उपक्रम ‘वेणा भजनी मंडळा’चा, फंडा ऑनलाईन भजनाचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2020
Total Views |


main_1  H x W:
 


उपक्रम ‘वेणा भजनी मंडळा’चा, फंडा ऑनलाईन भजनाचा! नियमितपणा ही निश्चयाची, आत्मबलाची व यशाची जननी असली तरी त्यासाठी भोवतालच्या परिस्थितीने निराश न होता, ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला हवी. तडजोड कशी करावी, हे जाणणाराच जगावे कसे हे जाणत असतो. याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे अंबरनाथच्या नीलाताई चौधरींनी सुरू केलेला ऑनलाईन भजनाचा उपक्रम...
 
 
कोरोना काळात अंबरनाथच्या नीलाताई चौधरींना काळजी वाटली की, दरमहा एकादशीला भजनासाठी जमा होणार्‍या महिला, आता भजनाच्या चाली विसरतील की काय? त्यांच्या ठाण्याला राहणार्‍या डॉक्टर मुलीला हे कळताच ती म्हणाली, “आई, गेल्याच वर्षी आपण दोघीही प्रथमच वारीला जाऊन आलो तेव्हा,दिंडीतील एक माऊली म्हणाले होते की, ते दर एकादशीला हरीपाठ ऑनलाईन घेतात. मग सद्यस्थितीत आपणही त्यांचे अनुकरण करू.” यावर लगेच नीलाताईंनी तसे करण्यासाठी येणार्‍या संभाव्य अडचणी, शंका-कुशंकांचा पाढाच वाचून दाखविला. त्यांची लेक उत्तरली, कोणत्याही नव्या गोष्टी करण्यात नेहमीच अडचणी येतात, पण करीत राहाल तर त्यावर तोडगाही सापडत राहील. अन् अगदी असेच झाले. भजन बंद पडले नाही. काहीजणींकडे स्वत:चा वा घरातही उपयुक्त मोबाईल नव्हते. इंटरनेटचाही प्रश्न छळत होता. मात्र, यावर मात करून तांत्रिक बाबींची पूर्तता करून, व्याप्ती वाढत गेली. कुटुंबीयांचेही साहाय्य लाभले. भजन म्हटले की, टाळ आलेच. पण, मोबाईल हातात घेऊन टाळ वाजविता येत नव्हते. तोडगा निघाला, ज्याला शक्य आहे त्याने लॅपटॉप समोर ठेवला व मग टाळ हातात घेतले. एकेक करून सर्वजणी ऑनलाईन भजनाला हजेरी लावू लागल्या. १५-१६ जणी, सोयीच्या वेळेत सायं. ४ ते ५.३० भेटू लागल्या. गणेशोत्सव, नुकत्याच संपलेल्या नवरात्रात, अनेक घरी त्यांनी आमंत्रणे आल्याने, ऑनलाईन भजनेही आनंदात पार पडली. घरात राहूनही भजनानंद मिळणार्‍या या नव्या तंत्रज्ञानालाही त्या आता सरावल्या. वेळ सत्कारणी जाऊ लागला. या लक्षवेधी उपक्रम करणार्‍या मंडळाचा हेतू, प्रेरणा, वाटचाल इत्यादी जाणून घेऊया.
 
 
 
अंबरनाथच्या पूर्वेला कानसई विभागात, मुरलीधराचे मंदिर आहे. तेथील ती अक्काताई वेलणकर या सर्वांच्या स्फूर्तिस्थान, महाराष्ट्र ते दिल्ली अनेक महिलांना अध्यात्मात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्ती गेली तरी तिचे कार्य पुढे चालू राहिले पाहिजे, हे सूत्र घेऊन त्यांच्या पश्चात सिंधुताई पन्हाळे या पुढे सरसावल्या. पश्चिमेला औद्योगिक वसाहतीत, त्यांनी वेणा समुदाय स्थापन केला. महिलांच्या भजनास सुरुवात केली. महिला संघटन अस्तित्वात यावे म्हणून स्वत:च पुढाकार घेऊन, अभंग निवडणे, चाली लावणे, दर बुधवारी एकत्र करणे, एकादशी, मोठे सण-उत्सव यातून येणार्‍याच्या प्रत्येक घरी, वस्तीत जाऊन, भजने गायली. वर्षअखेरीस घरातील सर्व व्यक्तींना बोलावणे जाई. सांस्कृतिक कार्याला सामाजिक कार्याची जोड दिली. त्या सर्वांच्या आई झाल्या. प्रत्येक महिलेच्या जन्मदिनी औक्षण होई. विधवा स्त्रियांना मानाने बोलावून आरतीचे ताट दिले जाई. डोक्यात गुलाबाचे फूल खोवले जाई. दर बुधवारी दासबोध पठण होई. पत्राने सात-आठ जणींकडून दासबोध परीक्षांना बसविण्यास प्रोत्साहन दिले. समर्थ संप्रदायाप्रमाणे भिक्षा मागून, धान्य व निधी गोळा करण्यात सर्व सहभागी होत. भजन करायला आपापल्या खर्चाने जाउन, मिळणारी बिदागी, मंडळाकडे जमा करण्याचा रिवाज त्यांनी सुरू केला. वर्षातून किमान दोनदा सहली होत व विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसात त्या ‘फूल’ होत. शेवटी जीपसारखी वाढीव वाहने घ्यावी लागत. सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्री त्यांनी सद्गुरू वेलणकर अक्का यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदानासाठी व सामाजिक संस्थांना भेटी देऊन त्यांची गरज लक्षात घेऊन तेथेही मदत केली आहे. अशा ठिकाणी भजन म्हणण्याचा प्रघातही त्यांनी ठेवला आहे. तसेच अक्काताईंचे भागवत कथन करणारे व्यासमुनींचा वारसा चालविणारे आठ-दहा जण सिंधुताईंनीही तयार केले. आपापल्या मूळ गावी भजन व भागवत ठेवून कृतार्थ करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असतो, यात शंका नाही. वाझेताई या अंगणवाडी शिक्षिका व अन्य महिलांना सतत प्रोत्साहन सतत मिळाल्याने सर्वजणी अध्यात्मात मग्न आहेत. नीलाताई चौधरी या विवाह करून अंबरनाथला आलेल्या, त्या २००४ नंतर वाजेताईंसह मंडळाची धूरा सांभाळत आहेत. आपल्या रसाळ वाणीने अनेकांना तृप्त करीत अद्याप सुमारे १७५ भागवत सप्ताह, निरूपण करून यशस्वी केले आहे.
 
 
बदलापूर येथे तर त्या सात वर्षे भागवताला येतात. हा उपक्रम औद्योगिक वसाहतीत सुरू झाल्याने, कष्टकरी, बहुजन समाजाच्या महिलांच्या जीवनात, जणू नव्या आशेचा किरण उगवला. सिंधुताईंनी, महिलांबरोबरच मुलांच्याही स्पर्धा ठेवल्या. संघटनेत साचलेपण येऊ न देता नावीन्याचीच वाट पकडली. कोरोना काळातही गडबडून न जाता, भक्तीचे तेल घालून ऑनलाईन भजनाची ज्योत तेवत ठेवली आहे. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी संपर्क अधिक माहितीसाठी नीलाताई चौधरी:- ९००४३ ७९७१८,लिलावती वाजेताई:-९३२४७७२७१३ संपर्क करावा. कोरोना काळात देऊळ बंद आहे. मात्र आधुनिक मार्गाचा अवलंब करत, समाजाला एकत्रित बांधणार्‍या या उपक्रमाचे महत्व शब्दातीत आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@