अवघे धरु सुपंथ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2020
Total Views |

shubhangi parker_1 &
 
माणूस म्हणून आपण सगळे एकमेकांशी आपल्या जीवित अस्तित्वामुळे जोडले गेले आहोत. थोडक्यात, आपल्या या एवढ्या मोठ्या विश्वात आपण विश्वाच्या अस्तित्वाने संलग्न झालेले आहोत.
 
 
कधी कधी आपल्याला खूप उदास वाटते, तणाव जाणवतो, चिंता सतावते. आपली वेगात असलेली गाडी अचानक ‘ब्रेक’ लागल्यासारखी थांबते आणि पुन्हा चालू होण्यास तयार नसते. आपण स्वत:च्या अनुभवातून ती गाडी पुन्हा सुरु होते का, याचा प्रयत्न करतो. आपल्या कुटुंबीयांची आणि मित्रमंडळींची मदत घेण्याचा प्रयत्न करतो. पण, गोष्टी काही घडत नाहीत, गाडी चालूच होत नाही. या अशा ठप्प झालेल्या गाड्यांच्या घटना आपल्या आयुष्यात अनेक वेळा घडतात. कधी कधी आपण त्यात घुसमटत राहतो. आपला श्वास कोंडला जातो, पण आपल्याला काही करता येत नाही. आपल्या मनात येणार्‍या विचारांवर आणि कल्पनांवर कुठलंही बंधन नसतं. आपण काहीही शक्य-अशक्य किंवा बरे-वाईट विचार करु शकतो. तथापि, आपल्या कृतीवर मात्र अनेक बंधनं आहेत. आपण ज्या कृती करु, त्यामुळे इतर लोकांवर, त्यांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, याचा विचार आपल्याला करावा लागतो. अनेक गोष्टी लॉजिकने पटतात, पण त्या कृतीत उतरविताना मात्र खूप कठीण वाटते. तुम्ही एखादी कृती करता, तेव्हा त्याचा परिणाम इतर लोकांवर वा समाजावर सकारात्मक आणि विधायक होणार असेल, तर ही कृती करण्यास तुम्हालाही मोकळीक मिळते आणि समाजही आडकाठी आणत नाही. परंतु, एखाद्याच्या कृतीने दुसर्‍याच्या आयुष्यात समस्या येण्यार असतील, गुंतागुंत होणार असेल, तर तुम्हाला तरी कृती करायचे स्वातंत्र्य सहजासहजी मिळत नाही. अशा कृतीत सामाजिक निर्बंध अनेक असतात.
 
 
आधुनिक समाजात लोकं वैचारिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून असतात. आपण आज केवळ आपले कुटुंब, शेजारी वा देश, एवढ्यापुरतेच जोडलेलो नाही, तर याही पलीकडे जाऊन व्यावहारिकदृष्ट्या आपण पूर्ण जगाशी जोडलो आहोत. तांत्रिक प्रगतीमुळे तर अधिक तीव्रतेने आपण जोडले गेले आहोत, याची प्रचिती सध्याच्या कोरोना काळात आपल्या सगळ्यानांच येते आहे. आज आपण इतर देशांच्या उपग्रह प्रणालीमुळे कोरोना काळात इतर देशांत काय चालले आहे, आपण काय करायला पाहिजे, आपण किती काळजी घेतली पाहिजे, या गोष्टी सहज समजून घेतो आहोत. इतकेच काय, आपण जे अन्नधान्य खातो, ते आपल्याला अपरिचित असलेल्या लोकांनी कुठेतरी दूरवरच्या शेतात वा कारखान्यात बनविले आहे. आपण जे विविध कर भरतो, त्याचा फायदा आपल्या देशातील कितीतरी लोकांना होत असतो. आपण थोडासा जर विचार केला, तर या लोकांनी जर काम केले नाही किंवा आपण नियमित कर भरले नाही, तर सगळ्यांचेच किती प्रचंड नुकसान होईल! याचाच अर्थ हा की, माणूस म्हणून आपण सगळे एकमेकांशी आपल्या जीवित अस्तित्वामुळे जोडले गेले आहोत. थोडक्यात, आपल्या या एवढ्या मोठ्या विश्वात आपण विश्वाच्या अस्तित्वाने संलग्न झालेले आहोत.
 
 
म्हणजे तुम्ही कुणाचे पुत्र आहात वा कन्या आहात, भाऊ वा बहीण आहात, पती किंवा पत्नी आहात, मालक वा नोकर आहात म्हणून स्वतंत्र व्यक्ती नाही आहात, एक विस्तृत असे मानवी नाते आहे. त्यात माणसाला त्याची कुठलीही छोटी-मोठी कृती करताना, त्या कृतीच्या इतरांवर होणार्‍या परिणामांची शहनिशा केली पाहिजे, त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपण एखादी विवाहित स्त्री पाहतो. ती आपल्या पतीबरोबर अमाप छळ सोसून, अपमान सहन करून कधी त्याचे विवाहबाह्य संबंध स्वीकारून जगत असते. आपल्याला कळत नाही की, ती इतका जुलूम का सहन करते आहे? का ती त्याला सोडून देत नाही? का ती घटस्फोट घेत नाही? या सगळ्या गोष्टी त्रयस्थ म्हणून विचार करायला सोप्या आहेत. तार्किक आहेत. पण, नवर्‍यापासून दूर व्हायच्या कृतीचे तिच्या आयुष्यातील इतरांवर काय पडसाद उमटू शकतात, याचा विचार ती करत असते. नाहीतर ‘आमचं पटत नाही म्हणून आम्ही आईबाबापासून वेगळे झालो’ या एक व्यक्तिगत निर्णयाने आज समाजाला वृद्धाश्रम निर्माण करायची गरज भासते, नाही का?
 
 
जरा विचार करा की, आपल्यावर एकमेकांच्या अस्तित्वाचे बंधन नसेल तर काय होईल? किती अराजकता माजेल? समर्थ माणसे अशक्त, विकलांग माणसावर कब्जा घेतील. जंगलराज निर्माण होईल. शक्तिवानच अधिकार गाजवतील. म्हणून तर एकमेकांवर विश्वसनीयदृष्ट्या अवलंबून असण्याची संकल्पनाच माणसाला सुखसमाधानाचा मार्ग दाखवू शकेल.
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@