समाजशील अर्थनीतीचा संकल्प हेच ध्येय!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2020   
Total Views |

mansa_1  H x W:


डॉ. सुमिता नाईक-सुब्रह्मण्यम यांनी अर्थशास्त्रातील विविध आयामांत संशोधन करताना समाजशीलताही जपली आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...


“कोरोनामुळे जगभरात कितीतरी संपन्न देशांची अर्थव्यवस्था कोलमडून गेली. लोकांची अन्नान्न दशा झाली. पण, अर्थशास्त्राची अभ्यासक म्हणून मला वाटते, आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीचे अभिनंदनच करायला हवे. त्यातही केंद्र सरकारचे कारण त्यांनी अत्यंज स्तरातील व्यक्तींना आगाऊ राशन वितरणाचा निर्णय घेतला. त्यामुळे हातावरती पोट असणार्‍या लोकांची उपासमार फार मोठ्या प्रमाणात टळली. तीच बाब जन-धन योजनेअंतर्गत ५०० रुपयांचे वितरण करण्याची. या दोन्ही गोष्टींचे स्वरूप तसे लहान वाटते. पण, अर्थशास्त्रीय परीक्षेपात या गोष्टींनी ‘लॉकडाऊन’मध्ये लोकांना जगण्याचा मार्ग दिला. याचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदीजींना आणि आत्मनिर्भर संकल्पनेला जाते,” डॉ. सुमिता नाईक-सुब्रह्मण्यम सांगत होत्या.

डॉ. सुमिता या ताडदेव येथील ‘एन. एस. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स महाविद्यालय’मध्ये वाणिज्य शाखेच्या साहाय्यक प्राध्यापिका आहेत. त्यांनी बँकिंग क्षेत्राचा विषय घेऊन पीएच.डी केली आहे. ‘समाजजीवनातील, पर्यावरणातील अर्थशास्त्र’ या विषयावर त्यांनी शेकडो आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठातील अनेक सामाजिक, आर्थिक संशोधन उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. २००७ साल होते, त्यावेळी मुंबईमध्ये संघटितपणे घरफोडी, लुटालूट, दरोडे टाकणारी टोळी सक्रिय होती. एका रात्री सुमिता यांना कसला तरी मोठा आवाज झाला. सुमिता आणि सुब्रह्मण्यम दोघेही बेडरूममधून बाहेर हॉलमध्ये आले तर पाहिले की, त्यांच्या घराचा मोठा भक्कम गेट आणि दरवाजाच गायब आहे. इतक्यात सात-आठ जण रॉड तलवारी आणि कसली कसली हत्यारे घेऊन त्यांना मारहाण करू लागले. सुब्रह्मण्यम आणि सुमिता यांनी दोघांनीही समारेच्यांच्या हातचे हत्यार हिसकावून घेतले आणि दोघे जण त्या सात-आठ जणांशी लढू लागले. सुमिता यांनी लेकीला ओरडून आवाज दिला आणि सांगितले दरवाजा उघडू नकोस, ‘१००’ नंबर डायल कर. त्यांच्या छोट्या बेबीने तसे केले आणि पेट्रोलिंगला आलेले पेालीस सुमिताच्या घरापर्यंत पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोर पळून गेले. सुमिता आणि सुब्रह्मण्यम गंभीर जखमी झाले होते. पण, सुमिता आणि सुब्रह्मण्यम यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आणि ते दरोडेखोर उस्मानाबादमधून पकडले गेले. डॉ. सुमिता आणि सुब्रह्मण्यम यांच्या शौर्याबद्दल त्यांना खूप सारे सन्मानही मिळाले.


डॉ. सुमिता या निडर, तर खरेच मागे वळून पाहताना त्यांच्या निडरतेचे श्रेय त्यांच्या आई शोभा नाईक यांनाच जाते. गुरुनाथ आणि शोभा नाईक हे मूळचे गोव्याचे. कामानिमित्त गुरुनाथ मुंबईत अंधेरी येथे राहू लागले. कामानिमित्त ते बाहेरगावीच असत. या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा. शोभा यांनी मुलांना अतिशय उत्तम संस्कार दिले. शोभा यांना फक्त कोकणी भाषा यायची. अल्पशिक्षण, स्थानिक भाषेची तितकी समज नाही, पतीदेव कामानिमित्त नेहमीच बाहेर. पण, अशा परिस्थितीत शोभा हिमतीने मुलांना वाढवत होत्या. त्यांची छोटी मुलगी पोलिओबाधित होती. 80चे दशक होते ते. शोभा यांनी मुलीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तीन महिने मुलगी रुग्णालयामध्ये होती. घरचे आटपून शोभा हॉस्पिटलमध्ये जायच्या. कूपर हॉस्पिटलमध्ये एक नातेवाईक हेड नर्स होती. त्या मदत करायच्या. पुढे शोभा यांनी मुलीची सेवा केली. आज ती मुलगी फॅशन डिझायनर आहे. अल्पशिक्षित आणि बाहेरच्या जगाचा तसा गंध नसलेल्या शोभांचे हे जगणे सुमिता यांनी अनुभवले होते. त्यामुळे आईची कष्टाळू वृत्ती, निर्णयक्षमता, जिद्द आणि निडरता सुमिता यांच्यातही आहेच.

पुढे सुमिता यांचा तामिळ भाषक शंकर सुब्रह्मण्यम यांच्याशी प्रेमविवाह झाला. एमकॉम झालेल्या सुमितांना बँकेत मॅनेजरची नोकरी लागली. पण, पुढे सुमितांना मुलगी झाली. मुलीच्या संगोपनासाठी त्यांनी स्वेच्छेने नोकरी सोडली. मुलगी जरा मोठी झाल्यावर त्या महाविद्यालयात अर्धवेळ शिकवू लागल्या. तेव्हा त्यांना वाटले की, आता वेळ आहे तर आपण पुढील शिक्षण घ्यावे. त्यांनी एमबीए केले, पीएच.डी करू लागल्या. पीएच.डीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना ‘ट्यूब प्रेग्ननन्सी’ हा दुर्धर आजार झाला. या आजारात स्त्रीला कळतच नाही की, ती गरोदर आहे. या आजारामध्ये लवकर निदान झाले नाहीतर ९९ टक्के महिलांचा मृत्यू निश्चित असतो. पीएचडी.चा शेवटचा टप्पा असताना सुमिता आजारी पडल्या, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना २६ -२७टाके पडले. नशीब बलवत्तर म्हणून वाचल्या. पीएचडी.चे सबमिशन काही दिवसांतच होते. त्यांनी हिंमत हारली नाही. मीरारोडहून त्या गोवंडी ‘टिस’मध्ये यायच्या, संशोधन करायच्या, त्यांनी पीएच.डीचे संशोधन पूर्ण केलेच. आज त्या अर्थशास्त्रीय विषयामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. विद्यार्थ्यांत समाजशील आर्थिक संकल्प जागवावा, यासाठी कार्यरत आहेत. डॉ. सुमितासारख्या विदूषी समाजाला भूषणच आहेत. डॉ. सुमिता म्हणतात की, “समाजशील अर्थनीतीचा संकल्प हेच ध्येय आहे!”

@@AUTHORINFO_V1@@