वाल्मिकी समाज : सन्मान आणि स्वाभिमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2020   
Total Views |

Valmiki_1  H x
 
महर्षी भगवान वाल्मिकींची आज जयंती. महर्षी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली आणि विश्वाला मानवी मूल्ये शिकवली. कालौघात वाल्मिकी समाजाची निर्मिती झाली. आज वाल्मिकी समाजाची धारणा काय आहे? स्थिती, गती, नैतिक वैचारिकता काय आहे, याबाबत मागोवा घेतला. त्यावेळी जाणवले, महर्षी वाल्मिकींच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाने स्वत्व राखले आहे आणि हा समाज प्रगती करत आहे. महर्षी भगवान वाल्मिकी महाराज की जय...
 
 
 
"वाल्मिकी समाज... समाजाच्या नावापुढे ‘वाल्मिकी’ असणे हे आमचे भाग्य आहे. मी वाल्मिकी समाजाचा आहे असे म्हणताना मनाला कितीतरी आश्वस्त वाटते. आम्ही वाल्मिकी समाजाचे आहोत आणि राहणार,” वाल्मिकी समाज मुंबई प्रदेश अध्यक्ष आणि महर्षी भगवान वाल्मिकी ज्योती सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश होरीलाल वाल्मिकी सांगत होते. समाजाबद्दल त्यांना रास्त प्रेम आणि निष्ठा होती. ते म्हणाले, “भारतीय संस्कृतीला मानवी शाश्वत मूल्यांची प्रेरणा आणि मार्ग कुणी दाखवला? भगवान वाल्मिकींनी. आई-वडिलांचा आदर करणे, सेवा करणे, आपल्या माणसासाठी त्याग करणे, समाजासाठी चांगला आदर्श निर्माण व्हावा म्हणून स्वत: आदर्श जीवन जगणे हे सगळे भारतीय संस्कार आहेत. ते संस्कार प्रभू रामचंद्रांच्या जीवनात आहेत. तेच संस्कार भगवान वाल्मिकींनी रामायणातून लिहिले. हे संस्कार आम्हा वाल्मिकींच्या जीवनाचा प्राणबिंदू आहे. आमचा समाज गरीब आहे, पण आईवडिलांना रस्त्यावर टाकणारा नाही, साफसफाईची काम करतील, पण आपले कुलशील सणवार जपतात. का, तर महर्षी भगवान वाल्मिकींचा आदर्श आम्ही जपतो.” मुकेश भरभरून बोलत होते. विक्रोळीच्या वाल्मिकी मंदिरात वाल्मिकी जयंतीनिमित्त मोठा उत्सव असतो, वाल्मिकी जयंतीच्या पूर्वसंध्येला भजन-पूजन असते. त्यावेळी
 
 
गुरू चंदन हम नीबरी, गुरू सागर मि कीच
जहा जहा गुरू के चरण है वहा हारो शीश
गुरू हमारे नारीयल उनर कटीन कठोर
भीतर घुस के देख ले अमृ है चहु और
 
 
अशा भावविभोर वातावरणात भगवान वाल्मिकींचे पुजन होते. रात्री 12 नंतर वाल्मिकी महर्षींचा जन्म होतो. त्यावेळी रात्रभर धार्मिक मेळावाच असतो. दुसर्‍या दिवशी सकाळी 4 वाजता आरती होते. नंतर यज्ञ-होम असतो आणि त्यांनतर 10 वाजल्यापासून भंडारा असतो. त्याच्या सगळ्या नियोजनामध्ये मुकेश यांचा सहभाग असतो. त्यांना विचारले की, ‘वाल्मिकी समाज’ न म्हणता ‘दलित समाज’ म्हणावे किंवा धर्मांतर करावे यासाठी वाल्मिकी समाज बांधवांवर दबाव टाकला जातो, यावर तुमचे मत काय? तर म्हणाले, “ज्याला प्रगती करायची असते तो कुठेही करतो. स्वधर्म सोडून कुणीही प्रगती करू शकत नाही. सच्चा वाल्मिकी समाजवाला कधीही समाज सोडू शकत नाही.” मुकेश यांची संस्था समाजातील गरीब, होतकरू मुलांना शैक्षणिक मदत करते, नशाबंदीसाठी काम करते. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठीही कार्य करते. आज २१व्या शतकात प्रत्येक समाज कात टाकत आहे, त्या पार्श्वभूमीवर वाल्मिकी समाजही बदलत आहे. पण, हा बदल भगवान वाल्मिकींच्या विचारांची प्रेरणा घेऊन बदलत आहे.
 
 
धर्मवीर गेहलोत हे उद्योगपती आहेत, विविध सामाजिक संस्थांचे ते प्रतिनिधित्व करतात. पण, त्यांचे म्हणणे, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा जीवनपट लिहिणारे भगवान वाल्मिकी आमचे आद्यभगवान आहेत. समाजाचा इतिहास सांगताना ते सांगतात, “हजारो वर्षांपूर्वीचा समाज इतिहास आहे, आम्ही लढवय्ये क्षत्रिय होतो. आम्हाला मुसलमानांचे पारतंत्र्य नको होते. काहीजण घाबरून काही अमिषाला बळी पडून मुसलमान झाले. पण, आम्ही मुसलमान झालो नाही. आम्ही प्राणपणाने लढलो. पण, दुर्दैवाने हरलो. त्यावेळी मुस्लीम राज्यकर्त्यांनी आमच्यासमोर पर्याय ठेवला, मुसलमान व्हा नाही, तर आमचा शौच-मैला वाहा. कारण, मुस्लीम राज्यकर्त्यांमध्ये शौचालय वापरण्याची पद्धत नव्हती. लढवय्या आणि त्यांना प्रतिकार करणार्‍या लोकांचा अपमान व्हावा म्हणून मग त्यांनी आम्हाला त्यांचा शौच-मैला साफ करण्याची शिक्षा दिली. त्यावेळी आमच्या पूर्वजांनी ठरवले की, प्राण गेला तरी बेहत्तर, पण मुसलमान व्हायचे नाही. पण, धर्माचे काम करायचे. त्यासाठी जगले पाहिजे. मग आम्ही दिवसभर मैला साफ करायचो. रात्री गावागावांत वाल्मिकी रामायणाचे प्रवचन करायचो. वाल्मिकी महर्षींनी जी जीवनमूल्ये शिकवली, ती समाजासमोर मांडायचो. पुढे मुस्लीम शासक गेले. पण, आमच्या कामामुळे आम्हाला समाजाने अस्पृश्य ठरवले. त्यामुळे आम्ही तेच काम करू लागलो. तरीही आम्ही समाजाला प्रेरणा देण्यासाठी वाल्मिकी रामायणाचे प्रवचन करणे सोडले नाही. त्यावेळी आमच्या समाजाला ‘वाल्मिकी’ नाव नव्हते. पण, ‘वाल्मिकी’ नाव का पडले, याबद्दल आमच्या आजोबा-पणजोबांनी त्यांच्या आजोबा-पणजोबांकडून सांगितलेली गोष्ट अशी की, मुस्लीम शासक गेल्यानंतर आम्ही रानावनात राहायचो.
 
 
त्यावेळी आमच्या एका समाजबांधवाच्या स्वप्नात भगवान वाल्मिकी आले आणि म्हणाले की, ‘तुम्हाला समाजात सन्मान मिळायला हवा. मी उद्या एक पशू होऊन गावातल्या मुख्य चौकात मरून पडतो, त्याची दुर्गंधी सुटेल, त्यावेळी गावचा मुखिया तो पशू दूर नेण्यासाठी तुम्हाला बोलावायला येईल. तेव्हा तुम्ही त्यांना गावाच्या जवळपास राहायला द्याल, तरच येऊ असे वचन मागा. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे की, तुम्ही नेहमी संस्कार आणि संस्कृती जपाल. तुम्ही समाजाचे अभिन्न अंग राहाल.’ दुसर्‍या दिवशी समाजबांधव उठला, त्याला वाटले स्वप्न असेल. पण, खरेच बाजूच्या गावचा मुखिया यांना शोधत जंगलात आला आणि पुढे सगळे स्वप्नासारखे झाले. भगवान वाल्मिकींनी स्वप्नात साक्षात्कार दिला आणि रानात राहणारे हे लोक गावाच्या जवळपास राहू लागले. तेव्हापासून हे लोक भगवान वाल्मिकींना पुजू लागले, आपल्या समाजाला ‘वाल्मिकीचा समाज’ संबोधू लागले. अर्थात यात श्रद्धा, अंधश्रद्धा तथ्य-मिथ्य या गोष्टींचा विचार केला, तर त्यावर अनेक प्रश्न उभे राहतील. पण, हे तेच सांगत होते जे त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून ऐकले. बोलता बोलता म्हणाले की, हाथरसमध्ये आमच्या लेकीवर अत्याचार झाला. तिला न्याय मिळायलाच हवा. तुम्हाला माहिती आहे का की, याच घटनेमुळे हाथरसमधील आमच्या ५० कुटुंबांनी वाल्मिकी समाज सोडून बौद्ध धर्म स्वीकारला आहे. अर्थात, बौद्ध धर्मही आपलाच आहे. राजरत्न आंबेडकर तिथे गेले होते. त्यानंतर काही लोकांनी या ५० जणांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. यावर आम्हाला तर हेच वाटते की, समाज बदलला म्हणून व्यक्ती बदलते का? मी वाल्मिकी समाजाचा आहे, पण उद्योगपती आहे. मार्केटमध्ये विविध जातीचे लोक मला ‘वाल्मिकी’ किंवा इतर नावाने हाक मारत नाहीत, तर ‘धर्माशेट’, ‘धर्मा भाई’ म्हणतात. जो जे काम करेल लोक त्याच कामाने त्याला ओळखतील. त्यामुळे जात-समाज सोडण्यापेक्षा चांगले कर्म केले तर बरे, असे मला वाटते. भगवान वाल्मिकींचा इतिहास, ते कसे वाल्याचे वाल्मिकी झाले, हे माहीत आहे. महर्षी वाल्मिकींचा आशीर्वाद समाजाला आहे. त्यामुळे रामनाम जपण्याची परंपरा सोडून इतर कुठेही गेले तरी सुख नाहीच मिळणार.” धर्मा यांचे वक्तव्य ऐकून वाटले की, समाज नुसताच भौतिक प्रगती करत नाही, तर नैतिक, वैचारिक आणि आध्यात्मिक स्तरावरही समाज प्रगत झाला आहे.
 
 
भगवान वाल्मिकी जयंतीनिमित्त अनेक समाजबांधवांशी बोलले. राजकारण आणि वाल्मिकी समाज यावर बोलताना त्यांचे म्हणणे होते की, महाराष्ट्रात वाल्मिकी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व नाही. दूरचे कशाला मुंबई महानगरात पाहा, एकही नगरसवेक नाही. तसेच ‘३७० कलम’ हटवल्यामुळे काश्मीरमधील समाजबांधवांना न्याय मिळाला. ‘सीएए’ कायद्यामुळे पाकिस्तानातील समाजबांधवांना आपल्या देशात येण्याचा मार्ग मोकळा झाला, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद तर जवळपास सगळ्यांनीच दिले. असो. आजच्या दृष्टीने विचार करता वाल्मिकी क्षुद्र होते का ब्राह्मण, असा निरर्थक वाद पेटवणार्‍यांना, वाल्मिकींनी वाल्मिकी पूजन, पर्यायाने रामपूजन सोडावे यासाठी विद्वेश माजवणार्‍यांना, वाल्मिकी समाज आजही जास्त स्वीकारत नाही. ‘महर्षी वाल्मिकी आमचा अभिमान, आदर्श आहे,’ असे म्हणत समाजाने स्वत:ला एकसंध ठेवले आहे. अभिमानाने स्वत्व टिकवून राहिला, स्वत:ची प्रगती करत राहिला. आज महर्षी भगवान वाल्मिकींची जयंती. वाल्मिकी बांधवांसोबत त्यांचे पूजन करू...
 
 
आज बसंत संत मिल बैठे
पहले आरती गाऊ मैं
वाल्मिकी गुरू खोल द्वारा
बाबा दर्शन पाऊ मैं...
महर्षी भगवान वाल्मिकी महाराज की जय...
 
 
@@AUTHORINFO_V1@@