राजमत वि. जनमत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2020   
Total Views |

JP_1  H x W: 0



रविवारी मतदानाच्या निकालानंतर मात्र मुस्लीमबहुल किर्गिझस्तानमध्ये लोकं रस्त्यावर उतरली. आधीच आर्मेनिया आणि अझरबैजानच्या संघर्षामुळे पूर्व युरोपातले वातावरण तापले असताना, मध्य आशियातील किर्गिझस्तान मध्ये पेटलेल्या जनआक्रोशाच्या ठिणगीने बघता बघता वणव्याचे स्वरूप धारण केले आणि आता या देशात निवडणुकांचे निकाल रद्द करण्याच्या मागणीने अधिकच जोेर धरलेला दिसतो.



जगाच्या पाठीवर कुठल्याही कोपर्‍यातल्या निवडणुकांनंतर नाराजीचा सूर हा उमटतोच. आपल्याकडे निवडणुकीतील यशापयशाचे खापर ‘इव्हीएम’वर फोडले गेले, तर अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाचे पुतिन यांना ट्रम्प यांच्या विजयाचे शिल्पकार ठरविण्यात आले. शेजारी पाकिस्तानात तर सैन्याने त्यांच्या मर्जीतला माणूस पंतप्रधानपदी बसवला. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात निवडणुका आणि त्यानंतरचे निकाल यावरून सदैव दोन गट पडलेले पाहायला मिळतात. सध्या असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे ते किर्गिझस्तानमध्ये. किर्गिझस्तान असो, अथवा मध्य आशियातील सोव्हिएत साम्राज्यातून स्वतंत्र झालेले देश, ते फारसे कधीही चर्चेत नसतात. पण, रविवारी मतदानाच्या निकालानंतर मात्र मुस्लीमबहुल किर्गिझस्तानमध्ये लोकं रस्त्यावर उतरली. आधीच आर्मेनिया आणि अझरबैजानच्या संघर्षामुळे पूर्व युरोपातले वातावरण तापले असताना, मध्य आशियातील किर्गिझस्तान मध्ये पेटलेल्या जनआक्रोशाच्या ठिणगीने बघता बघता वणव्याचे स्वरूप धारण केले आणि आता या देशात निवडणुकांचे निकाल रद्द करण्याच्या मागणीने अधिकच जोेर धरलेला दिसतो.

किर्गिझस्तान हा तसा चहुबाजूंनी इतर देशांनी वेढलेला देश. उत्तरेला भलामोठा कझाकस्तान, पश्चिमेला उझबेकिस्तान, पूर्वेला चीन आणि दक्षिणेला ताजिकिस्तान. १९९१ साली सोव्हिएत संघातून स्वतंत्र झाल्यानंतर इतर त्याच पठडीतल्या देशांप्रमाणे किर्गिझस्तानमध्येही रशियाचा प्रभाव राजकारणापासून ते जीवनशैलीवर अजूनही कायम आहे. आजही या देशात रशियन भाषा सर्वाधिक बोलली जाते, यावरून रशियाच्या पाऊलखुणांचा अंदाज यावा. त्याचप्रमाणे यापूर्वीचे किर्गिझस्तानचे राज्यकर्तेही रशियाच्या छत्रछायेखालीच मोठे झाले. पण, भ्रष्टाचार आणि सामान्य जनतेच्या आशा-अपेक्षांना दाखवलेली केराची टोपली यामुळे २००५ आणि २०१० सालीही किर्गिझस्तानमध्ये जनतेने तख्तपालट केला. त्यानंतर पुढील दहा वर्षे जवळपास शांततेत गेली असताना, किर्गिझस्तानमध्ये आता पुन्हा एकदा राजकीय असंतोष उफाळून आलेला दिसतो.



किर्गिझस्तान हा संसदीय लोकशाही तत्त्वावर चालणारा देश. ९०टक्के लोकसंख्या सुन्नी मुसलमानांची असूनही हा देश नुसता ‘रिपब्लिक’ आहे, ‘इस्लामिक रिपब्लिक’ नाही. निवडणुकांनंतर रविवारी समोर आलेल्या निकालानुसार राष्ट्राध्यक्ष सुरनबे जीनबेकोव यांच्या मर्जीतील तीन पक्षांना आणि विरोधातील केवळ एकाच पक्षाला संसदेतील बहुतांश जागा मिळाल्या. त्यामुळे एकूण १६ पैकी १२ विरोधी पक्षांनी या निवडणुकीचा निकाल मान्य करण्यास साफ नकार दिला. एवढेच नाही तर मतदान प्रक्रिया सदोष असून मतांची खरेदी करण्यात आली, मतदारांना धमकावण्यात आल्याचेही आरोप विरोधकांनी केले. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निकाल रद्दबातल ठरवण्याचीही मागणी विरोधकांनी केली. याच मागणीसाठी शांततेत निघालेल्या जनमोर्चाने आक्रमक रूप धारण केले आणि हजारो लोक चक्क संसदेत घुसले. त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या दालनात घुसूनही कागदपत्रे बाहेर फेकली. इतकेच नव्हे तर, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ११ वर्षांची शिक्षा भोगणार्‍या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष अलमाजबेक अतमबयेव यांना राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या इमारतीतून आंदोलकांनी मुक्त केले. खरं तर माजी राष्ट्राध्यक्ष अतमबयेव आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जीनबेकोव यांची घनिष्ठ मैत्री होती. पण, २०१७साली जेव्हा जीनबेकोव राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले, तेव्हापासून दोघांच्या संबंधात मिठाचा खडा पडला आणि त्याची परिणती पुढे अतमबेयव यांच्या कैदेतच झाली.


किर्गिझस्तानच्या राजधानी बिश्केकमध्ये असाच राजमत विरुद्ध जनमताचा भडका उडालेला असून रशिया आणि इतर देशांनीही किर्गिझस्तानला चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. कारण, आंदोलक आणि पोलिसांच्या झटापटीत ६०० हून अधिक लोक जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यूदेखील झाला आहे. आधीच कोरोनामुळे किर्गिझस्तानमध्येही परिस्थिती बिकट असताना, या आंदोलनाच्या वणव्याने वातावरण अधिकच तापले आहे. दुकानदारांनीही संभाव्य लुटीचे प्रयत्न लक्षात घेता, दुकाने बंद ठेवली आहेत. राजधानीतला सरकारविरोधी संघर्ष इतरही शहरांत पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेव्हा, आगामी काळात किर्गिझस्तानमध्ये एका दशकानंतर राजमत उलथवून जनमतातून पुन्हा सत्तांतर होते का, ते पाहावे लागेल.
@@AUTHORINFO_V1@@