आई बनली शिक्षणसंस्थाचालक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2020   
Total Views |

Chandrika Shah_1 &nb
 
 
हिरकणी आपल्या बाळासाठी रात्री किल्ल्याचा बुरुज चढून गेली होती. ही माऊली आपल्या चिमुकल्यांसाठी मुंबईवरुन थेट पाचगणीला येऊन राहिली. शिक्षणक्षेत्रातील एक आगळी-वेगळी शिक्षण संस्था उभारली. आईने मनात आणलं तर जगात ती काहीही करु शकते, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. चंद्रिका शाह याचं जीवंत उदाहरण आहे.
 
गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. अनेक शोध हे त्या त्या वेळच्या गरजेतून लागले. सध्या कोरोनाच्या काळात कोरोनावरच्या लसीचं संशोधन कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आणण्याच्या गरजेतून आहे. खरंतर त्या गरजेपोटी जो शोध लागतो, त्याने कोण्या एकाचा फायदा होतो, असं नाही, तर अनेकांना त्याचा कळत नकळत फायदा होतो. अशीच एक गरजू जननी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी राहण्याच्या वसतिगृहाच्या शोधार्थ गेली. वसतिगृह होते, पण शाकाहारी भोजनाची व्यवस्था हवी तशी नव्हती. आपल्यासारख्याच अनेकांच्या बाळांची ही होणारी ती आबाळ पाहून त्या माऊलीने स्वत:च एक वसतिगृह सुरु केले. आज २५ वर्षांनी त्या वसतिगृहाचे एका कनिष्ठ महाविद्यालयात रुपांतर झालेले आहे. हे रुपांतर घडविणारी ती जननी म्हणजे ‘स्वीट मेमरीज हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज’च्या संचालिका चंद्रिका शाह होय.
 
 
मुरजीभाई नंदू म्हणजे पुण्यातील एक खूप मोठं प्रस्थ. एक मोठे उद्योजक. पुण्यातल्या कॅम्प परिसरात पत्नी देवकाबेन आणि कन्या चंद्रिकासोबत ते राहत. पुण्यातल्या उद्योजकीय वर्तुळात मुरजीभाईंचा एक वेगळाच मान होता. ‘बॉम्बे कॉमेट बुक’ नावाची प्रकाशन संस्था ते चालवायचे. सोबतच त्यांचा फर्निचरचा मोठा व्यवसाय होता. वाशीचा सेन्ट्रल मॉल हा त्यांच्याच मालकीचा. मुरजीभाई जेवढे व्यवसायात अग्रणी होते, तितकेच ते समाजकार्यात आणि शैक्षणिक कार्यातसुद्धा अग्रणी होते. अनेक सामाजिक-शैक्षणिक संस्थांचे ते विश्वस्त होते. ‘पुणा हॉस्पिटल’चे ते संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त होते. ज्या समाजातून आपण वर येतो, त्या समाजाचे आपण देणेकरी असतो. समाजाचे हे देणे आपल्यापरीने त्वरित फेडावे, असा त्यांचा नियम होता. त्यांच्या विचाराचा पडगा त्यांची कन्या चंद्रिकावरसुद्धा तितकाच होता. चंद्रिकाचे शालेय शिक्षण एस. एम. चोक्सी विद्यालयात गुजराती माध्यमातून झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण वाडिया महाविद्यालयात झाले. वाणिज्य शाखेच्या पदवीच्या दुसर्‍या वर्षांपर्यंतच चंद्रिकाने शिक्षण घेतले. त्यानंतर लतेश शाह या तरुणासोबत तिचा विवाह झाला. लतेश शाह हे गुजराती रंगभूमीवरील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते होते. लग्नानंतर चंद्रिका मुंबईला आल्या. या दाम्पत्यास धवल आणि अमी अशी दोन गोंडस मुले झाली. मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर आला. मुंबईचं शिक्षण उत्तम होतंच, पण त्याव्यतिरिक्त मुलांना स्वावलंबनाची, शिस्तीची ओळख व्हावी, सोबतच उत्तम शिक्षण मिळावे याचा शोध हे दाम्पत्य घेऊ लागले. त्या काळात पाचगणीच्या शाळांचा उच्चवर्गीय वर्तुळात एक वेगळाच प्रभाव होता. अनेक प्रसिद्ध उद्योजक-व्यावसायिक, सेलिब्रिटी, खेळाडू, नेते, सरकारी उच्चपदस्थ आदींची मुले पाचगणीच्या पॉश वसतिगृहात शिक्षण घेत. येथे कडक शिस्तीच्या इंग्रजकालीन शिक्षणसंस्था अस्तित्वात होत्या.
 
 
आपल्या मुलांनादेखील पाचगणीला शाळेत ठेवावे, असा विचार शाह दाम्पत्यांनी केला. शाळेच्या प्रवेशाचं काम झालं. मात्र, मुलासाठी योग्य अशी खानावळ सापडत नव्हती. येथील बहुतांश खानावळी या शाकाहारी आणि मांसाहारी स्वरुपाच्या होत्या. धवल आणि अमी लहानपणापासून शाकाहारी संस्कारात वाढले होते. संपूर्ण शाकाहार असलेले वसतिगृह सापडत नव्हते. हीच समस्या अनेक विद्यार्थ्यांची होती. या समस्येवर उत्तर सापडत नव्हते. आपणच संपूर्ण शाकाहारी पर्याय देणारे वसतिगृह सुरु केले तर... हा विचार चंद्रिका यांच्या मनात आला. त्यांनी हा विचार तत्काळ आपल्या पित्यास कळवला. त्यांना चंद्रिकाचे विचार पटले. त्यांच्या ओळखीने त्यांना तीन खोल्या आणि स्वयंपाकघर असलेला एक बंगला पाचगणीत मिळाला. चंद्रिका यांनी १९८६ साली येथे वसतिगृह सुरु केले. स्वत:ची दोन मुले आणि अन्य तीन मुले अशा पाच मुलांसह हे वसतिगृह सुरु झाले. या वसतिगृहाच्या चविष्ट भोजनाची ख्याती सर्वत्र पसरली. इतर शाळांचे अनेक विद्यार्थी भोजनासाठी या वसतिगृहात येऊ लागले. निव्वळ दहा वर्षांत तीन विद्यार्थ्यांचे ५५ विद्यार्थी झाले. या विद्यार्थ्यांसाठी आपण शाळा सुरु केली तर... पुन्हा चंद्रिकांच्या मनात विचार आला. त्यांनी पुन्हा आपल्या बाबांना हा विचार कळवला. चंद्रिकाच्या बाबांची ‘एम. पी. नंदू चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाची नोंदणीकृत शैक्षणिक संस्था होती. काही शाळांचे ते अगोदरच विश्वस्त होते. आपली कन्याच शाळा सुरु करत आहे, हे त्यांना भावले. त्यांनी स्वत: पुढाकार घेत चंद्रिकांना प्रोत्साहन दिले. शासकीय नियमांचे सारे सोपस्कार पार पाडून १९९६ साली ‘स्वीट मेमरीज हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज’ अस्तित्वात आले. पहिल्याच वर्षी या शाळेत १० मुले होती. पहिल्या वर्षी फक्त प्राथमिक वर्गांना मंजुरी देण्यात आली होती. पुढच्याच वर्षी म्हणजे १९९७ साली सातवी वर्गापर्यंत परवानगी मिळाली. एकूण ६० विद्यार्थ्यांना त्या वर्षी प्रवेश देण्यात आला.
 
 
२०२० साली या शाळेत २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, यंदा शाळा रौप्यमहोत्सव साजरे करत आहे. आतापर्यंत या शाळेतून अंदाजे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेले आहे. निव्वळ भारतच नव्हे तर जगभरात हे विद्यार्थी पोहोचलेले आहेत. अधिकांश विद्यार्थी हे उद्योग व्यवसायात स्थिरावलेले आहेत. शिशुवर्ग ते कनिष्ठ महाविद्यालय असा शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवण्यात येतो. कौटुंबिक वातावरण आणि कडक शिस्त ही या शाळेची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. येथील प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत पातळीवर लक्ष देण्यात येते. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, हे पाहिले जाते. त्यांना योग, ध्यानधारणा शिकविली जाते. एकप्रकारचं आध्यात्मिक वातावरणसुद्धा येथे पाहावयास मिळते. कला-क्रीडा-साहित्य-संस्कृती या विषयांत विद्यार्थ्यांनी अन्य शाळेच्या तुलनेत स्वत:चा ठसा उमटवलेला आहे. शाळेच्या व्हॉलिबॉल संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. शाळेची ही प्रगती पाहून आंतरराष्ट्रीय संस्थेने शाळेला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविलेले आहे.
 
 
या शाळेचे आणखी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग. अजय सोनावणे हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. गेली २२ वर्षे ते या शाळेत अध्यापनाचे कार्य करत आहेत. त्यांच्याप्रमाणे अनेक शिक्षक गेल्या १८ ते २० वर्षांपासून विद्यार्थ्यांना शाळेत शिकवत आहेत, या शिक्षणसंस्थेचे स्वयंपाकी सुरुवातीपासून म्हणजेच गेल्या २६ वर्षांपासून या संस्थेत कार्यरत आहे. यावरुनच या शैक्षणिक संस्थेचे महात्म्य कळते. गेली काही वर्षे शाळेचा दहावी, बारावीचा निकाल १०० टक्के लागतो. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांवर गुण मिळतात. इतर भाषिक माध्यमातून शिकत असलेला मुलगा ४० टक्के मिळवून या शाळेत येतो. येथील शिक्षक त्याला खासगी शिकवणीच्या माध्यमातून असे काही घडवतात की, इंग्रजी माध्यमाच्या परीक्षेत तो ६० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होतो.
 
 
या सार्‍या यशाच्या मागे या शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त चंद्रिका शाह यांचे अपार कष्ट, कुटुंबीयांची सोबत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी संघभावनेने केलेली मेहनत आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे साईकाका या आपल्या गुरुंप्रतिसुद्धा त्या कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्या आध्यात्मिक कृपेचा आपलं कुटुंब, सहकारी शिक्षक यांच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा आहे, असं चंद्रिका शाह यांना वाटते. हिरकणी आपल्या बाळासाठी रात्री किल्ल्याचा बुरुज चढून गेली होती. ही माऊली आपल्या चिमुकल्यांसाठी मुंबईवरुन थेट पाचगणीला येऊन राहिली. शिक्षणक्षेत्रातील एक आगळी-वेगळी शिक्षण संस्था उभारली. आईने मनात आणलं तर जगात ती काहीही करु शकते, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. चंद्रिका शाह याचं जीवंत उदाहरण आहे. ‘आई. कुठे काय करते’ म्हणणार्‍यांसाठी ही एक मोठीच चपराक आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@