‘चांदोबा’चा शिलेदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
K. C. Shivshankar_1 





लहान मुलांचे प्रसिद्ध नियतकालिक ‘चांदोबा’मधील चित्रकार के. सी. शिवशंकर यांच्या निधनाने बालपण समृद्ध करणारा तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या कलाप्रवासावर एक नजर...
 
 
 
‘चांदोबा’ हे नियतकालिक माहीत नाही असा व्यक्ती क्वचितच सापडेल. अनेक देखण्या अप्सरा, सामान्य माणसं, शेतकरी, व्यापारी, राजघराण्यातील पुरुष, लहान बालकं... किती-किती म्हणून असायची ती चित्रं!! वाचन म्हणजे नक्की काय समजण्याआधी फक्त चित्र बघण्यातील मजा निराळीच होती. चित्रे इतकी सुरेख आणि जीवंत असत की, चित्रांतूनच कथा डोळ्यांसमोर उभ्या राहत.
 
 
या चित्रामागील महान चित्रकार के. सी. शिवशंकर वयाच्या ९७व्या वर्षी निधन पावल्याने कित्येक पिढ्यांचे बालपण पोरके झाले आहे. ‘चांदोबा’ या मासिकाचा ऐतिहासिक जन्म व यशस्वी वाटचाल घडवून आणणार्‍या चमूतील हा शेवटचा शिलेदार हरपला. विक्रम आणि वेताळ यांची अक्षरशः जीवंत चित्रं काढणारे चित्रकार म्हणजे के. सी. शिवशंकर. लहानपणापासूनच दैवी देणगी स्वरूपात लाभलेल्या कलेमुळे के. सी. शिवशंकर यांची चित्रकार म्हणून ओळख तयार व्हायला फार वेळ लागला नाही.
 
 
 
शिवशंकर यांचा जन्म १९२४ साली तमिळनाडू राज्यातील इरोडे जवळील छोट्या गावात झाला. त्यांचे वडील स्थानिक शाळेत शिक्षक होते, तर आई गृहिणी होती. १९३४ साली त्यांनी चेन्नईला स्थलांतर केले. त्यामुळे शिवशंकर यांचे बालपण चेन्नईतच गेले. शाळेपासून कला महाविद्यालयातील शिक्षणापर्यंत, कुंचल्यातील रंगरेषांनी त्यांच्या जीवनातील अडथळे दूर केले. संघर्ष अधिक सुसह्य केला. बालवयातच शिवशंकर यांनी आपले प्राध्यापक डी. पी. रॉय चौधरी यांना कुंचल्यातील कौशल्याने आश्चर्यचकित केले.
 
 
 
शालेय जीवनात त्यांची चित्रकलेतील प्रगती पाहून, तुझी चित्रकला उत्तम असून तू ‘बीए’ किंवा ‘एमए’ न करता चित्रकलेचं शिक्षण घे, असा सल्लाच दिला. याच सल्ल्यानुसार आणि आपली चित्रकलेची आवड जोपासत त्यांनी बारावी उत्तीर्ण होताच ’शासकीय कला महाविद्यालय, चेन्नई’ येथे प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून त्यांनी पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. १९४६ साली यात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘कलाईमगल’ या तामिळ मासिकात काम सुरू केले. यानंतर ते ‘चांदोबा’च्या संस्थापक चमूत आले. मूळचे तेलुगू नियतकालिक असलेल्या ‘अंबुलीमामा’ मासिकाची स्थापना चित्रपट निर्माते बी. नागी रेड्डी व चक्रपाणी यांनी १९४७ साली केली होती.
 
 
 
मुलांमध्ये प्रचंड लोकप्रियता लाभल्याने हे मासिक नंतर १३ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागले. या नियतकालिकेची हिंदी भाषेतील आवृत्ती १९४९साली सुरू झाली. १९५२साली मराठी भाषेत ‘चांदोबा’ या नावाने हे नियतकालिक सुरू झाले आणि अल्पावधीतच लहान मुलांच्यात प्रसिद्ध झाले. या प्रकाशनाच्या मूळ डिझायनर चमूतील शिवशंकर हे अखेरचे सदस्य होते. १९५२मध्ये शिवशंकर यांनी प्रमुख चित्रकार चित्रा यांच्या हाताखाली काम सुरू केले आणि पुढे अनेकांच्या मनात कायमच्या कोरल्या गेलेल्या ’विक्रमादित्या’ला जीवंत केले.
 
 
टोकदार तलवार आणि तितकीच टोकदार मिशी असलेला, प्रेताला पाठीवर घेऊन स्मशानातील मुंडक्यांच्या राशीतून चालणारा विक्रमादित्य साठच्या दशकात कधीतरी चितारला आणि तो ‘चांदोबा’ची ओळख बनला. त्यांच्या चित्रशैलीवर भारतीय, मध्य पूर्व आणि युरोपियन कलाशैलीचा प्रभाव होता. ‘चांदोबा’चे संस्थापक बी. नागी रेड्डी यांच्या मते शिवशंकर हे चमुचे महत्त्वपूर्ण घटक होते. त्यांच्या उपनिषदे, पुराण आणि इतिहासातील अनेक अप्रतिम चित्रांमुळे आताच्या पिढीतील अनेकांचे बालपण स्मरणात राहिले आहे.
 
 
 
शिवशंकर यांनी चांदोबा नियतकालिकात महाभारत व रामायणातील कथांसह अनेक कथांसाठी चित्रे काढली, मात्र ‘विक्रम आणि वेताळ’ मालिकेसाठी काढलेल्या चित्रांमुळे त्यांना ख्याती मिळाली. नीतीमत्ता आणि नैतिकता, भारतीय संस्कृती आणि संस्कार या गोष्टी ‘चांदोबा’च्या कथांच्या मूळाशी असायच्या. महाभारत, रामायण, विष्णूपूराण, लोककथा, दंतकथा याच्या माध्यमातून भारतीय संस्कृती लहान मुलांसमोर मांडली जायची. या गोष्टींची मांडणी आजीबाईच्या गोष्टींच्या स्वरूपात असल्याने लहान मुलांना ती अधिक भावत असे.
 
 
 
ऐकणार्‍याला आपण स्वत: त्या गोष्टीचा नायक असल्याचं भासत असे. त्यामुळे ‘चांदोबा’ने अनेक पिढ्यांची सांस्कृतीक संवेदनशीलता आणि वाचनाची सवय विकसित केली. ‘चांदोबा’चे अखेरचे प्रकाशन २०१२ मध्ये झाले होते. शिवशंकर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मासिकासाठी काम केले. १९५२ ते २०१२ या मासिकाचे प्रकाशन बंद होईपर्यंत तब्बल ६० वर्षे शिवशंकर यांनी यात चित्रे काढण्याचे काम केले. त्यानंतर ते ‘रामकृष्ण विजयम’ मासिकात काम करू लागले. पुढे शंकर अनेक चित्रकारांसाठी आदर्श ठरले. आपल्या कलेतून कित्येक पिढ्यांचे बालपण समृद्ध करणार्‍या या महान चित्रकाराला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!









@@AUTHORINFO_V1@@