पुरातत्त्वात ‘आर्य’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2020
Total Views |

archaeologist_1 &nbs

 

 

मागच्या काही लेखांमध्ये आपण आर्य नांवाचा ‘वंश’ ही संकल्पना किती तथ्यहीन, तर्कदुष्ट आणि एकूणच बिनबुडाची आहे, हे सविस्तर पाहिले. युरोपीय लोकांचा वंशवाद, आपल्या वंशाचे श्रेष्ठत्व सांगताना दिसणारी आढ्यता, त्यातून दुसर्‍यांना हीन लेखायची मानसिकता, या आणि अशा कारणांनी प्रेरित होऊन त्यांच्यातल्या काही विद्वानांनी काही मनगढंत कथा रचल्या. त्यासाठी विविध ज्ञानशाखांमधून दिसून येणार्‍या निरीक्षणांचा आधार घेतला. त्यांना ‘ऐतिहासिक पुरावे’ असे गोंडस नाव दिले. याच कथांचा इतिहासाच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये अतिशय बेरकीपणाने समावेश घडवून आणला. भारतीय इतिहास आणि संस्कृतीला हीन ठरविण्यासाठी या कथा त्यांना उपयोगी ठरताना दिसल्या, आजही दिसत आहेत. अशा भाकडकथांचा एकेक ज्ञानशाखेच्या आधारे समाचार घेण्याच्या या मालिकेत आता आपण पाहूया ‘पुरातत्त्व’ (Archaeology) हे शास्त्र आर्यांच्या स्थलांतराच्या किंवा आक्रमणाच्या बाबतीत काय सांगते ते...
 
 
 
 
भारतीय पुरातत्त्वाची पार्श्वभूमी
 
एक ब्रिटिश अधिकारी ‘सर अलेक्झांडर कनिंगहॅम’ यांनी सन १८६१ मध्ये 'Archaeological Survey of India (ASI)' अर्थात ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण’ या संस्थेची औपचारिकरीत्या स्थापना केली. ‘औपचारिकरीत्या’ असे फक्त एवढ्याचसाठी म्हणायचे, कारण अशा प्रकारचे पुरातत्त्वीय संशोधन त्याच्या सुमारे पाऊण शतक आधी सर विल्यम जोन्स यांनी कलकत्त्याला सुरू केलेल्या ‘एशियाटिक सोसायटी’ या संस्थेच्या माध्यमातून चालू होतेच. पुढे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्था सर्वाधिक चर्चेत आणि प्रकाशझोतात आली ती सिंधू नदीच्या खोर्‍यात केलेल्या उत्खननांमुळे. सन १९२०-३०च्या दशकात हडप्पा आणि मोहेंजोदरो येथे स्व. दयाराम साहनी आणि स्व. काशीनाथ नारायण दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली झालेली उत्खनने आणि ‘ASI'चा तत्कालीन मुख्य निदेशक जॉन मार्शल याच्या नावे त्या संशोधनाचे प्रसिद्ध झालेले तपशीलवार अहवाल, या सर्व गोष्टी एकूणच भारतीय इतिहासात मैलाचा दगड ठरल्या. याद्वारे अत्यंत प्राचीन; परंतु खूप प्रगत अशा नगरांचे दर्शन जगाला घडले.
 
 
सिंधू नागरीकरणात आर्यांचा प्रवेश
 
 
याच्या आधी भारताच्या बाहेर इजिप्त, मेसोपोटेमिया, बॅबिलोनिया, असीरिया, सुमेरिया वगैरे ठिकाणी १९व्या शतकातच उत्खनने झाली होती. तिथेही मोहेंजोदरो किंवा हडप्पाप्रमाणेच प्रगत नागरीकरण आणि संस्कृतीच्या खुणा सापडल्या होत्या. परंतु, त्यांचा काळ सिंधू नागरीकरणाहून जास्त प्राचीन म्हणजे सुमारे इ.स.पू. तिसरे सहस्रक असा निश्चित करण्यात आलेला होता. परंतु, पुढच्या काळात शोध लागलेल्या सिंधू नागरीकरणाचा कालखंड मात्र सुमारे इ.स.पू. १८०० इतका अलीकडचा निश्चित करण्यात आला. तिथे मिळालेल्या अनेक वस्तूंवरून काही तथ्ये लक्षात येतात. त्यांपैकी एक आहे सिंधू खोरे आणि मेसोपोटेमिया-बॅबिलोनिया, वगैरे प्रदेशांच्या दरम्यान चालणारा व्यापार. या दोन्ही प्रदेशांमध्ये अनेक वस्तू समान मिळाल्या आहेत, मुद्रांवरची अनेक चित्रे समान आहेत. असंख्य वस्तूंची देवाणघेवाण या दोन प्रदेशांच्या दरम्यान व्यापाराच्या माध्यमातून होत असे, हे तोपर्यंत विविध पुराव्यांनी स्पष्ट झालेले होते.
 
 
मग साहजिकच असा प्रश्न उपस्थित झाला की, इ.स.पू. ३००० ते इ.स.पू. १८००, या मधल्या काळात सिंधू संस्कृतीच्या नगरांमध्ये काय परिस्थिती होती? ही नगरे मेसोपोटेमियन नगरांच्या इतकी प्रगत तर वाटत नव्हती. पण, त्यांच्याशी इथून व्यापार मात्र चालू होता. याचाच अर्थ या दरम्यानच्या काळात मेसोपोटेमियन संस्कृतीच्या लोकांनी काही कारणांनी सिंधू संस्कृतीच्या परिसरात स्थलांतर केले असावे आणि त्यानंतर मग या परिसराचा विकास होत गेला असावा. असा एक सोयीस्कर निष्कर्ष जॉन मार्शल आणि तत्कालीन इतर पाश्चिमात्य अभ्यासकांनी काढला. परंतु, इथे मोर्टिमर व्हीलरने मात्र एक विसंगत गोष्ट सांगितली. ती म्हणजे या आक्रमणाच्या नंतर इथे सिंधू संस्कृतीचा र्‍हास सुरू झाला! स्वत: मोर्टिमर व्हीलर याचे ‘आर्यांचे आक्रमण’, ‘इंद्राने केलेला विध्वंस’ अशाच शब्दांनी वर्णन करतो. इ.स.पू. १८००च्या सुमारास घडल्याचे सांगितले गेलेल्या, एकाच घटनेच्या संदर्भात, एकाच ठिकाणी संशोधन केलेल्या, एकाच ‘ASI' या संस्थेचे, एकच मायदेश असणारे पण दोन वेगवेगळ्या काळातले दोन प्रधान निर्देशक वेगवेगळा निष्कर्ष काढतात! काय म्हणावे या विसंगतीला? यांना नेमकेपणाने काय सांगायचे आहे? इ.स.पू. १८०० मध्ये तथाकथित आर्यांनी सिंधूच्या खोर्‍यात स्थलांतर केले की आक्रमण? त्यामुळे या प्रदेशाचा विकास सुरू झाला की र्‍हास? त्या तथाकथित आर्यांना तिथे व्यापार करायचा होता की विध्वंस? अर्थात, मूळ तथ्यांकडे डोळेझाक करून दोन जणांनी मनातल्या मनात रचलेल्या दोन काल्पनिक कथांमध्ये विसंगतीच असणार, हे उघडच आहे!
 
उघड्या डोळ्यांनी दिसणारी तथ्ये
 
 
मागच्या एका लेखात आपण डॉ. पॉल ब्रोका याने दाखवून दिलेल्या मानवी कवटीच्या आणि हाडांच्या मोजमापांचे संशोधन पाहिले. त्यापैकी कवटीचे एक मोजमाप म्हणजे ‘मस्तक निर्देशांक’ (Cephalic Index) होय. सिंधूच्या खोर्‍यातल्या उत्खननांमध्ये मिळालेल्या मानवी सांगाड्यांबद्दल ‘ASI'चे पुढच्या काळातले अजून एक प्रधान निर्देशक अमलानंद घोष काय म्हणतात पाहा : मोहेंजोदरो येथे सापडलेले सांगाडे आजच्या सिंधी लोकांशी मिळताजुळता मस्तक निर्देशांक दाखवतात, तसेच लोथल येथे सापडलेले सांगाडे आजच्या गुजराती लोकांशी मिळताजुळता मस्तक निर्देशांक दाखवतात. अर्थात, मध्य आशिया किंवा मेसोपोटेमिया वगैरे प्रदेशातून सिंधूच्या खोर्‍यात स्थलांतर करून आलेले लोक आणि तिथले आजचे लोक हे जीवशास्त्रीय दृष्टीने समान वंशाचे आहेत. स्थलांतर, आक्रमण, विध्वंस, अत्याचाराच्या सर्व कथा काल्पनिक आहेत.
 
 
खेरीज मोर्टिमर व्हीलरच्या ‘आर्यांचे आक्रमण, इंद्राने केलेला विध्वंस’ इत्यादी निष्कर्षावर आपण मागेच अजून एका लेखात विचार केलाच आहे. त्याच्या दाव्यांचा फोलपणा आपण तिथे सविस्तरपणे उलगडून पाहिला. या परिसरात मिळालेल्या मानवी सांगाड्यांचा सखोल अभ्यास अनेक संशोधकांनी केला आहे. कार्नेल विद्यापीठातले विद्वान मानववंशशास्त्रज्ञ डॉ. के. आर. केनेडी त्यांच्यापैकी एक. त्यांच्या मतानुसार, या सांगाड्यांवर कुठल्याही शस्त्राच्या खुणा नाहीत, वार केल्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे ते सांगाडे युद्धात मारले गेलेल्या मृतांचे नाहीत. शिवाय, बर्कले विद्यापीठातल्या डॉ. जी. एफ. डेल्स यांच्याही मतानुसार अनेकदा पूर येऊन त्यातून वाहून आलेल्या गाळाचे थर एकावर एक दिसून येतात, अशा अवस्थेतल्या मातीत हे सांगाडे मिळालेले आहेत. त्यामुळे सातत्याने पूर आल्याने यापैकी काही परिसर वसतीयोग्य राहिला नाही, तर अजून काही परिसरात सातत्याने दुष्काळ पडल्याने तोही वसतीयोग्य राहिला नाही. त्यामुळे ही नगरे जेव्हा सापडली, तेव्हा उजाड अवस्थेत सापडली. सिंधू नागरीकरणाच्या र्‍हासाची खरी कारणे अशी पर्यावरणीय आहेत.
 
सिंधू खोर्‍यात उत्खनने झालेली बहुसंख्य ठिकाणे फाळणीनंतरच्या काळात पाकिस्तानात गेली. अगदी थोडी भारतात राहिली. स्वतंत्र भारतात सिंधू संस्कृतीच्या अधिक स्थळांची उत्खनने झालेली आहेत आणि अधिक मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेले आहे. सिंधू खोर्‍याच्या भारतातल्या भूभागात तितकेच किंबहुना अधिकच जुने अवशेष उपलब्ध झाले आहेत. पूर्वी मोहेंजोदरो हे ठिकाण या बाबतीत सर्वाधिक क्षेत्रफळाचे मानले जात असे. पण, पुढे हरियाणामधील हिसार जिल्ह्यातले राखीगढी हे ठिकाण आज सर्वाधिक क्षेत्रफळाचे ठरले आहे. त्याच्यासह अशा बहुतेक सगळ्याच ठिकाणच्या उन्नतावस्थेचा काळ अजूनच मागे जात सुमारे इ.स.पू. ३७०० पेक्षाही अधिक मागे गेला आहे. त्यातून मग ‘इ.स.पू. ३००० ते इ.स.पू. १८०० या मधल्या काळाचे काय’, हा प्रश्नच निकाली निघतो.
 
 
(क्रमश:)

- वासुदेव बिडवे
 
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@