जगा आणि जगू द्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2020
Total Views |

lekhmala_1  H x


आपण दुसर्‍याच्या आयुष्यात जास्तच भावूक होऊन गुंतले जात असू तर पहिला प्रांजळ प्रश्न आपण स्वत:ला विचारायला पाहिजे. तो म्हणजे, ही माझी स्वत:ची समस्या आहे का? जर उत्तर ‘होय’ असेल, तर त्या समस्येची प्रामाणिक जबाबदारी उचलायला पाहिजे आणि उत्तर ‘नाही’ असेल, तर आपण त्यात उगाचच ढवळढवळ न करता स्वतःच्या कामात लक्ष घालावं. दुसर्‍याच्या जीवनात अतिक्रमण करण्याचा हक्क या जगात कुणालाच मिळालेला नाही.


आपल्याला इतर लोकांची काळजी असते, तशीच इतरांनाही आपली काळजी असते. या काळजीपोटी होतेे काय की, बरीच इतर माणसे आपल्या आयुष्यात उगाचच डोकावत राहतात आणि आपणसुद्धा त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करत राहतो. बरेच जण असाही विचार करतात की, स्वत: जगा आणि दुसर्‍यांनाही जगू द्या. याचा अर्थ असा की, आयुष्यात जसे जसे अवघड प्रसंग येतील, तसतसे त्यांना स्वीकारा, सोडवा आणि उगाचच उद्या काय होईल, याची चिंता करत बसू नका. अर्थात, काही लोकांसाठी याचा अर्थ असाही होतो की, आयुष्याकडे एक गुंतागुंत म्हणून पाहत न बसता, थोडं आरामात पाहा, थोडं आनंदात पाहायला शिका. यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी अभिप्रेत आहेत. त्या म्हणजे, आपल्या आयुष्यात येणारे प्रसंग आणि माणसं. प्रसंगांपेक्षा अधिक वेळा आपण माणसांबरोबर कसे वागतो, हे अधिक महत्त्वाचे. या माणसांबरोबर आपलं जवळचे नाते असेल वा दूरचे नाते असेल, पण आपण यामधलं अंतर कसं पार करतो, हे खूप महत्त्वाचे आहे. मुळात या सगळ्या नात्यांचा आपण आदर करायला हवा. त्यांनीही आपल्या आयुष्यात उगाचच नाक खुपसू नये किंवा तशी संधी शोधू नये, याची आपण विशेष खबरदारी घ्यायला पाहिजे. त्यांनी आपलं आयुष्य कसं जगावं, हे त्यांचं त्यांनी ठरवावं, तसंच आपण आपलं आयुष्य कसं जगावं, हे त्यांनी न ठरवता आपलं आपणच ठरवावं. हे करताना आपल्याला एका लक्ष्मणरेषेवरून सांभाळून चालायला लागतं. ही लक्ष्मणरेषा जर आपण ओलांडली, तर आपल्या या नात्यांमध्ये प्रचंड भूकंप घडू शकतो. आपलं भावनिक विश्व ढवळून निघतं. खरंतर विचित्र गोष्ट ही आहे की, आपण इतरांना मदत करण्यासाठी वा त्यांचं भलं करण्यासाठी ती लक्ष्मणरेषा पार करतो. आपला इरादा चांगलाच असतो, पण आपल्या नकळत त्यांना मदत न करता त्यांचे नुकसानच करतो. आपल्याला काही मर्यादा पाळणं आवश्यक आहे.


आपण दुसर्‍यांना मदत करण्यात खूपच गुंतलो तर त्याच्या आयुष्यात आपण घुसखोरीच करतो. अगदी एक साधं महत्त्वाचं उदाहरण पाहा ना, एखाद्या स्त्रीचं तिच्या नवर्‍याशी काही कारणासाठी जमत नाही, तर तिला आपणं तिच्या नवर्‍याने तिच्याशी कसे वागायला पाहिजे, {तने तिच्या नवर्‍याशी कसे वागायला पाहिजे, याची नियमावलीच बनवतो. याही पुढे जाऊन तिने घटस्फोट घ्यावा की नाही, याबद्दल सल्ले घ्यायला लागतो. मग आपणही त्यांच्या संभाषणांमध्ये येतो. दैनंदिन जीवनात नको तेवढी ढवळाढवळ करतो. त्यामुळे आपण त्या दोघांचेही नैतिक खच्चीकरण तर करतोच, पण तेसुद्धा आपला तिरस्कार करु लागतात. खरंतर त्यांना असे सल्ले नको असतात. त्यांना एक भावनिक आणि नैतिक आधार हवा असतो. महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर आपण दुसर्‍यांना मदत करायची ठरवले तर ती त्यांना आणखी समस्या निर्माण न करता करायला पाहिजे. ती मदत दिशा दाखवणारी वा मार्गदर्शन करणारी असायला पाहिजे. आपण दुसर्‍याच्या आयुष्यात जास्तच भावूक होऊन गुंतले जात असू तर पहिला प्रांजळ प्रश्न आपण स्वत:ला विचारायला पाहिजे. तो म्हणजे, ही माझी स्वत:ची समस्या आहे का? जर उत्तर ‘होय’ असेल, तर त्या समस्येची प्रामाणिक जबाबदारी उचलायला पाहिजे आणि उत्तर ‘नाही’ असेल, तर आपण त्यात उगाचच ढवळढवळ न करता स्वतःच्या कामात लक्ष घालावं. दुसर्‍याच्या जीवनात अतिक्रमण करण्याचा हक्क या जगात कुणालाच मिळालेला नाही.


आपल्या नात्यामध्ये मैत्रीमध्ये वा अधिकारांमध्ये आपण अतिक्रमण करुच नये. आपण कधी कधी हक्काने वा अतिप्रेमाने वा माणुसकीच्या नात्याने दुसर्‍याच्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेतो, पण तो कधी कधी आपला अंहकार तरी असतो किंवा चुकीचा निर्णयसुद्धा असू शकतो. आपण असं गृहित का धरतो की, आपलं एखाद्याशी नातं आहे म्हणून त्याच्या जीवनात आपण ढवळाढवळ करु शकतो. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांचे शुभ चिंतितो, त्यांच्या आयुष्यात भयकर समस्या येऊ शकतात. पण, कदाचित त्यात तुम्ही शिरायला पाहिजे याची गरज नाही. लोकांना जे पटतं, जे रुचतं तेच ते करतात. त्यांना चांगलं काही सुचवून पाहावं, पण त्यांच्या आयुष्याचा लगाम आपल्या हातात घेणे उचित नाही. आपल्याला पटत नसलं तरी लोकांनी आपल्या आयुष्यात काय करावं, समस्यांचे निराकरण कसे करावे, हा त्यांचा अधिकार आहे, हे आपल्याला शांतपणे स्वीकारणं आवश्यक आहे. जेव्हा जरुरी आहे तेव्हा मदतीचा हात देणं उत्तम; पणं लोकांच्या आयुष्याचे त्यांना पटत नसेल तरी नियोजन करणे उचित नाही. ते निष्फळ ठरते. त्यातून विधायक काहीच निष्पन्न होत नाही. म्हणून शक्य तो आपण जगावे व दुसर्‍यालाही जगू द्यावे. हे शहाणपणाचे ठरेल.

- डाॅ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@