कृत्रिमपणा टाकून नैसर्गिकपणे जगा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2020
Total Views |

health_1  H x W
 
संतुलित, पोषक आहार घ्या. आपल्या आजुबाजूचे वातावरण पोषक, संतुलित, आनंदी ठेवा. खूप हसा अन् हसवत राहा. मिळून मिसळून राहा. जे वाटते ते शांतपणे सौम्य शब्दांत व्यक्त करा. समजवा आणि समजून घ्या. या आणि केवळ याचमुळे शरीर आणि मनाचे स्वास्थ्य जपले जाईल. कृत्रिमपणा टाकून नैसर्गिकपणे जगा.
 
 
आपण आजारी का पडतो, याचा कधी विचार केलाय का? आजारी पडण्याची दोन कारणं असतात. एक म्हणजे, शरीरात काहीतरी बिघाड होऊन किंवा बाहेरून काही त्रास होऊन म्हणजे संसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग आपण काही काळजी घेऊन टाळू शकतो, तसंच शरीरांतर्गत आजारही आपण आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर टाळू शकतो. आज आपण बघतोय प्रत्येक जण धावतोय, जगण्यासाठी धडपडतोय, पण जगण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, पैशाची की शरीराची? प्रश्नच आहे ना! जगण्यासाठी पैसा जितका महत्त्वाचा आहे, त्याहीपेक्षा जास्त शरीर आहे. कारण, शरीर जर सुदृढ असेल, निरोगी, सक्षम असेल, तरच काम करु शकेल, सहजपणे धावपळ करु शकेल. आजचच उदाहरण पाहा ना, आज जगातले सगळे व्यवहार थांबले आहेत, एक प्रकारची भीती ही प्रत्येकाच्या मनात आहे. जो तो आपली प्राणशक्ती वाढवण्याकडे कल देतो आहे. बरोबर ना? कशासाठी? तर आजारी पडू नये म्हणून. पण, मग हीच काळजी आपण आधीच घेतली असती, तर ही भीती आपल्या मनात राहिलीच नसती. आपण कोणताही विचार न करता नुसते धावत होतो, पण आता जगाला स्वच्छतेचे महत्त्व कळले आहे. संस्कारांची नव्याने ओळख झाली आहे. नव्याने अशासाठी की, आपण ती विसरलो होतो त्याचं महत्त्व नव्हतं किंवा पटलं नव्हतं. असो.
 
 
अंतर्बाह्य स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे आणि अस्वच्छ राहूच नये म्हणून काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. जसं बाहेर आपण कचरा टाकला तो साचत गेला, तर जशी दुर्गंधी पसरते आणि पर्यायाने रोगराई पसरते, खरं आहे ना! हे जसं बाहेर होतं, तसंच आतही होतं. तुम्ही म्हणाल ते कसं? बघा, आपण जेवणाच्या वेळा पाळतो का? वेळच्या वेळी पाणी पितो का? वेळच्या वेळी झोपतो का? उठतो का? व्यायाम करतो का? या सगळ्यांची उत्तरे शोधा. बरोबर ना! आपण जेवताना पाणी किती पितो, तिखट किती खातो, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ यांचे प्रमाण आहारात किती आहे, हेही महत्त्वाचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? माहिती आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूक नसताना खाणे! तुम्ही म्हणाल याचा काय संबंध? आज सगळ्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. मनाचा समतोल ढळला आहे. मनावर अनेक गोष्टींचे ताण आहेत, समस्या आहेत. प्रत्येकजण ग्रस्त आहे आणि जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतो, तेव्हा भूक नसतानाही आपण खातो. खरं आहे ना आणि तेव्हा आपल्याला चटपटीत खायला आवडतं, पटतंय का? या सगळ्याचे परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होत असतात. उभं राहून घटघट पाणी पिणे, फ्रिजमधील थंडगार पाणी पिणे, कमी पाणी पिणे या सगळ्याचाही परिणाम होत असतो. एका जागी बसून शांतपणे मांडी घालून (शक्य असल्यास) तोंडात घोळवून मगच पाणी प्यायल्यास ते पचनसंस्थेचे कार्य वाढवण्यास मदत करते. जेव्हा आपण तोंडात घोळवून पाणी पितो, तेव्हा लाळ जास्त प्रमाणात तयार होते. लाळमिश्रित पाणी पोटात जाते आणि पचनाला मदत करते, तसेच जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा शांतपणे चावून चावून त्याचा रस करून खाल्ले असता, जास्तीत जास्त लाळ त्यात मिसळते आणि असे अन्न सहज पचते. जी प्रक्रिया अन्न शिजवताना बाहेर आपण करतो, तीच प्रक्रिया शरीरातदेखील होते. दोन्ही जेवणांमध्ये किमान किमान सहा तासांचे अंतर आवश्यक आहे, जेवताना पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी अर्धा तास आधी पाणी प्यावे आणि जेवल्यानंतर ताक प्यावे किंवा लिंबू घातलेले गरम पाणी प्यावे. साधे पाणी किंवा फक्त पाणी हे किमान अर्ध्या एक तासानंतर प्यावे. जेव्हा भूक लागेल तेव्हाच खावे. पूर्ण पोटभर खाऊ नये. थोडीशी जागा शिल्लक ठेवावी. भूक नसताना खाऊ नये. जेवण झालं आहे आणि छान पदार्थ समोर आला म्हणून, आवडतो म्हणून, राहावलं नाही म्हणून उगाचच खाऊ नये. त्याने पचनसंस्थेवर अधिक भार येतो, हा अधिक भार समस्या निर्माण करतो. आपण खाल्ल्यानंतर त्याचे रसात रूपांतर होऊन तो रस शरीरामध्ये सर्वत्र रक्तामार्फत पोहोचवण्याचे काम केले जाते. जे आवश्यक नसते ते गाळून बाहेर फेकले जाते. जर आपण जास्त अन्न खाल्ले तर या प्रक्रियेत बिघाड होतो. अडथळा निर्माण होतो आणि मल साठत जातो. पर्यायाने पोटामध्ये गडबड सुरू होते आणि ही गडबड पूर्ण शरीराला त्रासदायक ठरणारी असते. सगळ्यांचं कार्य बिघडून जाते. जसं मशीनच्या एका पार्टमध्ये, भागामध्ये बिघाड झाला तर पूर्ण मशीन थांबतं, बिघडतं, त्याचप्रमाणे आपल्या शरीराचंदेखील आहे. त्याचंही काम यंत्रवत सुरू असतं. आपण वेळच्या वेळी योग्य प्रमाणात त्याला इंधन पुरवत गेलो, तर त्यात बिघाड होईल का? नाही ना! म्हणजेच आपणच कारणीभूत आहोत, आजारी पडायला. जन्मतः आपल्या शरीरामध्ये कोणताही रोग नसतो, आजार नसतो, परंतु, आपल्या चुकीच्या सवयी या आपल्यालाच घातक ठरतात. जसा बाहेर जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो, तसाच तो आतही वाढतो आणि शरीर आजारी पडतं. शरीर आजारी पडायला जसा आहारविहार कारणीभूत आहे, तसंच मनही कारणीभूत आहे.
 
 
 
वेळच्या वेळी मनातील सार्‍या गोष्टी बोलून बाहेर काढून टाकल्या नाहीत, तरी त्याचे विपरीत परिणाम शरीराला भोगावे लागतात. योग्य प्रमाणात पाणी प्यायले नाही, तर शरीर आजारी पडते. आपला प्राण हा अन्नमय आहे आणि योग्य प्रमाणात योग्य आहार घेतला, तरच तो प्राण सुरक्षित राहील. त्याची शक्ती र्‍हास पावणार नाही आणि तिच्या वाढीसाठी आपल्याला उपाय करावे लागणार नाहीत, औषधे घ्यावी लागणार नाहीत. आहार हेच औषध आहे, पण तो योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतला गेला, तर म्हणून पूर्वजांनी घालून दिलेले नियम हे खूप महत्त्वाचे आहेत. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, प्राणायाम करणे, दीर्घ श्वसन करणे, (मनाच्या शांतीसाठी) परमेश्वराचे ध्यान करणे म्हणजे ध्यानसाधना करणे ज्याला आपण ‘मेडिटेशन’ म्हणतो, ते तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता. तसेच शरीर स्वच्छ ठेवणे आतून आणि बाहेरूनही खूप महत्त्वाचे आहे. आपल्या आहारामध्ये मसाल्यांचा वापर योग्य प्रमाणात असावा, अन्यथा अल्सर, कर्करोग यांसारखे आजार उद्भवू शकतात. कारण, अति तेलकट, तिखट पदार्थ हे पित्त वाढीस कारणीभूत असतात आणि हे वाढलेले पित्त आपल्या शरीराला त्वचेला दाह निर्माण करते. डोळ्याची आग होणे, पोट साफ न होणे, मूळव्याध होणे, गॅसेस होणे, अस्वस्थ वाटणे, बेचैन वाटणे, भीती वाटणे, चिडचिड करणे, खूप राग येणे, संशय येणे, मळमळणे, जळजळणे, शरीरात चमका येणे आणि हळूहळू सांधे आखडणे यांसारखे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आजार उद्भवतात. आपण म्हणतो, क्रोध हा आमचा अनुवांशिक आहे, पण तो घालवण्यासाठी आपण आपला आहार बदलत नाही, आपले विचार बदलत नाही आणि अनेक व्याधींना आपण जन्म देतो. संसर्गजन्य आजार हे लवकर होऊ शकतात आणि आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचत जातो, संपत जातो. पूर्वीचे लोक आहार चांगला होता म्हणून खूप वर्ष निरोगी जीवन जगले, असे आपण म्हणतो. पण, त्याचबरोबर त्यांची जीवनशैली आपण अगदी सोयीस्करपणे विसरतो. त्यांची दिनचर्या ही आखीवरेखीव होती. त्यांच्या दिनचर्येत, कष्टात प्रमाणबद्धता होती, नियम ठरलेले होते, ठरलेल्या वेळीच ठरलेल्या गोष्टी ते करत होते. त्याच्या बाहेर ते कधीच गेले नाहीत, बाहेरचं खाणं नव्हते, संध्याकाळच्या आत जेवायचे आणि रात्री लवकरच झोपायचे. घरातली कामं करताना त्यांचा आपोआप व्यायाम व्हायचा. आज बैठे काम जास्त आहे. घरात अनेक यंत्र. या सगळ्यांमुळे आपण स्वतः स्वतःचे नुकसान करत आहोत. पैसा आहे, पण खायला वेळ नाही म्हणून अयोग्य आहार पोटात जातो. पैसा आहे, पण समाधान नाही. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडतंय. पर्यायाने शरीर स्वास्थ्य बिघडवून घेतो, फिरुन पुन्हा तेच. नेहमी बरेच जण म्हणतात, काय म्हणतात? मी माझ्या पोटात काय काय साठवून ठेवलं आहे, कोणालाच माहिती नाही, खरंय ना? अहो, हे साठवलेलंच तुमच्या आजारपणास कारणीभूत आहे. हे आपण लक्षातच घेत नाही. उगाचच विचार करून त्रासून, शरीराचं तापमान वाढवत राहतो, संतुलन बिघडवून घेतो, पोटाचा घेर वाढवत राहतो आणि आजारांना निमंत्रण देतो.
 
 
पोट साफ ठेवण्यासाठी शरीर आणि मन दोन्हीची काळजी घेतली पाहिजे. शरीरासाठी योग्य आहार योग्य प्रमाणात घेतला गेला पाहिजे आणि मानसिक शांती-समाधान सतत असले पाहिजे. पोट स्वच्छ तर शरीर स्वच्छ आणि आजारपण येणे खूप कठीण! प्राणशक्ती वाढीस लागेल, तिचा र्‍हास होणार नाही आणि आपण आजारी पडणार नाही म्हणून मनाने आणि शरीराने संतुलित राहणे, हे खूप गरजेचे आहे. प्राण म्हणजे ऑक्सिजन, प्राणवायू. तो अनमोल आहे आणि त्याचा शरीरात योग्य संचार व्हावा म्हणून पाणी आवश्यक आहे. कारण, तेच वाहक आहे. प्राणवायूचे योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य रीतीने याचा शरीरातील साठा संपला, तर बाहेरून कितीही दिला, देण्याचा प्रयत्न केला तरी तो निष्फळ आहे म्हणून आणि म्हणूनच त्याला जपण्यासाठी, संतुलित ठेवण्यासाठी नैसर्गिक जीवन जगा. संतुलित, पोषक आहार घ्या. आपल्या आजुबाजूचे वातावरण पोषक, संतुलित, आनंदी ठेवा. खूप हसा अन् हसवत राहा. मिळून मिसळून राहा. जे वाटते ते शांतपणे सौम्य शब्दांत व्यक्त करा. समजवा आणि समजून घ्या. या आणि केवळ याचमुळे शरीर आणि मनाचे स्वास्थ्य जपले जाईल. कृत्रिमपणा टाकून नैसर्गिकपणे जगा. कारण, शरीरासोबत मनाच्या गरजा ही खूप महत्त्वाच्या आहेत. त्या समजून घेऊन जगा. आजारपण येताना दहा वेळा विचार करेल म्हणजे येणारच नाही.
 
 
- सीता भिडे
 
 
@@AUTHORINFO_V1@@