
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : जम्मू – काश्मीरमध्ये भारतीय सैन्य आणि स्थानिक जनता यांच्यातील संबंध नेहमीच वेगळ्या प्रकारचे असतात. दोघांचाही परस्परांवर मोठा विश्वास असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील दिव्यांग (कर्ण आणि मुकबधिर) गौहर मीर याच्या शिक्षणाची आणि उपचारांची जबाबदारी राष्ट्रीय रायफल्सचे मेजर कमलेश मणी यांनी स्विकारली आहे. विशेष म्हणजे गौहरनेही मेजर मणी यांच्याप्रमाणे सैन्यदलात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा कार्यरत असलेले २१ – राष्ट्रीय रायफल्सचे मेजर कमलेश मणी हे गस्तीवर असताना त्यांची भेट १६ वर्षांच्या गौहरशी झाली. त्यांनी गौहरसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तो कर्णबधिर असल्याचे त्यांना समजले. मात्र, दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मेजर मणी यांनी त्याला बुट भेट म्हणून दिले. त्यानंतर मेजर मणी यांनी त्याची संपूर्ण माहिती घेतली, गौहर हा राजवार हांडवारा येथील यमराड भागातील रहिवासी असल्याचे समजले. मेजर मणी यांनी त्याच्या कुटंबियांशी संपर्क साधला. त्यावेळी त्याच्या नऊ जणांच्या कुटुंबातील त्याचे वडिल मोहंमद अश्रफ मीर यांच्यासह त्याची बहिण आणि काकादेखील कर्णबधीर असल्याचे लक्षात आले.
गौहरसोबत चांगली मैत्री झालेल्या मेजर मणी यांनी त्याच्या कुटुंबियांशी संवाद मानवतेच्या दृष्टीकोनातून साधून गौहरला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे गौहरच्या शिक्षणाचा आणि उपचारांचा सर्व खर्च उचलण्याचा निर्णय घेऊन त्याच्यावर हांडवारा येथील ‘डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’मध्ये (डीईआयसी) प्राथमिक उपचारांनाही सुरूवात केली आहे. मात्र, गौहर हा ७० टक्के कर्णबधीर आहे, त्यामुळे गरज पडल्यास काश्मीरच्या बाहेर नेऊन उपचार करण्याची परवानगी मेजर मणी यांनी त्याच्या कुटुंबियांकडे मागितली आणि त्यांनीही अगदी आनंदाने परवानगी दिली आहे. मेजर मणी यांनी त्याला आता एक स्मार्ट फोन घेऊन दिला आहे. गौहरची शाळेची पुस्तके, बुट, त्याच्या रोजच्या गरजा, त्याचे उपचार आणि आर्थिक गरजा याची चिंता आता मिटला आहे. विशेष म्हणजे कुपवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील झाचलदारा या गावातील शाळेत इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेतला आहे. यामुळे हांडवारा येथील ‘डीईआयसी’मध्ये राहून तो शिक्षण घेणार आहे.
मलाही तुमच्यासारखे सैन्यात जायचे आहे...
काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील दिव्यांग (कर्ण आणि मुकबधिर) गौहर मीर याच्या शिक्षणाची आणि उपचारांची जबाबदारी राष्ट्रीय रायफल्सचे मेजर कमलेश मणी यांनी स्विकारली आहे. विशेष म्हणजे गौहरनेही मेजर मणी यांच्याप्रमाणे सैन्यदलात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. pic.twitter.com/FWyEGYkleP
— महा MTB (@TheMahaMTB) October 29, 2020
सैन्याधिकारी मेजर कमलेश मणी यांनी गौहरविषयी एक ह्रदयस्पर्शी प्रसंग सांगितला. ते म्हणाले, मी नुकताच गौहर मीरला भेटलो. तो आपल्यासारखा बोलत नसला तरी तरी आम्ही एकमेकांशी ह्रदयापासून संवाद साधतो आणि त्याच्या देहबोलीतून तो मला सर्व काही सांगतो. “तुला मोठा होऊन काय व्हायचे आहे”, हा प्रश्न मी त्याला विचारला असता माझ्याकडे बोट दाखवून “मला तुमच्यासारखेच सैन्यात जायचे आहे”, असे त्याने सांगितले.