दसर्‍याला शिमग्याच्या बोंबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2020
Total Views |

Uddhav Thackeray_1 &
 
 
 
“शेण आणि गोमूत्राने भरलेले तोंड, शेणाच्या नि गोमूत्राच्या गुळण्या” ही नाक्यावरच्या छपरी किंवा टपोरी पोराची भाषा नाही, तर हे शब्द आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे! आजकाल अशा शब्दांचा वापर करायला मवालीसुद्धा बिचकतात, तिथे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा वापर करून आपली पात्रता दसर्‍यालाही शिमग्याच्या बोंबा मारण्याइतकीच असल्याचे सिद्ध केले.
  
 
“तोंडात शेण भरून भरून गोमूत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावर टाकल्या, काय झालं? आता तेच शेण भरलेलं तोंड, गोमूत्र भरलेलं तोंड, ते गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा! स्वतः शेण खायचं आणि दुसर्‍याचं तोंड हुंगायचं! अरे, तुमच्याच तोंडाला आणि धोतराला वास येतो गोमूत्राचा, मी काय करू त्याला?” कोणत्याही नाक्यावरच्या छपरी किंवा टपोरी पोराची ही भाषा नाही, तर हे शब्द आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे! आजकाल अशा शब्दांचा वापर करायला मवालीसुद्धा बिचकतात, तिथे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांचा वापर करून आपली पात्रता शिमग्याच्या बोंबा मारण्याइतकीच असल्याचे सिद्ध केले.
 
 
गेल्याच आठवड्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करू नये,” असे म्हटले होते. त्यावर जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना, उद्धव ठाकरेंनी कोणता थिल्लरपणा केला, असा प्रश्न पडला. तसेच सत्ताधारी आणि विरोधक असा दोन्ही बाजूंनी ‘थिल्लरपणा’ या शब्दावरून वाद घातला गेला. पण, शिवसेनापक्षप्रमुखांनी देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे खरे करण्यासाठी आणि जयंत पाटील यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी, थिल्लरपणा करूनच दाखवतो, अशी प्रतिज्ञा केली. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी साडेतीन मुहूर्तांपैकी एक विजयादशमीचा दिवस निवडला आणि आपल्या तोंडाने थिल्लरपणा कसा असतो, हे अवघ्या जगाला सांगितले. मात्र, मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीचे इतके शिवराळ आणि दळभद्री भाषण महाराष्ट्राने आजपर्यंत कधीही पाहिले नव्हते, त्यांना ते पाहायला मिळाले नि प्रत्येकानेच असला इसम परत त्या खुर्चीवर बसलेला पाहायला मिळू नये, अशीच प्रार्थना केली असेल; अर्थात यामुळे उद्धव ठाकरेंना ‘जनाची नाही तर मनाचीही लाज’ वाटणार नाहीच. कारण, मौखिक अतिसार किंवा तोंडातून शी-शू करून दाखवायलाच तर ते खुर्चीवर बसलेत, दसरा मेळाव्यात बरळलेत, तेव्हा त्यांना शरम कसली?
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शाल पांघरलेल्या तथाकथित हिंदुत्वाचे तुणतुणेही दसरा मेळाव्यात वाजवले. त्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या विजयादशमी संबोधनातील निवडक शब्दांचा आधार घेतला. पण, सरसंघचालकांच्या मागे लपून स्वतःची बेइमानी, लफंगेगिरी लपविणार्‍या उद्धव ठाकरेंकडून संघ किंवा भाजपने हिंदुत्व म्हणजे काय, हे शिकण्याची वेळ अजून तरी आलेली नाही, ना भविष्यात कधी येणार. हो, पण ‘हिंदुफोबिया’ झालेल्या मुख्यमंत्र्यांनी शाखेत येऊन सरसंघचालकांकडे हिंदुत्वाची शिकवणी लावायची मागणी केली, तर जमल्यास त्याचा विचार होऊ शकतो. उलट दसरा मेळाव्यातील शिवसेनापक्षप्रमुखांचा एक एक शब्द ऐकला तरी त्यांनी हिंदुत्वाशी संबंध तोडून इस्लामी कट्टरपंथी आणि डाव्यांच्या रांगेत स्वतःला नेल्याचेच स्पष्ट होते. कारण, जिहादी-दहशतवादी किंवा मूलतत्त्ववादी हिंदूंना हीन लेखण्यासाठी, हिंदूंचा अपमान करण्यासाठी सातत्याने गायीचे शेण आणि गोमूत्राची खिल्ली उडवतात. हिंदुत्वाचा मुद्दा आला की, गायीचे शेण आणि गोमूत्र खाणार्‍या-पिणार्‍यांना कसली आलीय अक्कल? बिनडोक, मूर्ख, निर्बुद्ध म्हणूनच संबोधतात. त्यातून अर्थातच त्या प्रत्येकाचा स्वतःचा जो काही धर्म-पंथ-विचार असेल, तो अतिश्रेष्ठ आहे, हे दाखवून देण्याचाच प्रयत्न असतो. हिंदूंच्या मनात न्यूनगंड निर्माण व्हावा, यासाठीच तर कट्टरपंथी आणि डावी मंडळी असे बोलत असतात.
 
 
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीही तेच केले, त्यांच्या तोंडातून ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार’ करणारा नव्हे, तर हिंदुत्वाला जाळायला निघालेला जिहादी बडबडत असल्याचेच जाणवत होते. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘जैश-ए-मोहम्मद’च्या आदिल डार या दहशतवाद्याने एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यात तो म्हणतो की, “मला गायीचे गोमूत्र पिणार्‍यांना धडा शिकवायचाय, अद्दल घडवायचीय!” म्हणजेच हिंदूंवर वर्चस्व गाजवायचेय, असेच त्याला सांगायचे होते. उद्धव ठाकरेंनी रविवारच्या दसरा मेळाव्यात गायीचे शेण आणि गोमूत्राचा ज्या हेतूने उल्लेख केला, त्यातून त्यांचाही आदिल डारप्रमाणेच हिंदूंना हीन लेखण्याचाच उद्देश असल्याचे स्पष्ट होते. हिंदुत्वाच्या नावावर इतका दुटप्पीपणा उद्धव ठाकरेंशिवाय कोणी केला नसेल, ना करू शकेल, हेच शिवसेनापक्षप्रमुखांचे दसर्‍याचे भाषण ऐकले की समजते.
 
 
दरम्यान, बाबरी पाडल्याचे भाकड श्रेय घेण्याचा उद्योगही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. पण, रामजन्मभूमी आंदोलनात कोणाचा सहभाग होता, हे अख्ख्या देशाला ठावूक आहे. देशभरातूनच नव्हे, तर मुंबईतूनही त्यावेळी शेकडो स्वयंसेवक कारसेवेसाठी अयोध्येत गेले होते. पण, आज बाबरी-बाबरीचा जप करून स्वतःला ‘हिंदुत्ववादी’ म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे, तेव्हा कोणत्या बिळात दडून बसले होते, तेव्हा का कोणी ठाकरे कारसेवेसाठी अयोध्येत हजर नव्हते? याचे उत्तर आहे का, शिवसेनापक्षप्रमुखांकडे? वडिलांच्या नावावर स्वतः घरात अंडी उबवत बसणार आणि आव मात्र मारे रणांगण गाजविल्याचा आणणार, असा यांचा सारा कारभार, त्यांची रामजन्मभूमी आंदोलनाची किंवा बाबरी विध्वंसाचे नाव घेण्याइतकी तरी पात्रता आहे का? हा प्रश्न म्हणूनच विचारावासा वाटतो.
 
 
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाला एक वर्ष पूर्ण होत असून, या काळात राज्यावर अनेक संकटे आली. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापूर. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात त्याचा धडपणे उल्लेखही झाला नाही, ना शेतकर्‍यांना, व्यावसायिकांना मदतीसाठी घोषणा केली. वस्तुतः शिवसेनेची आगामी वाटचाल कशी असेल, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर कसे घेऊन जाणार, कोरोनामुळे उद्भवलेल्या रोजगाराच्या संकटावर मार्ग कसा काढणार याची माहिती, त्यासाठीच्या योजना, प्रकल्पांची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली असती, तर तितकेच जनतेलाही बरे वाटले असते. पण, ते नाही, शिवसेनापक्षप्रमुखांनी तसे काहीही केले नाही, उलट दसरा मेळावा आनंदाचा, सुखाचा उत्सव नव्हे, तर भाजपद्वेषाच्या जाहीर ओकार्‍या काढण्याचा उपक्रम असल्यासारखे भाषण केले. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाशब्दांत प्रगल्भता, विवेक नव्हे तर फक्त आणि फक्त भाजप, फडणवीस, मोदी-शाह विरोधाचा विखार दिसत होता.
 
 
दसरा मेळाव्याच्याच भाषणात उद्धव ठाकरेंनी बेइमानी करून मिळविलेले सरकार पाडून दाखवा, असे आव्हानही दिले. मुळात ज्या सरकारची खाट स्वतःहूनच अध्येमध्ये कुरकुरते, जिथे अंतर्विरोधाची, विसंगतीची ढीगभर उदाहरणे सांगता येतील, तिथे दुसर्‍याने ते सरकार घालविण्यासाठी जोर लावायचे कारणच काय? उद्धव ठाकरेंचे सरकार आपल्या कर्मानेच पडणार, तिथे धर्माने तसा प्रयत्न करण्याची गरजच काय? म्हणूनच उद्धव ठाकरेंनी तशी काही भीती बाळगू नये, तुमचे सहकारीच तुमचे सरकार पाडण्यासाठी समर्थ आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@