बुलढाण्यातून खवले मांजराचे किलोभर खवले जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2020
Total Views |

pangolin_1  H x


आॅनलाईन मार्गाने विक्रीचा प्रयत्न 

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामधून वन विभागाने खवले मांजराची तस्करी उडकीस आणली आहे. शु्क्रवारी केलेल्या कारवाईत वन अधिकाऱ्यांनी तीघांना अटक करुन त्यांच्याकडून १.७ किलोचे खवले जप्त केले. या आरोपींनी आॅनलाईन मार्गाने हे खवले विकण्याचा प्रयत्न केला होता.

 
 

भारतीय 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत खवले मांजराला प्रथम श्रेणीचे संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्याची शिकारी किंवा तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा परिस्थितीतही राज्यातील विविध भागांमधून खवले मांजर खरेदी-व्रिक्री करण्याची प्रकरणे उघडकीस येत असतात. अशाच एका प्रकरणाचा छडा शु्क्रवारी बुलढाणा वन विभागाने लावला. 'केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग, मुंबई'तील (डब्लूसीसीबी) अधिकाऱ्यांना आॅनलाईन मार्गाने मलकापूरमधील काही इसम खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 'वाईल्डलाईफ क्राईम सेल'ला माहिती देण्यात आली. या सेलमधील अधिकाऱ्यांनी स्वत: बनावट ग्राहक बनून या इसमांशी व्यवहार केला. त्यांना मलकापूरातील एका ठिकाणी बोलावून सापळा रचून तीन इसमांना खवल्यांसह ताब्यात घेण्यात आले.


pangolin_1  H x 
 
गौरव वानखेडे, झेतरशिंग भाबर आणि कार्तिक होडके यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १.७ किलो वजनाचे १०० खवले जप्त केल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक डाॅ. सावन देशमुख यांनी दिली. ही कारवाई 'मेळघाट व्याघ्र प्रकल्पा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी मनोज खैरनार, वाईल्डलाईफ क्राईम सेलमधील ए.ए.सारडा, एम.बी.जवारकर, जे.एल.दहीकर, आर.आर.ठक्कर, आर.जे.आडे यांनी केली. खवले मांजर या प्राण्याबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. त्यातूनच सामान्य लोकांकडून या प्राण्याला मांसासाठी किंवा जादूटोण्यासारख्या अंधश्रद्धेसाठी पकडण्यात येते. परंतु, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वन्यप्राणी पकडणे, बंदिवासात ठेवणे, विक्री करणे, शिकार आणि वाहतूक करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी ३ ते ७ वर्षांपर्यंत कैद आणि रोख रक्कमेच्या दंडाची तरतूद आहे. तरी नागरिकांना मांसाच्या किंवा पैसाच्या लोभापायी अशा गंभीर गु्न्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये. वन्यप्राण्यांच्या शिकारीबाबत माहिती मिळाल्यास स्थानिक वन विभाग किंवा १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@