सर्वांची मने जिंकणारा ‘मनदीप’ सिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2020
Total Views |

mandeep singh_1 &nbs


आपल्या वडिलांच्या निधनाचे दुःख सांभाळत मैदानावर अर्धशतकी खेळी साकारणार्‍या मनदीप सिंगच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...


जगात अनेक प्रकारचे मैदानी खेळ आहेत. प्रत्येक देशाचा स्वतःचा असा एक राष्ट्रीय खेळ असतो. त्या खेळाची सुरुवात त्या देशापासून झालेली असते. परंतु, काही खेळ असेही आहेत की, त्या खेळांची लोकप्रियता ही फक्त त्या देशापुरती मर्यादित न राहता तो खेळ सर्वच देशांचा अत्यंत आवडता खेळ झाला आहे आणि अशा खेळांमध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेला खेळ म्हणजे क्रिकेट, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. क्रिकेट आवडणारे क्रिकेटप्रेमी आपल्याला सगळीकडेच आढळतात. भारताबद्दलच बोलायचे झाल्यास क्रिकेटच्या बाबतीतले भारतीयांचे प्रेम कुणापासूनही लपून राहिलेले नाही. याच कारणांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांव्यतिरिक्त भारतीय प्रेक्षकांकरिता ‘रणजी’ आणि ‘आयपीएल’सारख्या मालिकादेखील सुरू करण्यात आल्या. सध्या ‘आयपीएल’ ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक भारतीय खेळाडूंनी क्रिकेटप्रेमींची मने जिंकून घेण्यात यश मिळवले आहे. ‘आयपीएल’मध्ये नुकत्याच झालेल्या एका रोमांचक सामन्यात विशेष कौतुक झाले ते किंग्ज इलेव्हन संघातील सलामीवीर फलंदाज मनदीप सिंगचे.


पंजाबने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापतग्रस्त मयांक अग्रवालच्या जागी मनदीप सिंगला संघात स्थान दिले होते. युवा मनदीपसाठी आजचा सामना सोपा नव्हता. कारण, सामन्याच्या नेमक्या एका दिवसाआधी मनदीपच्या वडिलांचे निधन झाले होते. मनदीपचे वडील हरदेव सिंग काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनानंतर मनदीप सिंग खरंतर माघारी परतणार होता. मात्र, भारतात मायदेशी परतणे म्हणजे पूर्ण स्पर्धेवर पाणी सोडण्यासारखे असल्याने मनदीपने आपले मन घट्ट करत आपले कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला. मनदीपने मिळालेल्या संधीचे सोने केले आणि आज सर्वत्र त्याच्या कर्तृत्वाचे गोडवे गायले जात आहेत. मनदीपने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यात १४ चेंडूत १७धावांची खेळी केली. मात्र, मनदीपने त्यानंतरच्या झालेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत सर्वांचेच मन जिंकले. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने ५६ चेंडूंवर नाबाद ६६ धावांची खेळी करत आपले अस्तित्व सिद्ध केले. वडिलांच्या निधनाचे दुःख सांभाळत त्याने केलेली ही कामगिरी फार महत्त्वाची मानली जात असून, याबद्दल त्याचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
मनदीप हा मूळचा पंजाबचा खेळाडू.


१८ डिसेंबर, १९९१ रोजी त्याचा जन्म जालंधर येथे झाला. मनदीप सिंग याचे वडील हरदेव सिंग एकेकाळी जिल्हाधिकारी राहिले होते. त्यांना विविध खेळांमध्ये फार रुची होती. मनदीपने मोठे होऊन अ‍ॅथलिट बनावे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी त्यांची फार इच्छा होती. मात्र, मनदीपला अ‍ॅथलिटऐवजी क्रिकेटच्या खेळामध्ये फार रुची होती. मनदीपला अ‍ॅथलिट बनविण्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केले. परंतु, मुळातच क्रिकेटची आवड असणार्‍या मनदीपला काही केल्या ते जमेना. अखेरीस आपल्या मुलाच्या हट्टापायी वडिलांनी हार मानत मनदीपला क्रिकेटचे प्रशिक्षण मिळवून देण्याचा निर्णय घेतला. जालंधर येथून मोहाली येथे बदली झाल्यानंतर येथील एका नामवंत क्रिकेट क्लबमध्ये त्यांनी मनदीपची नोंदणी केली. मोहालीमध्ये मनदीप नामवंत क्रिकेट प्रशिक्षकांच्या मार्गदशनाखाली क्रिकेटच्या सरावाचे धडे गिरवू लागला. नामवंत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरविणार्‍या मनदीपने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली. जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर मनदीपला १४ वर्षांखालील पंजाबच्या राज्यस्तरीय संघामध्ये खेळण्यासाठी संधी देण्यात आली. येथेही मनदीपने उत्तम कामगिरी करत अनेक निवड समितीतील सदस्यांचे मन जिंकून घेतले. १४ वर्षांखालील पंजाबच्या क्रिकेट संघात उत्तम कामगिरी करणार्‍या मनदीपची निवड उत्तर भारतातील १९ वर्षांखालील संघातही झाली. यानंतर त्याला पंजाबच्या ‘रणजी’ सामन्यामधून खेळण्याची संधी मिळाली. मनदीपच्या कामगिरीचा धडाका असाच सुरू राहिला.


कालांतराने मनदीप पंजाबच्या संघाचा कर्णधारही झाला. ‘रणजी’ सामन्यांमध्ये खेळताना मनदीपच्या नावावर उत्तम प्रदर्शन केल्याचा विक्रम आहे. मनदीपने ७० सामन्यांमध्ये ४५.४६च्या सरासरीने चार हजार ६२०धावा आतापर्यंत काढल्या आहेत. यामध्ये २४ अर्धशतके आणि ११शतकांचा समावेश असून एकदा द्विशतक ठोकल्याचाही इतिहास आहे. त्याचा हा विक्रम पाहूनच सर्वात आधी कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०१०साली सर्वात पहिल्यांदा त्याला ‘आयपीएल’मध्ये खेळण्याची संधी दिली होती. येथे त्याने चांगली कामगिरी केल्यानंतर २०११सालच्या हंगामात पंजाबच्या संघाने उच्च बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. मनदीप आपल्या परीने उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघासाठी संधी मिळविण्याच्या प्रयत्नांत आहे. पुढील वाटचालीसाठी त्याला ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...!

- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@