‘डिझेल’च्या भडक्यात इमरान होरपळणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2020   
Total Views |



jagachya pathivr _1 


सध्याचे इमरान खान सरकार उलथून टाकण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी मौलान फजलुर रहमान उर्फ ‘मौलाना डिझेल’ याची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता या डिझेलच्या भडक्यात अगोदरच कमकुवत झालेले इमरान खान होरपळणार का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.


‘अपयशी राष्ट्र’ अशी ओळख असलेल्या पाकिस्तानच्या राजकारणात मुल्ला-मौलवींचे स्थान अतिशय बळकट आहे. कोणताही पक्ष अथवा नेता सत्तेत असला तरीही त्याच्यावर मुल्लामंडळी वर्चस्व ठेवत असतात. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, पाक लष्कर आणि मुल्ला-मौलवी या तीन पायांवरच पाकिस्तानचे नेतृत्व उभे असते. त्यातला सरकारचा चौथा पाय हा नेहमीच कमकुवत असतो. त्यामुळेच आता सध्याचे इमरान खान सरकार उलथून टाकण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी मौलान फजलुर रहमान उर्फ ‘मौलाना डिझेल’ याची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता या डिझेलच्या भडक्यात अगोदरच कमकुवत झालेले इमरान खान होरपळणार का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.पाकिस्तानचे सध्याचे सत्ताधारी हे कमकुवत असून त्यांच्यामुळे देश रसातळाला गेला आहे, त्यामुळे आता देशात सत्ताबदल होणे गरजेचे आहे; अशी हाक देत पाकमधील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा मुस्लीम लीग- नवाझ, बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी), बीएनपीचे प्रमुख सरदार अख्तर मेंगल आणि अन्य लहानमोठ्या ११ पक्षांच्या नेत्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये ‘पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट’ (पीडीएम) या नावाने एक आघाडी तयार केली आहे. त्यामध्ये तूर्तास या आघाडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सर्वांनी मिळून मौलाना डिझेलकडे सोपविली आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचे नाव पुढे केले. मौलाना डिझेलकडे पहिल्या टप्प्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


पाकमधील धार्मिक पक्ष अशी ओळख असलेल्या ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’ या सुन्नी कट्टरपंथी पक्षाचे नेतृत्व मौलाना डिझेल करतो. सुमारे वर्षभरापूर्वी यानेच इमरान खान विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्याचे वडील खैबर पख्तुन्वा प्रांताचे मुख्यमंत्री होते, स्वत: मौलाना डिझेलही पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्षनेता होता. विशेष म्हणजे, पाक संसदेच्या परराष्ट्र आणि काश्मीरविषयक समितीचे प्रमुखपदही त्याने सांभाळले आहे. नवाझ शरीफ सरकारच्या काळात मौलानाला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर २०१८ साली विरोधी पक्षांनी त्याला राष्ट्रपती पदाचाही उमेदवार बनविले होते. कट्टर तालिबान समर्थक असलेला मौलाना स्वत:ला उदारमतवादी म्हणवून घेतो. गतवर्षी मौलानाने इमरान खानने निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केल्याचा आरोप करून जनतेला रस्त्यावर उतरविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्याला यशही आले होते. आता तर ११ राजकीय पक्षांचा पाठिंबा त्याला मिळाला आहे. या महिन्यापासूनच ‘पीडीए’ इमरानविरोधात आंदोलनास प्रारंभ करणार आहे, तीन टप्प्यात होणार्‍या या आंदोलनामध्ये डिसेंबरमध्ये देशभरात ठिकठिकाणी, तर जानेवारी २०२१ मध्ये राजधानी इस्लामाबादमध्ये मोठा मोर्चा काढण्याची योजना आहे.


त्यामुळे अर्थातच इमरान खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘नया पाकिस्तान’ निर्माण करण्याची भाषा करीत सत्तेत आलेल्या इमरान खानचा कमकुवतपणा पहिल्या काही महिन्यांतच अधोरेखित झाला होता. पाकिस्तानला चीनच्या कच्छपी लावण्याचे आणि चीनची एक वसाहत म्हणून पाकिस्तानचे अस्तित्व ठेवणे हे इमरान खानने साधले आहे. पाकिस्तानमध्ये भरमसाठ चिनी गुंतवणूक होत असली तरी त्याची काय किंमत मोजावी लागणार आहे, हे आता पाकिस्तानी जनतेच्या लक्षात यायला लागले आहे. त्यामुळे आता इमरानविरोधात जनमत एकवटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आता गिलगिट-बाल्टिस्तानचे कार्ड खेळण्यास सुरुवात झाली आहे. या प्रदेशास पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून दर्जा देण्याची तयारी चालविली आहे; अर्थात या प्रकारास खुद्द गिलगिट-बाल्टिस्तानमधूनच तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. मौलाना डिझेलनेही त्यास विरोध केला आहे. विशेष म्हणजे, इमरान खान हे सर्व बीजिंगच्या अजेंड्याखाली करीत असल्याचा आरोपही त्याने केला आहे. त्यामुळे सध्या इमरान खान सरकारची अवस्था कोंडीत पकडल्यासारखी झाली आहे. त्यामुळे आता मौलाना डिझेलच्या भडक्यामध्ये इमरान खान नेमकी कशी तग धरणार, यावर पाकिस्तानचे राजकारण अवलंबून आहे.

@@AUTHORINFO_V1@@