आत्मनिर्भर भारत : विश्वगुरू भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2020
Total Views |

Aatmanirbhar bharat_1&nbs
 

रवींद्र तथा राजाभाऊ मुळे (नगर) लिखित ‘आत्मनिर्भर भारत- विश्वगुरू भारत’ या पुस्तकाचे प्रकाशन पू. गोविंददेवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते आज, दि. ३० ऑक्टोबर रोजी होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायकराव गोविलकर आहेत. त्यानिमित्ताने हा पुस्तक परिचय.
 
 
सोशल मीडियातून सहजसोप्या शब्दांमध्ये असे अर्थपूर्ण लिखाण हे लेखक रवींद्र मुळे यांचे वैशिष्ट्य आहे. याद्वारे त्यांनी नगर जिल्ह्यातील दिवंगत संघ कार्यकर्त्यांच्या परिचयाचे लेख लिहिले असून त्यांच्या संकलित ‘परिसवेध’ या पुस्तकास वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा या सर्व विषयात ते अत्यंत चपखल भाषेत समीक्षात्मक लेखन करीत असतात. स्वामी गोविंददेवगिरी यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, हे पुस्तक भल्या-बुर्‍या गतकालाचा आढावा व वर्तमानाचे विश्लेषण एवढ्यापुरतेच मर्यादित नसून त्याचे खरे बलस्थान आहे, ते त्याच्या भविष्यवेधी विचारात. त्यामुळे पुस्तकातील उंची व खोली लक्षात येते.
 
 
‘कोविड -१९’च्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्व जगाचे वेगवान चक्र थांबले. भारतदेखील त्याला अपवाद नव्हता. परंतु, आपल्या देशाने परंपरागत व सांस्कृतिक वारशामधून मिळालेल्या मूल्यात्मक विचार व आचरण यांच्या आधारावर या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केले आहे. या परंपरेचे आणि वारशाचे यथोचित सोप्या शब्दांमध्ये त्या-त्या प्रसंगाला साजेसे असे लेखन लेखकाने केलेले असून त्याचे संदर्भमूल्य असलेले पुस्तक वाचकांच्या भेटीस येत आहे.
 
 
अशा अभूतपूर्व आपत्तीच्या प्रसंगी देशाचे नेतृत्व करणार्‍या व्यक्तिमत्वाची कसोटी लागते. त्या कसोटीस संपूर्णपणे योग्य ठरलेले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जनतेतील संवादाला लेखकाने अत्यंत उचित असे महत्त्व दिलेले आहे. मोदी यांनी आवाहन केल्यावर देशाने भरघोस प्रतिसाद दिलेल्या साऊंड आणि लाईट थेरपीविषयी वर्तमानातील युवापिढीला एक नवीन विचार देऊन जातो. भारतासारख्या खंडप्राय देशाला जेव्हा एखाद्या मोठ्या अभूतपूर्व संकटाला तोंड द्यायचे असते. तेव्हा सर्व स्तरातील माणसांना भावणारा मुद्दा छेडावा लागतो. स्वातंत्र्य आंदोलनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एक मूठ मीठ हातात घेऊन केलेला अभूतपूर्व सत्याग्रह असो अथवा रोज एक तास चरखा चालवणे असे उपक्रम दिले. आपत्तीच्या प्रसंगी देशाची जी लढाई सुरू असते, त्यात सर्वसामान्य माणसाला मानसिक व भावनिकरीत्या जोडले जाण्यासाठी असे उपक्रम प्रतीकात्मक असतात. अशा उपक्रमांना आपला देश भरभरून प्रतिसाद देतो याचाच अर्थ नेतृत्व आणि समाज यांच्या अंतःकरणातील भावनांना जोडणारा हा उपक्रम आहे, हे सिद्ध होते.
 
 
भारतीय जीवन पद्धतीत आहार-विहार यावर मोठा भर दिलेला आहे. या जीवनशैलीचे नीट परीक्षण करून त्याचा व्यवहारात उपयोग केला, तर वर्तमानातील अनेक मोठ्या समस्या या कमी होऊ शकतात. कोविडच्या संकटात लोकांना पुन्हा एकदा या जीवनशैलीविषयी अंतर्मुख केले व व्यवहारात आणण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले. योग आणि प्राणायाम या आधारावर वाढणारी प्रतिकारक्षमता ही वैद्यकशास्त्रानेसुद्धा स्वीकारलेली आहे.
 
 
दोन महायुद्धांच्या पार्श्वभूमीवर व त्या पश्चात जगातील साम्राज्यवादी शक्तींनी विविध स्तरावरील आधुनिक विज्ञानाचा वापर करून संघर्ष अन्य देशांवर लागलेले आहे. ज्याला आज ‘हायब्रीड वॉर’ असे म्हणतात. या शक्तींविषयी लेखकाने सावध केले आहे. विकृत इतिहासाची मांडणी करून पराभूत मानसिकतेत समाजाला घेऊन जाण्याचे पद्धतशीर प्रयत्न झाले. त्यावर या पुस्तकात कोरडे ओढले असून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथातील अमूल्य वैचारिक ठेवा हाच या परिस्थितीत मार्गदर्शन करू शकतो, असे प्रतिपादन या पुस्तकात आहे.
 
 
‘आत्मनिर्भर भारता’चा विचार करताना, उपलब्ध संसाधनांचा मर्यादित उपभोग लक्षात घेऊन जल, जंगल, जमीन आणि जन यांचा एकत्रित विचार करून विकासाची वाटचाल करावी लागेल. भारताला विश्वगुरु होण्यासाठी या विकासाचे यशस्वी मॉडेल उभे करावे लागेल, हे लेखक लक्षात आणून देतो. आधुनिक विज्ञानाची कास धरून वर्तमानातील नारळीकर, अब्दुल कलाम, माशेलकर आदींनी या देशातील बुद्धिमत्तेचा परंपरागत वारसा पुढे नेलेला आहे. त्या आधारे संशोधनाच्या व्यवस्थांसंबंधीची काही मूलभूत बाबी या पुस्तकात अधोरेखित केल्या आहेत.
 
 
कोविडमुळे देशातील सर्व व्यवस्थांबाबत आत्मचिंतन करावे लागते आहे. उद्याचा घडणारा नागरिक हा शिक्षण पद्धतीतून निर्माण होत असतो. मेकॉलेप्रणित परंपरागत शिक्षण पद्धतीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातूनच निर्माण होणारा आत्मविस्मृत व पराभूत मानसिकतेचा एका मोठा वर्ग घडला आहे. महात्मा गांधी यांनीदेखील ब्रिटिश राजवटीपूर्वीची भारतीय शिक्षणपद्धती परिपूर्ण होती असे म्हटले होते. गांधीजींचे ज्येष्ठ अनुयायी धर्मपाल यांनी ब्रिटिश गॅझेटचाच आधार घेऊन लिहिलेले ‘ब्युटिफुल ट्री’ खंड हे याचा पुरावा आहेत. योगायोगाने याच कालखंडात भारत सरकारने जाहीर केलेल्या शैक्षणिक धोरणाबाबत लेखकाने समयोचित दखल घेतली आहे. व्यवसायाभिमुख कौशल्याचा शिक्षणात अंतर्भाव करून उद्याचा युवक हा ‘आत्मनिर्भर भारता’चा मुख्य आधार असणार आहे, हे लक्षात आणून दिले आहे.
 
 
मोदी सरकारने घोषित केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा ढोबळ मसुदा हा जिज्ञासूंसाठी उपयुक्त ठरेल. खरेतर पंतप्रधानांनी घोषित केलेली ‘आत्मनिर्भर भारत’ची धोरणे ही प्रामुख्याने अर्थव्यवस्था पुन्हा गतिशील करण्यासाठी एक आवश्यकता होती. त्यामुळे त्यात प्रामुख्याने कृषी व उद्योग या विषयाचा समावेश होता आहे. त्याचाही स्वतंत्र प्रकरणात लेखकाने ऊहापोह केलेला असून ‘आत्मनिर्भर भारत’ होऊन आपल्या कौशल्याला जगात काय संधी आहेत, ते थोडक्यात मांडले आहे. याला जोडूनच आर्थिक संस्थांची फेरमांडणी करावी लागेल, हे लक्षात येते.
 
 
या अभूतपूर्व आपत्तीमध्येच प्रदीर्घ संघर्षानंतर प्राप्त अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर ५ ऑगस्टला झालेला प्रस्तावित भव्य मंदिराचा भूमिपूजन समारंभ हा एक ऐतिहासिक क्षण आहे. ‘राम मंदिर ते राष्ट्र मंदिर’हा ‘आत्मनिर्भर’ वाटचालीतील एक मोठा टप्पा आहे. राष्ट्रीय अस्मितांच्या जागरणाने राष्ट्र आत्मविश्वासाने उभे राहत असते. ‘आत्मनिर्भर भारता’साठी अशा राष्ट्रीय अस्मितेचे जागरण होत आहे, ही गौरवास्पद बाब आहे. राम मंदिर निर्माणाच्या निमित्ताने पुस्तकात राष्ट्र मंदिर उभारणीतील काही पैलू लक्षात आणून दिलेले आहे.
 
 
कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक साहित्यकृती निर्माण होत आहेत. हे पुस्तक मात्र या आपत्तीतील आश्वासक व सकारात्मक विचारांना प्रेरित करणारे असे संग्राह्य पुस्तक आहे. गतिमान झालेल्या जीवनचक्रात अंतर्मुख होऊन भारतीय जीवनशैलीकडे येणार्‍या पिढीला हे पुस्तक उपयुक्त आहे. लेखकाची लेखनशैली संवादात्मक असल्यामुळे एखाद्या छोट्या बैठकीतील सहज गप्पांच्या स्वरूपात, परंतु मोठा आशय असलेल्या अनेक मूल्यांची चर्चा या पुस्तकात आहे. प्रस्तावनेत स्वामी गोविंददेवगिरी यांनी ‘लेखकाच्या मर्मग्राही प्रज्ञेतून आलेली विचाररत्ने’ असे म्हटले आहे. त्यामुळे हे पुस्तक किशोरवयीन शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, शिक्षकी पेशातील बंधू तसेच सर्व कुटुंबाला संग्रही ठेवण्यास अत्यंत उपयुक्त होईल.
 
 
- दिलीप क्षीरसागर
 
(लेखक रा.स्व.संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख आहेत.)
 
 
@@AUTHORINFO_V1@@