष्ठ कैकाडी महाराज, कोंडाजी काका या तिघांनी मिळून मठाची पायाभरणी केली. हा मठ स्थापत्त्यकलेचा उत्तम नमुना समजला जातो. पंढरपुरात विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी आलेला प्रत्येक भाविक मठाला भेट दिल्याशिवाय जात नाही. मठाला माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांनी भेट देऊन मठाच्या स्थापत्यासह, अध्यात्म, सामाजिकता, विश्वबंधुत्व या त्रिवेणी संगमाचे कौतुक केले होते. बाबांचे बंधू प्रा. तुलसीदास जाधव यांच्या ‘मॅडम’ या नाटकाचे शंभरांपेक्षाही अधिक प्रयोग झाले आहेत. पंढरपुरातील वास्तव्य, चंद्रभागेचे स्नान यामुळे बाबांवरील अध्यात्माचा पगडा अधिकाधिक घट्ट होत गेला. रामदासबाबांनी कैकाडी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या २१ व्या वर्षापासून कीर्तन-प्रवचन करण्यात सुरुवात केली.


रामदासबाबांच्या कीर्तनावर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, गाडगे महाराजांच्या विचारांचा मोठा पगडा असल्याचे दिसून येते. वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असणारे भेदाभेद, अमंगळ या वृत्तीचा परिचय कीर्तनातून करुन दिला. मनमाड शहरात १९६८च्या आसपास शिवाजी चौकात त्यांनी आपले पहिले कीर्तन केले. रसाळ वाणीने प्रभावित होऊन संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना आमंत्रणे येऊ लागली,१९७२च्या दुष्काळात रामदास बाबांना स्वस्थ बसणे शक्यच नव्हते, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला, जनतेचे प्रबोधन केले, जास्तीत जास्त लोकांना या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी होईल ती सर्व मदत केली. १९७८ ला संत कैकाडी महाराजांचे निधन झाल्यावर ‘मानवांनो, माणुसकीला जागा’ या कैकाडी महाराजांच्या विचाराचा प्रसार करुन संतांचे मूळ विचार रुजविणे व देवा-धर्माच्या नावावर चाललेली फसवणूक थांबविण्यासाठी सुमारे ५० वर्षे जनजागृती केली.

नाशिक ते पंढरपूर अशी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सुरू केलेली दिंडी मनमाड मार्गे जात असे. पाच ते सहा वर्षे नाशिक येथून दिंडी काढल्यावर पुढे मनमाड येथून १९८० नंतर निघण्यास सुरुवात झाली. दिंडी २०-२२ दिवसांत पंढरपुरात जाऊन पोहोचत असे. गेली ४०वर्षे न चुकता अव्याहतपणे दिंडी सुरू आहे.१९८४ मध्ये रामदास बाबांनी मनमाड येथे सर्वधर्मपरिषद व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. मनमाडच्या इतिहासात झालेला हा सर्वात मोठा धार्मिक सोहळा समजला जातो. यात शंकराचार्य, धुंडा महाराज देगलूरकर, तनपुरे महाराज, जनार्दन स्वामी, भदंत आनंद कौसल्यायन, उमा भारती, बाबा अजबसिंग यासह ख्रिश्चन व मुस्लीम धर्माचे धर्मगुरू व श्रीकृष्णाच्या भूमिकेने अजरामर झालेले शाहू मोडक सहभागी झाले होते. रामदास बाबांनी देव-भक्त ऐक्य सोहळा आयोजित करुन पंढरपूर ते देहू वारीचे आयोजन करत असत. वारी देहूला तुकाराम बीजेच्या दिवशी दाखल होत असे. देहूत संत कैकाडी महाराज संत साहित्य पुरस्कार देण्याची प्रथा रामदास बाबांनी सुरू केली. प्रा. रतनलाल सोनग्रा, तुकारामांच्या गाथेचे इंग्रजीत भाषांतर करणारे दिलीप चित्रे आदी पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. त्यांनी लाखो गाथा भाविकांना मोफत वाटल्या आहेत.

बाबा पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई ट्रस्टचे १८ वर्षे विश्वस्त होते. एक वर्ष त्यांनी अध्यक्ष म्हणून काम बघितले. त्यांनी मंदिराच्या आर्थिक व्यवहारात शिस्त लावण्याबरोबरच वारकर्‍यांना जलद व सुलभ दर्शन कसे होईल, याकडे विशेष लक्ष दिले. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज बघितले होते. त्यांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, विखे-पाटील फाऊंडेशनचा पुरस्कार यासह अनेक मान-सन्मान लाभले होते. त्यांचे मनमाड शहरावर विशेष प्रेम होते. येथे त्यांचा मोठा मित्र परिवार होता. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी ही मैत्री टिकवून ठेवली. दर दोन-तीन महिन्यांनी मित्रांना भेटण्यासाठी ते मनमाडला येत असत, कोरोना संक्रमण सुरू होण्याआधी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी दिलेली मनमाडची भेट ही शेवटची ठरली. आपल्या कर्तृत्वाने आध्यात्मिक क्षेत्रात व वारकरी संप्रदायात मनमाडचे नाव उज्ज्वल करणार्‍या या भूमिपुत्रास, आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण आदरांजली.


- हर्षद गद्रे
@@AUTHORINFO_V1@@