हसतमुख अष्टपैलू तारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2020
Total Views |

Satish Tare_1  
 
 
केवळ अभिनयच नव्हे, तर लेखन, दिग्दर्शन, वादन अशा अनेक क्षेत्रांत चौफेर मनमौजी काम करणारा हरहुन्नरी कलावंत, म्हणजेच अभिनेते सतीश तारे.
 
 
लवचिक अभिनय, शब्दांवर मार्मिक टिप्पणी करून त्यांनी अनेकांना लोटपोट हसवलं. ‘फू बाई फू’मधून प्रत्येक पर्वात या कलावंतांने प्रेक्षकांच्या मनावर राज्यच केलं. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधला त्यांचा गंभीर अभिनयही प्रेक्षकांना आवडला. पण, त्यांचं रंगभूमीवरचं प्रेम काही कमी झालं नाही. म्हणून त्यांनी ‘गोलगोजिरी’ नाटकाची निर्मिती केली आणि त्यांचं ते १००वे नाटक असताना आयुष्याच्या रंगभूमीवरूनच अचानक त्यांची झालेली एक्झिट मात्र अनेकांच्या डोळ्यात अश्रू देऊन गेली. या कलावंताच्या निधनाने एक मोठा विनोदी कलावंत अकाली गेल्याची हळहळ आजही व्यक्त होत आहे. हजरजबाबीपणा हा हुकमी एक्का त्यांच्या विनोदशैलीचा महत्त्वाचा भाग होता. केवळ टायमिंगच नव्हे, तर अचूक शब्दफोड त्यांना जमायची. खूप संघर्ष केल्यानंतर हा कलावंत वेगवेगळ्या माध्यमातून झळकत होता. केवळ अभिनयच नव्हे, तर लेखन, दिग्दर्शन, वादन अशा अनेक क्षेत्रांत चौफेर मनमौजी काम करणारा हा हरहुन्नरी कलावंत, म्हणजेच अभिनेते सतीश तारे.
 
 
सतीश तारे यांचे वडील जयंत तारे नाट्यकर्मी असल्यामुळे बालनाटकांपासून त्यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांचे वडील जयंत तारे पुण्यात ‘फुलराणी’ ही बालरंगभूमी चालवायचे. वडिलांच्या नाटकांतून अभिनयाचे धडे गिरविणार्‍या सतीश तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाट्यनिर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्त मुशाफिरी केली. ‘ऑल लाईन क्लीअर’ या सस्पेन्स कॉमेडीद्वारे त्यांनी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम पदार्पणातच आपली नाममुद्रा उमटविली. उत्स्फूर्त लवचिकता, हजरजबाबीपणा, विनोदाची अंगभूत उत्तम जाण आणि भान, जबरदस्त टायमिंग सेन्स या गुणांमुळे त्यांनी अल्पावधीतच नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमांत आपले स्थान निर्माण केले. ‘श्यामची मम्मी’, ‘जादू तेरी नजर’, ‘आम्ही बिघडलो’, ‘असा मी असामी’, ‘शुभ बोले तो नारायण’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘सगळं कसं गुपचूप’, ‘चल घेऊन टाक’, ‘रात्रीच घोटाळा झाला’, ‘गोलगोजिरी’ इत्यादी त्यांची नाटके गाजली. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘वळू’, ‘बालक पालक’, ‘नवरा माझा भवरा’ आदी चित्रपटांतूनही त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत त्यांनी रंगविलेली ‘माऊली’ ही व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचली. ‘सारेगम’ व अनेक रिअ‍ॅलिटी शोजमधूनही त्यांनी आपली छाप पाडली. जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या गायनातील हुन्नरही प्रकट केला. अभिनेत्याबरोबरच लेखक आणि गायक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. सतीश तारे यांना विविध प्रकारची वाद्ये वाजवता येत होती. ‘फू बाई फू’ या गाजत असलेल्या रिअ‍ॅलिटी शोच्या चौथ्या पर्वाचे ते विजेते ठरले होते.
 
 
‘सिंदबाद’, ‘हिमगौरी आणि सात बुटके’, ‘जाड्या-रड्या’ अशा बालनाट्यांतून कामे करत त्यांनी बंधू सुनील यांच्यासोबत व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. ‘वासूची सासू’, ‘टुरटूर’, ‘ऑल लाईन क्लीअर’, ‘आमचं जमलं बरं का’, ‘गाढवाचं लग्न’, ‘शुभ बोले तो नारायण’, ‘जादू तेरी नजर’, ‘श्यामची मम्मी’, ‘बाई गं बाई’, ‘वन टू का फोर’, ‘ना त्यातले ना ह्यातले’ अशा अनेक नाटकांतल्या त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. मात्र, काही वर्षांपूर्वी ‘आपलं ठेवा झाकून’ या नाटकाच्या निमित्ताने झालेल्या वादातून तारे यांना नाट्य निर्मात्यांच्या बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. तरीही त्यांनी जिद्दीने स्वतःची नाट्यनिर्मिती सुरू ठेवली होती. ते केवळ कलावंत नव्हे, तर उत्तम वादकही होते. हार्मोनियम, गिटार, तबला असे कोणतेही वाद्य तो वाजवायचे. ही वाद्ये वाजवायला सोपी नाहीत. परंतु, सतीश ती लीलया वाजवत. ते चांगले लेखक होते. त्यांना सुरांचे ज्ञान होते. ते दिग्दर्शनही करीत असत. सतीश म्हणजे, अद्भूत आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. इतर कोणा कलाकारांना मी कमी लेखत नाही. परंतु, त्यांच्यासारखा कलाकार आज आपल्या इंडस्ट्रीत नाही. सतत काम करत राहणे, हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यांना यश किती मिळालं हा पुढचा मुद्दा. पण, त्याची तमा न बाळगता ते सतत काम करीत राहिले; अर्थात हे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडून, जयंत तारे यांच्याकडून मिळाले.
 
 
कल्याणला नेहमी ‘जादू तेरी नजर’च्या शोआधी लावणीच्या कार्यक्रमाचा शो असायचा, मग तो सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे, प्रियांका शेट्टी किंवा आसावरी तारे... मग तारे सर आवर्जून बुकिंग किती झाली हे बघायला अत्रेला लवकर यायचे आणि सहसा नवीन नाटकांच्या निर्मात्यांना तिथेच भेटायला बोलवायचे. मग अत्रेच्या बॅकस्टेज एन्ट्रीच्या इथे खालीच प्रणयच्या कॅण्टीनचा चहा आणि निर्मात्याची मिटिंग याचा बेत असायचा. मग प्रशांत दामले सर आले की, “चला तारे, इथे कमी झोडपा, स्टेजवर गेल्यावर झोडपायचं आहेच की,” असं म्हणत निघून जात. मग तारे सर, पण गप्प आणि एखाद्या आज्ञार्थी मुलासारखे मागे निघून जायचे. मग जो काही स्टेजवर धडाका मारायचे तो निराळाच. पदरचे वाक्य वापरून नाटक फुलविण्यात तारे सरांचा हात कोणीच धरू शकत नाही. कधी कधी तर ते अशी वाक्य घ्यायचे त्याचा संदर्भ नुकताच बॅकस्टेजला घडलेल्या गोष्टींशी निगडित असे. एकदा त्यांनी भरनाटकात काहीतरी वाक्य टाकले त्यावर दामले सर, “अरे हो, आवर स्वतःला, कितीदा सांगू मी (यातील कितीदा सांगू मी हे त्यांचे वाक्य होते. पण, आवर स्वतःला, हा तारेंना टोमणा होता).” पण, यात शांत बसतील ते तारे कसले? त्यांनी, “अरे वाह, मघाशी बहिणीने आणलेले मासे नीट खाऊ दिले नाहीत आणि आता खुशाल म्हणताय आवर घाल हा (तारे सरांचे फॅन हे वाक्य त्यांच्याच टोनमध्ये वाचतील याची खात्री आहे),” असा आईने आणलेल्या माशांवर ताव मारत असताना दामले सरांनी टोकलेल्या गोष्टीवर मारलेला पंच होता. तेव्हा केवळ स्टेजवर तारे, आस्ताद, दामले सर इतकेच हसत होते.
 
 
 
एका शूटिंगच्या वेळी एका दृश्याला काही कारणास्तव दिग्दर्शक उपस्थित नव्हते, त्यामुळे तो सीन दिग्दर्शित करण्याची जबाबदारी एका नवोदित दिग्दर्शकावर आली. ताईने तो सीन वाचला. पण, त्या सीनमध्ये काही नव्हतेच मुळी. ऐनवेळी घुसविलेला सीन आणि लेखकानेदेखील काहीबाही लिहून वेळ मारून नेण्यासाठी तत्काळ बनविलेला सीन होता. पहिली संधी, त्यात सीनमध्ये कलाकार सतीश तारे आणि विजय कदम. इतक्यात विजय कदम सर आले आणि त्यांनी ऑलरेडी हा सीन वाचला होता. तेवढ्यात मेकअप करून तारे पण आले. कदम सर तारेंना इतकंच म्हणाले. “आधीच सीन पूर्ण ब्लँक, त्यात हा सीन एका नव्या माणसाला बसवायला सांगितला आहे. वाचा सीन आणि काय करायचं बोला.” तारेंनी सीन वाचला आणि इतकंच बोलले, “हा सीन कोणत्या सीननंतर आहे आणि कोणत्या सीनआधी, माहिती आहे ना तुला, हो म्हटल्यावर, मग तू स्टार्ट आणि एण्ड कसा करायचा तो सेटअप कर, आम्ही मध्येच बॅटिंग करतो... फक्त लक्षात ठेव, हा सीन वन टेक होईल आणि कॅमेरा एकाच ठिकाणी ठेव. रिटेक किंवा ओस वगैरे मिळणार नाहीत.” कॅमेरा सुरू झाला. इथे तारे सर आणि कदम सर यांच्यात काही बोलणे सुरू झाले. अ‍ॅक्शन बोलताच तारे आणि कदम सरांचे जे काही नाट्य सुरू झाले ते पाहून तिथे उभा असलेला प्रत्येक जण तोंडावर आलेले हसू दाबत नुसता बघत होता. पाच मिनिटे झाल्यानंतर सीनमध्येच तारेंनी कदम सरांना उद्देशून वाक्य म्हटले, “ए बाबा, तू जा घरी, नाहीतर हा काय मला थांबू देणार नाही...” खरंतर हे वाक्य सीनमध्येही बसलं आणि त्या नवोदित दिग्दर्शकाला शुद्धीवर आणायलाही पुरेसं ठरलं आणि सीन संपला. असा जबराट प्रसंग घडला तो केवळ विजय कदम आणि तारे सरांमुळेच.
 
 
सतीश तारे सरांचा अभिनय पाहायचा असेल, तर ‘येड्यांची जत्रा’मधील शौचालय उद्घाटनाचा सीन सजेस्ट करतो. बास, बघा मग कळेल, त्या सीनमध्ये इतके अभिनेते असूनदेखील पुरून उरतात फक्त तारे सर. सतीश तारे हा अवलिया कलावंत होता. अचूक शब्दमांडणी करून अशक्य त्या सर्व गोष्टी त्यांनी शक्य करून दाखविल्या. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. नाटक संपलं की, त्यांना भेटण्यासाठी लोक आतुर असायचे. अशा या हसतमुख आणि कायम विनम्र असणार्‍या अभिनेत्याला विनम्र अभिवादन...
 
- आशिष निनगुरकर
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@