ही ‘दादागिरी’ योग्यच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2020
Total Views |

saurabh ganguly_1 &n



अलीकडेच समाजमाध्यमांवर उद्भवलेल्या एका वादाच्या प्रसंगावर भाष्य करताना सौरव गांगुली याने केलेली ही दादागिरी चांगलीच चर्चेत राहिली. दादागिरी करत गांगुलीने आपल्या टीकाकारांना चांगलेच सुनावले.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली हा संपूर्ण क्रिकेट विश्वात ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘बंगाल टायगर्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गांगुलीचा क्रिकेट विश्वात एक वेगळाच दबदबा आहे. गांगुलीची कार्यपद्धती ‘दादागिरी’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असून त्याच्या या अनोख्या पद्धतीची जगभरात प्रशंसा केली जाते. अलीकडेच समाजमाध्यमांवर उद्भवलेल्या एका वादाच्या प्रसंगावर भाष्य करताना सौरव गांगुली याने केलेली ही दादागिरी चांगलीच चर्चेत राहिली. दादागिरी करत गांगुलीने आपल्या टीकाकारांना चांगलेच सुनावले. क्रिकेट समीक्षकांनीही सर्व प्रकाराची पडताळणी करत गांगुलीचीच पाठराखण केली. क्रिकेटमधील अनेक जाणकारांनी ही ‘दादागिरी’ योग्यच असल्याचे म्हटले. ‘आयपीएल’मधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असणारा मूळचा मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यरने एका मुलाखतीदरम्यान संघाच्या विजयाबद्दल सांगताना सौरव गांगुलीच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाल्याचे विधान केले. ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी असतानाही गांगुली एका संघाच्या खेळाडूला मार्गदर्शन कसे काय करू शकतो, याबद्दल समाजमाध्यमांमध्ये अनेक नेटिझन्सनी टीका करण्यास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमाचेही उल्लंघन करण्यात आल्याच्या मुद्द्यावरही अनेकांनी बोट ठेवले. मात्र, यावरून गदारोळ माजण्यास सुरुवात होताच ‘बंगाल टायगर’ने डरकाळी फोडली. दादाने दादागिरी सुरू करताच हे वादळ अवघ्या काही क्षणांत शमले. दादा म्हणाला, “श्रेयसच काय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने जरी माझ्याकडे मदत मागितली, तरी मी करू शकतो. मी भारतासाठी जवळपास ५०० सामने खेळलो आहे. त्यामुळे मी ज्युनिअर खेळाडूंशी बोलून त्यांना मदत करूच शकतो. मी श्रेयसला मागच्या वर्षी मदत केली होती. त्यावेळी दिल्लीच्या संघाचा टिम मेंटॉर होतो. मात्र, मी आता ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष आहे हे खरं आहे. पण, हे विसरून चालता येणार नाही. श्रेयसला मदत ही गेल्या वर्षी करण्यात आली होती; आता नव्हे, हे आधी टीकाकारांनी लक्षात घ्यावे,” असे दादाने खडसावताच सर्व जण गप्प बसले. गांगुलीने वेळीच याबाबत खुलासा केला नसता, तर हे प्रकरण आणखीन वाढीस लागण्याची शक्यता होती. त्यामुळे गांगुलीची ही ‘दादागिरी’ योग्यच, असे अनेक समीक्षकांना वाटते.


नियमभंग नाहीच!


सौरव गांगुलीच्या स्पष्टीकरणानंतर ‘दिल्ली कॅपिटल्स’ संघाचा कर्णधार आणि एक जबाबदार खेळाडू म्हणून श्रेयस अय्यरनेही याप्रकरणाबद्दल आपली बाजू सर्वांसमक्ष मांडण्याचे धाडस दाखवले. “गांगुली यांनी गेल्या वर्षी ‘आयपीएल’दरम्यान केलेल्या मार्गदर्शनाबाबत खरे तर मी म्हणालो होतो. काही जणांनी माझ्या विधानांचा विपर्यास केला. त्यामुळेच नव्या वादाला तोंड फुटले,” असा खुलासा श्रेयसने केला. मात्र, या सर्व प्रकारावर क्रीडा समीक्षकांनी प्रकाश टाकलेल्या काही बाबींवर अभ्यास होणे गरजेचे आहे. समीक्षकांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाने सुचविलेल्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या शिफारशीचे स्वागत करणे गरजेचे आहे. मात्र, एक अनुभवी खेळाडू म्हणून कनिष्ठ खेळाडूला मार्गदर्शन करणे यात काही गैर नाही. कनिष्ठ खेळाडूला मार्गदर्शन करताना कोणतेही दुसरे पद स्वीकारण्यात आलेले नाही. त्यामुळे टीकाकारांनी आधी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक होते. भारताचे माजी कर्णधार कपिल देव, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, लिटल-मास्टर सुनील गावस्कर, राहुल द्रविड यांसारखे अनेक दिग्गज खेळाडू अनेकदा कनिष्ठ खेळाडूंना मार्गदर्शन करतात. सचिन तेंडुलकर हा ‘आयपीएल’मधील मुंबई इंडियन्स संघाच्या उपाध्यक्षपदी आहे. मात्र, ‘आयपीएल’मधील ‘मुंबई विरुद्ध बंगळुरू’ या सामन्याच्या लढतीदरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली अनेकदा सचिनशी सल्लामसलत करतानाचे चित्र पाहायला मिळते. केवळ कोहलीच नव्हे, तर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि इतर काही परदेशी खेळाडूदेखील सचिनशी चर्चा करतात. सचिनसारख्या दिग्गज आणि अनुभवी खेळाडूकडून मार्गदर्शन मिळवणे यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. एक अनुभवी खेळाडू म्हणूनच कनिष्ठांना मार्गदर्शन केले जाते. मात्र, याचा हा अर्थ होत नाही की, ते त्यांनी नियमांचे उल्लंघन केले. एका पदावर विराजमान असताना अन्य पद स्वीकारणे हे नियमबाह्य आहे. मात्र, असे केले नसतानाही केवळ मार्गदर्शन केल्यामुळे एखाद्या बड्या पदाधिकार्‍यावर नियमभंग केल्याच्या आरोपांचा ठपका ठेवणे म्हणजे हे नेटिझन्सचे वागणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांचे आहे. यासाठी नेटिझन्सनी संयम बाळगणे गरजेचे असल्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.


- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@