शरद ऋतूतील चांदणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2020
Total Views |

Sharad Talwalkar_1 &
 
काही माणसे जिथे जातील तिथे स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. तिथल्या लोकांना भारावून टाकतात. गप्पांच्या मैफिलीत बसले तर संपूर्ण मैफिलीवर कब्जा मिळवतात व मैफील खिशात टाकतात. अशाच एका महान कलाकाराबद्दल आज आठवण झाली ते म्हणजे विनोदाचा बादशहा नटवर्य शरद तळवलकर, म्हणजेच सर्वांचे शरद काका.
 
हजरजबाबी, एक निखळ, प्रसन्न, मिश्कील व्यक्तिमत्त्व. १ नोव्हेंबर, १९१८ हा त्यांचा जन्मदिवस. बरोबर १०२ वर्षे झाली. त्या निमित्ताने त्यांचे स्मरण करावे, असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. मी, तसा लहान कलाकार. त्यांच्यावर काही लिहिण्याइतका तर खास मोठा नाही. परंतु, मला त्यांच्याबरोबर जो काही सहवास लाभला, नाटकातून त्यांच्याबरोबर अभिनय करायची संधी मिळाली त्यानुसार मी, फक्त आठवणींना उजाळा देणार आहे. शालेय शिक्षण पुण्याच्या पेरुगेट भावे स्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण एस. पी. कॉलेज पुणे येथून घेतले. एम. ए. मराठी होते. त्यांचा साहित्याचा अभ्यास दांडगा होता. उत्तम वक्ता, वाचक होते. विनोद सांगण्यात हातखंडा असे. विनोदी लेखन करणे कठीण असते. परंतु, त्यांनी सातत्याने केले. रंगभूमीवर १९३५ सालीच शाळेच्या नाटकात त्यांची पहिली एन्ट्री झाली आणि आवड उत्पन्न झाली. हळूहळू नाटकात कामे मिळत होती. पण, घर चालविण्यासाठी नोकरीही करत होते. मिलिटरी अकाऊंट, पुणे विद्यापीठ इ. ठिकाणी नोकर्‍या केल्या. नंतर त्यांनी सिनेमा, नाटकातच राहण्याचा निर्णय घेतला. नाटक व चित्रपटात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. तरुणपणात टक्कल पडल्याने त्यांच्या वाट्याला वयस्कर म्हातारे, मिश्किल अशा भूमिकाही आल्या त्याचे त्यांनी अक्षरशः सोनं केलं.
 
प्रत्येक ठिकाणी भूमिकेची छाप पडत असे. ‘एकच प्याला’ या नाटकामध्ये बालगंधर्वांबरोबर ‘तळीराम’ साकारला आहे. ‘भावबंधन’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत मानापमान’ यातील पात्रं जीवंत केली. तसेच ‘घरोघरी हीच बोंब’, ‘मामला चोरीचा’, ‘सखी शेजारिणी’, ‘बिनधास्त’, ‘बायको नसावी शहाणी’, ‘अपराध मीच केला’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘वरचा मजला रिकामा’मध्येही त्यांनी काम केले. चित्रपटांची यादी अशीच आहे. राजा परांजपे यांना ते गुरुस्थानी मानत. ‘अवघाची संसार’, ‘वाट चुकलेले नवरे’, ‘कैवारी’, ‘धाकटी सून’, ‘एक धागा सुखाचा’, ‘आराम हराम आहे’, ‘मुंबईचा जावई’, ‘एकटी’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘वैभव’ ही यादी खूपच होईल. यातील प्रत्येक भूमिकेचं वैशिष्ट्य त्यांनी जपलंय. ‘रंगल्या रात्री अशा’ या राजा ठाकूर यांच्या चित्रपटात त्यांनी ‘दादुमिया’ या सारंगीवादकाची भूमिका गाजविली. त्यासाठी त्यांनी मोहम्मद हुसेन खाँ साहेब यांच्याकडे दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी सांगितल्यामुळे दहा दिवस सहा ते नऊ तीन तास सारंगी वादनाचे शिक्षण घेतले. सारंगी कशी धरायची, कशी वाजवायची, पान खाता खाता कशी वाजवायची, गाण्याला दाद कशी द्यायची, हे सर्व लकबींसह शिकून घेतले. तो अभिनय इतका बेमालूमपणे केला की, पंडित रामनारायण या आंतरराष्ट्रीय सारंगीवादकालाही ती भूमिका आवडली. त्यांना राजा ठाकूर यांनी दोन-तीन शूट झालेली गाणी मुद्दाम दाखविली. ते खूश झाले. शरदरावांना त्यांनी विचारले, “बरखूरदार, आपने किसी के पास सारंगी की तालीम हासिल की?” हे ऐकून रणजित देसाई, राजा ठाकूर सगळे हसले आणि म्हणाले, “अहो, त्याला सारंगीतला ‘सा’देखील कळत नाही.” यावर रामनारायण यांनी, “क्या अजब बात हैं।” असे म्हणून, प्रेमाने शरदरावांना जवळ घेऊन लहान मुलासारखे कुरवाळले.
‘धूमधडाका’ या महेश कोठारे यांच्या सिनेमातून ‘धनाजीराव वाकडे’ ही भूमिका गाजविली. शाहीर दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटातील ‘डॅडी’ ही भूमिका गाजली. दादा कोंडके त्यांना ‘डॅडी’च म्हणत. ‘दिवा जळू दे सारी रात’ या नाटकात ते आणि बबन प्रभू ही जोडी धमाल करत असे. राजा गोसावी आणि शरद तळवलकर यांना महाराष्ट्राचे ‘लॉरेल-हार्डी’ म्हणत असत. जवळजवळ १२-१३ चित्रपटांत ही जोडी अक्षरशः धुमाकूळ घालायची. या जोडीने हीट चित्रपट दिले. काही नाटकांमध्ये ही जोडी होती. ‘लग्नाची बेडी’ मधला ‘हिरवट गोकर्ण’, ‘एकच प्याला’मधील ‘तळीराम’, ‘घरोघरी हीच बोंब’मधील ‘दाजीबा’, ‘अपराध मीच केला’मधील ‘गोळे मास्तर’, ‘दिवा जळू दे सारी रात’मधील ‘गुप्ते काका’ या भूमिकादेखील गाजल्या. त्यांनी काही चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाची कथाही त्यांचीच. त्यांनी लिहिलेली पुस्तकेपण आहेत. रंगभूमीवरील घडलेले व मागे घडलेले विनोदी किस्से असलेले ‘गुदगुल्या’, ‘नाटक झाले जन्माचे’ हे विनोदी नाटक, तसेच नाटकांमध्ये सिनेमांमध्ये रंगविलेल्या म्हातार्‍या भूमिका त्याची तयारी असलेले ‘मी रंगविलेले म्हातारे’ व त्यांच्या आयुष्यातील आलेल्या व्यक्तींचे ‘ऋणानुबंध.’
शेवटची दोन पुस्तके आजारी असताना लिहिलेली आहेत. तसेच, फार वर्षांपूर्वी म्हणजे ३० वर्षांपूर्वी ‘रसरंग’मध्ये ‘प्रश्न तुमचा, उत्तर शरद तळवलकर यांचे’ सदर यायचे त्यावरील प्रश्नोत्तरांचे पुस्तक. वयाच्या ८० व्या वर्षीपर्यंत ते रंगभूमीवर काम करत होते. याच सुमारास एका दैनिकाने ‘प्रश्न तुमचा, उत्तर शरद तळवलकर यांचे’ सदर सुरू करायचे ठरवले. वाचकांची प्रश्नांची पत्रे घरी येऊन पडली होती, काही दिवस अवकाश होता. पण, लगेच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व रुग्णालयामध्ये अ‍ॅडमिट झाले. आम्ही वाचून दाखवायचो ते उत्तर द्यायचे व ते लिहून घ्यायचे. घरी आल्यावर ही दोन वर्षे सदर चालले. मानाचे सर्व पुरस्कार त्यांना मिळाले. अनेक ठिकाणी सत्कार, बक्षिसं मिळाली पुल देशपांडे, बापू वाटवे, विजय कुवळेकर, रणजित देसाई, राजा ठाकूर, राजा गोसावी, असा मित्रपरिवार होता. त्यांच्या पत्नी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या. ‘अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना’चे ते अध्यक्षही होते. त्यांच्याकडे माझे नेहमी जाणे-येणे होते. गप्पांमध्ये आणि त्यांच्या आठवणींमध्ये वेळ कसा निघून जायचा कळायचे नाही. ते मला गुरुस्थानी आहेत. त्यांची शिकवण आम्हा कलाकारांवर शरदाच्या चांदण्याप्रमाणे राहो.भावपूर्ण श्रद्धांजली!
 
- श्रीप्रकाश सप्रे
 
@@AUTHORINFO_V1@@