‘वणवा’मुक्त कोकणाच्या दिशेने....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2020
Total Views |
forest fire _1  

 

 
निसर्गाला लागलेला शाप म्हणजे जंगलात लागणारे ‘वणवे.’ या वणव्यांमुळे निसर्ग?संपत्तीचा र्‍हास तर होतोच. मात्र, कित्येकदा सामाजिक घडीदेखील विस्कटते. कोकणातही वणव्यांची समस्या गंभीर असून त्यावर ऊहापोह करणारा लेख...

 
 
संगमेश्वर (प्रतीक मोरे) - हस्ताचे नक्षत्र म्हणजे गडगडणारा पाऊस झाला की, मान्सून परतीला लागतो. पावसाळ्यात अमृततुल्य पाणी पिऊन बहरलेली वनराई हळूहळू आपला पर्णसंभार त्यागण्याची तयारी करू लागते. पानझडी वने, निम सदाहरित जंगले आणि माळरानावर वाढलेले गवत सगळचे हळूहळू शुष्क होऊ लागते. ऋतुचक्रातील हे बदल दिवसागणिक वाढतच जातात. मग कधी कुठून पडलेली वीज किंवा फांद्या घासल्याने पडलेल्या ठिणग्या अशा कारणांमुळे सुकलेली पाने-गवत पेट घेते आणि वणवा लागतो.
 
 
नैसर्गिकरित्या वणवे लागण्याची प्रक्रिया ही निसर्गाचा एक घटक आहे. अगदी गुहेत राहणार्‍या आदिमानवसुद्धा संरक्षण आणि अन्न मिळावे म्हणून आगीचा वापर करत असल्याचे इतिहासात पाहायला मिळते. उन्हाळ्याची सुरुवात आणि वणवे यांचे नाते घट्ट विणलेले आहे. परंतु, विस्तीर्ण जंगलात लागणार्‍या वणाव्यांची कारणे शोधणे ही तितकेच अवघड. अशा वणव्यांचे प्रमाण ही १५ ते २० टक्के म्हणजेच अतिशय कमी. मात्र, खर्‍या अर्थाने नुकसानदायक ठरणारे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पाडून हजारो एकर गिळंकृत करणारे वणवे गेल्या काही वर्षात जगभर पाहायला मिळत आहेत. अ‍ॅमेझॉनचे जंगल, ऑस्ट्रेलिया आणि अलीकडे उत्तराखंड मधला अग्निप्रलय या वणाव्यांकडे एक पर्यावरणीय समस्या म्हणून बघायला भाग पाडत आहे. त्या अनुषंगाने या समस्येवर आता सारासार विचार करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
 
 
 
निसर्ग हा खर तर दानशूर. आपल्या सढळ हस्ते सर्व प्राणिमात्रांना तो जमेल तेवढे देतच आला आहे. परंतु, काही अविचारी प्रवृत्ती या वेळोवेळी ओरबाडण्याच्या अपेक्षेतून आगी लावतात आणि या आगी पसरून वणव्यांचे उग्र रूप धारण करतात. मानवनिर्मित वणव्यांचे प्रमाण एकूण आगीच्या ७० ते ८० टक्के असल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही वर्षांत या वणव्यांनी केलेली अर्थ आणि पर्यावरण हानीचे मूल्यमापन करणे ही तितकेच अवघड आहे. एका अभ्यासानुसार २०१६ मध्ये उत्तराखंडमध्ये लागलेल्या आगीच्या भक्षस्थानी ८,६०० एकरच्या आसपास वन आणि जंगल संपत्ती पडल्याचा अंदाज आहे. या वनांमध्ये राहणारे जीव, कीटक अनेक दुर्मीळ वनस्पती आणि जैवविविधता यांचे मूल्यमापन करणे तर अशक्यच.महाराष्ट्रातसुद्धा याहून वेगळी परिस्थिती नाही. तेंदुपत्ता काढणी झाली की, जुनी पाने जळून नवीन पालवी फुटावी यासाठी जंगलांमध्ये आग लावली जाते. कधी जंगलात मोकळ्या जागा तयार होण्यासाठी तर, कधी नाचणी, वरीच्या पिकांसाठी उभे डोंगर जाळले जातात. जुना चारा जाळला की नवीन येणारा चारा हा चांगल्या प्रतीचा असतो असाच एक समज आहे. यातून अनेक ठिकाणी वणवे लागण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. आधीच शुष्क मौसम आणि जोरदार वारे या आगीचा डोंब उसळवून त्याचे वणव्यात रूपांतर करतात आणि मग असे वणवे काही दिवस धुमसत राहतात.
 
 
 
कोकणात तर ‘कुठे ना कुठे, रोज एक वणवा’ अशी भयावह स्थिती आहे. हा वणवा एकदा पेटला की, परिसरातील जंगल अगदी महिनाभरसुद्धा जळत राहू शकते. या वणव्यांनी उजाडणार्‍या डोंगरांमुळे सर्वत्र निसर्ग सौंदर्याला, हिरवळीला हानी पोहोचून जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आदी अनेकांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. औषधी वनस्पतीही नामशेष झाल्या आहेत. कोकणात डोंगर-उतारावर वाढलेले गवत कापण्याचे कामी कोणी स्वारस्य दाखवत नाही. परिणामी विविध जनावरांसाठी उपयोगी असलेले गवत आज वणव्यांसाठी मुख्य कारण ठरते आहे. जंगलातून जाणार्‍या महावितरणच्या दोन विद्युत वाहिन्यांमधील दाब मोठया प्रमाणात वाढून शॉर्टसर्किट होतात. त्यांच्या ठिणग्यातून गवताने पेट घेतल्याने, कळत-नकळत वा एखाद्याचे नुकसान करण्याच्या हेतूने, वैयक्तिक हितासाठी लावण्यात येणारे वणवे, गावागावातून आडवाटेने जाणारे मद्यपींची सिगारेट आणि विडीचा झुरका घेऊन ती तशीच फेकून देण्याची प्रवृत्ती, सुक्या गवतावर ही विडी-सिगारेट पडल्याने लागणारे वणवे सारे प्रकार भयावह आहेत. त्यांचे प्रमाण सर्वदूर प्रचंड आहे. काही वनस्पती वणवा लागून गेलेल्या जमिनीत अधिक जोमाने वाढतात असे काही समज या मानसिकतेमागे आहेत. तरी चोरटी जंगलतोड, जंगलमाफियांकडूनही हेतूपुरस्सर जंगलांना आगी लावणे, प्राण्यांची शिकार ही यामागील प्रमुख कारणे सांगितली जातात.
 
 
 
थंडी संपून उन्हाळा वाढू लागला की, कोकणातला वणव्यांचा प्रश्न प्रतिवर्षी ज्वलंत बनू लागतो. तरुणांनी धरलेला मुंबईचा रस्ता, दिवसेंदिवस पडिक राहणारी जमीन, त्या जमिनीत प्रतिवर्षी वाढणारे गवत आणि ते नष्ट करण्याच्या निमित्ताने लावले जाणारे वणवे हे अद्यापी एक न सुटणारे दुष्टचक्र बनून राहिले आहे .मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून किंवा कोकणातील अंतर्गत रस्त्यांवरून डिसेंबर ते एप्रिल प्रवास करताना हमखास ठिकठिकाणी वणवे पेटले असतानाची दृश्ये पाहावयाला मिळतात. कोकणात भातशेतीच्या भाजणीसाठी विविध झाडांच्या सुक्या फांद्या तोडून त्या जमवून पेटविल्या जातात. पूर्वी हे करीत असताना आग शेजारच्या जंगलात पसरू नये, याची काळजी घेतली जाई. यातूनसुद्धा अनेक वेळा वणवे लागल्याच्या घटना घडलेल्या पाहायला मिळतात. पोटापुरती भातशेती करणे परवडणासे झाल्यामुळे कोकणातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आंबा काजू लागवड करू लागल्याचे मधल्या काळात दिसून येत होते. त्यात त्यांना यश येऊ लागले आहे असे वाटावे, तोपर्यंत वणव्यांनी त्या बागेचा कोळसा झालेला पाहण्याची नामुष्की अनेकांवर आली आहे. ज्यातून ‘नको ती शेती’ हाच विचार बळकट बनत असल्याचे चित्र कोकणात तयार होत आहे.
 
 
 
 
दरम्यान, सततच्या वणव्यांमुळे पाळीव जनावरांना एकेकाळी जंगलात सहज उपलब्ध होणारा भरपूर चारा आता मिळेनासा झाला आहे. पशुपालन करून उदरनिर्वाह करणार्‍यांची साधनेही नष्ट होत चालली आहेत. सरपटणारे प्राणीही नष्ट होत चालले आहेत. पक्ष्यांना गवतावरील किडे, बीज खाण्यास मिळत नसल्यामुळे हे पक्षी स्थलांतरित होत आहेत. मृत्युमुखी पडत आहेत. विविध पक्ष्यांचा हिवाळ्यात प्रजनन काळ असतो. नेमके याच दिवसात वणवे पेटविल्यामुळे पक्ष्यांची अंडी, पिल्लेही जळून जातात. त्यामुळे त्यांची संख्याही रोडावत चालली आहे. विंचू,सरडे,फुरसे, मण्यार, घोणस इत्यादी अनेक विषारी साप जंगलातील दगड, झुडपे यांच्या आश्रयालाच अंडी घालून पिल्लांना जन्म देत असतात. मात्र, वणव्यांमुळे सापांची संख्या व प्रजाती नष्ट होत आहेत. भारतीय वन सर्वेक्षणाच्या (एफएसआय) अहवालानुसार देशात सर्वाधिक वणवे लागणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या दहात आहे. वन विभागाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ हेसुद्धा जंगलात वणवे भडकण्याचे मोठे कारण असल्याचे आढळून आले आहे.
 
 
 
निसर्गाचा समतोल ढासळवणारे हे वणवे रोखणे मात्र आपल्याच हातात आहे. त्याकरिता विविध स्तरांवर जनजागृती करणे गरजेची आहे. सरकारने आणि विविध संस्थांनी ‘वणवा मुक्त गाव योजना’ अशा स्वरूपाचा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. ‘आमचा गाव, वणवामुक्त गाव’ अंतर्गत गावात फलक जागृती, स्वतंत्र ग्रामसभा, त्यात वणवा रोखणे, वृक्षवल्ली अभियान, वृक्षसंवर्धन याबाबत मार्गदर्शन, त्यासाठी कृतीदल स्थापना, स्थानिक युवकांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण, वणवाविरोधी पथक आदी विविध पर्याय वापरले जायला हवेत. प्रसंगी कायद्याचा, विधायक कामासाठी ळाचा वापर करून ‘वणवा’ संस्कृतीचा कायमचा बंदोस्त करीत हे वणवे रोखायलाच हवेत, ज्यातून वर्तमान प्रदूषित वातावरणात सर्वानाच मोकळा श्वास घेता येईल आणि आपले कोकण खर्‍या अर्थाने वणवामुक्त कोकण होईल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@