‘कोरोना’ काळातील मला भावलेले ‘कोरोना योद्धे’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2020
Total Views |

Corona yoddha_1 &nbs
 
 
‘सेवा परमोधर्म:’ या विचारांनुसार कोरोना काळातही तन-मन-धन अर्पूण समाजसेवा करणार्‍या कोरोना योद्धयांना वंदन. या वर्षाच्या सुरुवातीपासून जगभरात कोरोना नावाच्या विषाणूने जो काही धुमाकूळ घातला आहे, त्याने सकल मनुष्यजातीलाच नि:शब्द केले आहे. अशा परिस्थितीत अनेक जण जिवावर उदार होऊन कोरोना काळात सेवाकार्य करत होते आणि करत आहेत. त्यापैकी काही सेवाभावी व्यक्तींच्या कार्याचा इथे मागोवा घेत आहे. अर्थात त्यांच्या कार्याला शब्दही कमीच पडतात.
 
 
 
भारतातदेखील मार्च महिन्यापासून विषाणूने प्रवेश केला आहे. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीला तोंड देता देता चंद्रावर पोहोचलेला आणि बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा मनुष्य त्याच्या पुढे हतबल झाला. या संसर्गजन्य रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरण प्रक्रिया गरजेची आहे. ते तडकाफडकी होणारे काम नव्हे. निसर्गाने आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून दिली आहे. अजूनही वेळ निघून गेली नाही. स्वतःसोबत इतरांचेही प्राण वाचवण्यासाठी सरकारने ‘लॉकडाऊन’सारखा निर्णय घेऊनदेखील कोरोनाने आपले अजून ठाण उठवले नाही. मोठमोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्डबॉय हे आपल्या सुरक्षिततेसाठी आणि बचावासाठी माहितीपर ऑडिओ-व्हिडिओ पाठवत होते नि आहेत. कोरोना रुग्णांची योग्य देखभाल करत आहेत. पोलीस यंत्रणा, महानगरपालिकेचे कर्मचारी वर्ग, परिचारिका, पोस्टमन, बँक कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवा असणार्‍यांनी आपले कार्य सुरूच ठेवून स्वतःची काळजी घेत दैनंदिन कामकाज पाहिले. महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या घरोघरी जाऊन घराचे, इमारतीचे, परिसराचे निर्जंतुकीकरण करून आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. घरोघरी जाऊन मास्क, आर्सेनिकच्या गोळ्या, सॅनिटायझरचे वाटप केले. तसेच त्यांचा वापर कसा करायचा, स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, याचे धडे दिले. एवढे सगळे करूनही कोरोनाग्रस्त झालेल्या रुग्णांना त्यांनी दवाखान्यात पोहोचवण्याचे काम करत असतानाच पूर्ण घर, परिसर, बिल्डिंग, इमारती सर्व टेस्टिंग करून घेतल्या गेल्या. योग्य काळजी घेतल्यानंतर कोरोनाबाधित होत नाही किंवा झाल्यानंतर ही काय काळजी घ्यायची, न घाबरता त्याचा सामना कसा करायचा हेही शिकवले गेले. स्वतःच्या जीवावर उदार होऊन या लोकांनी समाजासाठी जे हे काम केलेले आहे हे नक्कीच प्रशंसनीय आहे. आपण आपल्या घरात सुखात, सुरक्षित आयुष्य जगत असतानादेखील डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस वर्ग बाहेर फिरून लोकांना योग्य अंतर राखणे, गर्दी टाळणे, संपर्क टाळणे, जास्तीत जास्त घरातच बसून राहणे याविषयी मार्गदर्शन करत फिरत होते. अशा अनेक उदाहरणातून बर्‍याच लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही ते आपल्या कार्यापासून ढळले नाहीत. समाजाचे आपण काही देणं लागतो ही जाणीव ठेवून त्यांनी समाजासाठी आपल्या कुटुंब आणि घराचा विचार न करता सर्वतोपरी सहकार्य केले आहे. अशा माझ्या अनुभूतीतील किंवा मी पाहिलेल्या ‘कोरोना योद्ध्यां’च्या उदाहरणांचा मी आज माझ्या लेखणीद्वारे ऊहापोह करत आहे. ज्यांनी कोरोना काळातील ‘लॉकडाऊन’ परिस्थितीत प्रत्यक्ष जे काम केले आहे. त्यातील पहिले उदाहरण म्हणजे पेशाने पोलीस असणार्‍या, पण मनाने हळव्या असणार्‍या अशा पोलीस खात्यातील लेखिका, कवयित्री आणि थोर समाजसुधारक अशा संगीता माने होय.
 
 
२७ मार्चपासून त्यांनी रस्त्यावर उभे राहून ‘लॉकडाऊन’ काळातही लोकांनी सुरक्षित कसे जगायचे किंवा रस्त्यावरील येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांची तपासणी करून, गाडीतील लोकांना योग्य संदेश देत गेले पाच महिने त्या हे कार्य करत आहेत. आपले घर, संसार, मुलेबाळे सर्व सांभाळून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. याच परिस्थितीत गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची बाधा झाली. जवळजवळ १५-१७ दिवस त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तरीही त्यांनी धीर खचून देता रुग्णालयातील सर्व सहरूग्णांना न घाबरता आलेल्या संकटावर मात करण्याचे शिकवले. त्यांनी आपला वाचनाचा-कविता लेखन लिहिण्याचा छंद रुग्णालयातदेखील सोडला नाही. सकारात्मक विचारसरणीच्या संगीता मानेंनी इतर रुग्णांनाही सकारात्मक विचार करण्यासाठी प्रवृत्त केले. आपल्या कवितांद्वारे त्यांचे मनोरंजन केले. प्रबोधन केले आणि काळजी घेण्यासाठी, सुरक्षित जीवन जगण्यासाठी धडे दिले. १५-१७ दिवस घराबाहेर राहावे लागल्यानंतर आपल्या घरच्यांची जी ओढ वाटते त्यामुळे मनात नैराश्य येते, त्याचे सावट दूर करून त्यांनी आपल्या लिखाणाचे व्रत रुग्णालयातही कायम राखले.
 
 
माझ्या पाहणीतील दुसरे ‘कोरोना योद्धे’ म्हणून मुंबईतील महानगरपालिका कर्मचारी हरिश्चंद्र धिवर( मुकादम )यांचे नाव घ्यावे लागेल. कोरोना ‘लॉकडाऊन’च्या या कठीण काळात अगदी सुरुवातीपासून गेले सहा महिने साहाय्यक मुख्य पर्यवेक्षक शिंदे साहेब, पर्यवेक्षक पांचाळ साहेब आणि रमेश परमार साहेब यांच्या सूचनेनुसार आणि कनिष्ठ अध्यक्ष अनिल बोरीचा यांच्या सहकार्याने त्यांच्या नियंत्रणासोबत मुकादम जनार्दन मगरे आणि अशोक मेकवान असे मिळून कंत्राटी कामगारांना बरोबर घेऊन प्रत्येक कोरोना रुग्णांच्या घरी, आवारात, सोसायटीत, चाळीत सॅनिटायझर पवारणी केली. विशेष असे की, त्यांनी कोणतेही सुरक्षेचे साधन न वापरता फक्त मास्क आणि सॅनिटायझर वापरून पेशंटला ठेवलेल्या रूममध्ये जाऊनदेखील त्यांनी त्या जागा निर्जंतुक करून घेतल्या आहेत. प्रत्येक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती घेतली. रुग्णाशी नि त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करून कोरोनाशी लढा देण्याविषयी हिंमत निर्माण केली. घाबरून जाऊ नका, बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क टाळा, आपण या महामारीच्या संकटातून सुरक्षित बाहेर पडू, असे सांगून त्यांचे मनोधैर्य वाढवत राहिले. सहा महिने त्या रुग्णाशी त्यांचा अगदी जवळून संपर्क आला. घरातदेखील त्यांनी वेगळी रूम न वापरता कुटुंबासोबतच राहून मास्क आणि सॅनिटायझर वापरून स्वतःची काळजी घेतली. त्यांची पत्नी आणि मुलाचे त्यांना त्या बाबतीत खूप सहकार्य मिळाले. कोरोना रुग्णांची वेळोवेळी मदत केली. त्यांनी आजपर्यंत एकही सुट्टी न घेता सलग सहा महिने आपले कर्तव्य पार पाडले आहे. आताही त्यांचा कंबर कसून कोरोनाला पराजित करण्यासाठी लढा चालूच ठेवला आहे. जनतेच्या, शासनाच्या आणि महापालिकेच्या सूचनांचे पालन करत आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून असेच सर्वांशी सहकार्य करत राहिलो तर कोरोनासारख्या घातक महामारीलादेखील आपण परतवून लावू शकतो. हे या ‘कोरोना योद्ध्यां’नी आपल्या वर्तनातून सिद्ध करून दाखवले आहे.
 
 
लोणंदसारख्या एका गावात डॉ. अविनाश शेळके नावाच्या अवलियाने आपल्या गावातील सर्व लोकांचे कोरोना काळात ‘लॉकडाऊन’ असूनदेखील ‘टेस्टिंग’ करून त्यांना त्या काळात स्वतःची काळजी कशी घ्यायची, मास्क आणि सॅनिटायझर लावून गर्दीचा संपर्क कसा टाळायचा, आर्सेनिकच्या गोळ्या मोफत वाटून योग्य प्रशिक्षण दिले आहे. तसेच कोरोनाग्रस्त लोकांवर योग्य ते औषधोपचार करून त्यांना जगण्यासाठी हिंमत दिली आहे. कोरोनाची बाधा होऊनदेखील आपण त्याच्यावर कशी मात करू शकतो, हे त्यांनी बाधित रुग्णांना सांगितल्यामुळे त्या रोगाची भीती वाटू न देता लोक ‘पॉझिटिव्ह’ विचार करून बरे झालेले आहेत.
मुंबई महानगर येथील विक्रोळीसारख्या उपनगरात असणारे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. वायकुळे यांचे कार्यदेखील उल्लेखनीय आहे. त्यांनीदेखील या काळात रुग्णांना योग्य ते उपचार करून त्यांचे मनोधैर्य राखण्याचे काम केले आहे. त्यांच्या या संपर्क आणि सेवेतून त्यांना कोरोनाची बाधा झाली. परंतु, आपल्या निश्चयावरून न ढळता त्यावर मात करत त्यांनी ‘निगेटिव्ह’ झाल्यानंतरही आपले कार्य नव्याने सुरू केलेले दिसून येते. कोरोना काळात विक्रोळीमधील भाजप रा. स्व. संघ यांच्या सहकार्याने दररोज तीन हजार अन्नाचे पॅकेट्स बनवून विक्रोळी, कांजूर परिसरात वितरण करणारे सुरेश गंगादयाल यादव यांचे कोरोना काळातील सेवाकार्य अतुलनीय आहे. हजारो लोकांना रेशनचे किट वाटप केले. का. मनोज कोटक यांच्या माध्यमातून विक्रोळी परिसरात मध्यवर्ती ठिकाणी दहा मेडिकल कॅम्प आयोजित केले. या आरोग्यसेवेचा लाभ हजारो लोकांनी घेतला. ज्यावेळी खासगी दवाखानेही बंद होते तेव्हा सुरेश डॉक्टरांना भेटले आणि डॉक्टरांना ‘पीपीई किट’चे वितरण केले. दवाखाने सुरू झाल्यानंतरसुद्धा हजारो लोकांना मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या असे वाटप केले. या काळात कोरोनाग्रस्त परिवाराला लोक वाळीत टाकत. त्यांच्या मदतीला कोणी जात नसे. अशा वेळी सुरेश यादव यांनी रुग्णांना दवाखान्यात नेणे, त्यांच्या कुटुंबांना जी लागेल ती मदत केली. पवईला ‘क्वारंटाईन सेंटर’ आहे. सुरुवातीला येथील व्यवस्था विस्कळीत होती. तिथे भेट देऊन त्यांनी तेथील व्यवस्था सुरळीत लावली. बिग बजारकडून गरजू लोकांना मोफत रेशन मिळवून दिले. त्यांनी आपल्या काही वस्तीतल्या १२/१२ मुलांच्या मिळून टीम्स बनवली. ही टीम तन-मन-धन अर्पण करून काम करायची. त्यात देवेंद्र डोके, प्रितेश पटेल, दुर्गा पांडा, शंकर नायडू यांची टीम होती. उत्कल मित्र मंडळ, आरंभ मित्र मंडळ आणि स्वंयम महिला मंडळासह अनेक संघटना यावेळी या टिमसोबत जोडले गेले. हे सगळे करताना सुरेश यादव आणि त्यांची टीम सर्वच आजारी पडले. कोरोनासदृश्य लक्षणं दिसू लागली. त्या न विचलित होता कोरोना नियम पाळून स्वतःला निरोगी बनवले. सुरेश यादव म्हणतात की, ” समाजाची वाताहत झाली. आम्हाला असे वाटले की, समाजाचे देणे फेडण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे आजारी पडल्याच्या पहिल्या दिवसापासून हेच ठरवले की आपण लवकर बरे व्हायचे. कारण, सगळे जण आजारी पडून राहिले तर कोरोना काळात सेवाकार्य बंद पडेल. म्हणून आम्ही १२-१२ युवकांचे ग्रुप बनवले होते. एक ग्रुप आजारी पडला की, दुसरा ग्रुप काम करायचा. त्यामुळे आमचे काम कधीही थांबले नाही. या कामात खा. मनोज कोटक, जनकल्याण, रास्वसंघ यांचे योगदान मोठे आहे” एकंदर सुरेश यादव आणि त्यांच्या टिमची समाजशिलता, समाजनिष्ठा आणि समाजकार्य थक्क करणारे आहे. आजही या टिमचे काम सुरू आहे. कुणाला जर काही माहिती हवी असेल तर सुरेश यांदव -८४२२००४८८८ किंवा प्रितेश पटेल - ९१७२३६४८४७ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. विक्रोळी परिसरातील या टिमने समाजसेवेचा एक नि:स्वार्थी आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आज जगभरात अनेक जण आपापल्यापरीने कोरोनाशी लढायला सिद्ध झाले आहेत. त्या सगळ्यांबद्दल लिहणे तर शक्य नाही. पण, मी स्वत: पाहिलेले कोरोना योद्धयांविषयी लिहणे हे माझ्यापरीने समाजशिलताच आहे. त्यामुळे या सर्वांच्या कामाचा मी संक्षिप्त स्वरूपात तपशिल दिला आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@