‘अंकुश’ परिस्थितीवर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2020   
Total Views |

Ankush Shinde_1 &nbs
 
 
केवळ स्वअध्ययनाच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षेत ५८७ गुण प्राप्त करणार्‍या नाशिकच्या अंकुश शिंदे याचा संघर्ष खरंच कौतुकास्पद आहे. त्याच्याविषयी...
 
 
विद्यार्थीदशेतच आपल्या जीवनातील परिस्थितीवर ‘अंकुश’ निर्माण करण्याचे कार्य नाशिक जिल्ह्यातील पळसे या खेडेगावात वास्तव्यास असणार्‍या एका युवकाने केले आहे. त्याचे नाव अंकुश भाऊसाहेब शिंदे. अंकुशचे वडील औषधीवाटपाचे काम करतात, आई शेतात मोलमजुरी, पाठीशी लहान भाऊ, अशी अंकुशची कौटुंबिक पार्श्वभूमी. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबीय असल्याने हलाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करते आहे. अशावेळी वडील औषधीवाटपाचे जे काम करतात, त्यामुळे अंकुशला प्रेरणा मिळाली. वडील जरी औषधीवाटप करत असले, तरी आपण डॉक्टर होऊन गरिबांची सेवा करावी, या हेतूने अंकुश वैद्यकीय परीक्षेच्या तयारी लागला. त्यातच आजी दगुबाई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी आजीला झालेल्या वेदना आणि तिचे असणारे दु:ख अंकुशने अनुभवले, त्यामुळे त्याने हृदयविकारतज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मग सुरू झाला स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अविरत ध्यास असणारा प्रवास. वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असणारी ‘नीट’ ही पात्रता परीक्षा देण्याचा निश्चय अंकुशने केला. मात्र, त्यासाठी आवश्यक असणार्‍या कोचिंगचा खर्च हा न परवडणारा होता. अब्दुल कलाम यांना आदर्श मानणारा आणि त्यांच्या जीवनसंघर्षाचा आदर बाळगणार्‍या अंकुशने स्वअध्ययनाचा निर्णय घेतला. नवोदय विद्यालयात शिक्षण झाल्याने त्या क्रमिक पुस्तकांची शिदोरी अंकुशच्या जवळ होतीच. ‘नीट’साठी आवश्यक असणारी काही पुस्तके त्याने मात्र चार हजार ते पाच हजार रुपये खर्च करून विकत घेतली. दररोज किमान १२ तास मनपाठ एक करून, त्याने अभ्यासाला सुरुवात केली. हे अभ्यासाचे व्रत त्याने सलग दहा महिने इमानेइतबारे पाळले.
 
 
फावल्या वेळेत ‘नीट’ परीक्षेसाठी आवश्यक असणारे व्हिडिओ तो युट्यूबच्या माध्यमातून पाहत असे. म्हणजे २४ तासांपैकी झोपेचे सहा तास वगळता अंकुश ‘नीट’ परीक्षेच्याच विचारात आणि तयारीत व्यग्र असे. एखादे संत किंवा ऋषीमुनी जसे ईश्वराला प्रसन्न करण्याकामी सातत्याने आराधना करत असतात, तशीच साधना जणू अंकुशने या काळात ‘नीट’ परीक्षा पास होण्याकामी केली. या परीक्षेत अंकुश केवळ पासच झाला नाही, तर त्याने चक्क ७२० पैकी ५८७ गुण प्राप्त केले आहेत. तेही कोणताही क्लास नसताना, हे विशेष. आजमितीस बाजारात विविध स्पर्धा परीक्षांसाठी लाखो रुपये शुल्क जिथे आकारले जाते. तिथे अंकुशने मात्र, चार ते पाच हजारांत हे यश संपादित केले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अंकुशचे उदाहरण नक्कीच पथदर्शक आहे. "‘नीट’ची तयारी करण्याऐवजी पदवीला प्रवेश घेत आपले शिक्षण पूर्ण करणे सहज सोपे होते. हा पर्याय तू का नाही निवडलास,” असे अंकुशला विचारले असता, तो सांगतो की, “हे बरोबर आहे. मात्र, आजमितीस भारताला आरोग्यक्षेत्रात मोठे काम होण्याची आवश्यकता आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य अबाधित असणे आणि प्रत्येक नागरिकाला आरोग्याचे कवच उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ रुग्णसेवा आणि रुग्णचिकित्सा यासाठी मी वैद्यकीय पेशात येण्यासाठी आग्रही आहे.” कमी वयात प्रगल्भ असणारे हे विचार नक्कीच प्रेरणादायी ठरतात. केवळ वलयांकित क्षेत्र म्हणून वैद्यकीय क्षेत्रात दाखल होणारे अनेक विद्यार्थी समाजात दिसून येतात. मात्र, अंकुशचे वेगळेपण हे त्याच्या विचारात आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने घेत असलेल्या झेपेमध्ये आहे. नामांकित क्लासला प्रवेश घेत आणि त्यांच्यामार्फत प्राप्त अध्ययनाच्या साधनांचा वापर करत अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असतात. मात्र, अंकुशने मानव संसाधन मंत्रालयामार्फत जारी करण्यात आलेल्या ‘एनटीए अभ्यास’ या अ‍ॅपचा खुबीने वापर आपल्या अभ्यासात केला. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांची शैली ही अंकुशच्या हाताखालून गेली होती. त्याचा फायदा त्याला प्रत्यक्ष परीक्षेवेळी झाला.
 
 
अंकुशने केवळ ढोर मेहनत करून हे यश संपादित केलेले नसून, त्यास स्मार्ट विचारांची आणि अभ्यासाचीही जोड दिली आहे, हेच यावरून दिसून येते. जीवनात परिस्थिती कशी असावी, हे कोणाच्या हातात नाही. मात्र, असणारी चांगली परिस्थिती अबाधित ठेवणे आणि असणारी वाईट परिस्थिती बदलणे हे नक्कीच आपल्या हातात असते. हेच अंकुशने जाणले. त्यामुळे केवळ रडगाणे न गाता त्याने आपल्या परीने परिस्थितीचा सामना करण्याचे ठरवले. मेहनती स्वभाव हे आपले भांडवल आहे, हे त्याने जाणले. विद्यार्जन हे आपल्या स्थितीबदलाचे साधन आहे, हे त्याने अनुभवले. त्यातूनच त्याने हे यश संपादित केले. राज्यातील कोणत्याही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत अंकुश प्रविष्ट होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, सध्या शिंदे कुटुंबीय आणि अंकुश यांच्या समोर वैद्यकीय शिक्षणाच्या आर्थिक बाबींचे संकट आहेच, त्यामुळे तो आगामी खर्च कोणी उचलू शकेल काय, याच्या शोधात आहे. गुणवत्ता सिद्ध केलेल्या अंकुशचे स्वप्न साकारण्यासाठी नक्कीच आपला सहृदयी समाज पुढे सरसावेल, अशी अपेक्षा त्याचे कुटुंबीय बाळगून आहेत. अंकुशला त्याच्या भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.
 
 
@@AUTHORINFO_V1@@