लिंगभेदापलीकडली मानवी प्रेरणा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2020   
Total Views |

Antara Shinde_1 &nbs
 
 
पूर्वाश्रमीचे आतिश शिंदे आता अंतरा शिंदे. किन्नर म्हणून जगताना आलेल्या अनुभवांची कटुता मनात न ठेवता, अंतरा यांनी कोरोनाकाळात अतुलनीय समाजकार्य केले. त्याचा हा मागोवा...
 
 
“तू, माझा मुलगा आहेस. हिंमत सोडू नकोस. जिद्दीने शिक, जे आयुष्य पदरात पडलंय त्यावर रडून काय उपयोग? जे आहे त्यात चांगलं जगण्याचा प्रयत्न कर बाळा.” शोभाबाई आतिशला समजावत होत्या. मुलाच्या डोळ्यातली आसवं थांबत नव्हती. हृदयात प्रचंड विस्फोट होत होता. आपणच असे का? आपलं पुढे काय होणार? पण, आईच्या समजाविण्याने आतिश शांत झाला. जे जगणं जगायचे होतं; ते स्वत्वाचा ठसा घेऊनच जगायचे, हे त्याने ठरवले. कोरोनाच्या काळात याच अंतराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने हजारो गरजूंना धान्यवाटप, गंभीर आजारी असलेल्या व्यक्तींना घरपोच औषध वितरण, कोरोनाच्या भीतीनेच अर्धमेले झालेल्यांना समुपदेशन, अशी कामे निर्भीडपणे केली. ठाण्यातील बाळकूम परिसरात अंतरा शिंदे यांचे नाव समाजसेविका म्हणून आदराने घेतले जाऊ लागले. कोरोनाकाळात कोरोनाला न घाबरता, अहोरात्र समाजाची सेवा करणार्‍या अंतरा शिंदे यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. पण, कोण आहे अंतरा शिंदे? आणि ती का बरं निराश होती?
 
 
 
मूळच्या श्रीवर्धनचे शिंदे कुटुंब. किसन शिंदे आणि शोभा शिंदे कामानिमित्त ठाण्याला बाळकूमला राहायला होते. किसन ट्रकवर क्लीनरचे काम करत, तर शोभा घरकाम. शोभा या दिव्यांग; पण दिव्यांग असल्याची निराशा त्यांना कधीच नव्हती. या दोघांना तीन अपत्य, त्यापैकी एक अंतरा. अंतरा जन्माला आली. मात्र, जन्मताच अंतराच्या आईबाबांना वाटले की, आपल्याला मुलगा जन्माला आला. त्यांनी त्या बाळाचे नाव आतिश ठेवले. सुरुवातीची काही वर्षे आतिशचे लाडकोड झाले. पण, काही वर्षांतच लक्षात आले की, आतिश हा काहीतरी ‘वेगळा’ आहे. जसे कळायला लागले, तसे आतिशला समजून चुकले की, बाबा किसन आपल्याला जवळही घेत नाहीत आणि आईचे आपण जीव की प्राण आहोत. वयाच्या पाचव्या वर्षी मग आतिशला आजीकडे कोकणात पाठवण्यात आले. गावी गेल्यावर आजी आणि मावशी होत्या. त्या दोघींनी आतिशला कायमच घरात ठेवले. पाच वर्षांचा आतिश धुणीभांडी, केरवारे करू लागला. मावशी, आजीला स्वयंपाकात मदत करू लागला. एकदा आई गावी आली आणि तिने आतिशला शाळेत टाकले. शाळेच्या निमित्ताने का होईना आतिश घराबाहेर जाऊ लागला. पण, घराच्या बाहेर पडल्यावर त्यांना काही विकृत लोक चिडवू लागले. बाहेर लोकांची छळवणूक आणि घरात सगळी कामं केलीच पाहिजेत ही पिळवणूक, अशा चक्रात आतिशचे जगणे सुरू झाले. आतिशला हा मानसिक कोंडमारा असह्य होऊ लागला.
 
 
आठवीची परीक्षा संपली होती. आई भेटायला आली. आतिश रडू लागला. आईला म्हणू लागला, “आई, मला तुझ्याकडे ने गं, मला जगणं असह्य झालं.” आईलाही सगळे माहिती होते. आतिशची काही चूक नसताना आतिशला लहानपणापासून खूप भोगावे लागले होते. शेवटी आईने ठरवले की, आतिशला सोबत घेऊन जायचे. समाजाच्या कठोर, अनाठायी नियमांनी ती घायाळ झाली होती. यापुढे आतीश आईसोबत ठाण्यात आला. नववीला शाळेत जाऊ लागला. किसन, आतिशचे वडील प्रेमळ होते. पण, लोकांच्या बोलण्याने तेही दुःखी होत. आतिश दहावीला असताना किसन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घराची संपूर्ण जबाबदारी शोभा आणि आतिशवर आली. आतिशही प्रथम संस्थेद्वारे चालविल्या जाणार्‍या शिकवणीमध्ये शिकू लागला. मेडिकलमध्ये नोकरी करू लागला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आतिश दहावी पास झाला. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, कसलीच सुविधा नाही, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि रात्रीची नोकरी यामुळे आतिश शिक्षणाकडे लक्ष देऊ शकला नाही. बारावीला अनुत्तीर्ण झाला. घरामध्ये आर्थिक चणचणही वाढली होती. अशातच आतिशचा संपर्क किन्नर समाजाच्या नायक बाळू भाऊ यांच्याशी झाला आणि किन्नर म्हणून समाजात वावरण्यासाठीची पूजा रीत करून आतिश ‘अंतरा’ झाले.
 
 
याबद्दलही त्यांच्या आईचे म्हणणे एकच होते. “तुला, जगण्यासाठी जसे जगावे लागेल, तसेच जग, बिलकूल उदास होऊ नकोस.” पॅण्ट-शर्ट ऐवजी साडी नेसल्यावर अंतराला खूप मोकळे वाटू लागले. आता ती किन्नरांप्रमाणे देवीपूजा आणि इतर व्यवहार करू लागली; अर्थात नातेवाइकांनी शोभा यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यावर शोभा म्हणत, “मग मी काय त्याला विष देऊ, मारून टाकू, लेकराला जगू द्याल की नाही,” आईचं प्रेम आणि मायेने अंतरामधली मान, संवेदना कायमच जीवंत राहिली. त्यामुळे कोरोना आल्यावर अरुण गव्हाणकर, विवेक कुलका या संघ स्वयंसेवकांच्या मदतीने अंतरा यांनी कोरोनाकाळात ठाणे परिसरात समाजकार्य केले. त्यांच्यासारख्यांना अंतरा संदेश देतात, “की शिका, आपणही माणूस आहोत, दुःखात कुढत जगू नका,” अंतरा आज समाजाला प्रेरणा देतात की, “जन्म घेणे आपल्या हातात नाही. पण, कर्म करणे तर आपल्याच हातात आहे.” अंतरासारख्या मानवशक्तीला मनःपूर्वक वंदन.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@