वैदिक सणांचे योगरहस्य : भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2020
Total Views |

festval_1  H x


वैदिक सण वा उत्सव अतिशुद्ध शास्त्रीय परंपरेवर आधारित आहेत. त्यात व्यक्तीबद्दलची श्रद्धा म्हणजेच भावुकता तसेच इतरांबद्दल अनादर वा द्वेष नाही. वैदिक सणात ऐतिहासिक घटनांना प्राधान्य नाही की भौगोलिक अवस्थांचा बडेजाव नाही. वैदिक धर्म, परंपरा आणि संस्कृती कोणा एका प्रेषिताची मिरासदारी नसल्याने वैदिक सण, उत्सवात व्यक्तीचे जन्म दिवस वा त्यांच्या पराक्रमाला धरुन केलेल्या जल्लोषाला मुळीच स्थान नाही. येथे व्यक्तीचा बडेजाव नाही की व्यक्तिद्वेष नाही, पंथाभिमानाने पेटून केलेल्या युद्धसंचाराचा जल्लोष नाही की काल्पनिक विजयाचा उन्माद नाही. येथे आहे निव्वळ शास्त्रीयता.


वैदिक सण वा उत्सव


वैदिक सण वा उत्सव अतिशुद्ध शास्त्रीय परंपरेवर आधारित आहेत. त्यात व्यक्तीबद्दलची श्रद्धा म्हणजेच भावुकता तसेच इतरांबद्दल अनादर वा द्वेष नाही. वैदिक सणात ऐतिहासिक घटनांना प्राधान्य नाही की भौगोलिक अवस्थांचा बडेजाव नाही. वैदिक धर्म, परंपरा आणि संस्कृती कोणा एका प्रेषिताची मिरासदारी नसल्याने वैदिक सण, उत्सवात व्यक्तीचे जन्म दिवस वा त्यांच्या पराक्रमाला धरुन केलेल्या जल्लोषाला मुळीच स्थान नाही. येथे व्यक्तीचा बडेजाव नाही की व्यक्तिद्वेष नाही, पंथाभिमानाने पेटून केलेल्या युद्धसंचाराचा जल्लोष नाही की काल्पनिक विजयाचा उन्माद नाही. येथे आहे निव्वळ शास्त्रीयता. पण ती शास्त्रीयता शर्करावगुंठित गोळ्यांप्रमाणे आहे. त्या शर्करावगुंठित गोळ्यांच्या आत कोणते औषधी संस्कार आहेत हे पाहण्याकरिताच वैदिक सण-उत्सवांचा योग्य विचार करुन त्यातील यौगिक रहस्य शोधून काढायची आहेत. वैदिक ऋतूंची नावेसुद्धा याच शास्त्रीय परंपरेला धरून आहेत.

ऋतू म्हणजे काय?


ऋतू या शब्दाचा अर्थच मुळी उत्पन्न करणे आहे. जगाच्या उत्पत्तीचा क्रम सांगताना वेद म्हणतात, ’ऋतंच सत्यंचाभिद्धात्त पसोऽध्यजायत’. म्हणजे प्रथम उत्पन्न करण्याची शक्ती आली ‘ऋतू’ नंतर ‘सत्य’ म्हणजे अस्तित्व आले आणि नंतर ‘तप’ आचरले जाऊन सृष्टीचा क्रम सुरु झाला. हाच क्रम वैदिक परंपरेने आपल्या सामाजिक व्यवहारात अंगीकारला आहे. ऋतूंची नावे त्या त्या कालमानाला योग्य अशीच असतात आणि त्या त्या ऋतूंतील सणोत्सव त्या त्या ऋतुमानाला साजेल, अशी योगसाधनेची रहस्ये सांगणारी असतात; त्यातील रहस्य आम्हाला कळत नाही एवढेच. वैदिक सणोत्सवातील प्रत्येक रचनेत आणि नामाभिधानातसुद्धा योगमार्गातील रहस्ये कथारुपाने गुंफली आहेत. आता आम्हाला त्या कथा केवळ कथाच वाटतात, ही गोष्ट वेगळी. पण त्या कथांचे रहस्य समजण्यास आजही साधकाला योगशास्त्रच मार्गदर्शक ठरेल. त्या कथा आहेत म्हणून त्यातील साधने आजही साधकाला गवसू शकतात. परंतु, त्याकरीता योग्य समज आणि आचार यांची नितांत आवश्यकता आहे. सणोत्सवातील संस्कार आमच्या लक्षात यावेत हाच त्यातील हेतू आहे. सणातील रहस्ये लक्षात आल्यावर आमचा वैदिक समाज किती शास्त्रीय आधारावर रचला गेला आहे, याची कल्पना येईल. वैदिक साधना ऋतुमानानुसार विभागल्या गेल्या आहेत.


ऋतू किती आहेत?


कृष्ण यजुर्वेदात चारच ऋतू सांगितले आहेत. ‘ग्रीष्म हेमंत: शरद वर्षाः’ यात शिशिर आणि भगवंताला प्रिय असलेल्या वसंत ऋतूला स्थान नाही. सायणाचार्यांनी पाच ऋतू सांगून त्यात वसंत ऋतुची भर टाकली आहे. परंतु, आज आम्ही सहा ऋतूओ मानतो आहोत. सेमेटिक पंथाचे लोकही चारच ऋतू मानतात. त्यात हेमंत आणि वर्षा ऋतू नाही. यावरुन सेमेटिक पंथ आणि वैदिक पंथ यांत कोणत्या काळात फारकत झाली असावी याची कल्पना येऊ शकते. म्हणजे सेमेटिक पंथाला मानणारे लोक फार प्राचीन काळात वैदिक परंपरेपासून दूर गेले नसावेत. ऋतूंच्या संख्येवरुन एकेकाळी आमचे सेमेटिक लोक आणि वैदिक यात सामंजस्य असावे असे दिसून येते. म्हणजे एकेकाळी सर्व जगच वैदिक परंपरेत नांदत होते असे यावरुन दिसते. तसा वर्षा हा ऋतू नाही. परंतु, भारतात तो एका विशिष्ट कालातच येतो म्हणून येथे वर्षा ऋतु स्वतंत्र मानला आहे. पूर्वी वर्षाचे मास दहा होते. त्यामुळे ऋतूंची संख्यासुद्धा पाच होऊ शकली. दोन दोन महिन्यांचा एक ऋतू. परंतु वर्षाच्या मास गणनेत आणखी दोन महिन्यांची भर पडली.


मास गणना


सेमेटिक जगतात पूर्वी दहा महिन्यांचा वर्षकाळ गणत असत. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन मास त्यात भरीस पडले आणि वर्षाच्या मास संख्येची संख्या बारा झाली. पूर्वी वर्षाची सुरुवात ‘मार्च’पासून होत असे. मार्च (MARCH)चा अर्थच आहे पुढे चालणे. वर्ष मार्च करुन पुढे चालत असे आणि मार्चमध्ये वसंत ऋतू येतो. वसंतापासूनच सेमेटिक जगताच्या ऋतुमानाची आणि वर्षाची सुरवात होती, असे दिसते. परंतु, वैदिक वर्षाची सुरुवात चैत्रापासून होते. पौर्णिमेला चित्रा नक्षत्र चंद्राजवळ असते म्हणून या मासाला चैत्र म्हणतात. चैत्रामध्ये वसंताचे शेवटचे चरण शिल्लक असते. आज वैदिक वर्षाला बारा मास आणि सहा ऋतू आहेत. सेमेटिक समाजातही आमचे पाहून म्हणा की काय पण वर्षातील मास बारा पण ऋतू आजही मुख्यत: चारच मानले आहेत. वैदिक ऋतूंचा काळ साधारणत: दोन महिन्यांचा असतो. ऋतू सुरु होण्याकरिता नक्षत्र प्राधान्य असावे लागते त्यामुळे ऋतु अमक्याच तिथीला सुरु होईल असे नक्की सांगता येत नाही. ज्योतिर्विदांना त्यातील रहस्य अधिक माहीत असते.


वैदिक परंपरा आणि साधना


वैदिक परंपरेत साधनांना प्रथम स्थान आहे. सर्व वेदांच्या सूक्ष्म अर्थाकडे पाहिल्यास त्यातील मंत्र म्हणजे निरनिराळ्या तत्त्वसाधनांची सूत्रमय वर्णने होत, असे वाटायला लागते. काही वेदमंत्र साधनांतून प्राप्त होणार्‍या अवस्थानुभवांची स्पष्ट वर्णने आहेत. आपण प्रतिदिन जे संध्यावंदन करतो त्यातील मुख्यांग गायत्री मंत्र असून त्याचे बहुलांग ‘आपोहिष्टा’ ऋचांनी व्यापलेले आहे, आपोहिष्टा ऋचांचे ऋषी अंबरीष पुत्र सिंधुद्वीप असून ऋचांची देवता आप आणि छंद गायत्री आहे. या आपोहिष्टा ऋचामध्ये आपतत्त्वाच्या प्राप्तीकर साधनेचे रहस्य दडले असून या साधनेतून प्राप्त होणार्‍या तत्त्वदर्शनस्थित अनुभवांचे स्पष्ट वर्णन त्यात आहे. एवढेच नव्हे तर ऋचांचे आपोहिष्टा नाम, सिंधुद्वीप ऋषी, त्यांचे पिता अंबरीष आणि छंद गायत्री या सर्व नामाधिकरणांमध्ये आकाश तत्त्वापासून परंपरेने प्राप्त होणार्‍या सर्व सिद्धिदायक आपतत्त्वातील प्राप्तीच्या अनुभवांचे अत्यंत शास्त्रीय पण सूत्रमय वर्णन आहे. जड वा दिव्य सिद्धींच्या प्राप्तीकरिता पराक्रमी आणि सिद्धिभोगप्रवण अशा आर्यांनी सर्व वेदात आवश्यक त्या ठिकाणी साधना मार्ग, साधनाप्रयोग आणि त्यातील अनुभव ग्रंथित केले आहेत. आर्य शब्दाचा अर्थच मुळी तत्त्वावडंबर चिरीत जाऊन स्वत:च्या अस्तित्वाकरिता हवे ते प्राप्त करुन सतत पुढे जाणारा पराक्रमी पुरुष असा आहे. आर्य शब्द वंशवाचक नसून तत्त्वावधानात पुरोगामी आणि जड दिव्यभोग संपन्न अशा पराक्रमी पुरुषाचे ते नामाधिकरण आहे. असल्या पुरोगामी, पराक्रमी आणि पुरुषार्थी लोकांचा समाज म्हणजे आर्य.


क्रमशः
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
शब्दांकन - राजेश कोल्हापुरे - संपर्क ९५९४७३७३५७ / ९७०२९३७३५७
@@AUTHORINFO_V1@@